रत्नागिरी-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्न आणि दागिन्यांच्या प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्राचे रत्नागिरी येथे उद्घाटन केले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रायोजित केलेल्या या उपक्रमासाठी जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) या सर्वोच्च संस्थेने पुढाकार घेतला आहे.
वेगवेगळ्या डिझाइन थीमवर आणि उत्तम कलाकुसर असलेले दागिने तयार करणे ही भारताची खासियत आहे. त्यामुळेच भारताच्या या ओळखीचा फायदा करून घेत नवीन मुलांना संधी देण्यासोबतच महाराष्ट्रातील समृद्ध कलेला पाठबळ देणे, हा या केंद्राचा उद्देश आहे. हस्तकला आणि बेस्पोक ज्वेलरीमध्ये महाराष्ट्राचा असलेला समृद्ध वारसा, त्याचे जतन आणि संवर्धन करणे हा देखील एक प्रमुख उद्देश आहे. याशिवाय, डिझाइनच्या क्षेत्रात असलेले भारताचे स्थान, येथील कारागीर आणि त्यांची सर्जनशीलता ही देखील या केंद्रामार्फत राखण्याचे काम GJEPC करत आहे.
रत्नागिरीतील या प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्रात स्थानिकांना या उद्योगाशी संबंधित कौशल्य शिकवली जातील. ज्यायोगे, रोजगाराच्या संधी तर निर्माण होतीलच पण या प्रदेशात आर्थिक विकासालाही चालना मिळेल. या सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे, दागिने तयार करण्याशी संबंधित वेगवेगळ्या क्षेत्रांचे प्रशिक्षण देणे, सांस्कृतिक वारसा जतन करणे, उद्योजकतेला चालना देणे आणि रत्नागिरीचा सर्वांगीण विकास करणे, हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “GJEPC च्या सहकार्याने आम्ही नवी मुंबईत भारतातील सर्वात प्रगत जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारत आहोत. अशा प्रकारच्या या पहिल्याच ज्वेलरी पार्कमुळे राज्यात जवळपास 1 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होतील. आणि ही संधी महाराष्ट्राच्या विविध भागातील लोकांपर्यंत पोहोचवायची आमची इच्छा आहे. GJEPC च्या CSR फंडाच्या माध्यमातून आम्ही रत्नागिरीमध्ये विशेष प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्र सुरू करत आहोत. या उपक्रमासाठी मी GJEPC चे अभिनंदन करू इच्छितो, कारण, यामुळे राज्याच्या विविध भागांतील तरुण आणि प्रतिभावंतांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रातून होणाऱ्या निर्यातीमध्ये रत्ने आणि दागिन्यांचा मोठा वाटा आहे. हीच आम्हाला प्रतिभा वाढवायची आहे.”
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “रत्न आणि दागिन्यांच्या व्यवसायात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे आणि अशा उपक्रमांमुळे त्याचे हे नेतृत्व टिकवून ठेवण्यास मदत होईल. रत्नागिरी प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्र दोन महिन्यांत सुरू होईल. आणि संस्थेत पहिल्या तीन वर्षांत प्रवेश घेणाऱ्या 1,500 विद्यार्थ्यांना नवी मुंबईतील आगामी इंडिया ज्वेलरी पार्कमध्ये निश्चित रोजगार मिळेल.
जीजेईपीसीचे अध्यक्ष विपुल शाह यांनी या केंद्राबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, “रत्नागिरीत प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्र उभारण्यासाठी जागा तसेच इमारत मोफत दिल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. रत्न आणि दागिने निर्यात उद्योग, ज्याचे मूल्य सध्या 40 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. ते भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. देशाच्या व्यापारी मालाच्या निर्यातीत याचे योगदान 9% आहे आणि हे क्षेत्र 4.3 दशलक्ष लोकांना रोजगार देते. वाढती जागतिक मागणी लक्षात घेता, तसेच 2030 पर्यंत 75 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढ्या मूल्याची निर्यात साध्य करण्यासाठी या उद्योगाला अधिक कुशल मनुष्यबळ आणि कौशल्याची आवश्यकता आहे. रत्नागिरीमध्ये प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्राची स्थापना हा या ध्येयपूर्तीचाच एक प्रयत्न आहे.”
राष्ट्रीय प्रदर्शन, GJEPC चेसंयोजक नीरव भन्साळी म्हणाले, “महाराष्ट्र हे रत्ने आणि दागिन्यांच्या व्यवसायात नेहमीच अग्रेसर राहिले आहे आणि आता आम्हाला डिझाईन, कलात्मकता आणि नवनवीन डिझाइन्सच्या क्षेत्रात महाराष्ट्राला अग्रेसर बनवायचे आहे. नव्याने कार्यान्वित झालेल्या प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्रामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नवनवीन प्रतिभा शोधून काढण्यास निश्चितच उपयोग होईल. स्थानिक कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांमध्ये आणि प्रतिभेमध्ये गुंतवणूक केल्याने केवळ उद्योगासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी उज्ज्वल भविष्याचा पाया रचला जाईल.”
रत्नागिरी प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्र हे दागिने बनवण्याच्या विविध पैलूंचा अंतर्भाव करणारे अभ्यासक्रम ऑफर करेल, ज्यामध्ये फाइलिंग आणि असेंबलिंग, मेटल सेटिंग, पॉलिशिंग आणि फिनिशिंग, कास्टिंग मशीन ऑपरेशन आणि दागिन्यांसाठी संगणक-सहाय्यित डिझाइन यांचा समावेश आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, प्रमाणित प्रशिक्षणार्थींना संपूर्ण महाराष्ट्रात तसेच बाहेरील रत्न आणि दागिने उत्पादक कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या प्रशिक्षणार्थींचे रोजगार मूल्य वाढवण्यासाठी त्यांना सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षणही दिले जाईल.
कौशल्य विकास आणि रत्न तसेच दागिने क्षेत्राला काही न काही नवीन देण्याच्या GJEPC च्या वचनबद्धतेला हा उपक्रम अधोरेखित करतो. स्थानिक कर्मचाऱ्यांचे कौशल्य आणि प्रतिभेची गुंतवणूक करून, रत्नागिरीतील उद्योग आणि स्थानिकांसाठी उज्ज्वल भविष्याचा मार्ग प्रशस्त करण्याचे GJEPC चे उद्दिष्ट आहे.