श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागेच्या वतीने आयोजन ; श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली देवीला पुष्प पोशाख
पुणे : श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली देवीला परिधान केलेला मोग-याचा पुष्पपोशाख…मंदिराचा गाभारा व सभामंडपात विविधरंगी फुलांची आरास आणि मोग-याच्या लाखो सुवासिक फुलांना गंध अनुभविण्याकरिता देवीभक्तांनी मोठी गर्दी केली. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मोग-याच्या हजारो फुलांची सजावट अक्षय्यतृतीयेच्या निमित्ताने करण्यात आली होती.
निमित्त होते, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने अक्षय्यतृतीयेच्या निमित्ताने मोगरा महोत्सवाचे. यावेळी ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही सजावट करण्यात आली.
मोग-याच्या फुलांनी मंदिराचा परिसर खुलून गेला होता. तब्बल १०० किलो मोगरा, गुलाबाच्या फुलांच्या गड्डया, चाफा, जाई-जुई, गुलछडी, तगर, झेंडू, कार्नेशियन, आॅर्किड यांसह अनेक फुलांची आरास करण्यात आली. श्री महालक्ष्मी देवीसह श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीसमोर नैवेद्य देखील दाखविण्यात आला. फुलांची आरास पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. ही आरास शुक्रवार, दि. १० मे रात्री ९.३० पर्यंत पाहण्यासाठी खुली असणार आहे.