पुणे- सहकारनगर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील सहकारनगर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे विकास उर्फ विकी रोहिदास फुंदे, वय-३६ वर्षे, रा. बी / ८ / २, चव्हाणनगर, धनकवडी, पुणे सध्या बिबवेवाडी पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता, चाकु या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खूनाचा प्रयत्न, दिवसा व रात्री घरफोडी चोरी, चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द १० गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम. पी. डी. ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे सुरेंद्र माळाळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे, ए. टी. खोबरे आणि त्यांचे अधिपत्याखालील पोलिस अधिकारी व पोलिस अमलदार यांनी सदरची कामगिरी पार पाडली.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मा. पोलीस आयुक्त यांनी चालू वर्षामध्ये दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या ५७ कारवाया केल्या आहेत. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
