एक हजार मतदारांना सहभाग प्रमाणपत्राचे वितरण
पुणे, दि. ८ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत सर्व विधानसभा मतदारसंघात नवयुवा, महिला, दिव्यांग, पारलिंगी (तृतीयपंथीय), दुर्लक्षित घटकातील अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा याकरीता जिल्ह्यात आयोजित ‘माय फस्ट सेल्फी वोट’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून बारामती लोकसभा मतदार संघांतर्गत स्पर्धेत सहभाग घेतलेल्या १ हजार १ मतदारांना सहभाग प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात १ हजार ८१२ पुरुष व ६७४ महिला अशा एकूण २ हजार ४८६ मतदारांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी सेल्फी पॉईंटसमोर छायाचित्रे काढून पाठविलेल्या १ हजार १ मतदारांना ही प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली आहेत, असे स्वीपच्या समन्वय अधिकारी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी सांगितले.
जिल्ह्यात १३ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत अधिकाधिक नवयुवा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून या स्पर्धेत सहभागी व्हावे. मतदानाच्या दिवशी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रथम मतदान करणाऱ्या १८ ते १९ वयोगटातील नवयुवा तसेच महिला, दिव्यांग व पारलिंगी मतदारांने मतदान केल्यानंतर मतदान केंद्राच्या विहीत १०० मीटर मर्यादेच्या बाहेर येवून आपला सेल्फी काढावा. सदरचा सेल्फी जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या ९२७०१०५५९३ या व्हॉटसअप क्रमांकावर पाठवावा. सेल्फी पाठवतांना मतदारांनी आपली माहिती व छायाचित्रे पाठवावे. माहितीमध्ये नाव, आडनाव, विधानसभा मतदारसंघाचे नाव, मतदान ओळखपत्र क्रमांक किंवा मतदार यादी भाग क्रमांक व मतदार यादीतील अनुक्रमांक याचा समावेश करावा. युवा, महिला, दिव्यांग, पारलिंगी बाबत उल्लेख करावा.
प्रथम मतदान करणाऱ्या नवयुवा, महिला, दिव्यांग व पारलिंगी मतदाराला फेसबुक व इंस्टाग्रामच्या माध्यमातूनदेखील या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. याकरीता मतदाराने मतदान केल्याबाबतचा सेल्फी फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर ‘स्वीपपुणे’ ला टॅग करून पोस्ट करावा.
प्रत्येक विधानसभा मतदार संघात १० याप्रमाणे एकूण २१० मतदारांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये नवयुवा तरूण-तरुणीचे प्रमाण ५० टक्के असणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक मतदाराला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले सहभागी झाल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या मतदारांची ‘नवमतदारांना’ विधानसभा-२०२४ साठी पुणे जिल्ह्याचे ‘नवयुवा मतदारदूत’ म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच या २१० मतदारांपैकी निवडक एकूण १० युवामतदारांना त्यांच्या महाविद्यालयात किंवा भागात स्टँडीज उभारुन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना ‘स्वीप’च्या कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात येणार आहे, अशी माहितीदेखील श्रीमती तांबे यांनी दिली आहे.
0000