पं. रोहिणी भाटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंगला हृद्य सोहळा

पुणे ता.१७: एकूणच शास्त्रीय नृत्यकलेस समाज मान्यता नसताना ज्यांनी आपल्या परिश्रमातून, दूरदृष्टीतून कथक क्षेत्रास मर्यादेतून मुक्त केले असे बहुआयामी, व्यासंगी व्यक्तीमत्व म्हणजे बेबीताई अर्थात रोहिणीताई.
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नृत्यभारती कथक डान्स अकॅडमीतर्फे ‘रोहिणीद्युति’ हा कार्यक्रम घेण्यात आला. भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या व संस्थेच्या संचालिका नीलिमा अध्ये यांच्या संकल्पनेतून रंगलेला हा दोनदिवसीय सोहळा रसिकांच्या पसंतीस उतरला. यावेळी ‘रोहिणीद्युति ‘ या नृत्यमैफलीतून आणि ‘सुहृदयसभा ‘ या वैचारिक मंथनातून समग्र रोहिणीताई रसिकांना उलगडल्या.
‘रोहिणीद्युति ‘ या मैफिलीची सुरुवात शिवस्तुतीने झाली. त्यानंतर कथक परंपरेनुसार तीन तालातील परण, आमद, परणामद, कालीपरण, यतीपरण, तुकडे, विलांबित लय, गत सादर करत कुशल नृत्यकलेचे दर्शन घडविले. रोहिणी ताईंकडून आत्मसात केलेल्या परंपरेची दृश्य झलक अध्ये यांच्या ‘घट घट मे पंछी बोलता..’ या एकल सादरीकरणातून पहावयास मिळाली. यांस रसिकांनी विशेष दाद दिली. नायिकेच्या नयनांचे काव्यात्मक वर्णन करणाऱ्या दोह्यास तसेच पर्जन्य सुक्त रचनेस देखील उपस्थितांची वाहवा लाभली. गणेश स्तुतीने मैफलीची सांगता झाली. अजय पराड (संवादिनी), माधुरी जोशी (गायन), कार्तिकस्वामी दहिफळे (तबला), आकाश तुपे (पखवाज), अर्पिता वैशांपायन (गायन), सुनील अवचट (बासरी), ऋजुता सोमण (पढंत) यांनी त्यांना समर्पक साथ दिली. यावेळी चेतना ज्योतिषी, सुषमिता घोष, डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते उद्गारने प्रकाशित केलेल्या ‘कथक दर्पण दीपिका’ या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी ज्योतिषी, घोष यांनी पं. भाटे यांच्या स्मृतीस उजाळा दिला. ‘बेबीताई साक्षात सरस्वती पुत्री होत्या. कलाकार म्हणून त्या प्रतिभावंत होत्याच परंतु अभिनय, गायन, साहित्य अशा कलाविष्कारांची देखील त्यांना सूक्ष्म जाण होती. ती प्रगल्भता त्यांच्या नृत्य आविष्कारातून रंगमंचावर उमटायची.’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी डॉ. आगाशे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या निपुण नृत्यांगनांनी केलेले निपुण सादरीकरण, ७५ वर्षे इतका मोठा काळ लोटूनही संस्थेच्या चार पिढ्यातील गुरू शिष्यांनी जपलेली परंपरा याबाबत त्यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ‘सुहृदयसभा’ यातून वैचारिक मंथन झाले. चंद्रमोहन कुलकर्णी (चित्रकला), सुषमा देशपांडे (नाट्य), सदानंद मेनन (छायाचित्रण), चैतन्य कुंटे (गायन), रोशन दाते (संस्कृती), शैलेश कुलकर्णी (साहित्य), सुहास किर्लोस्कर(चित्रपट), हेमंत महाजन (वास्तू विशारद) अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शनपर विचार ऐकण्याची संधी नवोदित कलाकारांना यातून लाभली. ‘ नृत्य ही एकमेव कला आहे, ज्यामध्ये शिल्प, चित्र, नाट्य, साहित्य आणि गायन या ललितकला वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळी तत्त्वे घेऊन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे नृत्यकलेतून प्रतिबिंबित होतात. त्यामुळे नृत्य म्हणजे सादरीकरण असा समज झाल्यास ती संकोचित मानसिकता ठरेल. नृत्याची अभिव्यक्ती समृद्ध तेव्हाच ठरेल, जेव्हा नृत्यासह इतर ललितकलांची देखील सूक्ष्म ज्ञान संपादित करण्याची क्षमता कलाकारांमध्ये दिसेल. असा सूर या सभेतून उमटला. ‘बेबीताईंनी सर्वज्ञ हे तत्व आत्मसात केल्यानेच त्या कलाकार म्हणून महान ठरल्या.आजच्या काळात ही तळमळ अभावानेच दिसते, अशी खंतही मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.
नीलिमा अध्ये यांनी या कार्यक्रमाचे निवेदन तर अशोक वाजपेयी यांनी सांगतापर मनोगत व्यक्त केले. शास्त्रीय मैफल आणि वैचारिक मंथन यांचा सुंदर मिलाफ ‘रोहिणीद्युति’ या कार्यक्रमातून रसिकप्रेमींनी अनुभवला.…………………………चौकट
शिष्यांकडून मानवंदना..मैफिलीतील सादरीकरणाने रसिकांना अक्षरश: खिळवून ठेवले असतानाच कार्यक्रमाच्या सांगतेची वेळ आली. यावेळी एकीकडे सादरीकरण सुरू असतानाच एक पेटती द्युती रंगमंचाच्या मधोमध ठेवण्यात आली. ‘या देवी सर्व शिष्येषु नृत्यरुपेण संस्थिता। या देवी रोहिणी तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥’ म्हणत रोहिणी ताईंच्या फोटोसमोर सर्व शिष्या नतमस्तक झाल्या. जाणिजे यज्ञ कर्म ..हे ब्रीद ठेवून संस्थेचा वारसा पुढे नेणे ही मोठी जबाबदारी आमच्यावर असल्याचा संदेश कृतीतून दिला. हे पाहून उपस्थित भारावले.