महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले उद्घाटन
मुंबई दि. २२ ऑक्टोबर : सुशासन ही व्यापक संकल्पना असून अधिकारी- कर्मचारी यांनी प्रशासकीय दैंनदिन कामामध्ये परिणामकारकता, पारदर्शकता, सहभागीता, प्रतिसादकता, उत्तरदायित्य, कायद्याचे न्याय या सहा सूत्रांचा वापर केल्यास कामाच्या पद्धतीमध्ये सुधारणा होऊन अधिकाधिक प्रभावी पद्धतीने कामकाज होईल असा विश्वास महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी व्यक्त केला. मंगळवारी सुशासन सप्ताहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या की, कोणत्याही संस्थेचा कर्मचारी हा महत्वाचा घटक आणि त्या संस्थेचा कणा असतो. त्यामुळे अधिकारी- कर्मचारी यांनी बदलत्या काळाबरोबर आवश्यक सर्व प्रशासकीय घटक अंगभूत असणे गरजेचे आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी ही जगतिकदर्जाची चित्रनगरी असून चित्रनगरीमध्ये गेल्या 47 वर्षात देशो-विदेशातील चित्रीकरण झाले आहे. परंतू या महामंडळाचे केवळ चित्रीकरण करणे हे एकमेव ध्येय नसून “कॅमेरा टु क्लाउड” अशा स्वरूपाचे काम करणे अर्थात चित्रपट, नाटक, सांस्कृतिक क्षेत्र, अशा विविध क्षेत्रात भरीव काम महामंडळाच्या माध्यमातून करण्याचे नियोजन करायचे आहे. यासाठी कौशल्याभिमुख आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा अधिकारी-कर्मचारीवर्ग येत्या काळात निर्माण करण्यासाठी विविध कर्मचाऱ्यांसाठी असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रस्तावना करतांना सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी उपक्रमाचा उद्देश विषद केला. पुढे ते म्हणाले की, टीमवर्क म्हणून काम केल्यास कामाची गती वाढते, त्याचा परिणाम लाभार्त्याना मिळणारे लाभ जलदगतीने मिळण्यास सहाय्यभूत ठरते. तसेच दैनंदिन काम करताना आपल्या सहकाऱ्यांमध्ये सुसंवाद असायला हवा, प्रत्येक कामाची एक कार्य पद्धती ठरलेली असायला हवी आणि ती त्या पद्धतीने पार पाडायला हवी. महामंडळामध्ये काम करत असताना शासनाच्या चांगल्या गोष्टी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या चांगल्या गोष्टी या दोन्हींचा संगम करता यायला हवा असे मत सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी व्यक्त केले.
यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, उप अभियंता ( स्थापत्य ) विजय बापट, उप अभियंता ( अभियांत्रिकी ) अनंत पाटील, व्यवस्थापक कलागरे सचिन खामकर, व्यवस्थापक ( नियोजन ) मुकेश भारद्वाज, उप मुख्य लेखाधिकारी राजीव राठोड, सहायक कलागरे मोहन शर्मा, रुचिता पाटील, अनिता कांबळे, अक्षता शिगवण, मंगेश राऊल, प्रेरणा देवळेकर आदि कर्मचारी उपस्थित होते.
अनिरुद्ध देशपांडे यांनी प्रशासकीय कार्य पद्धतीबाबत केले मार्गदर्शन
सांस्कृतिक कार्य विभागाचे कार्यासन अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांचे पहिले सत्र आयोजित करण्यात आले होते. प्रशासकीय कामाची उत्तम जाण असणार्या श्री. देशपांडे यांनी प्रशासकीय कार्य पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी टिपणी लेखन, पत्र लेखन तसेच शासनाकडून आलेले पत्र व्यवहार कसे करावे याबाबत उदाहरणासह अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. दरम्यान महामंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.