केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत आज तिरंगा यात्रेला मार्गदर्शन केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या यात्रेसाठी उपस्थित असलेल्यांसमोर आपले विचार व्यक्त करताना अमित शाह म्हणाले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये तिरंगा हाती घेऊन उभ्या असलेल्या हजारो लोकांना पाहिल्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाच्या प्रत्येक बालकात आणि युवकामध्ये देशभक्तीची भावना जागवण्याचे अभियान यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी देशामध्ये असे एकही घर नव्हते ज्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला नाही आणि लोकांनी सेल्फी घेतल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा जनतेला आपल्या घरांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे, असे ते म्हणाले. गुजरातमधून माती आणि तिरंगा घेऊन निघालेला युवा वर्ग दिल्लीला पोहोचेल. हे युवक देशभरातून आणलेली माती आणि तिरंगा दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करतील. युवा शक्ती प्रत्येक गावातही महान भारताच्या संकल्पाचा प्रसार करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादी का अमृत महोत्सव ही चळवळ हे देशभक्तीची भावना जागृत करण्याचे प्रभावी माध्यम ठरले आहे, त्याचप्रमाणे ‘मेरी माटी मेरा देश’ हा कार्यक्रमसुद्धा आपल्या देशाला महान, विकसित आणि स्वयंसिद्ध भारत म्हणून आकाराला आणण्यासाठीचा आपला संकल्प पूर्ण करेल, असे केंद्रीय गृहमंत्री यावेळी म्हणाले. सर्व नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट या काळात आपापल्या घरांवर तिरंगा फडकवावा आणि सेल्फी समाजमाध्यमांवर अपलोड करावेत असं आवाहन केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलं आहे. नागरिकांच्या या प्रयत्नांमुळे देशाला महानतेकडे नेणारी मोहिमच सुरु होईल असं ते म्हणाले. ज्या उत्साहाने तरुणवर्ग आपल्यासमोर उभा आहे ते बघून या मोहिमेतूनच पुढे देशभक्तीची भावना जागृत होईल आणि लोकांमध्ये विशेषतः मुले आणि तरुणांच्या मनात देशाला महान बनवण्याचा संकल्प दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात देशभक्तीची भावना जागृत केली, असे गृहमंत्री पुढे म्हणाले. ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’चा 15 ऑगस्ट 2023 रोजी समारोप होईल आणि नंतर 15 ऑगस्ट 2023 ते 15 ऑगस्ट 2047 या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करेल. स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष ते 100 वे वर्ष या कालखंडात आम्ही देशाला महान आणि प्रत्येक क्षेत्रात अव्वल म्हणून आकाराला आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमृतकाळ हा विशेषतः तरुण पिढ्यांसाठी अत्यंत मोलाचा आहे. 1857 तो 1947 या 90 वर्षांमध्ये तरुण पिढीने स्वातंत्र्य चळवळ केली आणि देशाला पारतंत्र्याच्या बेडीतून मुक्त केले, त्याचप्रमाणे आजच्या तरुण पीढीने 2023 ते 2047 या वर्षांमध्ये भारतमातेला महान बनवण्यासाठी योगदान द्यायला हवे, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.