पुणे–मध्य रेल्वेने 1 एप्रिल ते 15 नोव्हेंबर या आठ महिन्यांहून कमी कालावधीत 1 लाख एक हजार 443 मोटारींची वाहतूक केली. यातून मध्य रेल्वेला 120 कोटी 18 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ही वाहतूक मागील वर्षीच्या तुलनेत 36 टक्क्यांनी अधिक असून यावर्षीच्या मोटारींच्या वाहतुकीत पुणे विभाग अग्रस्थानी आहे.
एक एप्रिल ते 15 नोव्हेंबर या कालावधीत 708 रेकमधून एक लाख एक हजार 443 मोटारींची वाहतूक झाली. ऑटोमोबाईल उद्योगाला रेल्वे विभागाची मोठी मदत होत असून यामुळे वाहनांची देशभर वाहतूक करणे सोयीचे जात आहे. मागील वर्षी एक एप्रिल ते 15 नोव्हेंबर या कालावधीत मध्य रेल्वेने 613 रेकमधून 74 हजार 168 ऑटोमोबाईल लोड केल्या. त्यातून रेल्वेला 94 कोटी 19 लाख रुपयांचा महसूल मिळाला.मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कळंबोली, नागपूर विभागातील अजनी, भुसावळ विभागातील नाशिकरोड, सोलापूर विभागातील दौंड आणि विलाड तर पुणे विभागातील खडकी, चिंचवड, मिरज आणि लोणी येथे वाहतुकीसाठी मोटारींचे लोडिंग करण्यात आले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, मारुती उद्योग अशा नामांकित ऑटोमोबाईल कंपन्या मध्य रेल्वेच्या प्रमुख ग्राहक आहेत. या कंपन्यांच्या वाहनांची रेल्वेने नियमितपणे वाहतूक केली जाते.
पुणे विभाग यामध्ये पहिल्या स्थानावर आहे. एक एप्रिल ते 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 491 रेकमध्ये 79 हजार 136 मोटारींची वाहतूक करण्यात आली. मागील वर्षी याच कालावधीत 381 रेकमध्ये 49 हजार 945 मोटारींची वाहतूक झाली.भुसावळ विभाग दुसऱ्या स्थानवर आहे. या विभागाने चालू आर्थिक वर्षात 183 रेकमध्ये 18 हजार 224 मोटारी लोड केल्या. मागील वर्षी याच कालावधीत 155 रेकमध्ये 15 हजार 852 मोटारी लोड केल्या होत्या.सोलापूर विभाग तिसऱ्या स्थानावर असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या साडेसात महिन्यात 22 रेकमध्ये 2 हजार 580 मोटारी, नागपूर विभागाने 8 रेकमध्ये एक हजार 203 मोटारी तर मुंबई विभागाने 4 रेकमध्ये 300 मोटारी लोड करत त्यांची वाहतूक देशाच्या विविध भागात केली आहे.