पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात एकदिवसीय ‘ गांधी दर्शन शिबिराला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. रविवार, दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० ते ६ या वेळात हे शिबीर गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे पार पडले. ‘ गांधी दर्शन शिबिर ‘ मालिकेतील हे पाचवे शिबीर होते.
गांधी अभ्यास केंद्र(कोल्हापूर)च्या माजी समन्वयक डॉ.भारती पाटील यांनी ‘समग्र गांधी दर्शन’ या विषयावर ,ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी ‘गांधी सावरकर तुलना’ या विषयावर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी ‘सत्याग्रह शास्त्र’ विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. भारती पाटील म्हणाल्या, ‘पाश्चात्य विचारांकडे पाहिले की सर्वोदय, सत्याग्रह ही जगाला मिळालेली देणगी आहे, असे लक्षात येते.तळातल्या माणसाचा विचार करणारा विचार हा गांधीजींचा विचार आहे. हाच विचार घेऊन भारताला पुढे जावे लागेलगांधीजींनी एकाच आयुष्यात अनेक विस्मयकारक कामे केली. लेखन, संपादन, आंदोलन, स्वच्छताग्रह, समतेचा आग्रह अशा अनेक अलौकिक कामांना त्यांनी स्पर्श केला.
‘गांधीजी हे जातीव्यवस्था मोडून काढणारे दार्शनिक होते.समतेचा आग्रह त्यांनी धरला.हे भेद नष्ट करण्यासाठी गांधीजींनी काम केल्याने ते सनातन्यांना नकोसे झाले. गांधीजींचा प्रवास हा समताधिष्ठीत समाजासाठीचा प्रवास आहे. वर्चस्ववाद त्यांना नष्ट करायचा होता. त्यामुळे हयातीत त्यांना गोळया झेलाव्या लागल्या, आणि मरणानंतरही अनेक दशकांनी त्यांना गोळया झेलाव्या लागत आहेत.गांधीजींची पर्यावरणाला, परिसृष्टीवादाला जी देणगी आहे, ती अतुलनीय आहे. दुर्देवाने आपण सर्वानी भांडवलशाहीचा मार्ग स्वीकारला आहे.व्यक्तिगत स्वार्थाचा मार्ग आपण स्वीकारल्याने गांधीजींच्या व्यापक लोकशाहीचा आपणच पराभव केला’, असेही त्यांनी सांगीतले’
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ पूर्वी धर्मग्रंथाचे विवरण हाच विद्वत्ता दाखवण्याचा आधार होता. महात्मा गांधींनी स्वतः आचरणातून जीवनशैली निर्माण केली. शिवाय प्रत्येकाला तो विचार तपासून घेण्याची, विचारस्वातंत्र्याची मुभा दिली. गांधीजी कट्टरपंथीय नव्हते.विचारधारा तत्कालिन प्रश्नांना मार्गदर्शन करते. पण, विचार दर्शन हे सार्वकालिक, शाश्वत असते. गांधी विचारदर्शन हे असेच शाश्वत, सार्वकालिक आहे.’
ज्ञानेश्वर मोळक, डॉ. प्रवीण सप्तर्षी, संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, नीलम पंडित, सुदर्शन चखाले आदी मान्यवर उपस्थित होते.