Home Blog Page 1554

नवीन इमारतीमुळे पक्षकाराला विनाविलंब न्याय मिळेल- न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी

परभणी : न्यायदानाचे पवित्र कार्य गतिमानतेने पूर्ण व्हावे, यासाठी पायाभूत सुविधांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे परभणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाला सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा नूतन इमारतीची गरज होती. या इमारतीचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण होऊन पक्षकाराला विनाविलंब न्याय मिळेल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. परभणी येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन व कोनशीला अनावरण समारंभ आज पार पडला. त्यावेळी न्यायमूर्ती श्री. सूर्यवंशी बोलत होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती यनशीवराज खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा न्यायाधीश -१ श्रीमती संध्या नायर व ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. दे. बा. नांदापूरकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

संस्थांच्या विकासविषयक कामांमध्ये वैयक्तिक हित आणि महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून संस्थेचे हित लक्षात घेतले पाहीजे.  सध्या न्यायालयाचे काम भरपूर वाढले असून पायाभूत सुविधा पूर्वीप्रमाणेच आहेत. म्हणून येथे नवीन इमारतीची अत्यंत आवश्यकता होती. ही इमारत निर्धारित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करून न्यायमूती श्री. सुर्यवंशी म्हणाले की, पालक न्यायमूर्ती म्हणून आम्ही दोघेही आवश्यक ते सहकार्य करून अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू. याकामी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून, त्याशिवाय न्यायदानाचे काम परिणामकारकरित्या पार पाडता येणार नसल्याचे न्यायमूर्ती सुर्यवंशी म्हणाले.

बार आणि बेंच एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, वकिलाच्या सहकार्याशिवाय न्यायदानाचे काम पूर्ण क्षमतेने पार पाडणे अशक्य आहे. त्यामुळे न्यायदानाच्या प्रक्रियेचे घटक असल्याचे सर्वांनी भान ठेवले पाहिजे. सोबतच न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असल्याचा सार्थ अभियान असायला हवा. तरुण वकिलांना ज्येष्ठ विधिज्ञ दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करतात; यापुढेही ते मार्गदर्शन करत राहतील, असा विश्वास न्यायमूर्ती सुर्यवंशी यांनी व्यक्त केला.

नूतन इमारत कोनशीला अनावरणाचा क्षण अत्यंत आनंद आणि गौरवाचा आहे, असे सांगून कंत्राटदारानेही न्यायदानाच्या वास्तूचे बांधकाम करत असल्याच्या शुद्ध भावनेने चांगले व वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे न्यायमूर्ती सुर्यवंशी यावेळी म्हणाले.

न्यायदानाचे पवित्र कार्य कुठेही करता येते. मात्र न्यायालय परिसरातील वातावरण चांगले राहिल्यास त्याला गतिमानता येते. ती गतिमानता येऊन प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली निघावीत, यासाठी सर्वोच्च न्यायालयापासून उच्च न्यायालयेही नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रकरणे विनाविलंब निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे परभणी येथे सर्व सोयीसुविधांनी युक्त इमारतीची आवश्यकता होती, ती आता पूर्ण होत असल्याचे न्यायमूर्ती यावेळी म्हणाले.

संत गाडगेबाबा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्य व जनजागृतीबाबत सांगून मुलांना मोबाईलपासून दूर ठेवत, त्यांना पुस्तक वाचनाकडे वळवण्याचे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती यनशीवराज खोब्रागडे यांनी केले. मुळात न्यायालयात प्रकरणे येण्यापूर्वी ती परस्पर आपसी किंवा मध्यस्थांमार्फत मिटविण्याच्या प्रयत्न केला पाहीजे. त्यातून कौटुंबिक स्वास्थ्य लाभते व त्यामुळे समाजात शांतता प्रस्थापित होते आणि न्यायालयीन प्रकरणे कमी करता येतील, असे ते म्हणाले. येथील न्यायालयाची जुनी इमारत कामकाजाच्या दृष्टीने अपुरी कमी पडत होती. त्यामुळे येथे नवीन वास्तू होणे आवश्यक होते. ही पाच मजली वास्तू सर्व सोयीसुविधांनी युक्त राहणार असल्याचे ते म्हणाले.

न्यायालयीन कामकाज पार पाडताना, प्रकरणे एकाच ठिकाणी का पडून आहेत. त्याचे सर्व संबंधितांनी आत्मचिंतन करण्याकडे न्यायमूर्तींनी लक्ष वेधले. तसेच प्रलंबित खटले लवकरात लवकर निकाली काढून न्यायदानाचे काम करण्याबाबत न्यायमूर्तीं खोब्रागडे यांनी सांगितले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून न्यायालयीन वास्तूबाबत सविस्तर माहिती विशद केली. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्रीमती स्वाती दाभाडे, तहसीलदार गणेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, श्री. इटकर यांच्यासह ज्येष्ठ विधीज्ञ व वकील यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपट्यांना जलार्पण करून करण्यात आली. जिल्हा वकील संघ, सार्वजनिक बांधकाम विभाग, कंत्राटदार, जिल्हा सरकारी अभियोक्ता कार्यालय आणि विविध तालुका वकील संघाच्यावतीने न्यायमूर्तीव्दयींचा शाल, श्रीफल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

गांधी विद्यालयाच्या वैष्णवी खापरे, वेदिका मुंढे, आर्या गिराम, साक्षी अमिलकंठवार, तबला वादक विष्णू टोणपे, पीयुष निलंगे, पेटीवादक वैष्णवी देशमुख यांनी स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन पेडगावकर आणि श्रीमती कामने यांनी तर आर. एन. काझी यांनी उपस्थितांचे आभार मानले

               परभणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीबाबत माहिती

  • पाच मजली नियोजित नूतन इमारत असून, ६८ कोटी ७९  लक्ष  ८ हजार रुपये खर्चाला मान्यता
  • सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग व सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांच्या देखरेखीखाली होणार काम
  • २ डिसेंबर २०२१ ला मिळाली प्रशासकीय मान्यता
  • रेन, रुफ वॉटर हार्वेस्टिंग, दिव्यांगाकरिता सरकता जिना, पाणीपुरवठा
  • तळमजल्यावर राहणार महिला आणि पुरुषांसाठी लॉकअप, मुद्देमाल रुम, रेकॉर्ड रुम, बँक, पोस्ट ऑफिस, एटीएम, कॅन्टीन, न्यायाधीशांसाठी वाहनतळ व्यवस्था
  • इतर मजल्यांवर कोर्ट हॉल, न्यायधीशांसाठी कॉन्फरन्स रुम, ग्रंथालय, ऑफिस, व्हीसी रुम, महिला व पुरुष वकील संघासाठी स्वतंत्र खोली आदी सुविधा राहणार आहेत.
  • या इमारतीमध्ये एकूण 22 कोर्ट हॉल असतील.
  • इमारतीचे बांधकाम 2 वर्षात पूर्ण होणार.

बँकेच्या ब्रँच मॅनेजरकडून ग्राहकास 27 लाख रुपयांचा गंडा

पुणे-

आयसीआय बँकेत ब्रांच मॅनेजर असलेल्या व्यक्तीने एका ग्राहकास सिक्युरिटीचे शेअर्स कमी किमतीत खरेदी करून देतो असे खोटे आश्वासन देऊन तब्बल 27 लाख 46 हजार रुपयांना फसविल्याचा ठपका ठेवत अशोक सूर्यकांत कदम (राहणार -पुणे )या आरोपीवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.याबाबत चेतन बळीराम इथापे (वय- 36, राहणार -वाघोली ,तालुका- हवेली, पुणे )यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार मे 2021 पासून ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन स्वरूपात घडलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी अशोक कदम हे आयसीआय बँक येथे मॅनेजर असून ते ब्रँच मॅनेजर असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी आयसीआयसीआय सिक्युरिटीचे शेअर्स कमी किमतीत खरेदी करून देतो असे खोटे आश्वासन एका ग्राहकाला दिले> त्यानंतर तक्रारदार चेतन इथापे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी ब्रांच मॅनेजर अशोक कदम यांनी फोन पे, गुगल पे व एनईएफटीद्वारे 69 लाख 46 हजार रुपये स्वतःच्या खात्यावर प्राप्त केले.

तक्रारदार यांच्या आयसीआय सिक्युरिटी पोर्टफोलिओ मध्ये बनावट एन्ट्री करून ती खरी आहे असे सांगून व भासवून त्यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास कोरेगावपार्क पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एम. वराळ हे करत आहे.

वनाज सोसायटीच्या माजी अध्यक्षांसह तीन पदाधिकारी आणि दोन लेखा परिक्षकांवर 33 लाख रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल

पुणे -शहरातील कोथरूड परिसरातील वनाज सहकारी गृह रचना संस्थेच्या माजी अध्यक्षांसह तीन पदाधिकारी आणि दोन लेखा परिक्षकांनी तब्बल 33 लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून या पाच जणांवर कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी अध्यक्ष दीपक चव्हाण, माजी सचिव नितीन सुर्वे, माजी खजिनदार प्रकाश सोलकर (सर्व रा. वनाज सोसायटी, कोथरूड,पुणे), लेखा परिक्षक एम.आर. सलगर (रा. साडे सतरा नळी, हडपसर, पुणे) आणि लेखा परिक्षक धनश्री रत्नाळीकर (रा. पाषाण, पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नवे आहेत.

याबाबत लेखा परिक्षक प्रतिभा सुरेंद्र घोडके (वय- 51, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. सदरचा प्रकार हा सन 2014-15 ते सन 2018-19 दरम्यान वनाज सहकारी संस्था येथे घडला आहे. वनाज सहकारी गृह रचना संस्थेचे संबधित आरोपी पदाधिकारी असताना त्यांनी 33 लाख 22 हजार 387 रूपये रक्कमेचा अधिकारात बेकायदेशीर गैरवापर केला. त्यांनी सदर रक्कमेचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपहार केला. हे संस्थेच्या अभिलेखावर असतानाही त्याचे लेखा परिक्षण करणारे लेखा परिक्षक सलगर व रत्नाळीकर यांनी वास्त परिस्थिती व आर्थिक बाबी त्यांचे लेखा परिक्षण अहवालात न मांडता, वनाज संस्थेचे नमूद पदाधिकारी आरोपी यांनी केलेल्या अपहारास संगणमताने सहाय्य केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहे.

‘राजर्षी’ चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन संपन्न

‘ साई वाणी ’ प्रोडक्शन संस्थेतर्फे राजर्षी छत्रपति शाहू महाराज यांच्या कल्याणकारी विचारांवर आधारित ‘राजर्षी‘ या सामाजिक मराठी नियोजित चित्रपटाच्या पोस्टरचे  प्रकाशन आज पुण्यात  हॉटेल प्रेसिडेंट येथे समारंभपूर्वक करण्यात आले. या चित्रपटात राजर्षी छत्रपति शाहू महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील नानासाहेब करपे यांच्या हस्ते व सहकार्यांच्या उपस्थितीत प्रकाशन केले गेले. या आगामी चित्रपटाचे लेखक, पटकथा व संवाद लेखन  राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पवार असून धनंजय भावलेकर चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. याचे निर्माते सुदर्शन विष्णू ढेरे असून पुणे, सातारा, कोल्हापूर येथे चित्रीकरण पूर्ण होऊन या वर्षअखेर डिसेंबर महिन्यात हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. राजर्षी छत्रपति शाहू महाराज यांनी केलेला शिक्षण प्रसार व त्यासाठी केलेली वस्तीगृहांची सोय, युवकांना मार्गदर्शन, आरक्षण अशा विविध महत्वाच्या विषयांवर हा चित्रपट प्रकाश टाकेल. राजर्षी छत्रपति शाहू महाराजांच्या उदात्त व प्रेरणादायी विचारांचा जागर या चित्रपटाच्या रूपाने तरुण पिढीसह सर्वांना पाहायला मिळेल असे अभिनेते सुनिल करपे यांनी याप्रसंगी सांगितले. या प्रसंगी प्रमुख अभिनेता सुनील नानासाहेब करपे यांच्या समवेत दिग्दर्शक धनंजय भवलेकर, निर्माते सुदर्शन विष्णू ढेरे, उद्योजिका चित्रा मेटे, पुणे बार असोसिएशन – खजिनदार ॲड समीर बेलदरे व अन्य सहकारी उपस्थित होते.

राज्यातील मधमाशा पालकांसाठी ‘मधुमित्र’ पुरस्कार

पुणे दि. ५: राज्यातील मधमाशा पालकांना राज्यस्तरीय मधुमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने राज्यातील मधमाशा पालनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी सभापती रवींद्र साठे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.

राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळ मधमाशापालनाच्या विविध योजना राबवित आहे. राज्यात मधमाशापालनाला खूप मोठा वाव आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मधमाशापालनाकडे वळावे, या बाबत लोकांच्यात जनजागृती व्हावी आणि मधमाशापालनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी यावर्षीपासून ‘मधुमित्र’ या पुरस्कारांची घोषणा केली आहे. मधमाशा पालनात भरीव काम करणाऱ्या महिला व पुरुष मधपाळांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.

या पुरस्कारांचे वितरण २० मे या जागतिक मधमाशी दिनानिमित्त महाबळेश्वर येथील मध संचलनालय येथे होणार आहे. पुरस्कारामध्ये रोख रक्कम, शाल श्रीफळ व सन्मानपत्राचा समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये जास्तीत जास्त मधपालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री.साठे यांनी केले आहे.

खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सर्व जिल्हा कार्यालयांत पुरस्कारासाठी अर्ज उपलब्ध आहेत. अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत १२ मे पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी डी.आर.पाटील ( ९४२३८६२९१९) यांच्याशी संपर्क साधावा.
0000

शरद पवारांनीअध्यक्षपदीच राहावे, राजीनामा नामंजूर

राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल्ल पटेलांनी मांडले 2 प्रस्ताव

मुंबई-येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू झाली आहे . प्रफुल्ल पटेल यांनी दोन प्रस्ताव मांडले. त्यातला पहिला प्रस्ताव शरद पवार यांनी अध्यक्षपदी कायम रहावेत. तर दुसरा प्रस्ताव शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केल्याचा आहे.जे एकमताने मंजूर करण्यात आले आहेत .निवड समितीत हे २ ठराव मंजूर करण्यात आले आहेत .

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आणि समितीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली तेव्हा त्यांनी आपल्या निर्णयासाठी थोडा वेळ हवा असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती पटेल पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

अध्यक्ष निवडीच्या समितीत कोण आहे?

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच नरहरी झिरवळ, फौजिया खान,धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.

शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने एकमताने फेटाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे, अशी शरद पवारांना विनंती करणार आहेत, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.

प्लॅन ए आणि प्लॅन बी काय होते ते पहा …

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य समिती आज दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडणार होती . प्लॅन ए आणि प्लॅन बी असे दोन महत्त्वाचे प्रस्ताव समितीकडून मांडले जातील. पहिल्या प्रस्तावात शरद पवार यांनी आपल्या पदावर कायम राहावं असा निर्णय समिती देणार आहे.

पहिल्या प्रस्तावाला शरद पवार कायम नसतील तर मात्र समिती दुसरा प्रस्ताव मांडणार होती . दुसऱ्या प्रस्तावात एकमतानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना समर्थन द्यावं, असं सुचवण्यात येणार आहे.
शरद पवारांनंतर सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुप्रीया सुळेंच्या व्यतिरिक्त इतर कोणाचंही नाव चर्चेत नाही, अशी माहिती मिळत होती.

– शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. शरद पवारच राहणार अध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतला मोठा निर्णय.

– समितीची शिफारस शरद पवारांना कळवणार. पवारांनी समितीचा निर्णय यापूर्वीच मान्य असल्याचे म्हटले आहे. आता ते काय निर्णय घेतील, याकडे लक्ष आहे.

– कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या भावुक झालेल्या कार्यकर्त्याला इतरांनी रोखले.

– मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्याने आत्महदहनाचा प्रयत्न केला.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विविध जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन ते प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्याकडे पाठवले आहेत. प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. शरद पवार यांच्या निर्णयानंतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना तीव्र धक्का बसला आहे. पवार यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्र राज्य व देशाला आजच्या कठीण काळात अत्यंत आवश्यक्ता आहे.

शरद पवार यांनी जाहिर केलेल्या निर्णयानंतर धाराशीव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील शेतकरी बळवंत थिटे यांनी शेतातील चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया या शेतकऱ्याने दिली आहे.

गावागावातून लोक थिटे यांच्या शेतात

बळवंत थिटे हे पवारांचे जुने कार्यकर्ते आहेत. शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे यासाठी या शेतकऱ्याने 1993 ते 2014 या काळात आपली दाढी वाढवून समर्थन केले होते. आता देखील ते थिटे करत सत्याग्रहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. तसेच थिटे यांचे हे झाडावर चढून सुरु असलेले आंदोलन पाहण्यासाठी गावागावातून लोक थिटे यांच्या शेतात येत आहेत.

दीपक मानकरांना लोकसभेसाठी कॉंग्रेस पक्षातून मोठा पाठींबा

पुणे- एकीकडे दीपक मानकर जर पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून लढले तर लोकसभेत आपण इच्छुक म्हणून देखील नाव मागे घेऊ अशी भाजपमधील ‘हिरो’ पदाधिकाऱ्यांनी भूमिका कालच घेतली तर दुसरीकडे दीपक मानकर यांनी कॉंग्रेसकडून लोकसभा लढवावी असा मोठा आग्रह काल दिसून आला. काल मानकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या भेटीसाठी गुप्ते मंगल कार्यालयात रीघ लागली होती.वाढदिवसाच्या शुभेछ्या द्यायला आलेल्या प्रत्येकाच्या मुखी लोकसभेच्या निवडणुकीबाबत आणि मानकर यांच्या उमेदवारीची चर्चा होती.पुणे लोकसभा मतदार संघ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत तसेच महाविकास आघाडीत देखील कॉंग्रेसकडे येतो.परंतु येथून कॉंग्रेसचा पराभव देखील तेवढाच निश्चित मानला जातो,कसब्यात रवी धंगेकर निवडून आल्यावर कॉंग्रेसच्या आशा पल्लवित झाल्यात.परंतु धंगेकर यांनी कसबाच्याच गड राखावा,लोकसभेच्या रिंगणात धंगेकर पार्ट २ चालेल काय ? याबाबत अनेकांना शंका आणि रिस्क वाटते आहे.धंगेकर यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी दिली गेली तर भाजपा कडून संजय काकडे आणि मोहोळ यापैकी कुणाला तरी उमेदवारी मिळेल असे बोलले जाते.आणि धंगेकर यांना विजय कठीण होऊन बसेल असा अनेकांचा अंदाज आहे. पार्ट १ चालला म्हणून पार्ट २ चालेल अशी अपेक्षा नेत्यांनी करू नये असे मत अनेकांचे आहे.धंगेकर वगळले तर कॉंग्रेस कडे लोकसभा लढविण्यासाठी मातब्बर उमेदवार इच्छुकांच्यात नाहीच असेहि काही मान्यवरांचे म्हणणे आहे.आणि मानकर कॉंग्रेस मधूनच राष्ट्रवादीत आलेले आहेत.राष्ट्रवादीत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहेच,पण त्यांचे अजूनही कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्त्यां मध्ये ९० टक्केहून अधिक हितचिंतक आणि चाहते आहेत.या सर्वांनी,भाऊ तुम्ही कॉंग्रेस कडून लढा,विजय निश्चित आहे.दादांशी,ताईंशी बोलून हवा तर निर्णय घ्या असा आग्रह मानकर यांना केल्याचे समजले आहे. शिवसेनेत देखील मानकर यांचे चाहते आहेत.आणि भाजपचे एक महत्वाचे पदाधिकारी तर खाजगीत म्हणालेत ,भाऊंना जर अधिकृत उमेदवारी मिळाली तर आम्हाला कठीण होईल,मग इच्छुकांच्या यादीतूनही मला नाव मागे घ्यावे लागेल.

एकंदरीत लोकसभेची पोटनिवडणूक होईल कि नाही ? कि लोकसभा २४ लाच सर्व बरोबरच होईल.अशा शंका असताना मानकर यांच्या उमेदवारीसाठी मात्र मोठी लोकशक्ती एकवटते आहे असे दिसून येते आहे.

चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविणात येणाऱ्या राज्य शासनाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : चर्मकार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी अर्ज करण्याचे तसेच, केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभासाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर जिल्हा व्यवस्थापक आरती पुराणिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाची (चांभार, मोची, ढोर, होलार) आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य शासन अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येतात, तर केंद्र सरकारतर्फे एन.एस.एफ.डी.सी. योजना राबविण्यात येते.

अनुदान योजना व बीजभांडवल योजनेअंतर्गत परिपूर्ण कागदपत्र असलेले कर्ज प्रस्ताव स्वीकारले जातील. तसेच एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केलेले असून ज्याची लाभार्थी निवड समितीमार्फत निवड झाली आहे, अशा लाभार्थ्यांची यादी महामंडळाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. संबंधित पात्र अर्जदारांनी परिपूर्ण कागदपत्रांसह मुंबई शहर जिल्हा कार्यालय, खेरवाडी, वांद्रे येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती पुराणिक यांनी केले आहे.

प्रकल्प रखडवणाऱ्या आणि विस्थापित झालेल्या कुटुंबांना भाडे न देणाऱ्या विकासकांवर कारवाई करा– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वंकष आढावा घेऊन धोरण निश्चित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विशेषतः  दादर परिसरातील विकासकांमुळे रखडलेल्या ५६ प्रकल्पांबाबत नोडल अधिकारी तसेच आर्किटेक्ट नियुक्त करण्यात यावा. या प्रकल्पांचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटसह, विविध पर्याय तपासण्यात यावे. प्रकल्प रखडवणाऱ्या आणि विस्थापित झालेल्या कुटुंबांना भाडे न देणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखालील दादर परिसरातील पुनर्विकास रखडलेल्या इमारतींच्या रहिवाश्यांच्या शिष्टमंडळासमवेत आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. बैठकीस  गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, म्हाडाच्या मुंबई इमारत व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरूण डोंगरे आदी उपस्थित होते.

बैठकीत आमदार श्री. सरवणकर यांनी दादर परिसरातील उपकर प्राप्त इमारतीच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांची माहिती दिली. या परिसरातील अशा रखडलेल्या ५६ इमारतींमधील सुमारे साडेतीन हजार कुटुंबांची परिस्थिती बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावर निर्देश देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या प्रकरणाचे गांभीर्य आमदार श्री. सरवणकर यांनी संवेदनशीलपणे अनेकदा दाखवून दिले आहे. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांबाबत धोरण निश्चित करण्याची गरज आहे. यासाठी आम्ही काम देखील सुरु केले आहे. विशेषतः दादर परिसरातील या ५६ इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाची सर्वंकष माहिती घेण्यासाठी, प्रत्येक इमारतीचे प्रश्न वेगळे असतील, तर त्याबाबत अभ्यास कऱण्यासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येईल. तसेच एक आर्किटेक्टही नियुक्त कऱण्यात येईल. जेणेकरून या क्लस्टर डेव्हलपमेंटसह अन्य कोणते पर्याय आहेत, ते अभ्यासले जाईल.

या दरम्यान म्हाडाने विहीत नियमानुसार पुनर्विकास रखडवणाऱ्या विकासकांवर कारवाई करावी. त्यांना नोटीस देणे, प्रकल्प अधिग्रहीत करण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी. काही विकासक पुनर्विकसित इमारतीतील जागा देण्याबाबत या कुटुंबांना टाळाटाळ करत असतील, तर त्यांनाही समज देण्यात यावी. गेली कित्येक वर्षे पुनर्विकास रखडल्याने मुंबईतील या मूळ घर मालकांना मुंबईच्या बाहेर जावे लागले आहे. यामध्ये शासन म्हणून लक्ष घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. रखडलेले हे पुनर्विकासाचे म्हाडाप्रमाणेच अन्य यंत्रणांच्या माध्यमातून कसे पूर्ण करता येतील यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.

यावेळी उपस्थित रहिवाश्यांनीही आपले म्हणणे मांडले. या सर्वांचे म्हणणे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी आस्थेवाईकपणे ऐकून घेतले. या नागरिकांच्या तक्रारी-म्हणण्याची म्हाडाने नोंद घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

विविध संस्था संघटनाद्वारे संभाजी गार्डन येथे ईद मिलन कार्यक्रम साजरा

पुणे-आपल्या देशात कायमच मिली-जुली संस्कृती राहिली आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण या द्वेषाने भरलेल्या समाजात प्रेमाचे दुकान उघडण्याची जबाबदारी आपली आहे असं मतमाजी न्यायमूर्ती बी .जी. कोळसे पाटील यांनी मांडले. निमित्त होते लोकायत, मराठा सेवा संघ, भिम आर्मी (बहुजन एकता मिशन), मूलनिवासी मुस्लिम मंच, युनिक फाऊंडेशन आयोजित पैग़ाम-ए-अमन या सांस्कृतिक कार्यक्रमाचे. लोकायतच्या समन्वयिका अलका जोशी कार्यक्रमाचा उद्देश सांगताना म्हणाले कि आपल्या संत परंपरेने समता, बंधुता, मानवता यांसारख्या मूल्यांची जपणूक करत तिचा प्रचार-प्रसार केला. हीच मूल्यं आपल्या देशाच्या संविधानातही आली आहेत. म्हणूनच सर्व मिळून सर्व सण साजरे करणं ही आपली परंपरा राहिली आहे. याच भावनेतून प्रेम, शांती आणि सद्भावनेचा संदेश देणाऱ्या ‘पैगाम-ए-अमन’! हा गाणी, कविता आणि शेर-ओ-शायरीचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम ईदनिमित्त आयोजित केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळ तिवारी,माजी नगरसेवक अविनाश बागवे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन कदम, नितीन जाधव, मराठा सेवा संघाचे सचिन आडेकर, युनिक फाऊंडेशनचे विशाल जाफरी यांनीही आपले मनोगत मांडले. या कार्यक्रमात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला शहर अध्यक्षा मृणालिनी वाणी, भिम आर्मी(बहुजन एकता मिशन)चे दत्ता पोळ, मूलनिवासी मुस्लिम मंचचे अंजुम इनामदार, समाजकल्याण विभागाचे सुशीलकुमार शिंदे, अधिकारी म्हस्के, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, अंगणवाडी कर्मचारी सभा, पथारी पंचायत, रिक्षा पंचायतचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. पुणे पोलीस परिमंडळ १, डेक्कन पोलीस स्टेशन यांचे कार्यक्रमात विशेष सहाय्य लाभले. ईद मुबारकचा सेल्फी पॉईंट, पताकांची व लाईट माळांची सजावट, रांगोळीने कार्यक्रम अधिक उठावदार झाला. प्यार बाटते चलो, चल चलिए हि गाणी, मैं खीर तू शीरकुर्मा हा हिंदू-मुस्लिम संस्कृती एक्य सांगणारा रॅपही घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी शिरकुर्म्याचा आस्वाद घेतला. मराठा सेवा संघाचे सचिन आडेकर यांनी आभारप्रदर्शन मांडले.

कुस्तीगीर महिलांच्या लढ्याला अभिव्यक्तीचा पाठिंबाअभिव्यक्तीकडून शहरात विविध ठिकाणी जनजागृती अभियाने

पुणे : देशाच्या राजधानीत सूरू असलेल्या कुस्तीगीर महिलांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी अभिव्यक्तीकडून शहरात विविध ठिकाणी जनजागृती अभियाने राबवली. डी मार्ट, वारजे, महात्मा गांधी रस्ता, पुणे कॅम्प आणि कलाकार कट्टा इथे राबवली गेली.
यावेळी पुणेकर नागरिक-विद्यार्थी-विद्यार्थिनी-महिला यांच्याशी या घटनेला धरून महिला संघटनांच्या असणाऱ्या विविध मागण्यांविषयी चर्चा झाली. जसं एखादी महिला म्हणत असेल की तिच्यावर अत्याचार झाला आहे, तर हो झाला आहे. तिच्यावर अत्याचार कधी झाला आणि ती आत्ता बोलतेय हे गौण मुद्दे आहेत. राजकीय रंग देण्याआधी ती महिला माणूस असून तिचा मानभंग झाला आहे, खेळाडू महिलांवर ही परिस्थिती ओढवत असले तर देशातल्या सामान्य महिलेने कुठे आणि कशी दंड मागायची यावर नागरिक चर्चा करत होते. एकूणच या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला.
त्यानिमित्ताने संबंधित घटनेविषयी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने महिला कुस्तीगीरांवर होत असलेल्या लैंगिक शोषणाच्या विरोधात सरकारने कोणतीच कायदेशीर कारवाई केलेली नाही याचा अभिव्यक्ती संघटना तीव्र निषेध करत आहे. या अन्यायाविरोधात कुस्तीगीर महिलांनी वाचा फोडत उभ्या केलेल्या लढ्याला अभिव्यक्ती संघटना पाठिंबा व्यक्त करत आहे. या खेळाडूंच्या सत्काराच्या वेळी मात्र या महिला खेळाडू देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत, अशी खोटीच कौतुकाची थाप द्यायची, बेटी बचाओ बेटी पढाओ, मातृवंदन, नारी शक्ती अशी विशेषणे वापरायची आणि वास्तवात मात्र स्त्रियांच्या संरक्षणासाठी कोणतीही आवश्यक ठोस कृती करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नसलेल्या आणि स्त्री म्हणजे केवळ उपभोगाची वस्तू आहे अशा विचाराच्या या सरकारचा अभिव्यक्ती संघटना निषेध करते आहे. ब्रिजभूषण शरण सिंह आणि इतर आरोपींना त्वरित अटक करावी, सर्व क्रीडा महासंघ आणि क्रीडा संकुल, या ठिकाणी लैंगिक छळ विरोधी कायद्यांतर्गत समित्या स्थापन कराव्यात, तक्रारदारांना संरक्षण देऊन त्यांना धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करावी, पॉक्सो, कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि लैंगिक अत्याचार विरोधी अन्य दखलपात्र कलमांचा वापर करून आरोपींवर त्वरित गुन्हे दाखल करावेत या मागण्याही अभिव्यक्ती यावेळी करत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विषय तज्ज्ञांच्या सेवा उपलब्धतेसाठी शासन निर्णय निर्गमित

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या विविध पदभरती परीक्षांच्या गोपनीय कामासाठी विषयतज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

आयोगाच्या गोपनीय व संवेदनशील कामकाजासाठी काही वेळेस शैक्षणिक संस्थांमधील संबंधित विषयांतील तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करुन घेताना आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा परिणाम परीक्षांच्या वेळापत्रकावर होतो. परिणामी शासन सेवेत कामकाज करण्यासाठी आवश्यक उमेदवार वेळेवर मिळू शकत नाहीत. त्यामुळे पुरेशा मनुष्यबळाअभावी शासकीय कामकाजाच्या गतिमानतेवर परिणाम होत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन विविध शैक्षणिक संस्थांमधील विषय तज्ज्ञांच्या सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगास उपलब्ध व्हाव्यात याकरिता या शासन निर्णयाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

या शासन निर्णयान्वये संबंधित सर्व शैक्षणिक संस्थांमधील अध्यापकीय संवर्गातील विषय तज्ज्ञांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सोपविण्यात आलेली गोपनीय व संवेदनशील कामे आयोगाने विहित केलेल्या कालमर्यादेत व दर्जात्मक स्वरुपात पूर्ण करुन देणे बंधनकारक राहणार आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विहित केलेल्या कालमर्यादेत संबंधित विषयतज्ज्ञांची सेवा आयोगास उपलब्ध करुन देणे उपरोक्त शैक्षणिक संस्था प्रमुखांवर बंधनकारक राहणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विषयतज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी निगडित कामकाजासाठी समन्वयक म्हणून क्षेत्रीय स्तरावरील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजाच्या आवश्यकतेनुसार विषय तज्ज्ञांच्या सेवा आयोगास उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक सहकार्य करण्याची जबाबदारी अशा समन्वयकांवर राहणार आहे, असेही शासन निर्णयात म्हटले आहे.

0000

नामांकित शास्त्रज्ञ हनीट्रॅपमध्ये अडकला; महिला समजून ISI गुप्तहेराला दिली गोपनीय माहिती,पुण्यात एटीएसकडून अटक

६ वर्षे दिवंगत शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासमवेत विविध प्रकल्पांत काम केलेला शास्त्रज्ञ

पोखरण येथे केलेल्या अणुस्फोट चाचण्यांसाठी निवडलेला शास्त्रज्ञ

पुणे- येथील संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) संचालक तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना दहशतवादविरोधी प्रतिबंधक पथकाने (एटीएस) अटक केली आहे. पाकची गुप्तचर संघटना अायएसआयच्या हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकर यांनी संरक्षण विभागाची संवेदनशील माहिती पाकिस्तानास पुरवल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे कुरुलकर यांच्या निवृत्तीला सहा महिनेच शिल्लक असताना हनीट्रॅपसारख्या प्रकारात अडकल्याने खळबळ उडाली आहे.क्षेपणास्त्र तंत्रज्ञान, लष्करी उपकरणे, रोबोटिक्स व लष्करात उपयोगी ठरणाऱ्या मानवरहित मोबाइल तंत्रज्ञान, उपकरणांचे डिझाइन तसेच विकासात कुरुलकर यांचे प्रावीण्य होते. त्यांनी ६ वर्षे दिवंगत शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासमवेत विविध प्रकल्पांत काम केले होते. सन १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने पोखरण येथे केलेल्या अणुस्फोट चाचण्यांसाठी निवडलेल्या ३५ शास्त्रज्ञांमध्ये त्यांचाही समावेश होता. मात्र निवृत्तीला ६ महिने बाकी असताना हनीट्रॅपमध्ये अडकल्याने त्यांच्या कारकीर्दीला बट्टा लागला.

पुण्यातील डीआरडीओ कार्यालयात बुधवार, ३ मे रोजी ड्यूटीवर असताना कुरुलकर यांनी पाकिस्तानी आयएसआयच्या हस्तकाशी व्हाॅट्सअॅप व्हाॅइस मेसेज आणि व्हिडिओ कॉलवर संपर्क साधून त्याला संरक्षण दलाची अत्यंत संवेदनशील व गोपनीय माहिती पाठवली. कुरुलकरविरोधात मुंबई येथील काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या मोहापायी देशद्रोह

कुरुलकर हे फेसबुक व व्हॉट्सअॅप मेसेज, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एका महिलेच्या संपर्कात आले. प्रत्यक्षात महिलेचे छायाचित्र असलेले ते बनावट फेसबुक खाते होते. ते एक आयएसअाय हस्तक चालवत होता. महिलेच्या नादाने कुरुलकर चॅटमध्ये गोपनीय माहिती पुरवत होते. डीअारडीओच्या कार्यालयात बसूनही हे उपद्व्याप सुरू होते.

यंदा दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखी सोहळा:यशस्वीतेसाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे, दि. ४: आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठक डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपयुक्त ए. राजा, पिंपरी चिंचवड परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त ॲड. विकास ढगे-पाटील, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. माणिक मोरे आदी उपस्थित होते.

यंदा दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखी सोहळा होत आहे त्यामुळे सर्व विभागांनी संपूर्ण तयारी गतीने करावी, असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, यंदा भारतीय हवामानशास्त्र विभागाने अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड मनपा, नगरपरिषदा तसेच सर्व स्थानिक यंत्रणांनी पाणीपुरवठ्याबाबत दक्ष रहावे. पालखी जूनमध्ये निघणार असल्याने उष्णतेचा घटकही लक्षात घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील पालखी सोहळा हा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक सोहळा असून सर्वांच्या सहभागातून शांततेत, आनंदात व सौहार्दात हा सोहळा यशस्वी करू. भाविकांची कोणतीही अडचण होणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी पालखी मार्ग, पालखी तळ, विसाव्यांची संयुक्त्त पाहणी केली आहे. पालखी सोहळा प्रमुखांसमवेत समन्वयाने काम सुरू आहे. पाहणी आणि बैठकीत निदर्शनास आलेल्या बाबींच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांनी आपापल्या विभागांकडील कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत.

पाणीपुरवठ्याचे टँकर आणि शौचालयांच्या संख्येत गतवर्षीपेक्षा वाढ करण्यात येईल. पालखीला टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व स्रोतांची तपासणी करावी. आवश्यक ती निर्जंतुकीकरणाची औषधे, दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास ती तात्काळ काढून टाकण्यात यावीत असे निर्देश त्यांनी दिले.

पोलीस अधीक्षक श्री. गोयल म्हणाले, पालखीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल. पालखी सोहळ्याच्या मार्गावरील वाहतूक वळविण्याबाबत अगोदर पूर्वप्रसिद्धी करण्यात येईल. पालखी सोहळा व्यवस्थापकांनीही पुरेसे स्वयंसेवक नेमावेत, अशीही सूचना श्री. गोयल यांनी केली.

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता, अन्न व औषध प्रशासन, महावितरण आदी विभागांकडून पूर्वतयारीचा आढावा घेतला.

बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, श्री संत तुकाराम महाराज देवस्थान, श्री संत सोपानदेव महाराज देवस्थान, श्री संत चांगावटेश्वर महाराज देवस्थान पदाधिकारी, उपविभागांचे प्रांताधिकारी, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, महानगरपालिका, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्य विभाग, पोलीस, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
0000

मनु कुमार श्रीवास्तव यांनी घेतली राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदाची शपथ

मुंबई, दि. 4 : लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी मनु कुमार श्रीवास्तव यांना राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त पदाची शपथ दिली.

आज मंत्रालयात राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त, आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त या पदांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बलदेव हरपाल सिंग यांना राज्य लोकसेवा हक्क आयुक्त पदाची (कोकण, महसूल विभाग) आणि भूपेंद्र एम.गुरव यांना राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ न्यायमूर्ती श्री. कानडे यांनी दिली.

या सोहळ्यास मुख्य सचिव मनोज सौनिक, उपलोकायुक्त संजय भाटिया, सर्व विभागीय लोकसेवा हक्क आयुक्त, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकसेवा हक्क आयुक्त, पुणे दिलीप शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी केले.