मुंबई-गुजरातमधून औरंगजेबचे चेले- चपाटे आले. पैशांच्या जोरावर पक्ष फोडण्यात आले. मात्र तरीही ते शिवसेना संपवू शकत नाहीत अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणजे पावसाळ्यात उगवणारी छत्री आहेत. त्यांच्या आजूबाजूला सर्व कलंकित लोक आहेत. फडणवीस जर चांगले गृहमंत्री असते तर अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात टाकले असते असे राऊत म्हणाले. आज प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे विधान केले आहे.
पुढे राऊतांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष केले आहे. ते म्हणाले, ”संघर्षातून उद्धव ठाकरे उभे राहत असतात. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी सत्ता, पैसा आणि दहशतीच्या जोरावर शिवसेना ओरबडून घेतली. आमचा पक्ष आणि चिन्ह गद्दारांच्या हातात सोपवले. मात्र ठाकरे जिद्दीने उभे राहिले. त्यांनी नव्याने पक्ष उभा केला. लोकसभेत 9 खासदार नवीन चिन्हावर निवडणून आणले. आता आम्ही विधानसभेच्या दिशेने मजबूत पाऊले टाकत आहोत. राज्यातील जनता बाळासाहेबांप्रमाणे ठाकरेंवर प्रेम करतात. त्यामुळे गुजरातमधून कितीही चेले- चपाटे आले तरी महाराष्ट्रात शिवसेनेला संपवता येणार नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथे केवळ शिवराय फॅन्स क्लब चालतो”, असे राऊत म्हणले.तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर राऊतांनी घणाघात केला आहे. ते म्हणाले, ”फडणवीस हे पावसाळ्यात उगवणारी छत्री आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशात मुख्यमंत्री नेमले गेले. तसेच त्या काळात अनेक अनुभवनी नेत्यांना डावलून फडणवीसांना मुख्यमंत्री केल्यामुळे ते जनतेला माहित झाले. फडणवीसांना तेव्हा नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. मात्र महाराष्ट्राला कलंकित करण्याचे राजकारण त्यांच्या नेतृत्वत सुरू झाले. त्यांनी राज्याला कलंकित केले”, असे राऊत म्हणालेपुढे ते म्हणाले, फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्र द्वेष करतो. फडणवीसांना जनता खलनायक मानते. यासाठी ते स्वतः जबाबदार आहेत. त्यांनी नेतृत्व करण्याची एक उत्तम संधी गमावली. भाजपने कपटनितीने राज्याचे केलेले नुकसान भरणे सोपे नाही. यासाठी आम्हाला सत्तेत यावेच लागेल. फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला. विरोधकांना संपवण्यासाठी गृह खात्याचा गैरवापर केला. त्यांच्या आजूबाजूला कलंकित लोक आहेत. ते जर चांगले रगृहमंत्री असते तर त्यांनी ५ मिनिटात अर्धे मंत्री मंडळ तुरुंगात टाकले असते”, अशी टीका राऊतांनी केली आहे.
आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त सांगलीत भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर झळकले आहे. याबाबत बोलतांना राऊतांनी महायुतीला टोला लगावला आहे. महायुतीमध्ये सात मुख्यमंत्रीपदाचे इच्छुक उमेदवार आहेत असा पुनरुच्चार राऊतांनी केला आहे. बॅनरबाबत बोलतांना राऊत म्हणाले, पोस्टर किंवा बॅनर लावायला आम्ही सांगत नाही. ती एक लोकभावना आहे. या माध्यमातून लोक भावना व्यक्त करत असतात. त्याबाबत कोणाला दुःख वाटण्याचे कारण नाही. काही पक्षांमध्ये तीन, तीन नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागतात. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी सात उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि देश संकटात असताना ज्या प्रकारे राज्य चालवले ते लोक विसरलेले नाहीत”, असे राऊत म्हणाले.