सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या कालच्या भेटीसंदर्भात म्हटले आहे कि, अजित पवार हा माझा पुतण्या आहे. पवार कुटुंब जर बघितलं तर पवार कुटुंबात आता वडील माणूस मी आहे. वडील माणसाला कोण भेटायला आलं आणि वडील माणसानं कुणाला भेटायला बोलावलं तर हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं.संसदेत अविश्वास ठरावावर बोलताना माझ्या नावाचा उल्लेख करत नरेंद्र मोदी यांनी त्यांचं मत सांगितलं आहे. पण मला त्यांच्या बरोबर जाऊन काही व्हायचं नाही असं शरद पवार मोदींच्या पंतप्रधानपदाच्या वक्तव्याविषयी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या शनिवारी पुण्यात गुप्त बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या बैठकीचे विविध अर्थ काढले जात आहेत. जयंत पाटलांसह आणखी एक गट सत्तेत सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. अशी एकंदरीत चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवारांच्या भेटीबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की, अजित पवार हा माझा पुतण्या आहे. सध्या पवार कुटुंबामध्ये सर्वात वडिलधारी व्यक्ती मीच आहे. त्यामुळे वडीलकीच्या नात्याने मी अजित पवारांना भेटलो. त्यामुळे यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही.भाजपाबरोबर युती करण्याच्या चर्चेवर शरद पवार पुढे म्हणाले, “भाजपाबरोबर युती करणं, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये बसत नाही. त्यामुळे आम्ही कुणीही भाजपाबरोबर जाणार नाही. आमच्यातील काही सहकार्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्यात काही परिवर्तन होईल का? असा प्रयत्न आमचे काही हितचिंतक करत आहेत. त्यासाठी ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी भूमिका मांडतो की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार नाही.”