पुणे-हडपसरमधील हांडेवाडी परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या पुणे महापालिकेच्या सहायक निरीक्षकाला भाजी विक्रेत्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेत निरीक्षकाच्या गाडीची काचही फोडण्यात आली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.करोडोंची बेकायदा बांधकामे सोडली अन गरिबांच्या पोटावर पाय देता असे म्हणत अतिक्रमण कारवाईला भाजी विक्रेत्या महिलांनी विरोध केला. या घटनेबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षक अमोल लावंड यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शीतल महेश डांगे, रेखा सुदेश रोकडे, शाहिन मियाँसाहेब शेख, उषा दादाराव गायकवाड आणि सोनू सुदेश रोकडे (सर्व रा. हांडेवाडी) यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करत आहेत.
गुरुवारी (16 एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हांडेवाडीतील भाजी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई सुरू होती. त्यावेळी भाजी विक्रेत्या महिलांनी कारवाईला विरोध करत सहायक निरीक्षक अमोल लावंड यांना धमकावले. विक्रेत्यांनी लावंड यांच्यावर महिलांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यानंतर अतिक्रमण कारवाईस विरोध करत एकाने लावंड यांच्या गाडीची काच फोडली.

