Home Blog Page 1395

धनकवडीतील अट्टल गुन्हेगार विकी फुंदेवर एम.पी.डी.ए. ची कारवाई

पुणे- सहकारनगर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील सहकारनगर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे विकास उर्फ विकी रोहिदास फुंदे, वय-३६ वर्षे, रा. बी / ८ / २, चव्हाणनगर, धनकवडी, पुणे सध्या बिबवेवाडी पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता, चाकु या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खूनाचा प्रयत्न, दिवसा व रात्री घरफोडी चोरी, चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द १० गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम. पी. डी. ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे सुरेंद्र माळाळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे, ए. टी. खोबरे आणि त्यांचे अधिपत्याखालील पोलिस अधिकारी व पोलिस अमलदार यांनी सदरची कामगिरी पार पाडली.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मा. पोलीस आयुक्त यांनी चालू वर्षामध्ये दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या ५७ कारवाया केल्या आहेत. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

धनकवडीत अल्पवयीन मुलांनी भरधाव वेगात गाडी चालवत अनेक वाहनांना उडवले

पुणे- सहकारनगर येथे सातारा रोडवर अल्पवयीन मुलांनी भरधाव वेगात गाडी चालवत अनेक वाहनांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी अल्पवयीन मुलांना चोप दिला आहे. घटनेची माहिती मिळताच सहकार नगर बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. ही मुले भावाला न सांगता गाडी घेऊन रस्त्यावरती आल्याचे तपासात समोर आले आहे.

 धनकवडीमध्ये भरधाव वेगातील चारचाकी गाडीने सात ते आठ वाहनांना धडक दिली. या घटनेत तीनजण जखमी झाले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.17) दुपारी दोनच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पठार परिसरातील एक अल्पवयीन मुलगा आपल्या मित्राबरोबर आय ट्वेंटी चारचाकीमधून राऊंड मारत असताना धनकवडी येथील सावरकर चौकात एका रिक्षाला धडक दिली. अपघात झाल्यामुळे तसेच चौकातील नागरिक मागे लागल्याने अल्पवयीन मुलाने घाबरून भरधाव वेगात पळवली. त्यात रस्त्यात सात ते आठ वाहनांना धडक देत सातारा रस्ता, बालाजीनगर परिसरात नागरिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्पवयीन मुलाने भावाला न सांगता मित्रालासोबत घेऊन गाडी रस्त्यावर आणली.त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. वाहनांना धडक दिल्यानंतर स्थानिक तरुणांनी त्याचा पाठलाग करुन त्याला गाठत चोप दिला.

मिलन लुथरियाच्या दिग्दर्शनाच्या अभूतपूर्व यशानंतर ” सुलतान ऑफ दिल्ली ” चा सीझन 2 येणार ?

 मिलन लुथरियाची यांची वेब सिरीज, ” सुलतान ऑफ दिल्ली ” ने अवघ्या काही दिवसात प्रेक्षकांची मन जिंकली. त्याच्या आकर्षक कथानकाने आणि उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांना मोहित केले आहे. ही वेब सीरिज नक्कीच कमालीची ठरली वेगवेगळ्या घटकांना एकत्र घेऊन येऊन ती आकर्षक ठरली. 

 लुथरियाचे उत्कृष्ट दिग्दर्शन उत्तम स्टार कास्ट याला सर्वत्र प्रशंसा मिळाली असून यातली पात्र आणि कथा याची प्रशंसा सगळेच करतात. शोचे यश केवळ त्याच्या थरारक कथानकाच्या ट्विस्टमध्येच नाही तर प्रतिभावान कलाकारांनी सादर केलेल्या आकर्षक कामगिरीमध्येही आहे. सीझन 1 ने प्रेक्षकांना आपलंसं तर केलं पण आता चाहत्यां ना उत्सुकता आहे ती म्हणजे सीझन 2 चीमिलन लुथरियाच्या निपुण कथाकथनाने डिजिटल मनोरंजनाच्या लँडस्केपवर एक अमिट छाप सोडली आहे ज्यामुळे त्याला प्रशंसा मिळाली आणि आता सगळेच नव्या सीजन ची आतुरतेने वाट पाहत आहेत आता लुथरिया पुन्हा एकदा नवा सीजन घेऊन येणार का हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

चित्रकारांच्या गटाकडून दुर्गम भागात दिवाळी सरंजाम भेट 

पुणे :पुण्यातील तरुण चित्रकारांच्या गटाने चित्रकार सुरेंद्र कुडपणे आणि धनश्री काळे यांच्या नेतृत्वाखाली धानिवली वस्ती (ता.भोर) येथे दिवाळी सरंजाम भेट देऊन वंचितांची दिवाळी साजरी केली. या दुर्गम भागात  जेथे गाडी जात नाही अशा ठिकाणी पाच तासाचा प्रवास डोंगरउतार कडे चढुन, उतरून जाऊन हा उपक्रम साजरा केला. चित्रकारांच्या या गटाकडून दर वर्षी एका वस्तीवर दिवाळी सरंजाम,धान्य,फराळ भेट देवून सामाजिक दृष्टिकोन जपला जातो. चित्रकार सुरेंद्र कुडपणे आणि धनश्री काळे यांच्या नेतृत्वाखाली धनश्री काळे, जय कुडपणे, विनोद रघुवीर ,राम धानवले यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. महेंद्र थोपटे, सनी कुडपणे, विजय  धनावडे, महेश टेंकाळे, वर्षा रसाळे, रीना शहा,प्रकाश ढगे, कैलास गाढवे, राहुल म्हेत्रे, गायत्री पाटील,रीना शहा,संगीता होनराव, साची होनराव, सई होनराव , अनिकेत देशमुख, धनंजय कोटकर, अमित बेलदरे पाटील, कुणाल बेलदरे पाटील , सौ.देवयानी नलावडे , स्वाती जरांडे ,रामदास कांबळे या सर्वांचे सहकार्य या उपक्रमाला मिळाले. 

फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार २२ नोव्हेंबर पासून होणार सुरू

·         प्रत्येकी १० रुपये (“इक्विटी शेअर”) दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी १३३ रुपये ते १४० रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित. प्रत्येक इक्विटी शेअरसाठी १० रुपयांचा एम्प्लॉई डिस्काऊंट

·         फ्लोअर प्राइस १३.३० पट आहे आणि कॅप प्राइस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या १४.००  पट आहे;

·         बोली/ऑफर बुधवार २२ नोव्हेंबर २०२३ रोजी खुली होईल आणि शुक्रवार २४ नोव्हेंबर २०२३ रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख मंगळवार २१ नोव्हेंबर २०२३ असेल

·         बोली किमान १०७ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर १०७ इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

·       आरएचपी लिंक   

https://www.icicisecurities.com/Upload/ArticleAttachments/Fedbank%20Financial%20Services%20Limited%20-%20RHP.pdf

पुणे, १७ नोव्हेंबर २०२३: फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (“कंपनी”)ची प्राथमिक समभाग विक्री बुधवार २२ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होईल. प्राथमिक समभाग विक्रीमध्ये ६०० कोटी रुपयांपर्यंत (“फ्रेश इश्यू”) इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा समावेश आहे आणि विक्री समभागधारकांद्वारे ३५,१६१,७२३ पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची विक्रीची ऑफर (“विक्रीची ऑफर” आणि ताज्या इश्यूसह एकत्रितपणे “ऑफर”) समाविष्ट आहे.

प्रमुख गुंतवणूकदार बोलीची तारीख मंगळवार २१ नोव्हेंबर २०२३ असेल. ऑफर बुधवार २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सदस्यत्वासाठी खुली होईल आणि शुक्रवार २४ नोव्हेंबर २०२३ रोजी बंद होईल.

प्रत्येक इक्विटी शेअरसाठी १३३ रुपये ते १४० रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान १०७ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर १०७ इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. ऑफरमध्ये कर्मचार्‍यांसाठी प्रति इक्विटी शेअर १० रु. च्या सवलतीवर १० कोटी रुपयांपर्यंत राखीव संच समाविष्ट आहे.

कंपनीने फ्रेश इश्यूमधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा विनियोग व्यवसाय आणि मालमत्तेच्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या कंपनीच्या भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या टियर – I भांडवलाचा आधार वाढवण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पुढे, फ्रेश इश्यूमधून मिळालेल्या रकमेचा एक भाग ऑफर खर्च पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल.

विक्रीच्या ऑफरमध्ये फेडरल बँक लिमिटेड (“प्रवर्तक”) द्वारे ५,४७४,६७० इक्विटी शेअर्स आणि २९,६८७,०५३ पर्यंत ट्रू नॉर्थ फंड VI LLP (“गुंतवणूकदार विक्री समभागधरक”) यांचा समावेश आहे.

या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे एक्सचेंजेस BSE लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) आहेत. ऑफरच्या उद्देशासाठी नियुक्त स्टॉक एक्सचेंज हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड असेल.

ऑफरमध्ये पात्र कर्मचारी (“कर्मचारी आरक्षण भाग”) च्या सदस्यत्वासाठी एकूण १० कोटी रुपये राखीव आणि कर्मचारी आरक्षण भागामध्ये पात्र कर्मचारी बोलीसाठी ऑफर किंमतीच्या प्रति शेअर १० रु पर्यंत सवलत समाविष्ट आहे. (“कर्मचारी सवलत”)

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१८च्या सुधारित (“SEBI ICDR Regulations”) नियम ३१ सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स १९५७च्या १९(२)(ब) सुधारित नियमावलीनुसार  ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या ६(१) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 50 % पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (Anchor Investors) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल.

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, म्युच्युअल फंडांची एकूण मागणी निव्वळ QIB भागाच्या 5% पेक्षा कमी असल्यास, म्युच्युअल फंड भागामध्ये वाटपासाठी उपलब्ध शिल्लक इक्विटी समभाग QIBs च्या उर्वरित QIB भागाच्या प्रमाणात वाटपामध्ये जोडले जातील.

तसेच, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी अ) एक तृतीयांश भाग 200,000 रुपयांपेक्षा जास्त आणि 1,000,000 रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि ब) बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीतील दोन तृतीयांश भाग 1,000,000 रुपयांपेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 35% पेक्षा कमी नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना (“रिटेल श्रेणी”) उपलब्ध होईल.  ऑफरच्या किमतीवर किंवा त्याहून अधिक मान्यताप्राप्त बोली साठी हे लागू असेल.

पुढे, कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणार्‍या पात्र कर्मचार्‍यांना त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या वैध बोलींच्या अधीन किंवा ऑफर किमतीच्या वर इक्विटी समभागांचे वाटप प्रमाणानुसार केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या बँक खात्यांचा तपशील (युपीए आयडीसह) जाहीर करून अर्जाची विहित रक्कम ब्लॉक (“ASBA”) करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. पुढे, कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणार्‍या पात्र कर्मचार्‍यांना त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या ऑफर किमतीवर किंवा त्याहून अधिक ऑफर किमतीच्या बोलीवर इक्विटी समभागांचे वाटप प्रमाणानुसार केले जाईल. तपशीलांसाठी, आरएचपीचे पृष्ठ 450 पासून सुरू होणारी “ऑफर प्रक्रिया” पहा.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, बीएनपी परिबास, इक्वीरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड  आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.

आतंकवादाचा प्रतिशोध घेणाऱ्या इस्रायलच्या समर्थनार्थ पुण्यात पदयात्रा

‘हर घर सावरकर’ समिती आणि ‘भारत इस्रायल मैत्री मंच’ यांच्या वतीने आयोजन
देशप्रेमी बांधवांकडून भ्याड आक्रमणाचा निषेध तसेच मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली 

पुणे : ‘हर घर सावरकर’ समिती आणि ‘भारत इस्रायल मैत्री मंच’ यांच्या वतीने आतंकवादाचा प्रतिशोध घेणाऱ्या इस्रायलच्या समर्थनार्थ तसेच या आक्रमणात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
वीर सावरकर स्मारक येथून पदयात्रा सुरु  होऊन टिळक रस्ता येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल’ येथे यात्रेची सांगता झाली. या पदयात्रेत विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत इस्रायलला  पाठिंबा दर्शवला. भारत इस्रायल मैत्री मंचचे रणजीत नातू, विद्याधर नारगोलकर, पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक,  विराट हिंदुस्थान संगमचे जगदीश शेट्टी, इस्त्रायली नागरिक अदेलीया पेनकर, विश्व हिंदू परिषद, हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना, यांच्यासह ३०० देशप्रेमी बांधव सहभागी झाले होते.  

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर म्हणाले, इस्रायल हे आतंकवादाचा प्रतिशोध घेत आहे. आतंकवादाचा प्रतिशोध घेणाऱ्या इस्रायलच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. 
देवव्रत बापट म्हणाले, हमास या आतंकवादी संघटनेच्या आक्रमणापासून आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी इस्रायलने प्रत्युत्तर दिले आहे. हमासच्या भ्याड आक्रमणाचा निषेध करण्यासाठी, तसेच या आक्रमणात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी  पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
ससून फणसपुरकर, इस्रायली नागरिक अदेलीया पेनकर, हिंदु जनजागृती समितीच्या क्रांती पेटकर यांनी मनोगत व्यक्त केले. या पदयात्रेला भारतात राहणारे इस्रायली बांधवही सहभागी झाले होते.

आठ महिन्यात मध्य रेल्वेने केली एक लाख मोटारींची वाहतूक

पुणेमध्य रेल्वेने 1 एप्रिल ते 15 नोव्हेंबर या आठ महिन्यांहून कमी कालावधीत 1 लाख एक हजार 443 मोटारींची वाहतूक केली. यातून मध्य रेल्वेला 120 कोटी 18 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ही वाहतूक मागील वर्षीच्या तुलनेत 36 टक्क्यांनी अधिक असून यावर्षीच्या मोटारींच्या वाहतुकीत पुणे विभाग अग्रस्थानी आहे.

एक एप्रिल ते 15 नोव्हेंबर या कालावधीत 708 रेकमधून एक लाख एक हजार 443 मोटारींची वाहतूक झाली. ऑटोमोबाईल उद्योगाला रेल्वे विभागाची मोठी मदत होत असून यामुळे वाहनांची देशभर वाहतूक करणे सोयीचे जात आहे. मागील वर्षी एक एप्रिल ते 15 नोव्हेंबर या कालावधीत मध्य रेल्वेने 613 रेकमधून 74 हजार 168 ऑटोमोबाईल लोड केल्या. त्यातून रेल्वेला 94 कोटी 19 लाख रुपयांचा महसूल मिळाला.मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कळंबोली, नागपूर विभागातील अजनी, भुसावळ विभागातील नाशिकरोड, सोलापूर विभागातील दौंड आणि विलाड तर पुणे विभागातील खडकी, चिंचवड, मिरज आणि लोणी येथे वाहतुकीसाठी मोटारींचे लोडिंग करण्यात आले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, मारुती उद्योग अशा नामांकित ऑटोमोबाईल कंपन्या मध्य रेल्वेच्या प्रमुख ग्राहक आहेत. या कंपन्यांच्या वाहनांची रेल्वेने नियमितपणे वाहतूक केली जाते.

पुणे विभाग यामध्ये पहिल्या स्थानावर आहे. एक एप्रिल ते 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 491 रेकमध्ये 79 हजार 136 मोटारींची वाहतूक करण्यात आली. मागील वर्षी याच कालावधीत 381 रेकमध्ये 49 हजार 945 मोटारींची वाहतूक झाली.भुसावळ विभाग दुसऱ्या स्थानवर आहे. या विभागाने चालू आर्थिक वर्षात 183 रेकमध्ये 18 हजार 224 मोटारी लोड केल्या. मागील वर्षी याच कालावधीत 155 रेकमध्ये 15 हजार 852 मोटारी लोड केल्या होत्या.सोलापूर विभाग तिसऱ्या स्थानावर असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या साडेसात महिन्यात 22 रेकमध्ये 2 हजार 580 मोटारी, नागपूर विभागाने 8 रेकमध्ये एक हजार 203 मोटारी तर मुंबई विभागाने 4 रेकमध्ये 300 मोटारी लोड करत त्यांची वाहतूक देशाच्या विविध भागात केली आहे.

‘रूफ टॉप हॉटेल’सह, साइड आणि फ्रंट मार्जिनमधल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा- आयुक्त

पुणे -शहरातील रूफ टॉप हॉटेल विरोधात  महानगरपालिका आक्रमक झाली असून  महापालिकेच्या तक्रारीनंतर  जिल्हाधिकारी कार्यालयाने शहरातील 26 बेकायदा ‘रूफ टॉप हॉटेल’ना नोटीस बजावली. या नोटिसला हॉटेल चालकांनी उत्तर दिल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले.शहरात सुमारे शंभर ‘रूफ टॉप हॉटेल’ आहेत. शहरात ‘रूफ टॉप हॉटेल’ ही संकल्पना एकत्रित बांधकाम नियमन आणि विकास नियमावलीत नाही. त्यामुळे ही सर्व हॉटेल बेकायदा असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. अशा ‘रूफ टॉप हॉटेल’मध्ये आगीच्या घटना घडल्या होत्या. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती झाल्यास जीवितहानीचीही भीती आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे या हॉटेलवर कारवाई केली जाते. या कारवाईत हॉटेलचा बराच भाग उतरवला जातो.

कारवाईनंतर काही दिवसांतच ही हॉटेल पुन्हा सुरू होतात. या हॉटेलना जिल्हा प्रशासनाच्या उत्पादन शुल्क विभागातर्फे मद्य परवाना दिला जातो. त्यामुळे या हॉटेलचा परवानाच रद्द करावा, अशी शिफारस महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाला केली होती; तसेच यापुढे हॉटेल व बारना परवाने देण्यापूर्वी महापालिकेचे ‘ना हरकत पत्र’ घ्यावे, अशी शिफारसही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.

‘रूफ टॉप हॉटेल’सह, साइड आणि फ्रंट मार्जिनमध्ये उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, पंधरा दिवसात त्याचा अहवाल सादर करा,’ असा आदेश आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या सर्व कनिष्ठ अभियंत्यांना दिला होता. त्यानुसार बांधकाम विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.

त्यात शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ‘रूफटॉप हॉटेल’ बंद करावीत, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमली आहे. ‘पालिकेच्या विनंतीनुसार मद्य परवाने देण्यात पालिकेच्या एका अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे; तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी 26 रूफ टॉप हॉटेल्सना नोटीस बजावली आहे,’ असे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले

विघ्नहर्ता पथकातर्फे १६०० किलो ‘धान्यरुपी जोगवा’ संस्थांना सुपूर्द

सामाजिक संस्थांना दिवाळी भेट ; सण – उत्सवात वादन करून जमा केलेला शिधा
पुणे : गणेशोत्सव, नवरात्र , दिवाळी यांसारख्या सण उत्सवांमध्ये विविध ठिकाणी वादन करून मिळालेल्या निधीतून गोळा केलेला धान्यरूपी जोगवा पुण्यातील सामाजिक संस्थांना दिवाळी भेट म्हणून देण्यात आला. तब्बल १६०० किलो धान्य विविध सामाजिक संस्थांना विघ्नहर्ता वाद्य पथकातर्फे सुपूर्द करण्यात आले.

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ गणेश मंदिरासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (निवृत्त) चंद्रशेखर दैठणकर, खडक पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने, पथकाचे सिद्धेश्वर दळवी, गौरव देवकर, ऍड. वृषाली मोहिते, सिद्धार्थ घटकमल, प्रथमेश पिसे, अंकुश गुप्ता, सचिन गायकवाड, विद्या मोहिते, श्रावणी काकडे, तेजश्री सुमंत, समर्थ घटकांबळे आदी उपस्थित होते.

भोर वेळवंड येथील समर्थ विद्या प्रसारक मंडळी, वाघोली येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याणकारी संस्था, संतुलन पाषाण वाघोली या सामाजिक संस्थांना हा धान्यरूपी जोगवा देण्यात आला. यामध्ये गहू, तांदूळ रवा, पोहे, शेंगदाणे इत्यादी प्रकारचे धान्य tतसेच तेल, साखर, चहा पावडर, मसाले, बिस्किटे, कांदे, बटाटे, केळी यांचा देखील समावेश होता. तसेच संतुलन पाषाण या संस्थेला चंद्रशेखर दैठणकर यांच्या वाढदिवसानिमित्त इन्वर्टर भेट देण्यात आले.

चंद्रशेखर दैठणकर म्हणाले, ज्यांना गरज आहे, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणे आवश्यक आहे. समाजात अशा अनेक संस्था आहेत, ज्या चांगले काम करीत आहेत. त्यांना आपण मदतीचा हात द्यायला हवा, असेही त्यांनी सांगितले. सुनील माने यांनी मनोगत व्यक्त केले.

मराठ्यांना चारही बाजूने पडलेला वेढा मोडून काढायचाय-मनोज जरांगे पाटील

सांगली- मराठ्यांची ताकद आज राज्याला दिसतेय. चारही बाजूने मराठ्यांना घेरले जात आहे, आपल्याला हे षडयंत्र मोडून काढायचे, सावध राहा, गाफील राहू नका, 70 वर्षापासून मराठ्यांना वेढा पडलाय, हा वेढा तोडायचा आहे. आज समितीला पुरावे सापडले आहे. मराठा 50 टक्क्यांच्या आतमध्येच आहे. मराठा ओबीसी आरक्षणात आहे हे सिद्ध झाले आहे, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसी प्रवर्गात सामाविष्ट व्हायचे असेल तर कुठल्याही जातीला निकष पूर्ण करावे लागतात. मराठा समाजाने हे सर्व निकष पूर्ण केलेत. विदर्भात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश केला. व्यावसायावर आधारित जाती निर्माण झाल्या, त्यावर आरक्षण मिळाले असेल तर आमचाही व्यवसाय शेती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता इथून पुढच्या काळात आपल्या लेकरांचे वाटोळे होऊ द्यायचे नाही. आपल्या मुलांना सावली मिळण्यासाठी आज आपल्याला उन्हात बसावं लागेल. सांगलीत प्रचंड संख्येत जमलेल्या लोकांनी मराठ्यांची एकजूट दाखवली. एकजुटीशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रातील मराठा समाजाला माझे आवाहन आहे, की, आता एकजूट दाखवण्याची गरज आहे. बिगर कामाचे कळप एकत्र यायला लागलेत. आपली जात वाचवणे गरजेचे आहे. त्यासाठी आरक्षण असलेल्या आणि नसलेल्या मराठा बांधवांनी ताकदीने एकजूट दाखवा. मी मराठा समाजाला पाया पडून विनंती करतो. आपल्याला आव्हान पेलायचे आहे. स्वत:च्या लेकरांच्या हितासाठी लढायचे आहे. आपली जात उद्ध्वस्त होता कामा नये. पोरं संपली तर जात संपली, पोरांचे करिअर बर्बाद होऊ देऊ नका. आजपासून प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदारी आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुमची जात ओबीसी आरक्षणात गेली, ती कुठल्या आधारे गेली हे सांगा. या राज्यात मराठ्यांची त्सुनामी आली आहे. एवढ्या ताकदीने समाज आज रस्त्यावर उतरला आहे. आरक्षण नसलेल्या भावाच्या मदतीला ज्या मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे, त्यांनी मदतीला या. आपल्याला लढून वेढा तोडायचा आहे. माझ्या सांगण्याकडे मराठा समाजाने बारकाईने लक्ष द्या, आम्ही संपलो तर उद्या मराठ्यांना संपवायला मागेपुढे पाहणार नाही. मराठ्यांची लेकरं पुढे जाऊ नये असा चंग बांधला आहे. यांचे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही. आमचे आरक्षण 70 वर्ष खाल्ले आहे. ज्या ज्या वेळी समिती झाल्या तेव्हा प्रत्येक समितीने पुरावे दिले. परंतु तरीही मराठ्यांना आरक्षण दिले नाही. मराठ्यांच्या ताकदीवर हे पुरावे आता समोर आलेत. मराठ्यांना आरक्षण मिळाले असते तर सर्वात प्रगल्भ जात मराठाच राहिली असती असेही त्यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, एकही राजकारणी आपल्याला मदत करणार नाही, कुणीही राजकीय नेता आपल्या मदतीला येणार नाही. तुम्ही त्यांना साहेब म्हणता, साहेबांना मोठे केले, त्याच्या वडिलांना मोठे केले. मात्र ते आपल्याला मदत करायला येणार नाही. प्रत्येक पक्षाला मराठ्यांनी मोठे केले. सगळ्यांनाच मोठे व्हायला मदत केली. त्या नेत्यांना आपण मोठे केले कारण आपल्या बापजाद्यांना वाटले होते की हा माणूस मोठा झाला की आपल्या लेकराबाळांना मदत करेल. मात्र एकही राजकीय नेता आपल्याला मदत करत नाही. त्यामुळे आपण त्याला मोठे केले कशाला? असाही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला 70 वर्षांपूर्वी आरक्षण दिले असते तर मराठा जात प्रगत झाली असती. मराठ्यांचे पुरावे असतानाही मराठ्यांना आरक्षण दिले नाही आणि पुरावे ही सापडू दिले नाहीत. आज तेच पुरावे बाहेर निघालेत फक्त मराठ्यांच्या ताकतीवर आणि एकजुटीवर हे पुरावे बाहेर आल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यांच्या या आंदोलनाला राज्य सरकारने प्रतिसाद दिला. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याविषयी न्यायमूर्तींची समिती गठित केली. ही समिती तिचे काम करत आहे.

मराठ्यांची वाताहत कुणी केली? तुमचा खरा शत्रू ओळखा, गोपीचंद पडळकर यांचा शरद पवार यांच्यावर थेट हल्ला

अंबड-मराठा समाजाची वाताहत कुणी केली? तुमचा खरा शत्रू ओबीसी नाही. तुम्हीच तुमचा खरा शत्रू ओळखा, अशा शब्दात अंबड येथे शुक्रवारी झालेल्या ओबीसींच्या एल्गार परिषदेत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. पण त्यांना 346 जाती असणाऱ्या ओबीसी वर्गातील जातींना धक्का न लावता आरक्षण द्या. या प्रकरणी ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला तर अवघा महाराष्ट्र पेटून उठेल.ओबीसींची ही सभा पाहून आमच्याविरोधात काम करणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला पाहिजे. देशात ओबीसी आरक्षणासाठी अनेक आंदोलने उभी राहिली, त्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळाले. या आरक्षणात काटे आणण्याचे काम काही जण करत आहेत. त्यांना सरळ करण्याचे काम या ओबीसींमध्ये आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. पण ओबीसीमधील 346 जातींच्या आरक्षणाला हात लावता काम नये, असेही गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसीच्या आरक्षणाला नख लावण्याचा प्रयत्न झाला तर ओबीसी समाज प्रस्थापितांना उत्तर देईल. मराठा समाजाने या प्रकरणी आपली वाताहत कुणी केली हे ओळखावे. ओबीसी समाज मराठ्यांचा शत्रू नाही. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला जसे आरक्षण दिले, तसेच आरक्षण मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.गोपीचंद पडळकर यांनी यावेळी मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे तोंड भरून कौतुक केले. आजच्या दिवसाची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल. गटातटात विभागालेले ओबीसीचे नेते आता एकत्र आलेत. ओबीसींना सहजपणे आरक्षण मिळाले नाही. त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. पण आता काही जण आरक्षणासाठी त्याची वाटमारी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.

आता ओबीसी समाज जागा झाला आहे. छगन भुजबळ ओबीसींचा ढाण्या वाघ आहे. वाघ म्हातारा झाला तरी तो डरकाळी फोडणे थांबवत नाही. म्हातारा झाला तरी तो गवत खात नाही. आम्ही सर्वजण छगन भुजबळ यांच्या पाठिशी आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.गोपीचंद पडळकर म्हणाले, महात्मा फुले, सावित्री फुले यांचे रक्त आमच्या रक्तात सळसळत आहे. अन्यायाविरोधात बंड केले पाहीजे, हा महात्मा फुलेंचा मंत्र तंतोतत पाळण्याचे काम छगन भुजबळांनी केले आहे. पडळकर म्हणाले, गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे, याला आमचा विरोध नाही. परंतू ३४६ जातींचा समावेश असलेल्या ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहीजे, ही आमची भूमिका आहे. अजूनही ओबीसीमधील अनेक जातींना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. अनेक जाती अशा आहेत ज्यामधील व्यक्तींना अजून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य होता आलेले नाही. त्यामुळे ओबीसींच्या या आरक्षणाला धक्का लावला तर ओबीसी चवताळून उठल्याशिवाय राहणार नाही.पडळकर म्हणाले, ओबीसीत अजून कितीतरी जातसमूह अजून वंचित आहेत. त्यामुळे छगन भुजबळांनी जी भूमिका घेतली आहे, ती अतिशय योग्य आहे. महाराष्ट्रातील ५ कोटी धनगर समाज भुजबळांच्या सोबत आहे. मराठा समाजाची वाताहत कोणी केली? मराठा समाजाचा विरोधक कोण आहे? ओबीसी मराठ्यांचा शत्रू नाही. मराठा समाजातील नेतेच या समाजाचे शत्रू आहेत. ओबीसी फक्त स्वत:चे आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व ओबीसींनी एकत्र येण्याची गरज आहे. .प्रस्थापितांना आपल्याला आता टक्कर द्यायची आहे. यासाठी ओबीसींची एक मोट बांधण्याची गरज आहे.

टोपे अन् रोहित पवारांनी जरांगेंना उपोषणाला बसवले, भुजबळांचा आरोप

जालना-जालन्याच्या आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील आपल्या घरात जाऊन झोपले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे व रोहित पवार यांनी त्यांना उठवून उपोषण स्थळी नेऊन बसवले, असा मोठा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी केला.

जालना जिल्ह्यातील अंबड येथे शुक्रवारी ओबीसींचा महामेळावा झाला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी लाठीचार्जनंतर पडद्यामागे घडलेला घटनाक्रमही सांगितला.छगन भुजबळ यांनी सांगितले की, आंतरवाली सराटीत पोलिसांनी केलेला लाठीचार्ज सर्वांनी पाहिला. त्यात महिला पोलिसांसह जवळपास 70 पोलिस कर्मचारी जखमी झाले. हे पोलिस पाय घसरून पडले का? पोलिस तिथे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते. पण त्यांनी त्यांना थोड्या वेळाने येण्यास सांगितले. त्यानंतर पोलिस उपोषणस्थळी गेले असता त्यांच्यावर दगडांचा मारा करण्यात आला. त्यात अनेकजण जखमी झाले, असे छगन भुजबळ म्हणाले.

लाठीचार्ज झाल्यानंतर हे शूर सरदार (मनोज जरांगे) पळून जावून आपल्या घरात जाऊन झोपले. त्यांना राजेश टोपे व रोहित पवार यांनी मध्यरात्री 3 वाजता जाऊन त्यांना उठवले. त्यांना शरद पवार साहेब येणार असल्याचे सांगितले. तसेच उपोषणस्थळी जाऊन बसण्याची सूचना केली. त्यानंतर पवारांनी त्यांची भेट घेतली. पण जरांगेंनी पवारांना लाठीचार्ज का झाले हे सांगितले नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.पवार साहेबांना आम्ही आजसुद्धा उत्तम प्रशासक मानतो. त्यांना वस्तुस्थिती समजली असती तर एक वेगळा प्रकार झाला नसता. मराठा तरुणांना असणारी सहानुभूती गेली नसती. लाठीचार्जनंतर घडलेल्या घटनांत सर्वांचीच चूक होती. पोलिस अधीक्षकही चूकले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना मारहाण झाल्याचे सांगण्याची गरज होती. त्यांनी माफी मागितली. यामुळे देशापुढे खरे चित्र आलेच नाही. आम्ही बोललो तर आमच्यावर तुफान टीका झाली, असे छगन भुजबळ म्हणाले.बीडमध्ये कोड नंबर देऊन राजकीय नेत्यांची घरे व कार्यालये जाळण्यात आल्याचा दावाही भुजबळ यांनी यावेळी केला. प्रकाश सोळंके यांचे घर जाळले. एक केवळ एक वाक्य बोलले होते. त्या ठिकाणी कोयते, चॉपर, पेट्रोल बॉम्ब सापडले. या हल्ल्यासाठी कोड नंबर देण्यात आले होते. 1 नंबर प्रकाश सोळंके, 10 नंबर सुभाष राऊत यांचं हॉटेल, 21 नंबर जयदत्तर क्षीरसागर, 25 नंबर अमरसिंह पंडीत असे कोंड नंबर ठरले होते, असे ते म्हणाले.

नेत्यांना गावबंदी करायला महाराष्ट्र तुम्हाला सातबाऱ्यावर लिहून दिलाय का? भुजबळांचा मनोज जरांगेंना सवाल

 जालना-अंबड इथं ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत बोलताना भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. तसेच राजकीय नेत्यांना, मंत्र्यांना गावबंदी केली त्यावर भुजबळांवर भूमिका मांडली. असं करताना महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला आहे का? असा सवालही त्यांनी केला.भुजबळ म्हणाले, “काय चाललंय या पोलिसांचं आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी! काय महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिलाय काय रे? तुम्ही मेसेज करता आमचा बोर्ड फाडला मग तुमचे हात कुठे गेले? जशास तसं उत्तर द्यावं लागेल. मी सांगितलं ‘करेंगे या मरेंगे’ हा तुमचा पाहुणा म्हणतो हा हिंसाचार आहे. पण हे तर महात्मा गांधींचं वाक्य आहे. पण जरांगे तर म्हणतात की, ‘लढेंगे और जितेंगे…’वारे वारे वा”माझं पोलिसांना आवाहन आहे की, हे गावागावात लावलेले गावबंदीचे फलक ताबडतोब हटवले पाहिजेत. हे लोकशाहीचं राज्य आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना माझं सांगण आहे. आज आमदार, राजकीय नेते गावात यायचं नाही हे दोनचार मुलं काहीतरी लावतात आणि धांदल करतात. हे असं यापुढं चालणार नाही.सरकार आहे की नाही? कायदा आहे की नाही? तुम्ही जर असा पक्षपातीपणा कराल तर ओबीसी देखील गप्प बसणार नाही. ओबीसींच्या जोडीला दलित-मुस्लीम-आदिवासी सर्व एकवटल्याशिवाय राहणार नाही. पण ही दादागिरी बंद करु, असंही यावेळी भुजबळ म्हणाले.

अरे काय चाललंय? मला तर रोज धमक्या, शिवीगाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवीगाळ होतेय. पोलिसांना तक्रार केलं तरी काही होत नाही. बस येऊन जाऊन येवल्यात कसा निवडून येतो ते बघतो असं म्हणतात. काय बघतोस तू? काय चार पोरं निघतात आणि याचा राजीनामा घ्या त्याचा राजीनामा घ्या म्हणतात.

काहीजण मला म्हणतात भडकाऊ भाषण नका करु? पण मी कधी भडकाऊ भाषण केलं. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ३० वर्षे मराठ्यांसोबत राहिलो कधी त्यांचा द्वेष केला. पण त्यांनी केलेलं चालतं का?, अशा शब्दांत छगन भुजबळांनी भूमिका मांडली.

‘मर्डरवाले कुलकर्णी’ रंगमंचावर येण्यास सज्ज

विनोदाच्या अफलातून टायमिंगने रसिकांचे मनोरंजन करणारे अभिनेते वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार हे विनोदाचे दोन हुकमी एक्के रंगमंचावर एकत्र येत धमाल उडविण्यास सज्ज झाले आहेत. मर्डरवाले कुलकर्णी या आगामी नाटकात हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. येत्या २४ नोव्हेंबरला हे नाटक रंगभूमीवर दाखल होतंय. वैभव मांगले यात मध्यवर्ती भूमिकेत असून संतोष पवार यांच्या भन्नाट दिग्दर्शनाखाली या नाटकाचा पट रंगला आहे. अष्टविनायक संस्थेचे दिलीप जाधव यांनी नाटकाची निर्मिती केली असून सहनिर्मात्या मयुरी मांगले आणि निवेदिता सराफ आहेत.  

प्रेक्षकांना मनमुराद हसवण्यासाठी आम्ही सज्ज असून आमच्या दोघांची केमिस्ट्री ‘मर्डरवाले कुलकर्णी या नाटकामध्ये सॉलिड धमाल आणेल, असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. एकत्र काम करताना आम्हाला खूपच मजा आल्याचे हे दोघेही सांगतात.

अष्टविनायक संस्थेच्यामर्डरवाले कुलकर्णी  नाटकाचे लेखन जयंत उपाध्ये यांचे असून या निखळ कौटुंबिक मनोरंजक नाटकात भार्गवी चिरमुले, निमीश कुलकर्णी, सुकन्या काळण, विकास चव्हाण आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत. या नाटकाची गाणी वैभव जोशी यांनी लिहिली असून नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. प्रकाश योजना रविरसिक तर संगीत आशुतोष वाघमारे यांचे आहे. 

संतोषची दिग्दर्शनाची अनोखी शैली आणि वैभव यांच्या अभिनयाचा हटके अंदाज मर्डरवाले कुलकर्णी मध्ये धुमाकूळ घालणार हे नक्की.

‘लंडन’च्या रेड कार्पेटवर ‘मोऱ्या’ उर्फ जितेंद्र बर्डेचे भव्य स्वागत!

८ डिसेंबर २०२३ ला मोऱ्या महाराष्ट्रात!

मुंबई : लंडन येथील “सोहोवाला सिनेमा म्हणजेच ‘कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा'(“Sohowala Cinema, Courthouse Hotel Cinema, London – UK ”) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये “मोरया”(MORRYA) या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाचा ‘भव्य प्रीमियर शो’ करण्यात आला आहे. UK मधील महाराष्ट्रीय समुदायाने आयोजित केलेल्या या चित्रपटाच्या ‘प्रीमियर शो’ची तिकिटे हातोहात संपली, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे असे आयोजकांच्या वतीने लंडन स्थित “युनिक एअरएक्सप्रेस कुरिअरचे संचालक सिनेरसिक सचिन पाटील, कुलदीप शेखवात, तुषार जोगी, संतोष पारकर(बीजेपी), आबेडकरी विचाराचे प्रवीण करुणा यांनी व्यक्त केले आहे. या खास प्रीमियरसाठी मोऱ्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व प्रमुख अभिनेते जितेंद्र बर्डे हे खास उपस्थित होते.

आपल्या मराठी चित्रपट, नाटक, संगीत कलाकृतींचे लाखो चाहते जगभरात आहेत. अश्या कलाकृती पाहण्यासाठी ते आतुर असतात. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये ‘मोऱ्या’ या मराठी चित्रपटाने लक्ष वेधले होते. त्यामुळे लंडन मधील रसिकांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता होती. UK मधील प्रीमियर शो पाहिल्यावर प्रेक्षक काही वेळ स्तब्ध होतो. चित्रपटाची कथा, मांडणी व सादरीकरण पाहून त्यांना गहिवरून आले होते. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते जितेंद्र बर्डे यांच्या कामाचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले. ‘मोऱ्या’ चित्रपटातील व्यक्तिरेखा मनात अस्वस्थता, चलबिचल, काहूर निर्माण करते अशी प्रतिक्रियासर्वच प्रेक्षकांनी बोलून दाखविली. या चित्रपटाचे शोज् संपूर्ण युरोप देशामध्ये करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.

एका सफाई कर्मचाऱ्यांची भावस्पर्शी कथा ‘मोऱ्या’ या चित्रपटात रेखाटण्यात आली असून ती साकारण्यासाठी अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी विशेष मेहनत घेतली आहे. त्यांचा नैसर्गिक सहज – संयमी अभिनय रसिकांच्या मनात घर करीत असून रसिकांसोबत त्यांची नाळ जोडली जात आहे. खास या शोसाठी उपस्थित असलेले जितेंद्र बर्डे हा सर्व अनुभव पाहून  भारावून गेले होते. ते म्हणाले, “आपण जन्माला घातलेल्या कलाकृतीला प्रेक्षक आपलं म्हणतात, आणि तो विचार, ती कलाकृती स्वतः सोबत घेऊन जातात, हा विलक्षण अनुभव मी इथे अनुभवाला आहे. माझा हा पहिला चित्रपट आहे, त्यासाठी मी आणि माझ्या टीमने केलेले सर्व कष्ट सार्थकी लागले आहेत, विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यातील ‘पिंपळनेर ते लंडन’ हा माझा प्रवासही ‘मोऱ्या’मुळेच घडला आहे”

‘मोऱ्या’चा टीझर ‘कान महोत्सवात दाखवण्यात आला होता. एलएचआयएफएफ बार्सिलोना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव, झारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव-२०२२, पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव, अयोध्या फिल्म फेस्टिव्हल, लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या चित्रपट महोत्सवांत या सिनेमाला ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळाला आहे. तसंच यापैकी काही महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट कथा असे पुरस्कारही या सिनेमानं पटकावले आहेत. जितेंद्र बर्डेची ही पहिलीच कलाकृती आहे. या निर्मितीसाठी निर्माती तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे.

‘टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘मोऱ्या’मध्ये उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, विजय चौधरी, अविनाश पोळ, रुपाली गायके आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर आणि शीर्षक भूमिकेत जितेंद्र बर्डे यांनी काम केले आहे. सफाई कामगार ते पिंपळनेरचा सरपंच हा ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा जीवनप्रवास नेमका आहे तरी कसा हे दाखविण्यासाठी येत्या ८ डिसेंबर २०२३ ला मोऱ्या महाराष्ट्रातील आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.