पुणे, दि. ९ : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यासाठी चार शाळांची निवड करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नये तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे यासाठी त्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यास राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजनाबरोबर इतर सोई-सुविधा शासनाकडून मोफत पुरविल्या जातात.
या योजनेंतर्गत शिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील जे. आर. गुंजाळ इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, आळेफाटा (ता. जुन्नर), एस. डी. सह्याद्री पब्लिक स्कूल (सीबीएसई) अॅण्ड ज्युनियर कॉलेज, वाघळवाडी (ता. बारामती), एस. बी. पाटील पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, वनगळी (ता. इंदापूर) आणि श्री व्यंकटेश्र्वरा इंग्लिश मिडीयम स्कूल, वालचंदनगर (ता. इंदापूर) या चार शाळांची निवड करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील धनगर समाजातील पालकांचे उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्ता व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये प्रवेश घेऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक संगिता डावखर यांनी केले आहे.