शिअरफोर्स क्रीडा स्पर्धेला शानदार सुरुवात
पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वतीने आयोजन
पुणे : विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी आणि पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स स्पर्धेत डी.वाय.पाटीस काॅलेज ऑफ आर्किटेक्चरने श्रीमती काशीबाई नवले आर्किटेक्चर कॉलेजचा १-० ने पराभव करत विजयी सलामी दिली.
वानवडी येथील एस.आर.पी.एफ. मैदानावर स्पर्धेचा उदघाटन सोहळा पार पडला. गिर्यारोहक आणि मॅरेथॉन धावक किशोर धनकुडे, विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट अभय छाजेड, सचिव जितेंद्र पितळीया, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य प्रसन्न देसाई या वेळी उपस्थित होते. महाविद्यालायाच्या क्रीडा विभागातील प्रथम चांडक, समृद्धी गोसावी, यश नाईक, सानिका ठिगळे यांचा स्पर्धा आयोजनामध्ये सहभाग आहे.
पहिल्या दिवशी फुटबॉलच्या सामन्यांना सुरुवात झाली. यामध्ये मुलांच्या विभागात मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि सिंहगड आर्किटेक्चर कॉलेज यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. या सामन्यात मराठवाडा कॉलेजचा बेन्सन मॅथ्यूज सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.
दुसऱ्या सामन्यात 28 व्या मिनिटाला आयानकुमार यादवने नोंदवलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरने श्रीमती काशीबाई नवले आर्किटेक्चर कॉलेजचा १-० असा पराभव केला. अयान सामन्याचा मानकरी ठरला.
मुलींच्या विभागात झालेले आयोजन स्कूल ऑफ डिझाईन विरुद्ध एस.बी. पाटील आर्किटेक्चर कॉलेज आणि ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर वि. अलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर हे दोन्ही सामने गोलशून्य बरोबरीत सुटले. या सामन्यात अनुक्रमे आयोजन स्कूलची मृण्मयी रावडे आणि अलाना कॉलेजची आचल मुगडिया यांची सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.