सामाजिक संस्थांना दिवाळी भेट ; सण – उत्सवात वादन करून जमा केलेला शिधा
पुणे : गणेशोत्सव, नवरात्र , दिवाळी यांसारख्या सण उत्सवांमध्ये विविध ठिकाणी वादन करून मिळालेल्या निधीतून गोळा केलेला धान्यरूपी जोगवा पुण्यातील सामाजिक संस्थांना दिवाळी भेट म्हणून देण्यात आला. तब्बल १६०० किलो धान्य विविध सामाजिक संस्थांना विघ्नहर्ता वाद्य पथकातर्फे सुपूर्द करण्यात आले.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ गणेश मंदिरासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (निवृत्त) चंद्रशेखर दैठणकर, खडक पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने, पथकाचे सिद्धेश्वर दळवी, गौरव देवकर, ऍड. वृषाली मोहिते, सिद्धार्थ घटकमल, प्रथमेश पिसे, अंकुश गुप्ता, सचिन गायकवाड, विद्या मोहिते, श्रावणी काकडे, तेजश्री सुमंत, समर्थ घटकांबळे आदी उपस्थित होते.
भोर वेळवंड येथील समर्थ विद्या प्रसारक मंडळी, वाघोली येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याणकारी संस्था, संतुलन पाषाण वाघोली या सामाजिक संस्थांना हा धान्यरूपी जोगवा देण्यात आला. यामध्ये गहू, तांदूळ रवा, पोहे, शेंगदाणे इत्यादी प्रकारचे धान्य tतसेच तेल, साखर, चहा पावडर, मसाले, बिस्किटे, कांदे, बटाटे, केळी यांचा देखील समावेश होता. तसेच संतुलन पाषाण या संस्थेला चंद्रशेखर दैठणकर यांच्या वाढदिवसानिमित्त इन्वर्टर भेट देण्यात आले.
चंद्रशेखर दैठणकर म्हणाले, ज्यांना गरज आहे, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणे आवश्यक आहे. समाजात अशा अनेक संस्था आहेत, ज्या चांगले काम करीत आहेत. त्यांना आपण मदतीचा हात द्यायला हवा, असेही त्यांनी सांगितले. सुनील माने यांनी मनोगत व्यक्त केले.