Home Blog Page 1396

रोहिणीद्युति’ मधून घडले  प्रगल्भ नृत्यपरंपरेचे दर्शन

पं. रोहिणी भाटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंगला हृद्य सोहळा


पुणे ता.१७: एकूणच शास्त्रीय नृत्यकलेस समाज मान्यता नसताना ज्यांनी आपल्या परिश्रमातून, दूरदृष्टीतून कथक क्षेत्रास मर्यादेतून मुक्त केले असे बहुआयामी, व्यासंगी व्यक्तीमत्व म्हणजे बेबीताई अर्थात रोहिणीताई. 
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नृत्यभारती कथक डान्स अकॅडमीतर्फे ‘रोहिणीद्युति’ हा कार्यक्रम घेण्यात आला. भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या व संस्थेच्या संचालिका नीलिमा अध्ये यांच्या संकल्पनेतून रंगलेला हा दोनदिवसीय सोहळा रसिकांच्या पसंतीस उतरला. यावेळी ‘रोहिणीद्युति ‘ या नृत्यमैफलीतून आणि ‘सुहृदयसभा ‘ या वैचारिक मंथनातून समग्र रोहिणीताई रसिकांना उलगडल्या. 
‘रोहिणीद्युति ‘ या मैफिलीची सुरुवात शिवस्तुतीने झाली. त्यानंतर कथक परंपरेनुसार तीन तालातील परण, आमद, परणामद, कालीपरण, यतीपरण, तुकडे, विलांबित लय, गत सादर करत कुशल नृत्यकलेचे दर्शन घडविले. रोहिणी ताईंकडून आत्मसात केलेल्या परंपरेची दृश्य झलक अध्ये यांच्या ‘घट घट मे पंछी बोलता..’ या एकल सादरीकरणातून पहावयास मिळाली. यांस रसिकांनी विशेष दाद दिली. नायिकेच्या नयनांचे काव्यात्मक वर्णन करणाऱ्या दोह्यास तसेच पर्जन्य सुक्त रचनेस देखील उपस्थितांची वाहवा लाभली. गणेश स्तुतीने मैफलीची सांगता झाली. अजय पराड (संवादिनी), माधुरी जोशी (गायन), कार्तिकस्वामी दहिफळे (तबला), आकाश तुपे (पखवाज), अर्पिता वैशांपायन (गायन), सुनील अवचट (बासरी), ऋजुता सोमण (पढंत) यांनी त्यांना समर्पक साथ दिली. यावेळी चेतना ज्योतिषी, सुषमिता घोष, डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते उद्गारने प्रकाशित केलेल्या ‘कथक दर्पण दीपिका’ या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी ज्योतिषी, घोष यांनी पं. भाटे यांच्या स्मृतीस उजाळा दिला. ‘बेबीताई साक्षात सरस्वती पुत्री होत्या. कलाकार म्हणून त्या प्रतिभावंत होत्याच परंतु अभिनय, गायन, साहित्य अशा कलाविष्कारांची देखील त्यांना सूक्ष्म जाण होती. ती प्रगल्भता त्यांच्या नृत्य आविष्कारातून रंगमंचावर उमटायची.’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी डॉ. आगाशे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या निपुण नृत्यांगनांनी केलेले निपुण सादरीकरण, ७५ वर्षे इतका मोठा काळ लोटूनही संस्थेच्या चार पिढ्यातील गुरू शिष्यांनी जपलेली परंपरा याबाबत त्यांनी विशेष कौतुक केले. 
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ‘सुहृदयसभा’ यातून वैचारिक मंथन झाले. चंद्रमोहन कुलकर्णी (चित्रकला), सुषमा देशपांडे (नाट्य), सदानंद मेनन (छायाचित्रण), चैतन्य कुंटे (गायन), रोशन दाते (संस्कृती), शैलेश कुलकर्णी (साहित्य), सुहास किर्लोस्कर(चित्रपट), हेमंत महाजन (वास्तू विशारद) अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शनपर विचार ऐकण्याची संधी नवोदित कलाकारांना यातून लाभली. ‘ नृत्य ही एकमेव कला आहे, ज्यामध्ये शिल्प, चित्र, नाट्य, साहित्य आणि गायन या ललितकला वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळी तत्त्वे घेऊन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे नृत्यकलेतून प्रतिबिंबित होतात. त्यामुळे नृत्य म्हणजे सादरीकरण असा समज झाल्यास ती संकोचित मानसिकता ठरेल. नृत्याची अभिव्यक्ती समृद्ध तेव्हाच ठरेल, जेव्हा नृत्यासह इतर ललितकलांची देखील सूक्ष्म ज्ञान संपादित करण्याची क्षमता कलाकारांमध्ये दिसेल. असा सूर या सभेतून उमटला. ‘बेबीताईंनी सर्वज्ञ हे तत्व आत्मसात केल्यानेच त्या कलाकार म्हणून महान ठरल्या.आजच्या काळात ही तळमळ अभावानेच दिसते, अशी खंतही मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.
नीलिमा अध्ये यांनी या कार्यक्रमाचे निवेदन तर अशोक वाजपेयी यांनी सांगतापर मनोगत व्यक्त केले. शास्त्रीय मैफल आणि वैचारिक मंथन यांचा सुंदर मिलाफ ‘रोहिणीद्युति’ या कार्यक्रमातून रसिकप्रेमींनी अनुभवला.…………………………चौकट
शिष्यांकडून मानवंदना..मैफिलीतील सादरीकरणाने रसिकांना अक्षरश: खिळवून ठेवले असतानाच कार्यक्रमाच्या सांगतेची वेळ आली. यावेळी एकीकडे सादरीकरण सुरू असतानाच एक पेटती द्युती रंगमंचाच्या मधोमध ठेवण्यात आली. ‘या देवी सर्व शिष्येषु नृत्यरुपेण संस्थिता। या देवी रोहिणी तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥’ म्हणत रोहिणी ताईंच्या फोटोसमोर सर्व शिष्या नतमस्तक झाल्या. जाणिजे यज्ञ कर्म ..हे ब्रीद ठेवून संस्थेचा वारसा पुढे नेणे ही मोठी जबाबदारी आमच्यावर असल्याचा संदेश कृतीतून दिला. हे पाहून उपस्थित भारावले. 

कॅम्पस अ‍ॅक्टिव्हवेयरची देशभरात २५० स्टोअर्स 

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2023 – कॅम्पस अ‍ॅक्टिव्हवेयर या भारतातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स आणि अ‍ॅथलीझर फुटवेयर ब्रँडने विस्तार योजनेअंतर्गत देशभरात २५० स्टोअर्सचा टप्पा गाठल्याचे जाहीर केले. ही असामान्य कामगिरी साजरी करण्यासाठी कंपनीने पुण्यातील सीझन्स मॉल येथे नवे स्टोअर सुरू करत दर्जेदार, फॅशनेबल व वाजवी शूज ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची बांधिलकी जपली आहे. 

याप्रसंगी कॅम्पस अ‍ॅक्टिव्हवेयरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निखिल अगरवाल म्हणाले, ‘ग्राहकांच्या पसंतीबरोबर जुळवून घेत कॅम्पस अ‍ॅक्टिव्हवेयरने आपला विकास केला आहे. आज फॅशनच्या बदलत्या गरजा खऱ्या अर्थाने समजून घेणाऱ्या ब्रँडमध्ये आमचे रूपांतर झाले आहे. म्हणूनच आम्ही भारतातील सर्वात मोठ्या फुटवेयर ब्रँड्सपैकी एक आहोत, शिवाय सर्वात ट्रेंडी आणि फिट, सातत्याने नवीन शूज उपलब्ध करणारा, स्टोअर्स सुरू करणारा ब्रँड म्हणून आमची ओळख तयार झाली आहे. २५० वे स्टोअर सुरू करत असतानाच सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याचे, प्रत्येकाला नवी स्टाइल, आत्मविश्वास व अभिव्यक्ती आपलीशी करण्यासाठी प्रेरणा देण्याचे आमचे ध्येय आहे. देशांतर्गत संशोधन आणि डिझाइनचे तत्व यांच्या आधारे आम्ही आजच्या तरुणांना त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाविषयी आत्मविश्वासपूर्ण वाटण्यासाठी मदत करत आहोत.’

२००५ मध्ये स्थापना झाल्यापासूनच ब्रँडने सातत्याने आपल्या उत्पादन श्रेणीत अत्याधुनिक डिझाइन्सचा समावेश केला आहे. ब्रँडने कायमच नाविन्य, धोरणात्मक भागिदारी आणि खास भागिदारींच्या माध्यमातून ग्राहकांच्या बदलत्य गरजा आपल्याशा केल्या आहेत. कॅम्पसचा रिटेल प्रवास २०१७ मध्ये सुरू झाला. २०२० मध्ये ब्रँडच्या एक्झक्लुसिव्ह आउटलेट्सची संख्या ३५ होती व आता देशभरातील दालनांची एकूण संख्या २५० वर गेली आहे. दमदार ऑनलाइन नेटवर्कच्या मदतीने कॅम्पसने सर्व प्लॅटफॉर्म्सवर आपले स्थान निर्माण केले आहे. हा विकास ब्रँडच्या दर्जेदार स्पोर्ट्स आणि अ‍ॅथलीझर वेयर वैविध्यपूर्ण ग्राहकांना पुरवण्याचा बांधिलकीशी सुसंगत आहे. आजवरच्या प्रवासात ग्राहकांनी दाखवलेला विश्वास आणि निष्ठेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, असे श्री. अगरवाल म्हणाले.

कॅम्पस अ‍ॅक्टिव्हवेयर कायमच नाविन्यपूर्ण फॅशन आणि आरामदायीपणाच्या बाबतीत आघाडीवर राहिले आहे. इतक्या वर्षांत कॅम्पसने गुणवत्तेशी बांधिलकी कायम राखत आपल्या फॅशन श्रेणीचा विकास केला आहे. चपळ, आधुनिक, ट्रेंडी डिझाइन्स, उठावदार रंग व आकर्षक किंमती यामुळे ब्रँडचे स्थान मजबूत झाले. जागतिक फॅशन ट्रेंड्सवर नजर ठेवत ब्रँडने बहुमाध्यमिक चॅनेल्सद्वारे विक्रीचा दृष्टीकोन अवलंबला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील मागणी व ग्राहकांच्या विविध गरजा पुरवणे ब्रँडला शक्य झाले आहे.

या खास प्रसंगाच्या निमित्ताने कॅम्पिस अ‍ॅक्टिव्हवेयरने भारतातील विविध स्टोअर्समध्ये खास ऑफर्स लाँच केल्या आहेत. ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ब्रँडने ४९९९+ रुपयांची खरेदी करा आणि मोफत वायरलेस इयरफोन किंवा ३४९९+ रुपयांची मोफत बॅगपॅक मिळवा अशा ऑफर्सचा त्यात समावेश आहे.

‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निवासस्थानी उभारला राष्ट्रध्वज

नागरिकांना उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

पुणे दि.१३: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पालकमंत्री श्री.पाटील यांनी स्वतः उपक्रमाचा शुभारंभ कोथरुडमधील आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वज उभारुन केला आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सांगता ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमाने होत असून त्याचाच एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम गतवर्षीप्रमाणे राबविण्यात येत आहे. गतवर्षी या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रत्येक देशवासीयांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन आपला देशाभिमान व्यक्त करण्यासह स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करावे, असे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.

९ ऑगस्ट रोजी ‘माझी माती माझा देश’ अंतर्गत संपूर्ण देशात स्वातंत्र्य लढ्यातील योद्ध्यांना स्मरण करून पंचप्रण शपथ घेण्यात आली. गावपातळीवर यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून यात सहभागी होताना पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज आपल्या कोथरुडमधील निवासस्थानी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना दिली.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. हजारो स्वातंत्र्य योद्ध्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे या अमृतमहोत्सवी वर्षात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण केले जात आहे. त्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येकांनी यात सहभागी व्हावे, आणि आपला हा उत्सव आनंदाने उत्साहाने साजरा करावा. तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या योद्ध्यांचे स्मरण करावे. राष्ट्रध्वज फडकवताना त्याचा सन्मान राखला जाईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
0000

पाचव्या  गांधी  दर्शन  शिबिराला चांगला प्रतिसाद

पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात   एकदिवसीय ‘ गांधी  दर्शन   शिबिराला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला.  रविवार, दि. १३ ऑगस्ट  २०२३ रोजी सकाळी १० ते ६ या वेळात हे शिबीर  गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे पार पडले. ‘ गांधी  दर्शन   शिबिर ‘ मालिकेतील हे पाचवे शिबीर होते.
गांधी अभ्यास केंद्र(कोल्हापूर)च्या माजी समन्वयक डॉ.भारती पाटील यांनी ‘समग्र गांधी दर्शन’ या विषयावर ,ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी  ‘गांधी सावरकर तुलना’ या विषयावर  मार्गदर्शन केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष  आणि युवक क्रांती दलाचे  संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी ‘सत्याग्रह शास्त्र’ विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. भारती पाटील म्हणाल्या, ‘पाश्चात्य विचारांकडे पाहिले की सर्वोदय, सत्याग्रह ही जगाला मिळालेली देणगी आहे, असे लक्षात येते.तळातल्या माणसाचा विचार करणारा विचार हा गांधीजींचा विचार आहे. हाच विचार घेऊन भारताला पुढे जावे लागेलगांधीजींनी एकाच आयुष्यात अनेक विस्मयकारक कामे केली. लेखन, संपादन, आंदोलन, स्वच्छताग्रह, समतेचा आग्रह अशा अनेक अलौकिक कामांना त्यांनी स्पर्श केला.

‘गांधीजी हे जातीव्यवस्था मोडून काढणारे दार्शनिक होते.समतेचा आग्रह त्यांनी धरला.हे भेद नष्ट करण्यासाठी गांधीजींनी काम केल्याने ते सनातन्यांना नकोसे झाले. गांधीजींचा प्रवास हा समताधिष्ठीत समाजासाठीचा प्रवास आहे. वर्चस्ववाद त्यांना नष्ट करायचा होता. त्यामुळे हयातीत त्यांना गोळया झेलाव्या लागल्या, आणि मरणानंतरही अनेक दशकांनी त्यांना गोळया झेलाव्या लागत आहेत.गांधीजींची पर्यावरणाला, परिसृष्टीवादाला जी देणगी आहे, ती अतुलनीय आहे. दुर्देवाने आपण सर्वानी भांडवलशाहीचा मार्ग स्वीकारला आहे.व्यक्तिगत स्वार्थाचा मार्ग आपण स्वीकारल्याने गांधीजींच्या व्यापक लोकशाहीचा आपणच पराभव केला’, असेही त्यांनी सांगीतले’

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ पूर्वी धर्मग्रंथाचे विवरण हाच विद्वत्ता दाखवण्याचा आधार होता. महात्मा गांधींनी स्वतः आचरणातून जीवनशैली निर्माण केली. शिवाय प्रत्येकाला तो विचार तपासून घेण्याची, विचारस्वातंत्र्याची मुभा दिली. गांधीजी कट्टरपंथीय नव्हते.विचारधारा तत्कालिन प्रश्नांना मार्गदर्शन करते. पण, विचार दर्शन हे सार्वकालिक, शाश्वत असते. गांधी विचारदर्शन हे असेच शाश्वत, सार्वकालिक आहे.’
ज्ञानेश्वर मोळक, डॉ. प्रवीण सप्तर्षी, संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, नीलम पंडित, सुदर्शन चखाले आदी मान्यवर उपस्थित होते.

गौरी गणपती साहित्य जत्रेच्या बचत गटांची बैठक संपन्न

पुणे-आज रविवार दिनांक 13 रोजी पुणे शहर काँग्रेस भवन येथे प्रियदर्शनी गौरी गणपती साहित्य जत्रेच्या बचत गटांची बैठक झाली या बैठकी मध्ये बचत गटांच्या उत्पादनाची पाहणी करण्यात आली. सर्व महिला आपल्या आपल्या बचत गटांमार्फत जे जे उत्पादन करतात त्याचे सॅम्पल्स घेऊन मिटींगला आल्या होत्या. यावेळीकाँग्रेस पक्षाचे पुणे शहरअध्यक्ष अरविंद शिंदे हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी बचत गटांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रियदर्शनी वुमन्स फोरम च्या अध्यक्ष श्रीमती संगीता तिवारी, सुवर्णा माने, शिल्पा वैष्णवी रेड्डी ,सुंदर ओव्हाळ,राहुल राज, दिगांता ओव्हाळ, गौरी काळे, वर्षा गांधी, आणि बचत गटा च्या महिला उपस्थित होत्या .

संरक्षण राज्यमंत्र्यांनी पुणे येथील बीईएल-भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. ला दिली भेट

पुणे-संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी आज संरक्षण क्षेत्रातील नवरत्न कंपनी  भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या पुणे स्थित कारखान्याला  भेट दिली आणि लेझर सिस्टम, इलेक्ट्रॉनिक फ्यूज आणि अॅम्युनिशन, एनर्जी स्टोरेज उत्पादने आणि लढाऊ प्रणाली या क्षेत्रातील कारखान्याचे सामर्थ्य  जाणून घेतले.

यावेळी राज्यमंत्र्यांसमोर बीईएलच्या संरक्षण आणि  बिगर -संरक्षण या दोन्ही क्षेत्रातील उत्पादने आणि क्षमतांच्या विस्तृत श्रेणीबाबत सादरीकरण झाले. अजय भट्ट यांनी संपूर्ण कारखान्याची पाहणी केली . यावेळी त्यांना आर्टिलरी गन, लेझर उत्पादने (डायरेक्टेड एनर्जी वेपन सिस्टीम, लेझर टार्गेट डिझायनेटर्स आणि रेंज फाइंडर्स, फायबर ऑप्टिक गायरो बेस्ड सेन्सर्स), लिथियम बॅटरी निर्मिती आणि केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लियर (सीबीआरएन) सिस्टम्स (ट्रॅक आणि व्हील्ड) च्या निर्मितीशी संबंधित अत्याधुनिक सुविधा दाखवण्यात आल्या.

संरक्षण राज्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान बीईएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भानु प्रकाश श्रीवास्तव आणि  मुख्य व्यवस्थापक  (बीईएल-पुणे) जी एस एन मूर्ती उपस्थित होते.

संरक्षण राज्य मंत्र्यांनी दक्षिण कमांडच्या पुणे येथील मुख्यालयाला दिली भेट

पुणे-संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी काल दक्षिण कमांडच्या पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली.

दक्षिण कमांडच्या मुख्यालयात लेफ्टनंट जनरल ए के सिंग, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, आर्मी कमांडर, दक्षिण कमांड यांनी संरक्षण राज्य मंत्र्यांचे स्वागत केले. या वेळी संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांना आत्मनिर्भर भारत अभियानात योगदान  देण्यासाठी  तसेच विविध संस्थांमधील समन्वय आणि तिन्ही सेवादलांमधील एकात्मता वाढविण्यासाठी कमांडने त्याच्या कार्य क्षेत्रात केलेल्या विविध परिचालन, प्रशिक्षण आणि प्रशासन उपक्रमांबद्दल आणि उचललेल्या पावलांबद्दल माहिती देण्यात आली. यासोबतच, राष्ट्र उभारणीसाठी भारतीय लष्कर आणि दक्षिण कमांडचे विशेष योगदान देखील अधोरेखित करण्यात आले. यामध्ये नागरी – लष्करी फ्युजन , विद्यांजली योजनेअंतर्गत शाळा दत्तक घेणे आणि नागरीकांसाठी अमृत सरोवरांची निर्मिती  यावर चर्चा करण्यात आली.

संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी दक्षिण कमांडमधील लष्करी अभियांत्रिकी   सेवेने  बांधलेल्या 2.5 कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीमार्फत उद्घाटन केले. या प्रकल्पांमध्ये लष्करी रुग्णालय, जलतरण तलाव, एक सभागृह, दोन सौर ऊर्जा संयंत्रे आणि एक दारुगोळा साठवण सुविधा यांचा समावेश आहे. या सुविधा कमांडच्या सात वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत.

संरक्षण राज्य मंत्र्यांनी कमांडच्या विविध तुकड्यांशी संवाद साधला आणि राष्ट्राचे सार्वभौमत्व सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोन तसेच उच्च दर्जाच्या कार्यान्वयन तत्परतेबद्दल सर्व श्रेणींचे कौतुक केले. आपल्या  क्षेत्रात विविध मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR) मोहिमांमध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल त्यांनी कमांडचे अभिनंदन केले. सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाला पुढे नेण्यासाठी नागरी संरक्षण उद्योग तसेच संशोधन आणि विकास संस्थांशी संलग्न राहाण्यासाठी सदर्न कमांड करत असलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.

13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरांवर तिरंगा फडकवण्याचे आणि ऑनलाईन सेल्फी अपलोड करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे सर्व नागरिकांना आवाहन

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे हर घर  तिरंगा मोहिमेअंतर्गत आज तिरंगा यात्रेला मार्गदर्शन केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या यात्रेसाठी उपस्थित असलेल्यांसमोर आपले विचार व्यक्त करताना अमित शाह म्हणाले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये तिरंगा हाती घेऊन उभ्या असलेल्या हजारो लोकांना पाहिल्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाच्या प्रत्येक बालकात आणि युवकामध्ये देशभक्तीची भावना जागवण्याचे अभियान यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी देशामध्ये असे एकही घर नव्हते ज्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला नाही आणि लोकांनी सेल्फी घेतल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा जनतेला आपल्या घरांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे, असे ते म्हणाले. गुजरातमधून माती आणि तिरंगा घेऊन निघालेला युवा वर्ग दिल्लीला पोहोचेल. हे युवक देशभरातून आणलेली माती आणि तिरंगा दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करतील. युवा शक्ती प्रत्येक गावातही महान भारताच्या संकल्पाचा प्रसार करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादी का अमृत महोत्सव ही चळवळ हे देशभक्तीची भावना जागृत करण्याचे प्रभावी माध्यम ठरले आहे, त्याचप्रमाणे ‘मेरी माटी मेरा देश’ हा  कार्यक्रमसुद्धा  आपल्या  देशाला  महान, विकसित आणि स्वयंसिद्ध भारत म्हणून आकाराला आणण्यासाठीचा आपला संकल्प पूर्ण करेल, असे केंद्रीय गृहमंत्री यावेळी म्हणाले. सर्व नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट या काळात आपापल्या घरांवर तिरंगा फडकवावा आणि सेल्फी समाजमाध्यमांवर अपलोड करावेत असं आवाहन केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलं आहे. नागरिकांच्या या प्रयत्नांमुळे देशाला महानतेकडे नेणारी मोहिमच सुरु होईल असं ते म्हणाले. ज्या उत्साहाने तरुणवर्ग आपल्यासमोर उभा आहे  ते बघून या मोहिमेतूनच पुढे देशभक्तीची भावना जागृत होईल आणि लोकांमध्ये विशेषतः मुले आणि तरुणांच्या मनात देशाला महान बनवण्याचा संकल्प दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात देशभक्तीची भावना जागृत केली, असे गृहमंत्री पुढे म्हणाले.  ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’चा 15 ऑगस्ट 2023 रोजी समारोप होईल आणि नंतर 15 ऑगस्ट 2023 ते 15 ऑगस्ट 2047 या काळात  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली  देश स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करेल. स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष ते 100 वे वर्ष या कालखंडात आम्ही देशाला महान आणि प्रत्येक क्षेत्रात अव्वल म्हणून आकाराला आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमृतकाळ  हा विशेषतः  तरुण पिढ्यांसाठी अत्यंत मोलाचा आहे.  1857 तो 1947 या 90 वर्षांमध्ये तरुण पिढीने स्वातंत्र्य चळवळ केली आणि देशाला पारतंत्र्याच्या बेडीतून मुक्त केले, त्याचप्रमाणे आजच्या तरुण पीढीने 2023 ते 2047 या वर्षांमध्ये भारतमातेला महान बनवण्यासाठी योगदान द्यायला हवे, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

प्रोजेक्ट 17 A अंतर्गत सहाव्या युद्धनौकेचे राष्ट्रपतींच्या हस्ते होणार राष्ट्रार्पण

प्रोजेक्ट 17 A अंतर्गत विकसित केलेल्या ‘विंध्यगिरी’ या युद्धनौकेचे राष्ट्रार्पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते कोलकाता इथे ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेड’मध्ये 17 ऑगस्ट 2023 रोजी केले जाणार आहे.

कर्नाटकातील डोंगररांगेचे नाव दिलेली ‘विंध्यगिरी’ ही प्रोजेक्ट 17 A अंतर्गत निर्माण केलेली सहावी युद्धनौका आहे. प्रोजेक्ट 17 A युद्धनौका वर्गातील ‘शिवालिक’ प्रकारच्या पाठोपाठ निर्माण करण्यात आलेल्या या युद्धनौका असून त्यामध्ये शत्रूपासून लपून राहण्याची सुधारित प्रणाली, अद्ययावत शस्त्रास्त्रे, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन यंत्रणा आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित युद्धनौका विंध्यगिरी ही तिच्या पूर्ववती ‘लिएंडर’ वर्गीय एएसडब्ल्यू युद्धनौका आयएनएस विंध्यगिरीच्या सेवेचा सन्मान वाढवणारी नौका ठरेल. जुन्या विंध्यगिरीने 8 जुलै 1981 ते 11 जून  2012 या जवळपास 31 वर्षांच्या सेवेत अनेक वेळा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला आणि बहुराष्ट्रीय मोहिमांमध्ये सहभाग नोंदवला. नवी विंध्यगिरी ही सरंक्षण क्षेत्रातील स्वदेशी क्षमताबांधणीचे भविष्य दर्शवतानाच भारतीय नौदलाच्या समृद्ध वारशाचे प्रतीक म्हणून समोर येत आहे.

प्रकल्प 17 A अंतर्गत ‘एम/एस एमडीएल’ चार तर ‘एम/एस जीआरएसई’ तीन जहाजांची बांधणी करत आहे. प्रकल्पांतर्गत पहिली पाच जहाजे एमडीएल व जीआरएसईने 2019 ते 2022 या काळात पुरवली आहेत.

प्रकल्प 17 A जहाजे ही भारतीय नौदलाच्या ‘वॉरशिप डिझाईन ब्युरो’ अर्थात ‘युद्धनौका संरचना विभागा’च्या संकल्पनेतून विकसित केली जात आहेत. देशाची आत्मनिर्भरतेप्रती असलेली कटिबद्धता लक्षात घेत या प्रकल्पांतर्गत जहाजबांधणीसाठी आवश्यक उपकरणे व यंत्रणांच्या एकूण मागणीपैकी 75% मागणीचा पुरवठा देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकडून होत आहे. आत्मनिर्भर नौदल घडवण्याकडे देश करत असलेल्या वाटचालीचा हा उत्तम दाखला आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी जम्मू-काश्मीरमधल्या श्रीनगर येथे 4 बिबट्यांची कातडी केली जप्त

जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर इथल्या काही टोळ्या बेकायदेशीर वन्यजीव व्यापारात गुंतलेल्या आहेत आणि बिबट्याच्या कातड्यांच्या विक्रीसाठी संभाव्य खरेदीदारांचा शोध घेत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) एक मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार टोळीतील सदस्यांना पकडण्यासाठी सविस्तर योजना आखण्यात आली.

योजनेनुसार खरेदीदार म्हणून  मुंबई झोनल युनिट (गोवा प्रादेशिक युनिट)चे अधिकारी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरला पोहोचले.

वाटाघाटीच्या अनेक फेऱ्यांनंतर, विक्रेत्यांनी बिबट्याचे पहिले कातडे श्रीनगरमधील डलगेटजवळ  नियोजित ठिकाणी आणले. पाळत ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी नेमलेल्या जागेजवळ बिबट्याची कातडी घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे श्रीनगरमधील सार्वजनिक ठिकाणी त्याच्या आणखी एका साथीदारालाही ताब्यात घेण्यात  आले. 

या प्राथमिक यशानंतर विक्रेत्यांच्या दुसर्‍या टोळीशी वाटाघाटी सुरू ठेवण्यात आल्या होत्या. रात्रभर वाटाघाटी केल्यानंतर, विक्रेते शेवटी 3 बिबट्यांची  कातडी नियोजित ठिकाणी आणण्यास सहमत झाले. प्रतिबंधित वस्तू (3 बिबट्यांची  कातडी) घेऊन जाणाऱ्या 3 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून या  व्यवहाराशी संबंधित आणखी 3 जण सार्वजनिक ठिकाणी जवळपासच वाट पाहत असल्याचे धागेदोरे हाती लागले. अधिकाऱ्यांची 2 पथके तात्काळ रवाना करण्यात आली आणि त्या सार्वजनिक ठिकाणी त्यांनी 3 जणांना ताब्यात घेतले. अशाप्रकारे, वन्यजीवांच्या या अवैध व्यापारात गुंतलेल्या एका पोलीस हवालदारासह  एकूण 8 जणांना ताब्यात घेण्यात आले आणि एकूण 4 बिबट्यांची (पँथेरा परडस) कातडी  जप्त करण्यात आली. लडाख, डोडा आणि उरी येथून बिबट्याची शिकार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972च्या कलम 50(1)(c) च्या तरतुदीनुसार एकूण 4 बिबट्यांची  कातडी  जप्त करण्यात आली.

वन्यजीव (संरक्षण) कायदा1972 अंतर्गत प्राथमिक जप्तीच्या कारवाईनंतर वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972  अंतर्गत गुन्हा करणाऱ्या 8 व्यक्ती आणि जप्त केलेल्या प्रतिबंधित वस्तू, जम्मू आणि काश्मीर वन्यजीव संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. 

77व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी सुमारे 1,800 विशेष अतिथी

देश सज्ज; ऐतिहासिक लाल किल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सोहळ्याचा प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट 2023ला ऐतिहासिक लाल किल्यावरुन 77व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा  प्रारंभ करतील. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर प्रथेप्रमाणे पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित करतील. या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचा समारोप  होणार आहे. 12 मार्च 2021ला अहमदाबाद मध्ये साबरमती आश्रमातून पंतप्रधानांनी याचा प्रारंभ केला होता. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हा सोहळा  नवी उमेद देत पुन्हा अमृत काळ प्राप्त करून देईल.

77वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी अनेक नवे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येने पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.  

विशेष अतिथी

लाल किल्यावर होणाऱ्या समारंभासाठी समाजातल्या विविध क्षेत्रातल्या सुमारे 1800 जणांना त्यांच्या जोडीदारासह विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. केंद्र  सरकारच्या ‘जन भागीदारी’ या दृष्टीकोनाला अनुसरून हा उपक्रम आहे.

या विशेष अतिथीमध्ये 660 पेक्षा जास्त व्’हायब्रंट व्हिलेजेस’चे 400 सरपंच, शेतकरी उत्पादक संघटना योजनेतील 250 व्यक्ती, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजनेमधले प्रत्येकी 50 व्यक्ती, सेन्ट्रल विस्टा प्रकल्प, नवे संसद भवन, सीमावर्ती भागातली  रस्ते बांधणी, अमृत सरोवर, हर घर जल योजना  यासाठी काम करणारे 50 श्रमयोगी (बांधकाम मजूर), 50 खादी कामगार, प्राथमिक शिक्षक, परिचारिका, मच्छिमार वर्गातले प्रत्येकी 50 जणांचा समावेश आहे. यापैकी काही विशेष अतिथी दिल्लीमधल्या आपल्या मुक्कामात राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील व संरक्षण राज्यमंत्री  अजय भट्ट यांची भेट घेतील.

प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशामधल्या 75 जोडप्यांना त्यांच्या पारंपारिक वेशात लाल किल्यावरच्या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.   

सेल्फी पॉइंटस’

केंद्र सरकारच्या विविध योजना व उपक्रम अधोरेखित करणारे ‘सेल्फी पॉइंटस’ 12 महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. राष्ट्रीय युद्ध स्मारक, इंडिया गेट, विजय चौक, नवी दिल्ली रेल्वे स्थानक, प्रगती मैदान, राज घाट, जामा मशीद मेट्रो स्थानक, राजीव चौक मेट्रो स्थानक, दिल्ली गेट मेट्रो स्थानक, आयटीओ मेट्रो गेट, नौबत खाना आणि शीश गंज गुरुद्वारा यांचा यात समावेश आहे.

‘सेल्फी पॉइंटस’मध्ये, जागतिक आशा : लस आणि योग; उज्वला योजना; अंतराळ सामर्थ्य; डिजिटल इंडिया; स्कील इंडिया; स्टार्ट अप इंडिया; स्वच्छ भारत; सशक्त भारत, नव भारत; प्रधानमंत्री आवास योजना आणि जल जीवन अभियान या योजनांचा समावेश आहे.

स्वातंत्र्यदिन समारंभाचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाने MyGov पोर्टल वर 15 – 20 ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन सेल्फी स्पर्धा आयोजित केली आहे. जनतेने या 12 पैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी सेल्फी काढाव्यात व MyGov पोर्टल वर अपलोड करावे यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. ऑनलाईन सेल्फी स्पर्धेअंतर्गत प्रत्येक ठिकाणच्या एक, अशा एकूण बारा विजेत्यांची निवड करण्यात येईल. विजेत्याला प्रत्येकी 10,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.  

ई–निमंत्रण

सर्व अधिकृत निमंत्रणे आमंत्रण पोर्टल (http://www.aamantran.mod.gov.in/) द्वारे पाठवण्यात आली आहेत. या पोर्टल द्वारे 17,000 ई–निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत.

लोकशाहीच्या रक्षणासाठी बंधुतेची मशाल हाती घ्यावी : डॉ. सबनीस

लोकशाहीच्या रक्षणासाठी बंधुतेची मशाल हाती घ्यावी : डॉ. सबनीसबंधुता परिषदेतर्फे दहाव्या विद्यार्थी व शिक्षक साहित्य संमेलनात रोहित पवार, प्रा. प्रदीप कदम यांना पुरस्कार प्रदान
पुणे : धर्मांध आणि सत्यांध असलेले सत्ताधारी वैचारिक दिवाळखोरी, महापुरुषांची बदनामी, नामांतर आणि धर्मांतर यासंबंधी उलटसुलट चर्चा करण्यात मश्गुल आहेत. अखंड भारतासाठी हे हिताचे नाही. अशावेळी बंधुतेची मशाल घेऊन लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वसामान्य नागरिकांनी उभे ठाकले पाहीजे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

क्रांतीदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय या संस्थाच्या वतीने कर्जत येथील शारदाबाई पवार सभागृहात आयोजिलेल्या दहाव्या शिक्षक आणि विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी ते बोलत होते. डॉ. सबनीस यांच्या हस्ते आमदार रोहीत पवार यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ व प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. संजय नगरकर, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, स्वागताध्यक्ष राजेंद्र फाळके आदी मान्यवर उपस्थित होते.

तत्पूर्वी, ‘आम्ही भारतीय’ अस्मिता दर्शन यात्रेने संमेलनाची सुरुवात झाली. दोन हजार विद्यार्थी, शिक्षक आणि साहित्यिकांनी त्यात सहभाग घेतला. यात्रेच्या प्रारंभी सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शंकर आथरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.

प्रा. शंकर आथरे म्हणाले, “कारखान्यांमध्ये वस्तूंचे उत्पादन व्हावे, तसे आजच्या शिक्षण व्यवस्थेने प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, विविध क्षेत्रातील अधिकारी यांचे उत्पादन केले. पण माणूसपण हरवले. त्यामुळे अडचणीच्या काळात एकमेकांच्या मदतीसाठी सक्षमपणे उभा राहणारा समाज निर्माण झाला नाही ही शोकांतिका आहे. त्यासाठी अशी संमेलने उपयुक्त ठरतात.” अशा संमेलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागेल. त्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास चालना मिळेल. वाचन संस्कृती वृद्धिंगत होईल, अशी भावना संमेलनाध्यक्ष डॉ. संजय नगरकर यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार रोहित पवार, प्रा. प्रदीप कदम, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्रकाश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. या संमेलनात बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार, गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले. राजेंद्र फाळके यांनी स्वागत केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुखदेव कोल्हे यांनी आभार मानले.

स्वातंत्र्य दिन समारंभाची मंत्रालयात रंगीत तालीम

मुंबई, दि १३: भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन १५ ऑगस्ट २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे.

सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागामार्फत भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय येथे ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अशोक गायकवाड यांच्यासह मंत्रालयीन विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

जीवनाला आकार देणाऱ्या समाजाच्या मदतीची जाणीव ठेवावी : पवार

प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थी साहाय्यक समितीमधील विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मंडळातर्फे सत्कार
पुणे : “आयुष्याची जडणघडण होताना कुटुंबासह विविध संस्था, व्यक्ती, समाज यांचे साहाय्य महत्वपूर्ण असते. यशाची शिखरे गाठताना वाटेवर मदतीला आलेल्यांचे ऋण विसरू नयेत. सामाजिक जाणीव ठेवून समाजाला परत देण्याची वृत्ती अंगीकारावी. संस्थेने दिलेले संस्कार, शिकवण प्रत्यक्ष कामात उतरवावी,” असे मत विद्यार्थी साहाय्यक समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले.
माजी विद्यार्थी मंडळातर्फे प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थी साहाय्यक समितीमधील विद्यार्थ्यांच्या सत्कारावेळी पवार बोलत होते. समितीच्या आपटे वसतिगृहात झालेल्या समारंभावेळी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष राजू इंगळे यांच्यासह समितीचे विश्वस्त, कार्यकर्ते, आजी-माजी विद्यार्थी, पर्यवेक्षक, देणगीदार उपस्थित होते.
पोलीस उपअधीक्षक किरण पोपळघट, सहायक संचालक (वित्त व लेखा विभाग) पूजा दाभाडे, मंत्रालय कक्ष अधिकारी विशाल ढोले, चक्रधर रासकर, सहायक सरकारी अभियोक्ता ऍड. पांडुरंग गरदरे, वनपरिक्षेत्र अधिकारी नीलम महाडिक, सोनाली इंगळे, सनदी लेखापाल भरत जाधव व आकाश पवार, विक्रीकर निरीक्षक सागर सरोदे, पोलीस उपनिरीक्षक भीमेश कोटला, ज्ञानेश्वर दुधेकर, काजल सरोदे, गोविंद बेडके, सहायक रासायनिक विश्लेषक सखी शेडगे यांना मानपत्र व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रतापराव पवार म्हणाले, ” चांगले लोक सगळीकडे हवे असतात. स्वतःच्या पायावर हिमतीने उभे राहताना अनेकजण मदतीला येतात. अपयशाने खचून न जाता जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले, तर यश मिळते.  माजी विद्यार्थी हे समितीचे भांडवल आहे. आपल्या यशात योगदान देणाऱ्यांप्रती कृतज्ञ रहा. अनुभवातून शिका. चांगल्या गोष्टींचा, ज्ञानाचा सदुपयोग करा. दिलेला शब्द, वेळ पाळा. सहकार्य, सौहार्दाच्या भावनेतून समाजहिताचे प्रामाणिक काम करा.”
तुषार रंजनकर म्हणाले, “समितीमधील विद्यार्थी मोठ्या संख्यने अधिकारी होताहेत, ही आनंदाची बाब आहे. इथे मिळालेले संस्कार, शिकवण कायम स्मरणात ठेवा. कठीण परिस्थितीत समितीचा, इतरांचा जसा आधार मिळाला, तसाच आधार तुम्ही देखील अडचणीत असलेल्याना द्या.”
राजू इंगळे यांनी माजी विद्यार्थी म्हणून संस्थेच्या कामात योगदान द्यायला हवे, असे आवाहन केले. समितीतील संस्कारांची शिदोरी अधिकारी म्हणून काम करताना उपयोग येईल, असे सांगितले. तुकाराम गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. मंडळाचे सचिव सुनील चोरे यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव मनीषा गोसावी यांनी आभार मानले.

मोदींच्या बरोबर जाऊन मला काहीही व्हायचं नाही,शरद पवारांनी कालच्या अजितदादांच्या भेटीचाही केला खुलासा

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या कालच्या भेटीसंदर्भात म्हटले आहे कि, अजित पवार हा माझा पुतण्या आहे. पवार कुटुंब जर बघितलं तर पवार कुटुंबात आता वडील माणूस मी आहे. वडील माणसाला कोण भेटायला आलं आणि वडील माणसानं कुणाला भेटायला बोलावलं तर हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं.संसदेत अविश्वास ठरावावर बोलताना माझ्या नावाचा उल्लेख करत नरेंद्र मोदी यांनी त्यांचं मत सांगितलं आहे. पण मला त्यांच्या बरोबर जाऊन काही व्हायचं नाही असं शरद पवार मोदींच्या पंतप्रधानपदाच्या वक्तव्याविषयी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या शनिवारी पुण्यात गुप्त बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या बैठकीचे विविध अर्थ काढले जात आहेत. जयंत पाटलांसह आणखी एक गट सत्तेत सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. अशी एकंदरीत चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजित पवारांच्या भेटीबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की, अजित पवार हा माझा पुतण्या आहे. सध्या पवार कुटुंबामध्ये सर्वात वडिलधारी व्यक्ती मीच आहे. त्यामुळे वडीलकीच्या नात्याने मी अजित पवारांना भेटलो. त्यामुळे यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही.भाजपाबरोबर युती करण्याच्या चर्चेवर शरद पवार पुढे म्हणाले, “भाजपाबरोबर युती करणं, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये बसत नाही. त्यामुळे आम्ही कुणीही भाजपाबरोबर जाणार नाही. आमच्यातील काही सहकार्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्यात काही परिवर्तन होईल का? असा प्रयत्न आमचे काही हितचिंतक करत आहेत. त्यासाठी ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी भूमिका मांडतो की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार नाही.”