पुणे- शहरातील तीन बांधकाम व्यावसायिकाशी संबधित ४० ठिकाणांवर प्राप्ती कर विभागाने गुरुवारी एकाचवेळी छापे घातले आहे. प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात ही छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे.आयकर खात्याच्या पथकाने बांधकाम व्यावसायिकांचे कार्यालय आणि निवासस्थानी जाऊन कारवाई केलेली आहे. या कारवाईत काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त करण्यात आला आहे. पाषाण रस्त्यावरील सिंध सोसायटी आणि पिंपरी चिंचवड भागात संबधित कारवाई करण्यात आली.
या कारवाईत प्राप्तीकर विभागातील मुंबई, पुणे कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून एकूण २५० जण सहभागी झाले. प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करुन ४० ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले आहे.
औंध परिसरात सिंध सोसायटी ही उच्चभ्रू सोसायटी असून सदर ठिकाणी तीन बांधकाम व्यवसाय राहतात ते एकमेकांचे व्यावसायिक भागीदार असून आयकर विभागाच्या रडावर ते आलेले आहेत. आयकर विभागाने त्यांच्याशी संबंधित कार्यालय आणि निवासस्थानी आदी जागी बांधकाम व्यवसायातील आर्थिक व्यवहारात अनियमित असल्याचे सांगत कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी छापेमारी का करण्यात आली याबाबतचा अधिकृत खुलासा आयकर विभागांनी केलेला नाही.