Home Blog Page 1159

रत्नागिरी केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना इंडिया ज्वेलरी पार्क, नवी मुंबई येथे नोकरी मिळेल

रत्नागिरी-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्न आणि दागिन्यांच्या प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्राचे रत्नागिरी येथे उद्घाटन केले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रायोजित केलेल्या या उपक्रमासाठी जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) या सर्वोच्च संस्थेने पुढाकार घेतला आहे.

वेगवेगळ्या डिझाइन थीमवर आणि उत्तम कलाकुसर असलेले दागिने तयार करणे ही भारताची खासियत आहे. त्यामुळेच भारताच्या या ओळखीचा फायदा करून घेत नवीन मुलांना संधी देण्यासोबतच महाराष्ट्रातील समृद्ध कलेला पाठबळ देणे, हा या केंद्राचा उद्देश आहे. हस्तकला आणि बेस्पोक ज्वेलरीमध्ये महाराष्ट्राचा असलेला समृद्ध वारसा, त्याचे जतन आणि संवर्धन करणे हा देखील एक प्रमुख उद्देश आहे. याशिवाय, डिझाइनच्या क्षेत्रात असलेले भारताचे स्थान, येथील कारागीर आणि त्यांची सर्जनशीलता ही देखील या केंद्रामार्फत राखण्याचे काम GJEPC करत आहे.

रत्नागिरीतील या प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्रात स्थानिकांना या उद्योगाशी संबंधित कौशल्य शिकवली जातील. ज्यायोगे, रोजगाराच्या संधी तर निर्माण होतीलच पण या प्रदेशात आर्थिक विकासालाही चालना मिळेल. या सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे, दागिने तयार करण्याशी संबंधित वेगवेगळ्या क्षेत्रांचे प्रशिक्षण देणे, सांस्कृतिक वारसा जतन करणे, उद्योजकतेला चालना देणे आणि रत्नागिरीचा सर्वांगीण विकास करणे, हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “GJEPC च्या सहकार्याने आम्ही नवी मुंबईत भारतातील सर्वात प्रगत जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारत आहोत. अशा प्रकारच्या या पहिल्याच ज्वेलरी पार्कमुळे राज्यात जवळपास 1 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होतील. आणि ही संधी महाराष्ट्राच्या विविध भागातील लोकांपर्यंत पोहोचवायची आमची इच्छा आहे. GJEPC च्या CSR फंडाच्या माध्यमातून आम्ही रत्नागिरीमध्ये विशेष प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्र सुरू करत आहोत. या उपक्रमासाठी मी GJEPC चे अभिनंदन करू इच्छितो, कारण, यामुळे राज्याच्या विविध भागांतील तरुण आणि प्रतिभावंतांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रातून होणाऱ्या निर्यातीमध्ये रत्ने आणि दागिन्यांचा मोठा वाटा आहे. हीच आम्हाला प्रतिभा वाढवायची आहे.”

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “रत्न आणि दागिन्यांच्या व्यवसायात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे आणि अशा उपक्रमांमुळे त्याचे हे नेतृत्व टिकवून ठेवण्यास मदत होईल. रत्नागिरी प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्र दोन महिन्यांत सुरू होईल. आणि संस्थेत पहिल्या तीन वर्षांत प्रवेश घेणाऱ्या 1,500 विद्यार्थ्यांना नवी मुंबईतील आगामी इंडिया ज्वेलरी पार्कमध्ये निश्चित रोजगार मिळेल.

जीजेईपीसीचे अध्यक्ष विपुल शाह यांनी या केंद्राबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, “रत्नागिरीत प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्र उभारण्यासाठी जागा तसेच इमारत मोफत दिल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. रत्न आणि दागिने निर्यात उद्योग, ज्याचे मूल्य सध्या 40 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. ते भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. देशाच्या व्यापारी मालाच्या निर्यातीत याचे योगदान 9% आहे आणि हे क्षेत्र 4.3 दशलक्ष लोकांना रोजगार देते. वाढती जागतिक मागणी लक्षात घेता, तसेच 2030 पर्यंत 75 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढ्या मूल्याची निर्यात साध्य करण्यासाठी या उद्योगाला अधिक कुशल मनुष्यबळ आणि कौशल्याची आवश्यकता आहे. रत्नागिरीमध्ये प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्राची स्थापना हा या ध्येयपूर्तीचाच एक प्रयत्न आहे.”

राष्ट्रीय प्रदर्शन, GJEPC  चेसंयोजक नीरव भन्साळी म्हणाले, “महाराष्ट्र हे रत्ने आणि दागिन्यांच्या व्यवसायात नेहमीच अग्रेसर राहिले आहे आणि आता आम्हाला डिझाईन, कलात्मकता आणि नवनवीन डिझाइन्सच्या क्षेत्रात महाराष्ट्राला अग्रेसर बनवायचे आहे. नव्याने कार्यान्वित झालेल्या प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्रामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नवनवीन प्रतिभा शोधून काढण्यास निश्चितच उपयोग होईल. स्थानिक कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांमध्ये आणि प्रतिभेमध्ये गुंतवणूक केल्याने केवळ उद्योगासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी उज्ज्वल भविष्याचा पाया रचला जाईल.”

रत्नागिरी प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्र हे दागिने बनवण्याच्या विविध पैलूंचा अंतर्भाव करणारे अभ्यासक्रम ऑफर करेल, ज्यामध्ये फाइलिंग आणि असेंबलिंग, मेटल सेटिंग, पॉलिशिंग आणि फिनिशिंग, कास्टिंग मशीन ऑपरेशन आणि दागिन्यांसाठी संगणक-सहाय्यित डिझाइन यांचा समावेश आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, प्रमाणित प्रशिक्षणार्थींना संपूर्ण महाराष्ट्रात तसेच बाहेरील रत्न आणि दागिने उत्पादक कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या प्रशिक्षणार्थींचे रोजगार मूल्य वाढवण्यासाठी त्यांना सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षणही दिले जाईल.

कौशल्य विकास आणि रत्न तसेच दागिने क्षेत्राला काही न काही नवीन देण्याच्या GJEPC च्या वचनबद्धतेला हा उपक्रम अधोरेखित करतो. स्थानिक कर्मचाऱ्यांचे कौशल्य आणि प्रतिभेची गुंतवणूक करून, रत्नागिरीतील उद्योग आणि स्थानिकांसाठी उज्ज्वल भविष्याचा मार्ग प्रशस्त करण्याचे GJEPC चे उद्दिष्ट आहे.

..आता भावी मुख्यमंत्री , तानाजी सावंत…नवलाईच्या बॅनरने पुणेकरांनी घातली तोंडात बोटे

पुणे – पुणेरी पाट्यांप्रमाणे पुणे शहरातील बॅनर नेहमी चर्चेचा विषय असतो. पुणे शहरात लागलेल्या या बॅनरची चर्चा राज्यभर होत असते. मग राजकीय बॅनर असतील तर त्यासंदर्भात अधिकच कुतूहल तयार झालेले असते. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख असलेले बॅनर लागताना पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्यानंतर आता यात आता शिवसेनेच्या तानाजी सावंत यांची भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण तापले असतानाच शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पुण्यात बॅनर लागल्याने तोंडात बोटे घालण्याची वेळ पुणेकरांच्यावर आली आहे.एवढेच नव्हे तर अशी पोस्टर्स फेसबुकवर हि दिसत आहेत. यामुळे एकनाथ शिंदेंनंतर शिवसेनेत तानाजी सावंत हे देखील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत का? असा विस्मयकारी प्रश्न उपस्थित होतो आहे.

दरम्यान तानाजी सावंत यांनाएका उत्साही चाहत्याने यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना तानाजी सावंत यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री केला आहे. त्यांनी पुणे शहरात लावलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. पुण्यातील कात्रज चौकात हे बॅनर लावण्यात आले आहे. यामुळे सावंत यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला पंख फुटल्याची एकच चर्चा समाज माध्यमात होत आहे.

एकीकडे महायुतीच्या बैठकांचा सपाटा सुरू असताना तर दुसरीकडे जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू असताना तानाजी सावंत यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेले बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरले आहेत. तसेच हे बॅनर सावंत यांच्या संमतीने लावले आहे की कार्यकर्त्यांनी अतिउत्साहीपणात हे बॅनर लावले आहेत, याचीही चर्चा होत आहे.

बारामती माझा मतदारसंघ,कोणीही दमदाटी केली तर गाठ माझ्याशी, सुप्रिया सुळे यांचा अजित पवार गटाला थेट इशारा

इंदापूर -बारामती हा माझा मतदारसंघ आहे. माझ्या मतदारसंघात कोणी दमदाटी केली तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथे बोलताना अजित पवार गटाला दिला आहे. तसेच हर्षवर्धन पाटील यांना कुणी शिव्या घातल्या तर मी ढाल बनून उभी राहीन. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना धमकी देण्यात आल्याचा दावा त्यांनी स्वतः पत्राद्वारे केला होता. यावरूनच सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.

यावेळी बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”आजनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा महाराष्ट्रात कुणीही आमच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली तर त्यांना सांगायचे आधी सुप्रिया सुळेंना धमकी दे, मग माझ्याशी बोल. कुणीही शिवीगाळ करायची नाही. सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे. जसा चढ असतो तसा उतारही असतो”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बारामती हा माझा मतदारसंघ आहे. मी इथली खासदार आहे. त्यामुळे इथे कोणीही दमदाटी करायची नाही. कोणीही धमकी द्यायची नाही. नाही तर गाठ माझ्याशी आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या ”भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष एकमेकांवर असे हल्ले करतात, हर्षवर्धन पाटलांना शिव्या घातल्यात, ही इंदापूर आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे?, एका मित्रपक्षाचा नेता दुसऱ्या मित्रपक्षाच्या नेत्याला शिवीगाळ करतो. हर्षवर्धन पाटील यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगावे लागले”, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी महायुतीला लगावला आहे.

खालच्या पातळीवरील एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आपणास तालुक्यात फिरु देणार नाही, अशी धमकी देणाऱ्या मित्र पक्षातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर वेळीच आळा घालावा. ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी नुकतेच भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या नेत्यांचा समाचार घेतला.

इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

कुरुंदवाड : पुणे येथील इंद्रायणी बालन फांऊंडेशन व पुनित बालन ग्रुप यांचे समाजोपयोगी कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे मत स्पेशल कमांडो सुरक्षा भागाचे पोलीस सुहास पाटील यांनी केले. ते येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलला इंद्रायणी बालन फाउंडेशन व पुनीत बालन ग्रुप यांचे मार्फत इंट्रॅक्टीव्ह पॅनल प्रदान कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. वाय. पाटील उपस्थित होते. या ग्रुप मार्फत संस्थेला सुमारे १२ लाखाचे ६ इंट्रॅक्टीव्ह पॅनल मंजूर करण्यात आले आहेत. मुख्याध्यापक विनोद पाटील म्हणाले, बालन ग्रुपची शिक्षण, खेळ, समाज व देशातील जवानाप्रती असलेली आपुलकी त्यांच्या कार्यातून स्पष्ट होते. या कामी सुहास पाटील यांनी पाठपुरावा केल्याबद्दल संस्थेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. उदय पाटील यांनी स्वागत करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक गुणवत्ता वाढी साठी होत असल्याचे मत व्यक्त केले. आभार आर. एस. खोपडे यांनी मानले.

कॉंग्रेस देणार OBC चेहरा, आता बागुल आणि धंगेकर नावात रस्सीखेच

पुणे-लोकसभेसाठी काँग्रेस कडून आमदार रवींद्र धंगेकर, शहर अध्यक्ष अरविंद शिंदे आणि ज्येष्ठ नेते आबा बागुल यांची नावे चर्चेत आहेत. दिल्लीत या तीन नावावर चर्चा सुरु आहे. यातील अरविंद शिंदे हे मराठा उमेदवार आहेत. जातीची समीकरणे जोडायची झाली तर शिंदे यांचे नाव मागे पडून ओबीसी चेहरा पुढे केला जाऊ शकतो, असे मानण्यात येत आहे.तसेच त्यांच्याकडे सद्यस्थितीत पद देखील आहे. ओबीसी चेहरा असलेले बागुल आणि धंगेकर हे उरतात. काँग्रेसच्या एक नेता एक पद या नियमानुसार धंगेकर यांना आमदारकी देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन आणि ओबीसी चेहरा म्हणून बागूल हेच पात्र ठरतात, असे वृत्त आहे .पुणे लोकसभेसाठी भाजप अर्थात महायुती कडून मुरलीधर मोहोळ यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेस अर्थात महाविकास आघाडी कडून ज्येष्ठ नेते आबा बागुल यांचे जवळपास निश्चित झाल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. त्यानुसार काँग्रेसच्या एक नेता एक पद या सूत्रानुसार आणि महायुतीच्या मराठा उमेदवाराला धोबीपछाड देण्यासाठी महाविकास आघाडी कडून ओबीसी उमेदवाराचा विचार करता बागूल हेच यासाठी पात्र ठरत आहेत. येत्या 18 मार्च ला हे नाव अंतिम केले जाईल. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.पुणे लोकसभा निवडणुकीत आता रंग भरू लागले आहेत. कारण भाजप कडून आपले पत्ते ओपन करण्यात आले असून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून संजय काकडे ,योगेश मुळीक, सुनील देवधर यांची देखील नावे शर्यतीत होती. मात्र मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने ब्राम्हण उमेदवार राज्यसभेसाठी देण्यात आला असल्याने, मराठा उमेदवार म्हणून मोहोळ यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. आपला उमेदवार जाहीर करण्यात महाविकास आघाडी सावध पाऊल टाकत आहे. परंपरे प्रमाणे आघाडी कडून ही जागा काँग्रेसला सोडण्यात येईल. त्यानुसार काँग्रेस आणि महाविकास आघाडी ही जातीची समीकरणे निश्चित करूनच उमेदवार अंतिम करणार आहे.

आमदार धंगेकर यांना उमेदवारी मिळाली तर भाजप आपली दुप्पट ताकद लावेल असाही कयास आहे . त्याला कारण म्हणजे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यात धंगेकर यांनी बाजी मारली होती. तो पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. धंगेकर उमेदवार असतील तर भाजपला त्याचा वचपा काढायचा आहे. त्यामुळे काँग्रेस सावध पाऊले टाकत आहे.बागूल हे पहिल्यापासूनच सॉफ्ट आणि काँग्रेसचा सभ्य चेहरा म्हणून ओळखले जातात. शिवाय महाविकास आघाडीतील नेते देखील त्यांचेच नाव लावून धरत आहेत. बागूल यांच्या अनुभवाचा विचार करता त्यांनाच उमेदवारी दिली तर काँग्रेस ला पुणे लोकसभेची जागा हमखास मिळू शकेल, असे काँग्रेस वरिष्ठाना देखील वाटते. त्यामुळे येत्या काही दिवसांत उमेदवाराचे नाव जाहीर होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

डीवायपीसीओएची विजयी सलामी

शिअरफोर्स क्रीडा स्पर्धेला शानदार सुरुवात
पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वतीने आयोजन

पुणे : विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी आणि पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स स्पर्धेत डी.वाय.पाटीस काॅलेज ऑफ आर्किटेक्चरने श्रीमती काशीबाई नवले आर्किटेक्चर कॉलेजचा १-० ने पराभव करत विजयी सलामी दिली.  
 वानवडी येथील एस.आर.पी.एफ. मैदानावर  स्पर्धेचा उदघाटन सोहळा पार पडला. गिर्यारोहक आणि मॅरेथॉन धावक किशोर धनकुडे, विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट अभय छाजेड, सचिव जितेंद्र पितळीया, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य प्रसन्न देसाई या वेळी उपस्थित होते. महाविद्यालायाच्या क्रीडा विभागातील प्रथम चांडक, समृद्धी गोसावी, यश नाईक, सानिका ठिगळे यांचा स्पर्धा आयोजनामध्ये सहभाग आहे. 

  पहिल्या दिवशी फुटबॉलच्या सामन्यांना सुरुवात झाली. यामध्ये मुलांच्या विभागात मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि सिंहगड आर्किटेक्चर कॉलेज यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. या सामन्यात मराठवाडा कॉलेजचा बेन्सन मॅथ्यूज सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.
दुसऱ्या सामन्यात 28 व्या मिनिटाला आयानकुमार यादवने नोंदवलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरने श्रीमती काशीबाई नवले आर्किटेक्चर कॉलेजचा १-० असा पराभव केला. अयान सामन्याचा मानकरी ठरला.

मुलींच्या विभागात झालेले आयोजन स्कूल ऑफ डिझाईन विरुद्ध एस.बी. पाटील आर्किटेक्चर कॉलेज आणि ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर वि. अलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर हे दोन्ही सामने गोलशून्य बरोबरीत सुटले. या सामन्यात अनुक्रमे आयोजन स्कूलची मृण्मयी रावडे आणि अलाना कॉलेजची आचल मुगडिया यांची सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. 

विजय शिवतारे 6 तासांपासून वर्षा बंगल्यावर, शिवतारेंचा निर्धार मावळणार ?

मुंबई-माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी बरोबर निवडणूक समयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडचणीत आणून राजकीय वैमनस्याचा वचपा काढण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांना आव्हान देणे सुरु केले आहे. त्यांनी अजित पवारांना थेट आव्हान देत मी लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार असल्याची वल्गना केली. त्यामुळे महायुतीचा घटक पक्ष असलेले शिंदे व अजित पवार गटात चांगलाच वाद उफाळला आहे. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना भेटीसाठी बोलावले होते. मात्र, एकनाथ शिंदेंनी विजय शिवतारेंना 6 तासापासून वर्षा बंगल्यावर ताटकळत ठेवले आहे.

पुरंदर तालुक्याची शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवतारे म्हणाले की, मी त्यांना महायुती झाल्यानंतर माफ केले होते. मात्र अजित पवार यांचा उर्मटपण गेलेला नाही. जनता त्यांना निवडून देणार नाही. मी बारामतची लोकसभा निवडणूक लढवणारच आहे.अजित पवारांचा बदला घेणारच असा निर्धारच विजय शिवतारे यांनी केला होता. सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार असा प्रश्न आहे. मात्र, अजित पवार उर्मट आहेत, त्यामुळे लोक आम्ही सुप्रिया सुळेंनाच मतदान करु असे म्हणत आहेत”, असं विजय शिवतारे यांनी बोलून दाखवले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही. लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. त्यापैकीच हा एक आहे. त्यामुळे पवारांच्या नावाचा जयघोष करण्यापेक्षा मी स्वाभिमानाने लढले पाहिजे. अजित पवारांनी असभ्यतेची नीच पातळी गाठली आहे, असा जहरी टीकाही विजय शिवतारे यांनी केली होती.

आपल्याकडे लोकशाही आहे. सर्वांना बोलण्याचा अधिकार असतो. शिवाय निवडणूक लढवण्याचेही अधिकार आहेत. सध्या आम्ही महायुतीमध्ये काम करत आहोत. कोणाही राजकीय वातावरण बिघडेल, असं बोलू नये. महायुतीतील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठांसोबत बोलावे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय.

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपासून अजित पवार आणि विजय शिवतारे यांचा वाद वाढीस लागला. विजय शिवतारे यांनी शरद पवारांविरोधात टोकाची टीका केली होती. त्यानंतर अजित पवारांनी शिवतारे यांच्या मतदारसंघात सभा घेतली होती. या सभेत अजित पवार म्हणाले होते की, “विजय शिवतारे पोपटासारखा मिठू मिठू बोलाय लागलाय. तुझ बोलण किती आहे आणि तुझा आवाका किती आहे? आमचं दैवत असणाऱ्या माणसाविरोधात बोलतो. तुला यंदा दाखवतो तू आमदार कसा होतो ते. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, मी जर एखाद्याला आमदार करायचं नाही असं ठरवलं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही.” त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारेंचा पराभव झाला.

अजित पवारांचा बदला घेणार
जुन्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात बारामतीतून शड्डू ठोकलाय. मी विधानसभा निवडणूक लढवणारच असं शिवतारेंनी म्हटलय. अजित पवारांनी त्यांच्याविरोधात केलेली विधाने दोघांतील वाद वाढण्यास कारणीभूत ठरली आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विजय शिवतारे युतीधर्म पाळून अजित पवारांना मदत करतात की, स्वत: निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी यावर मार्ग काढण्यासाठी शिवतारेंना वर्षा निवासस्थानी बोलावले होते.

महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या स्वाती सिंह यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

मुंबई दिनांक १४ मार्च २०२४

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार, स्टार्ट अप इंडिया अंतर्गत असीम शक्ती फाउंडेशनची स्थापना करत महिलांना स्वावलंबी बनविणाऱ्या स्वाती सिंग यांचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती देऊन स्वाती यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री अमरजीत मिश्रा, विजय सिंह देखील उपस्थित होते.

“रेडी टू वेअर साडी विथ पॉकेट्स” या संकल्पनेचे पेटंट घेऊन स्वाती यांनी भारतीय पोशाख बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. त्याचबरोबरआर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. स्वाती यांचे कार्य उल्लेखनीय आहे. असे सांगत उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी स्वातीच्या कार्याचे कौतुक केले आणि त्या इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरतील असा विश्वास व्यक्त केला.

नुकतेच क्रियेटर अवॉर्ड सोहळ्यात पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, आता रेडीमेडचे युग आहे. पगडी घालण्याऐवजी आजचा तरुण रेडिमेड पगडी घालतो, आता रेडिमेड धोतरही बाजारात आले आहे. मुलींना सहज भारतीय कपडे घालता यावेत यासाठी रेडीमेड साड्याही बनवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले होते. तर गेल्या काही वर्षांपासून स्वाती यांची संस्था असीम शक्ती फाउंडेशन महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी हा उपक्रम राबवत आहे.स्वाती यांचा कारखाना अंधेरीतील एका झोपडपट्टीत आहे.

जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत 10 कोटी 68 लाखांचा बाह्यवळण रस्ता मंजूर

मुंबई, दि. 14 :- श्रीक्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेजुरी येथील बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्यासही मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मंजूरी प्राप्त झाली असून त्यासाठी अधिकच्या 10 कोटी 68 लाख 75 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णयही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने जारी केला आहे.

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 17 फेब्रुवारी 2024 रोजीच्या जिल्हास्तरीय बैठकीत श्रीक्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेजुरी येथील बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच त्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार प्रस्ताव तयार करुन त्यास 11 मार्च 2024 रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीची आणि 13 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता घेण्यात आली. त्यानुसार कालंच नवीन कामांचा व निधीमंजूरीचा शासन निर्णय जारी करण्यात आला. श्रीक्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी 20 जून 2022 रोजी मंजूर करण्यात आलेल्या 109 कोटी 57 लाख रुपयांच्या कामांमध्ये अधिकचे 10 कोटी 68 लाख रुपये मंजूर करुन हा नवीन बाह्यवळण रस्ता समाविष्ट करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेंनुसार प्रस्ताव सादर करुन आवश्यक मंजूरी मिळवण्यासह शासन निर्णय जाही करण्याची ही कार्यवाही अवघ्या दीड महिन्यात पूर्ण करण्यात आली.

महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या व जेजुरी शहरविकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे 349.45 कोटी रकमेचा श्रीक्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखाडा एकूण तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील विकास कामासाठी 109 कोटी 57 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यात आता 10 कोटी 68 लाख रुपये अधिकचे मंजूर करुन हा नवीन बाह्यवळण रस्ता समाविष्ट करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर 109 कोटी 57 लाख रुपयांच्या निधीतून, मंदिर व संपूर्ण तटबंदीचे जतन व दुरुस्तीसाठी 11 कोटी 23 लाख रुपये, दीपमाळांचे जतन व दुरुस्तीसाठी 11 कोटी 25 लाख रुपये, उत्तर-पूर्व व पश्चिम पायर्‍या, 13 कमानी, सहायक संरचना जतन आणि दुरुस्तीसाठी 12 कोटी 22 लाख रुपये, ऐतिहासिक होळकर व पेशवे तलाव आणि इतर जलकुंडांचे जतन व दुरुस्तीसाठी 12 कोटी 56 लाख रुपये, मल्हार गौतमेश्वर मंदिर, लवथळेश्वर व बल्लाळेश्वर मंदिरांचे जतन व दुरुस्तीसाठी 2 कोटी 2 लाख रुपये, कडेपठार मंदिर दोन पायरी मार्गांचे जतन व दुरुस्तीसाठी 10 कोटी 73 लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली. तसेच मूलभूत पायाभूत सुविधेअंतर्गत 12 कोटी रुपये, भूदृशे विकसित करण्यासाठी 18 लाख रुपये आदी कामांचा समावेश आहे.

प्रत्यक्षात जुलै 2023 मध्ये कामाला सुरुवात झाली. दि. 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सप्टेंबरमध्ये मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात डागडुजीचे काम सुरू करण्यात आले. सध्या तटबंदीची दुरुस्ती व जतन, जेजुरी गडकोटातील सर्व ओवर्‍या, सज्ज्यावरील आतील भागात वॉटरप्रूफिंग, प्रदक्षिणामार्गावर दगडी पायऱ्या बसविणे, पूर्व दरवाजा व पश्चिम दरवाजाबाहेरील दगडी पायरी मार्ग तयार करणे ही कामे सुरू आहेत. पिंपळ वेशी परिसरात पायरी मार्ग दुरुस्ती, कठडे, कमान सुशोभीकरण, बानूबाई मंदिर, हेगडे प्रधान मंदिराबाहेरील कामे सुरू आहेत. मुख्य मंदिरातील गाभारा, सभागृहातील दगडी फरशी तसेच सभागृहातील दगडी खांबांच्या दुरुस्तीचे काम अद्याप बाकी आहे. होळकर व पेशवे तलावाच्या तटबंदीची दुरुस्ती, नवीन दगडी कामे प्रगतिपथावर आहेत.

‘एमआयटी एडीटी’च्या प्रांजलीला मिनी गोल्फमध्ये रौप्य

पुणेः भारतीय मिनी गोल्फ संघटनेच्या मान्यतेने व महाराष्ट्र मिनीगोल्फ असोसिएशनच्या वतीने विभागीय क्रीडा संकुल, मनकापूर (नागपूर) येथे घेण्यात आलेल्या ९व्या वरिष्ठ (पुरुष आणि महिला) मिनी गोल्फ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यपीठाच्या प्रांजली सुरदुसे हिने महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करताना रौप्य पदकाची कमाई केली.तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या महिला गटात उत्तराखंड संघाने पहिला क्रमांक मिळवित सुवर्ण, तर महाराष्ट्रा संघाने रौप्यपदकावर आपली मोहर उमठवली. तर मध्यप्रदेश संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रांजलीने अगदी लहाण वयापासूनच मिनी गोल्फ खेळायला सुरुवात केली. त्यासाठी तिला वडील विनोद सुरदुसे यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर तिला एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रियंका जाधव यांचेही मार्गदर्शन लाभले.तिच्या या रौप्य कामगिरी नंतर विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, मिनीगोल्फ फेडरेशनचे मुख्य सचिव डाॅ.सुरज सिंग यवतीकर, प्र.कुलगुरू.डॉ.अनंत चक्रदेव, डॉ.रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डाॅ.सुराज भोयार यांनी अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिव्यांग नागरिकांना इलेक्ट्रिक सायकलींचे वितरण

बारामती, दि. १४:  जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अष्टावधानी संतुलन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलीचे वितरण भिगवण रोडवरील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, आरोग्य विस्तार अधिकारी सुनील जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार, फाउंडेशनचे अध्यक्ष भाऊसाहेब जंजिरे आदी उपस्थित होते.

फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील १०० दिव्यांग नागरिकांना सुमारे ५० लाख रुपयांच्या तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलीचे वितरण करण्यात आले. त्यापैकी आज ५ दिव्यांग नागरिकांना प्रातिनिधिक स्वरुपात तीन चाकी इलेक्ट्रिक सायकली वितरित करण्यात आल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे लोकार्पण

बारामती, दि. १४: प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ आणि बारामती नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच उघडा मारुती परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या सदनिका गृहप्रकल्पाचे भूमिपूजनदेखील उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे संचालक अनिल कानिटकर, संचालक प्रवीण कोळी, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव, किरण गुजर, बिरजू मांढरे आदी आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील गृह प्रकल्प ५ हजार ५०० चौ.मी. भूखंडावर उभारण्यात आला असून त्याअंतर्गत एकूण १०० सदनिकेचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सदरच्या सदनिका १ बीएचके आकाराच्या असून त्याचे क्षेत्रफळ २८.१ चौ.मी. इतके आहे. संपूर्ण गृह प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ९ कोटी ६६ लाख रुपये खर्च झाला आहे.

उघडा मारुती परिसरात सुमारे ५ हजार ११३ चौ.मी भूखंडावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पात एकूण ११४ सदनिका आहेत. सदरच्या सदनिका १ बीएचके आकाराच्या असून त्याचे क्षेत्रफळ २८.३१  चौ.मी. आहे. गृह प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १४ कोटी ८३ लाख रुपये खर्च येणार आहे.

या दोन्ही गृह प्रकल्पामुळे बारामती परिसरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध होणार असून त्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या शहरातील व्यापारी संकुलाचे लोकार्पण करण्यात आले.

०००

सिल्लोडच्या धर्तीवर बारामती शहरात उर्दू घर उभारण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. १४: अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून सिल्लोडच्या धर्तीवर बारामती शहरात उर्दू घर उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आगामी अर्थसंकल्पात करण्यात येईल, त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

डेंगळे गार्डन, कसबा येथे मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने शहरातील मुस्लीम समाजातील व्यवसायिकांना कर्ज मंजुरीपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गफार पी. मूकदूम, सहायक व्यवस्थापक संदेश कदम, आविश म्हात्रे, जिल्हा व्यवस्थापक रहीम मुलानी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, मुस्लीम कॉ. बँकेचे अध्यक्ष अल्ताफ सय्यद, माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव, तरन्नुम सय्यद, इद्रिस नायकवडी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास आणि वित्त महामंडळाकडून मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला कर्जपुरवठा करण्यात येतो. या कर्जपुरवठ्यासाठी  राज्यशासनाच्या हमीची मर्यादा आठ वर्षांसाठी ३० कोटींवरुन ५०० कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाचे भागभांडवल ७०० कोटी रुपयांवरुन १ हजार कोटी रुपये करण्यात आले आहे. महामंडळाच्यावतीने व्यापारी, महिला बचत गटांना सूक्ष्म कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महामंडळाडून देण्यात येणाऱ्या कर्जाच्या अटी व शर्तीत सुधारणा करुन त्या सुलभ करण्यात आल्या आहेत. महामंडळाला आवश्यकतेप्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी विविध पदांची भरती प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.

राज्यात अल्पसंख्यांक आयुक्तालय स्थापन करण्यासोबच जिल्हास्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अल्पसंख्यांक समाजातील तरुणांना व्यवसायिक शिक्षण घेता यावे, यासाठी शैक्षणिक कर्जाची  मर्यादा २० लाख रुपये करण्यात आले असून त्यांना व्यवसाय करण्यास प्रोत्सहान मिळण्याबरोबरच स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय, तांत्रिक अणि व्यवासायिक विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी ४० लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याकरीता अर्थसंकल्पात १० कोटीहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. डॉ. झाकेर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेकरीता १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अल्पसंख्यांक वर्गासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीच्याअनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल.

बारामती शहराच्या वैभवात भर घालणारा दिमाखदार शादीखाना उभारण्यात आला आहे. उर्दू शाळेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचे कामाला सुरुवात लवकरच सुरु होणार आहे. अल्पसंख्यांक विभागाकडून् बारामती तालुक्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागात दफनभूमी, संरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्यात अल्पसंख्यांक महिलांसाठी २ हजाराहून अधिक महिला बचत गट स्थापन करण्यात येणार आहे. यापैकी तालुक्यात अल्पसंख्यांक महिलांचे बचत गट स्थापन करण्यात येईल. समाजातील गोरगरीब नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. बारामती परिसरातील अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुस्लीम समाजातील नागरिक पारंपरिक व्यवसाय करीत असून त्यांना शासनाच्यावतीने मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महामंडळाच्यावतीने मुस्लीम समाजातील १५० व्यवसायिकांना प्रत्येकी रुपये ३ लाख या प्रमाणे ४ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. व्यवसायिकांनी मंजूर कर्जातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह योग्यरित्या करावा. कुटुंबाची प्रगती करावी, कर्ज वेळेवर परत करावे. आगामी काळात महामंडळाच्यावतीने परिसरातील इतर व्यवसायिकांना देखील अशाचप्रकारे निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे श्री. पवार म्हणाले.

यावेळी श्री. सय्यद यांनी विचार व्यक्त केले.

जावा येझ्दी मोटरसायकल्सतर्फे पुण्यात मेगा सर्व्हिस कॅम्पचे आयोजन

·         १६ ते १८ मार्च २०२४ दरम्यान या तीन दिवसीय सर्व्हिस कॅम्पचे आयोजन. शहरातील २०१९-२०२० मॉडेल्सच्या जावा मोटरसायकल ग्राहकांना सेवा देण्याचे ध्येय

·         ग्राहकांच्या मदतीसाठी आघाडीचे ओरिजनल इक्विपमेंट उत्पादक कॅम्पमध्ये हजेरी लावणार

पुणे१४ मार्च २०२४ : जावा येझ्दी मोटरसायकल्स आपला यशस्वी मेगा सर्व्हिस कॅम्प पुणेमहाराष्ट्रात येथे आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. राज्यभरात विविध ठिकाणी या तीन दिवसीय कॅम्पचे यशस्वी आयोजन केल्यानंतर पुण्यात १६ ते १८ मार्च २०२४ दरम्यान हा कॅम्प घेतला जाणार आहे. कॅम्पमध्ये २०१९- २०२० मॉडेल्सच्या जावा मोटरसायकल ग्राहकांना सेवा दिली जाणार आहे.

हा सर्व्हिस कॅम्प तीन ठिकाणी घेतला जाईल:

o   शक्ती ऑटोमोबाइल्स – प्लॉट क्रमांक जीपी- १८७लोअर ग्राउंड ड्रीमहाउस (मारूती ग्रुप थरमॅक्स चौक) चिंचवडपुणे, महाराष्ट्र ४११०१९

o   ग्रीन गिझर्स मोबिलिटी – गेट क्रमांक ४एस. नं. ५८२प्लॉट क्रमांक आर-2२६ओल्ड पाटील गराज ज्योती पान शॉप लेनमार्केट यार्डसमोर, गुलटेकडीपुणेमहाराष्ट्र ४११०३७

o   सनश्राइन व्हेंचर्स – ६६ गुरुछाया अपार्टमेंटकर्वे रस्तानळ स्टॉप, पुणेमहाराष्ट्र ४११००४

या कॅम्पमध्ये २०१९- २०२० मॉडेल्सच्या जावा मोटरसायकल ग्राहकांना त्यांच्या गाडीची संपूर्ण तपासणी आणि निवडक भागांचे मोफत रिप्लेसमेंट करून मिळेल. आघाडीचा ओरिजनल इक्विपमेंट पुरवठादार या कॅम्पमध्ये सहभागी होऊन ग्राहकांना मदत करणार असून त्यात मोतुलअमारॉनसीएट यांचा समावेश आहे. ग्राहकांना दीर्घकालीन सेवा देण्याच्या बांधिलकीतून जावा येझ्दी मोटरसायकल्सने मोटरसायकलच्या मूल्यांकनावरून मोफत वाढीव वॉरंटी देण्याचे ठरवले आहे. त्याशिवाय एक्सचेंज मूल्य जाणून घेत अपग्रेडिंगमध्ये रस असलेल्या ग्राहकांसाठी ग्राहकांसाठी खास झोन तयार केला जाणार आहे.

आधीच्या १४ सर्व्हिस कॅम्पना मिळालेला यशस्वी प्रतिसाद व त्यामध्ये करण्यात ३४५५ पेक्षा जास्त जावा मोटरसायकल्सचे सर्व्हिसिंग करण्यात आले असून  कंपनीने मार्च अखेरपर्यंत १०,००० बाइक्सच्या सर्व्हिसिंगचे करण्याचे ठरवले आहे. ब्रँडद्वारे येत्या काही महिन्यांत वेगवेगळ्या शहरात मेगा सर्व्हिस कॅम्प्सचे आयोजन केले जाणार आहे. या उपक्रमातून ब्रँडची ग्राहक समाधानाला प्राधान्य देण्याची व दर्जेदार ओनरशीप एक्सपिरियन्स देण्याची बांधिलकी दिसून आली आहे. 

जावा येझ्दी मोटरसायकल्सच्या ग्राहकांना त्यांच्या जवळच्या ब्रँड वितरकाकडे आपला स्लॉट राखून ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. आपल्या मोटरसायकलचे दर्जेदार सर्व्हिसिंग करण्याची व सर्वोच्च ग्राहक समाधान मिळवण्याची ही संधी चुकवू नये.

अल्ट्रा झकासच्या मनोरंजन विश्वात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ चित्रपट सामाविष्ट!

मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ या चित्रपटांनी जोरदार धुमाकूळ घालून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. दोन्ही चित्रपट आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘रेडीमिक्स’ हा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर उपलब्ध झाला असून ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ १८ मार्च २०२४ रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 

आपल्या मोठ्या बहिणीला प्रेमात मिळालेल्या धोक्याच्या निराशेतून बाहेर काढण्यासाठी नूपुरने आखलेली योजना यशस्वी होईल का, हे रेडीमिक्स चित्रपटात तर गोगलगावातील लोकांना घाणीतून स्वच्छ आणि सुंदर गाव करण्यासाठी अनासपूरेंची योजना यशस्वी होईल का, हे जय स्वच्छमेव जयते बोला या चित्रपटात बघता येणार आहे. ‘रेडीमिक्स’ चित्रपटात वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांचा जबरदस्त अभिनय पहायला मिळणार असून मकरंद अनासपूरे यांनी ‘जय स्वच्छमेव जयते  बोला’ चित्रपटात आपल्या विनोदी ढंगाने समाजासाठी एक गंभीर संदेश दिला आहे.

“समाजात मनोरंजन महत्वाचं आहे, त्याचबरोबर समाजाचं प्रबोधनही तेवढंच महत्वाचं आहे. मनोरंजातून प्रबोधन करणारे रेडीमिक्स आणि जय स्वच्छमेव जयते बोला हे चित्रपट प्रेक्षकांना बहाल करताना मनात एक उत्स्फूर्त भावना आहे” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीकुमार अग्रवाल म्हणाले. 

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies