पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने ‘मोदींसाठी मोहोळच’ असा प्रचार सुरू केला आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ‘मोदींना एक मत द्या मुरलीधर मोहोळ यांना निवडून द्या’ यावर प्रचाराची भिस्त ठेवली असली तरी त्यामागे पाच वर्षे पालिकेवर एकहाती सत्ता असतानाही पुण्याचे काही महत्त्वाचे प्रश्न सुटण्याऐवजी जटील का बनले? या प्रश्नांनी भाजपला घेरले आहे. नुकतेच पुण्यासाठी काय केले याची माहिती घरोघरी पोहोचविणाऱ्या भाजपच्या पर्यायाने महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या संक्षिप्त कार्यअहवालाचे ‘पोस्टमार्टम’ केले जात आहे. ‘पाने चार, कामेही चार आता म्हणे चारशे पार ‘ अशी उपरोधिक टीका टिपण्णी राष्ट्रवादीचे नितीन कदम आणि अश्विनी कदम यांनी केली आहे. विशेष म्हणजे एकाच कामांची वेगवेगळ्या पानांवर मांडणी करून पाठपोठ आठ पाने भरण्याचे ‘काम’ चोख बजावले असले, तरी चाणाक्ष पुणेकरांच्या नजरेतून मात्र ते सुटले नाही तर नवलच! याकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते नितीन कदम यांनी लक्ष वेधले आहे.
पुणेकरांना वृत्तपत्राच्या माध्यमातून पाठवलेल्या ‘बांधिलकी पुण्याशी’ या संक्षिप्त कार्यअहवालावर उपरोधिक चर्चा आता रंगत आहे. ‘विश्वस्त पुणेकरांच्या विश्वासाचा’ याद्वारे साद घातली आहे; पण त्यावरून पुणेकर मात्र ‘तुमची आहे कुणावर भिस्त’ यावर अंगुलीनिर्देश करत असल्याचे चित्र आहे. या अहवालात केवळ मेट्रो, नदीसुधार, वैद्यकिय महाविद्यालय, चांदणी चौक उड्डाणपूल, समान पाणीपुरवठा, भामा आसखेड, उड्डाणपूल आणि कोरोनातील कामांचा लेखाजोखा मांडला आहे. त्यात शेवटच्या पानांवर पुन्हा हीच कामे संक्षिप्तपणे मांडल्याने ‘सांगण्यासारखे दुसरे काहीच ठोस नाही’ हेच अधोरेखित होत आहे. अशा शब्दात नितीन कदम यांनी या कार्य अहवालाचा पंचनामा केला आहे.
त्यात त्यांनी मांडलेले मुद्दे
न झालेली कामे/ पुणेकर उपेक्षितच
- मिळकत करा वरील 40% सवलत कोणी काढून घेतली?
- मेट्रो फक्त २०% झाली, उर्वरित मेट्रोचे कायपर्यायी रस्त्यांची अंमलबजावणी न झाल्याने ट्रॅफिक समस्या ‘जैसे थे’
- राष्ट्रवादीच्या काळात देशांतर्गत स्मार्ट सिटी स्पर्धेमध्येमध्ये पुण्याचा दुसरा नंबर आला होता. मोहोळांच्या कार्यकाळात मानांकन तर दूरच स्मार्ट सिटी ही गुंडाळायची वेळ आली
- चांदणी चौकात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडकल्याने तो सुधारण्यात आला
- इतर कामांसाठी खोदलेले रस्ते अजूनही दुरूस्त झाले नाही
- 24×7 पाणी योजना अजूनही सुरळीत नाही
- जायका प्रकल्प अजूनही रखडलेलाच
- भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय अर्धवट सुरु, रूग्ण उपचारांपासून वंचित
- पुण्यापासून लांबच्या अंतरावर इलेक्ट्रिक बस आहेत, मात्र खुद्द पुण्यात फिरण्यासाठी इलेक्ट्रिक बस नाहीत
- आपत्ती व्यवस्थापन विभाग नाही, त्यामुळे नैसर्गिक आपत्तींना तोंड देताना भंबेरी उडते
- बालगंधर्वच्या पुर्नविकासाचे काय
- नदी सुधार प्रकल्प व बालभारती-पौड फाटा रस्त्यांमुळे पुण्याच्या पर्यावरणाचा ऱ्हास
- आंबील ओढ्यासारख्या पुण्यातील मध्यवर्ती भागातील नाल्याकडे दुर्लक्ष
- बालेवाडीला क्रिडा विद्यापीठ अजूनही झाले नाही
विशेष म्हणजे ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ असा काहीसा प्रकारही या अहवालातून करण्यात आला आहे. त्यात कौशल्य विकास प्रशिक्षणावर आधारित रोजगार देणारे ‘लाईट हाऊस’ हा प्रकल्प मागील पालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात होता. त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाला आहे. सीओईपी येथील उड्डाणपूल, स्वारगेट येथील उड्डाणपूल राष्ट्रवादीच्या सत्तेत झाले आहेत. तसेच स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांच्या काळात ८३ पाण्याच्या टाक्यांची मान्यता मिळालेली असताना मात्र ती कामेही या चार पानांच्या कार्यअहवालात समाविष्ट करण्यात आली आहेत. पुण्यासाठी ठोस काही केले नाही म्हणून संक्षिप्त कार्य अहवालाबरोबर ४८ पानांची मोदी @१० ही छोटेखानी पुस्तिका भाजपने सादर करून मतांचे दान मिळवण्याचा खटाटोप केला असला तरी सुज्ञ पुणेकर मात्र त्याला थारा देणार नाही. असा ठाम विश्वास नितीन कदम यांनी व्यक्त केला आहे. शिवाय निवडणूक जाहीर होण्याआधी पुण्याच्या विकासावर बोलायचे सोडून ‘भक्ती’वर बोलणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांच्या या कार्य अहवालात काही ‘राम’ नाही अशी उपरोधिक टीकाही त्यांनी यानिमित्ताने केली आहे.