शिर्डी दि.९: देशातील महिलांना अधिकारिता देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, त्यामुळे आगामी काळात अनेक महिला राजकारणात महत्वाच्या पदावर दिसतील. महिलांच्या सक्षमीकरणातून देशाला बळकटी देण्याचं काम पंतप्रधान मोदी करत आहेत. पारंपरिक व्यावसायिक व बारा बलुतेदार यांचा विचार यापूर्वी कोणीही केलेला नव्हता, पंतप्रधान मोदींनी त्यांच्याकरिता १४ हजार कोटींची विश्वकर्मा योजना आणलेली आहे. मोदींजींनी महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांसाठी ५० हजार कोटींची निधी दिला आहे. अनेक वर्षे रेंगाळलेलं निळवंडे धरण प्रकल्पातून दुष्काळी भागाला पाणी देण्याचे आमचे नियोजन आहे. सहकारी कारखाने मजबूत करण्याचे काम मोदींजींनी केले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात आयकर विभागाच्या नोटिसा साखर कारखान्यांना पाठवून कारखाने बंद पाडण्याचा घाट घातला गेला मात्र पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या, लोकांच्या हिताकरिता कायद्यात बदल करून या कारखान्यांचा दहा हजार कोटी रुपयांचा आयकर रद्द करून साखर कारखाने आणि शेतकऱ्याला मदत करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. समृद्धी सारखा महामार्ग उभारून मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्राचा विकास यापरिसरात करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोपरगाव मधून सर्वाधिक मताधिक्य देऊन महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे आणि ज्या क्षणी शिर्डी लोकसभेतून सदाशिव लोखंडे यांना निवडून द्याल त्याक्षणी हा मतदारसंघ थेटपणे मोदींजींसोबत जोडला जाईल आणि या मतदारसंघातील विकासाला कोणीही थांबवू शकणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा क्षेत्रात मोठया प्रमाणात विकासात्मक कामे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली आहेत. यामध्ये समृद्धी महामार्ग, भाजीपाला जास्त काळ टिकावा याकरिता शीतगृहांची उभारणी यांसह विविध विकासकामे पूर्णत्वास नेलेली आहेत. केंद्रात पंतप्रधान मोदींजींचे हात बळकट करण्यासाठी आणि आगामी काळात शिर्डी लोकसभा क्षेत्रात आणखीन विकासात्मक कामे होण्यासाठी महायुतीचे लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी कोपरगाव येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री भागवत कराड, राज्याचे बांधकाम मंत्री दादा भुसे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, खासदार सदाशिव लोखंडे तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, जायकवाडी प्रकल्पातील व गोदावरी नदीतील पाणीप्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येथील सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन समान पाणी वाटप करतील असा विश्वास शिवसेना नेत्या डॉ. गोऱ्हे यांनी नागरिकांना दिला.
ही निवडणूक विकास विरुद्ध विनाश अशी आहे. भाजप सत्तेत आल्यावर घटना बदलणार असे काँग्रेस कडून जनतेत गैरसमज पसरविला जात असून एक प्रकारे खोटा प्रचार सर्वच विरोधकांकडून सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेला मोदी सरकारच्या काळात आणखीन मजबूत करण्याचे काम करण्यात आले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. ही निवडणूक, केंद्रात मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासोबतच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार पुन्हा येण्यासाठीची परीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांना सक्षम करणारे हे सरकार असून महिलांना राजकीय आरक्षण, सणावाराला आनंदाचा शिधा, अर्ध्या तिकिटात बस प्रवास यांसह महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी विविध योजना या सरकारने आजवर राबविल्या असल्याचे त्यांनी सांगितले.