श्री शनिवार वीर मारुती उत्सव मंडळातर्फे श्रीराम धोंडूराम दहाड यांचे स्मृतिप्रित्यर्थ आयोजन
पुणे : श्री शनिवार वीर मारुती उत्सव मंडळातर्फे यावर्षी प्रथमच वीर मारुतीरायाचे भक्त श्रीराम धोंडूराम दहाड यांचे स्मृतिप्रित्यर्थ ‘लोकपरंपरा पुरस्कार’ दिला जाणार आहे. यावर्षीचे प्रथम पुरस्कारार्थी औरंगाबादचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मनोहरबुवा दीक्षित हे असणार आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शुक्रवार, दि.१० मे रोजी रात्री १० वाजता पुरस्कार वितरण होणार आहे.
जेष्ठ विचारवंत डॉ. न. म. जोशी यांचे हस्ते पुरस्कार वितरण होणार असून शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि ५ हजार ५५५ रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शनिवार पेठेतल्या वीर मारुतीचा उत्सव गेली दोनशेहून अधिक वर्षे अखंड सुरू आहे. विशेष म्हणजे, चैत्र पौर्णिमा म्हणजेच, हनुमान जयंती ते अक्षयतृतीया असा हनुमान जयंतीचा इथे चालणारा उत्सव हा बहुदा पुण्यातील नव्हे तर महाष्ट्रातील १८ दिवस चालणारा एकमेव उत्सव असावा.
उत्सवात फक्त कीर्तन किंवा प्रवचने असतात. ही परंपरा अखंड सुरू ठेवण्याची ठेवण्याची धुरा सध्या महेश पानसे, राम दहाड, सचिन दाते, मयुरेश जोशी, प्रवीण जोशी व इतर कार्यकर्ते मंडळी चालवत आहेत. यासाठी ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे, रामचंद्र बुवा भिडे , वासुदेव बुरसे, मनोहरबुवा दीक्षित तसेच अनेक युवा कीर्तनकारांचे सहकार्य असते. यावर्षीपासून देण्यात येणारा लोक परंपरा पुरस्कार हा ज्यांनी भारतीय व मराठी परंपरा जपण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत व आपली असलेली परंपरा पुढे चालू ठेवली आहे, अशांना दरवर्षी देण्यात येणार आहे.