पुणे- सहकारनगर येथे सातारा रोडवर अल्पवयीन मुलांनी भरधाव वेगात गाडी चालवत अनेक वाहनांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी अल्पवयीन मुलांना चोप दिला आहे. घटनेची माहिती मिळताच सहकार नगर बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. ही मुले भावाला न सांगता गाडी घेऊन रस्त्यावरती आल्याचे तपासात समोर आले आहे.
धनकवडीमध्ये भरधाव वेगातील चारचाकी गाडीने सात ते आठ वाहनांना धडक दिली. या घटनेत तीनजण जखमी झाले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.17) दुपारी दोनच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पठार परिसरातील एक अल्पवयीन मुलगा आपल्या मित्राबरोबर आय ट्वेंटी चारचाकीमधून राऊंड मारत असताना धनकवडी येथील सावरकर चौकात एका रिक्षाला धडक दिली. अपघात झाल्यामुळे तसेच चौकातील नागरिक मागे लागल्याने अल्पवयीन मुलाने घाबरून भरधाव वेगात पळवली. त्यात रस्त्यात सात ते आठ वाहनांना धडक देत सातारा रस्ता, बालाजीनगर परिसरात नागरिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्पवयीन मुलाने भावाला न सांगता मित्रालासोबत घेऊन गाडी रस्त्यावर आणली.त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. वाहनांना धडक दिल्यानंतर स्थानिक तरुणांनी त्याचा पाठलाग करुन त्याला गाठत चोप दिला.