श्री शक्तीदर्शन योगाश्रम, किन्नीगोळी आणि सुरभिवन गौशाळा यांच्या वतीने आयोजन ; ‘देशी’ – भारतीय गायींच्या लुप्त होत चाललेल्या जातीला वाचवण्याचा एक प्रयत्न
पुणे : समुद्र मंथनातून गोमाता कामधेनूची उत्पत्ती… पृथ्वीला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी भूमाताच गोमाता झाल्याची कथा… गाईची पूजा केल्यामुळे इंद्रदेवाने गोकुळात केलेला पावसाचा कहर… गोकुळवासियांना आणि गाईंना वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने करंगळीवर उचललेला गोवर्धन पर्वत… अशा विविध कथांच्या माध्यमातून ‘विश्वमाता गौमाता’ ही नृत्य नाटिका सादर झाली. भारतीय गायींचे महत्व आणि त्यांच्या लुप्त होत चाललेल्या जातीला वाचविण्याचा आणि संपूर्ण भारतभर गोमातेचे संरक्षण सुनिश्चित करण्याचा प्रयत्न या नाटिकेतून करण्यात आला.
श्री शक्तीदर्शन योगाश्रम, किन्नीगोळी आणि सुरभिवन गौशाळा – ओम प्रकृती धामा ट्रस्ट, कोंपंडावू यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात ‘विश्वमाता गौमाता’ या नृत्य नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगाभ्यासी आचार्य केदारनाथ, प.पू. गुरुजी देवदास राव (देवबाबा), कैलासनाथ नंदा, आदी मान्यवर उपस्थित होते. गोरक्षण व गोसंवर्धन चळवळीचे मूळ प्रवर्तक पूज्य गोजीवन श्री चौंडे महाराज प्रथम गोव्रती पुरस्कार श्री गोवर्धन महिला व बालविकास फाउंडेशन यांच्या तर्फे देवबाबा यांना देण्यात आला.
आत्तापर्यंत भारतातील विविध भागांमध्ये ‘विश्वमाता गौमाता’ चे ५५ प्रयोग झाले आहेत व हा ५६ वा प्रयोग आहे. तसेच एकूण १०८ प्रयोगांचा संकल्प करण्यात आला असून संपूर्ण भारत वर्षात त्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी परीक्षित राजाने गोहिंसकांना, गोहत्या करणाऱ्यांना दिलेली शिक्षा… आपल्या वासराला सिंहापासून वाचवण्यासाठी गाईने केलेला आक्रोश याच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक वर्ग थक्क झाला.
आचार्य केदारनाथ म्हणाले, आपल्या भारतीय संस्कृतीत जो आपल्याला चांगल्या गोष्टी देतो, मदत करतो त्याला आपण देव मानतो. मग गौमातेपासून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्यासाठी ती देवताच आहे, म्हणून तिचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे ही त्यांनी सांगितले.
देवदास राव म्हणाले, आपल्या प्राचीन धर्मग्रंथांनी गोमातेच्या अंगभूत गुणांचा गौरव केला आहे आणि गायीला विश्व मातेचा दर्जा दिला आहे. गाईवर तिच्या उत्पादनावर संशोधन झाले तर अनेक औषधी कंपन्या बंद होतील. गाय ही फक्त दूध देण्याचे मशीन नाही तर तिच्यामध्ये अनेक रोगांचे निवारण करण्याची शक्ती आहे. आपण गाईसाठी फक्त दुःख करतो परंतु तिच्यासाठी काम करण्याची तयारी दाखवत नाही. गाईचे संरक्षण करण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.