Home Blog Page 1160

आसवानी क्रिकेट कप स्पर्धेचे तिसरे पर्व २३ एप्रिलपासून

श्रीचंद आसवानी यांची पत्रकार परिषदेत माहिती; २४ दिवस चालणाऱ्या स्पर्धेत १६ संघांचा सहभाग

पुणे : ‘आसवानी क्रिकेट कप’ क्रिकेट स्पर्धेचे तिसरे पर्व २३ एप्रिल २०२४ पासून सुरु होत आहे. पिंपरी-चिंचवड येथील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर ही क्रिकेट स्पर्धा २४ दिवस चालणार आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ खेळणार असून, टी-१० स्वरूपात हे सामने होणार आहेत. ‘ये है पिंपरी का त्योहार’ ही टॅगलाईन घेऊन हा क्रीडा महोत्सव होत आहे, अशी माहिती स्पर्धेचे प्रमुख संयोजक, आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे मालक श्रीचंद आसवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. आसवानी क्रिकेट कप स्पर्धेचा लिलाव नुकताच मृणाल क्रिकेट ग्राउंडवर झाला. त्यानंतर आसवानी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी १६ संघांचे संघमालक उपस्थित होते. 

श्रीचंद आसवानी म्हणाले, “सिंधी समाजातील तरुणांमध्ये खेळ आणि तंदुरुस्तीबाबत गोडी निर्माण करण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. सिंधी समाजाला व्यवसायाबरोबरच खेळातही प्रगती करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा उपयुक्त ठरते. पहिल्या दोन्ही पर्वाना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आमची ऊर्जा वाढली आहे. एकूण ३६० खेळाडूंनी लिलावासाठी नाव नोंदणी केली होती. त्यातून १९२ खेळाडूंची निवड करण्यात आली. पुणे व पिंपरी-चिंचवडसह ठाणे, कल्याण, बारामती, सातारा शहरातून, तसेच कर्नाटक, गुजरात येथून खेळाडू सहभागी झाले आहेत. आयपीएलच्या धर्तीवर ही स्पर्धा होत असून, या स्पर्धेमुळे सिंधी समाजातील खेळाडूंना नव्या-जुन्या मित्रांसोबत खेळता येणार आहे.”

या १६ संघांचा समावेश

या स्पर्धेत पिंपरी इंडियन्स (विशाल तेजवानी-विशाल प्रॉपर्टीज), रत्नानी नाईट रायडर्स (प्रकाश रत्नानी-रोझ ग्रुप), मंगतानी टायटन्स (बग्गी मंगतानी-कोमल असोसिएट्स), तिल्वानी चार्जर्स (मयूर तिलवानी-गीता बिल्डर्स), एफएफ पुणे वॉरियर्स (फ्रेंड्स फॉरेव्हर ग्रुप), रॉयल चॅलेंजर्स वरुण (वरुण वर्यानी-एसएसडी एक्स्पोर्ट्स), केसवानी किंग्ज इलेव्हन (दीपक केसवानी-हॉटेल राधाकृष्ण), वाधवानी सनरायझर्स (पवन वाधवानी-साई वैष्णवी असोसिएट्स), मोटवानी रॉयल्स (हिरो मोटवानी-रोहित इन्फ्रा), आसवानी डेअरडेविल्स (श्रीचंद आसवानी-आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स), संत कंवरम लायन्स (लडकानी & लखवानी फॅमिली-विजयराज असोसिएट्स अँड लखवानी असोसिएट्स), देव टस्कर्स (शेरा अहुजा-सतनाम ड्रायफ्रुट्स), डायमंड सुपरकिंग्ज (मनजीत सिंग वालेचा-एमएसव्ही स्टील अँड अल्युमिनियम), रामचंदानी सुपरजायंट्स (विजय रामचंदानी-एव्हीआर स्पेसेस), सिंध ब्लास्टर्स (रितेश अथवानी-एव्हीआर स्पेसेस) आणि छाब्रिया रायझिंग स्टार्स (गौरव छाब्रिया-विश्वकर्मा ग्रुप) या १६ संघांचा समावेश आहे.

बक्षिसांची बरसात

या स्पर्धेचे उद्घाटन २३ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. सर्व सामने युट्युब व फेसबुक पेजवरून लाईव्ह प्रक्षेपित केले जाणार असून, सर्व कुटुंबीय या स्पर्धेत प्रेक्षक म्हणून सहभागी होतील. विजेत्या संघाला ५,५५,५५५/-, तर उपविजेत्या संघाला ३,३३,३३३/- रुपयांचे रोख पारितोषिक व करंडक दिला जाणार आहे. यासह मॅन ऑफ द सिरीजसाठी कार, सलग ६ षटकार लावणाऱ्यास २,५१,०००/- रुपयांचे रोख बक्षीस, हॅट्रिक विकेटसाठी १,०१,०००/-, हॅट्रिक सिक्सेससाठी ५१,०००/-, प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचसाठी १०,०००/-, प्रत्येक सिक्ससाठी १०००/-, प्रत्येक चौकारासाठी ५००/- रुपये बक्षीस दिले जाणार आहे.”

यांनी लावला स्पर्धेला हातभार

या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स आहेत. मीडिया स्पॉन्सर पीसीएमसी केबल्स (अरुण शर्मा), एफएनबी पार्टनर रंगला पंजाब (रमण बिंद्रा), टॉस स्पॉन्सर सिटी कार्स (रॉकी सेवानी), जर्सी स्पॉन्सर शगुन टेक्स्टाईल्स (सुमित बोदानी), स्ट्रॅटेजिक पार्टनर द कॉर्नर लाऊंज (सनी गोगिया) व फेअर प्ले अवॉर्ड स्पॉन्सर ओम कंस्ट्रक्शन्स (पंकज केसवानी), किट स्पॉन्सर आरके पॉलिमर्स (राहुल कुकरेजा), इव्हेन्ट स्पॉन्सर थॉट वाईज (राजेश शर्मा) यांनी स्पर्धेला हातभार लावला आहे. संयोजन समितीमध्ये विजय आसवानी, हितेश बाटवा, अविनाश इसराणी, शाईल कुकरेजा, राहुल तेजवानी, सुनीत सोनवानी, जॅकी दासानी, दिनेश मुलचंदानी, ऋषी उबरानी, नीरज कृपलानी, पंकज मंगतानी, विकी चंचलानी, सुमित कटारिया व रॉकी सेवानी यांचा समावेश आहे.

 राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र पहिले अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबईदि. १४ : मौजे वाटोळे (ता. पाटण, जि. सातारा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकरीता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. हे विभागाचे राज्यातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र आहे. यामध्ये अद्ययावत सर्व सुविधा असणार आहे. विभागातील अधिकारी, जवान, कर्मचारी यांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षण केंद्र उपयोगी ठरणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, प्रशिक्षण केंद्रात सायबर सेल कार्यान्वित राहणार आहे. या सेलच्या माध्यमातून अवैध मद्य विक्री व निर्मिती, अन्य राज्यातून आवक होणारे अवैध मद्य यामध्ये गुन्हे दाखल करणे, गुन्हे सिद्ध करणे, याबाबत कारवाया कारणे सोयीचे होणार आहे. या प्रशिक्षण केंद्राकरीता ३४८ कोटी रुपयांचा खर्च येणार असून ५० एकर जागा लागणार आहे. तसेच ५१ नवीन पदे प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर करण्यात आली आहेत. पोलिस विभागातील प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य यांची प्रतिनियुक्तीवर सेवा घेवून प्रशिक्षण देण्यात येईल. नवीन पदांवरील व्यक्ती रुजू होईपर्यंत ही व्यवस्था राहील. सध्या विभागातील ७५० पदांची भरती प्रक्रिया सुरू असून एमपीएससीमार्फत १४४ पदे भरण्यात येणार आहेत.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनास महसूल देणाऱ्या प्रमुख विभागांपैकी एक आहे. या विभागाद्वारे शासनास 2022-23 या आर्थिक वर्षात सुमारे 21 हजार 550 कोटी इतका महसूल जमा करण्यात आलेला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता 25 हजार 200 कोटी इतके महसुली उद्दिष्ट आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला राज्यासाठी मोठा महसूल मिळवून देण्याचे उद्दिष्ट देण्यात येते. दरवर्षी या उद्दिष्टात वाढ करण्यात येत आहे. त्यानुषंगाने विभागातील अधिकारी/कर्मचारी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी अवैध मद्य विक्री व निर्मितीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करत असतात. त्याकरिता मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक  कारवाया व गुन्हे नोंद करण्यात येतात. हे गुन्हे नोंदविणे, त्याचा तपास करुन गुन्हे सिद्ध करण्यास्तव कायदेशीर तरतुदीचे तसेच तपासकामी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे इ. बाबींचे ज्ञान आवश्यक असते. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची शारीरिक क्षमता वृध्दिंगत करून शारीरिक व कायदेविषयक प्रशिक्षण देण्याकरीता विभागाचे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारणी करणे गरजेचे होते, अशी माहितीही मंत्री श्री. देसाई यांनी दिली.

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी २८ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १४ : मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील ज्या विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी २८ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, शैक्षणिक दाखला, ट्रान्सफर सर्टीफिकेट, आधार, पॅन, मतदानकार्ड, पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे, उत्पन्न दाखला इत्यादी कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय मुंबई शहर/उपनगर, रुम नं. ३, गृहनिर्माण भवन, म्हाडा बिल्डिंग, कलानगर, वांद्रे (पूर्व) मुंबई ४०० ०५१ या पत्त्यावर अर्ज करावेत. २८ मार्च २०२४ नंतर कोणतेही प्रशिक्षणाचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. प्रशिक्षण विद्या वेतनासाठी विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालयातून विनामूल्य मिळतील.

जिल्ह्यातील मातंग समाज बांधव व तत्सम बारा पोटजातीमधील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थी मांतग समाजातील व तत्सम बारा पोटजातीतील असावा, त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे. यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच प्रशिक्षणार्थीने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा.

याअंतर्गत मुंबई शहरातील २०० मुंबई उपनगरातील २०० विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे. मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत याकरिता सन-२०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त झाले आहे, असे महामंडळाचे मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

शिराळा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळ विकासासाठी 13 कोटी 46 लाखांचा निधी मंजूर -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 14 :- स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन अशा सांगली तालुक्यातील शिराळा येथील स्मृतीस्थळ विकास आराखड्यास राज्य शासनाच्या शिखर समितीची मान्यता मिळाली असून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने त्यासाठी 13 कोटी 46 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यासंबंधीचा शासननिर्णय नियोजन विभागाने जारी केला आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना कोकणात अटक करुन पुण्याला नेत असताना, मोगलांच्या ताब्यातून त्यांची सुटका करण्यासाठी स्वराज्याच्या मावळ्यांनी शिराळा येथे दिलेल्या धाडसी लढ्याची माहिती यानिमित्ताने भावी पिढीपर्यंत पोहचेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील वढु-बुद्रुक येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ स्मारकाचं तसंच हवेली तालुक्यातील मौजे तुळापूर येथील बलिदानस्थळ आणि परिसराच्या विकासकामांचं भूमीपूजन नुकतंच करण्यात आलं. त्याच धर्तीवर सांगली तालुक्यातील शिराळा स्मृतीस्थळ विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत सातत्याने बैठका घेऊन त्यांनी यासंदर्भातील कार्यवाही त्वरेने करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार स्मृतीस्थळ विकास आराखडा तयार करुन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समिचीची त्यास मान्यता घेण्यात आली व 13 कोटी 46 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असून 31 मार्च 2026 पर्यंत त्यांना सर्व विकासकामे पूर्ण करायची आहेत.

सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या या स्मृतीस्थळाचे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यरक्षणाच्या लढ्यात अनन्यसाधारण महत्व आहे. छत्रपती संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर इथे कैद करुन पुण्याकडे नेले जात असताना त्यांची मोगलांच्या ताब्यातून सुटका करण्याचा साहसी प्रयत्न शिराळ्यातल्या भुईकोट किल्ला परिसरात झाला होता. स्वराज्याच्या मावळ्यांना त्यात यश आलं नसलं तरी स्वराज्याच्या लढ्यातला तो देदिप्यमान अध्याय आहे. तो अध्याय जपण्याचा, त्या लढ्याची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न शिराळा स्मृतीस्थळ विकास आराखड्याच्या अंमलबजावणीतून करण्याचा प्रयत्न आहे. त्यात निश्चित यश मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार आमच्या हृदयात:माझी विचारधारा अन् पक्ष एकच, मी केव्हाच पक्ष सोडला नाही, आमदार नीलेश लंके यांचे प्रतिपादन

पुणे-माझी विचारधाराी अन् पक्ष एकच आहे. मी केव्हाच पक्ष सोडला नाही. शरद पवार साहेब आमच्या हृदयात आहेत. खासदारकी किंवा निवडणुकीविषयी माझी त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. मी आज येथे केव्ळ पुस्तक प्रकाशनासाठी आलो आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीची चर्चाच झाली नाही तर त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही, असे मत आमदार नीलेश लंके यांनी गुरुवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

नीलेश लंके यांच्या ‘मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करून ते आल्यापावली मार्गस्थ झाले. यावेळी शरद पवारांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे ,आमदार अशोक पवार, प्राजक्त तनपुरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप,प्रवक्ते अंकुश काकडेउपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, बराच काळ आमची आणि निलेश लंके यांची भेट होत नव्हती. आज ती झाली. सर्वसामान्य लोकात लंके यांची ओळख असून राज्याला मदत काळात धावून येणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. लंके हे शरद पवार यांना आज भेटण्यास आले. पवार यांच्या नेतृत्व आणि व्यक्तिमत्व याचे आकर्षन त्यांना राहिलेले आहे. पवार साहेब यांच्या विचारधारेनुसार यापुढे काम करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे .शरद पवार यांचे वय इतके झाले असताना सुद्धा, तरुणांना लाजवेल अशा प्रकारे ते काम करत आहे. त्यांच्या ऊर्जेची अनेकांना भुरळ पडते.

निलेश लंके म्हणाले, देशात ज्या महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत, त्यात महत्वाची भूमिका शरद पवार यांनी बजावलेली आहे. शरद पवार साहेब आमच्या हृदयात आहेत. मला विधानसभा निवडणूक आज देखील आठवत आहे. त्याचा शुभारंभ पवार साहेब यांनी केला. कोरोना काळात अनेक जण नाती विसरली, पण शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर सुरू करून 31 हजार लोकांना मदत केली. कोविड काळात आलेले अनुभव सविस्तरपणे या पुस्तकात मांडले आहेत.

मोदींची गॅरंटी भेदभाव करणारी तर राहुल गांधींची गॅरंटी सर्वसामान्य जनतेला न्याय देणारी: बाळासाहेब थोरात.

ओझर, नाशिक, दि. १४ मार्च
मोदी सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन काळे कायदे २७ सप्टेंबर २०२० रोजी आणले होते परंतु शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनापुढे त्यांना झुकावे लागले आणि अखेर ते तीन काळे कायदे वापस घ्यावे लागले. यासाठी १५ महिन्यांचे आंदोलन व ७०० शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागले आणि १९ नोव्हेंबर २०२१ रोजी हरित क्रांतीच्या प्रणेत्या दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जन्मदिनी मोदींना मजबुरीने काळे कायदे वापस घ्यावे लागले. तीन वर्षानंतर पुन्हा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे, हे आंदोलनही दडपण्याचा प्रयत्न झाला. मोदी सरकारने वारंवार शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. मोदी सरकारची एकच निती आहे, चंदादात्याचा सन्मान व अन्नदात्याचा अपमान, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी केला.
नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे पत्रकार परिषदेशाला संबोधित करताना जयराम रमेश म्हणाले की, शेतकऱ्यांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, गोळीबार केला, राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्याची धमकी दिली पण पुन्हा एकदा मोदी सरकारला झुकावे लागले आणि दिल्लीच्या रामलीला मैदानावर शेतकरी आंदोलन सुरु झाले तर आजच चांदवडमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावाही पार पडला. भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना पाच गॅरंटी दिल्या आहेत. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार एमएसपीचा कायदा करणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, आयात निर्यात धोरण शेतकरी हिताचे करणार, पिक विमा योजनेची पुनर्रचना करणार व शेतकऱ्यांना जीएसटीतून वगळणार.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारने १० वर्षात केवळ मुठभर श्रीमंत लोकांसाठी काम केले आहे. सर्व पातळीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. भारत जोडो यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असून राहुल गांधी यांच्यावर जनतेचा विश्वास वाढलेला आहे. केंद्रातील मोदी सरकार पायउतार होण्याची वेळ आली असून राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस विचाराचे सरकार येईल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारत जोडो यात्रेसारखे भारत जोडो न्याय यात्रेलाही जनतेचे मोठे समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रात नंदूरबारमध्ये या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. धुळ्यात महिला हक्क परिषदेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि चांदवडच्या शेतकरी मेळाव्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी शेतकरी, कामगार, तरुण, महिला, सर्वसामान्य जनतेला गॅरंटी देत आहेत. मोदींची गॅरंटी भेदभाव करणारी आहे तर राहुल गांधी यांची गॅरंटी मात्र सर्वसामान्य जनतेला न्याय देणारी आहे.

या पत्रकार परिषदेला माजी मंत्री व काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, सोशल मीडियाचे राज्य प्रमुख विशाल मुत्तेमवार, सरचिटणीस ब्रिज दत्त आदी उपस्थित होते.

भारत जोडो न्याय यात्रा आज सकाळी मालेगाव येथून सुरु झाली त्यानंतर चांदवड मध्ये शेतकरी मेळावा झाला. ओझर येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले, दुपारच्या विश्रातीनंतर नाशिकच्या द्वारका चौकातून यात्रा पुन्हा सुरु झाली व इंदिरा गांधी चौकात जनतेला संबोधित करुन राहुल गांधींनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यात्रेचा मुक्काम मोखाडा येथे होईल.

..तर नरेंद्र मोदींना पळून जावे लागेल:राहुल गांधींची टीका

आदिवासी महिला असलेल्या राष्ट्रपतींना राम मंदिराच्या कार्यक्रमात डावललेजनतेचे मूळ मुद्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न22 जणांकडे 70 कोटी लोकांएवढे धन

नाशिक – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आज येथे राहुल गांधी यांनी टीकेची झोड उठवली. कोणत्याही क्षेत्रात मागास वर्गाचे योग्य प्रतिनिधित्व नाही. या वर्गाच्या लोकसंख्येचा खरा आकडा कुणीही सांगू शकत नाही. त्यांचा आकडा 50 टक्क्यांच्या आसपास असल्याचा दावा केला जातो. पण प्रत्यक्षात आदिवासी, दलित, मागासवर्ग यांचा आकडा 90 टक्क्यांच्या आसपास आहे. या वर्गाने आपली ताकद ओळखली पाहिजे. त्यांनी जातगणनेची मागणी केली तर नरेंद्र मोदींना एकतर जातगणना करावी लागेल किंवा पळून जावे लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी आहेत. त्यामुळेच त्यांना राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही. कारण, भाजप त्यांना आदिवासी नव्हे वनवासी मानते. या कार्यक्रमाला धनदांडगे दिसून आले. पण तिथे एकही शेतकरी, कामगार, दिनदुबळे दिसला नाही. सरकार 24 तास तुमचा खिसा कापत असताना तुम्ही काहीच बोलत नाही ही खरी समस्या आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सर्वसामान्य जनतेचे लक्ष मूळ मुद्यांवरून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर उद्योगपती गौतम अदामी जनतेची लूट करत आहे. या दोघांनंतर अमित शहा ईडी, सीबीआय, आयटीच्या माध्यमातून जनतेला दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राहुल म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्राच्या अग्निवीर योजनेवरूनही सरकारवर निशाणा साधला.

22 जणांकडे 70 कोटी लोकांएवढे धन आहे. सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करत असेल तर शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे. हे कसे होत नाही हे मी पाहतो. सरकारला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करता येत नसेल तर उद्योगपतींचेही करू नये, असे राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा गुरुवारी नाशिकमध्ये रोड शो झाला. यावेळी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी राहुल यांना जेसीबीच्या मदतीने हार घालण्याचा प्रयत्न केला. पण राहुल यांच्या अंगरक्षकांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तसे करण्यापासून रोखले. यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच नाराजी झाली. दरम्यान, देशातील आदिवासी, दलित, मासागवर्गीयांनी जातगणनेची मागणी केली तर नरेंद्र मोदींना एकतर जातगणना करावी लागेल किंवा पळून जावे लागेल, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या नाशिकमध्ये आहे. राहुल यांनी गुरुवारी दुपारी नाशिकमध्ये रोड शो काढला. दुपारी 3 च्या सुमारास हा रोड शो द्वारका चौकातून सुरू झाला. त्यानंतर हा रोड शो शहरातील सारडा सर्कल परिसरात आला असता काँग्रेसच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल यांना जेसीबीच्या मदतीने हार घालण्याचा प्रयत्न केला. पण राहुल यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मज्जाव केला. ते एवढ्यावर थांबले नाही. त्यांनी जेसीबीवरील हार तोडून टाकला. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.या घटनेनंतर राहुल यांचा ताफा शालिमार परिसराकडे रवाना झाला. तिथे राहुल गांधींची जाहीर सभा झाली.

कुणीच नाराज नाही:एकाला तिकीट दिले म्हणून दुसरा नाराज अशी आमच्यात परंपरा नाही, मुरलीधर मोहोळ यांचा दावा

पुणे-भारतीय जनता पक्षातर्फे पुणे लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर गुरुवारी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती येथे महायुतीतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र येत त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासह शहरातील विविध भागात अभिवादन रॅली काढली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे ,प्रवक्ते संदीप खर्डेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षात लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. परंतु निवडणुकीचे तिकिट हे एकालाच द्यावे लागते, त्यानुसार प्रातिनिधीक स्वरुपात ते मला दिले गेले. एकाला तिकिट दिले म्हणून दुसरा नाराज हाेताे असे भाजपात कधीच हाेत नाही. ही परंपरा पक्षाची आहे. त्यामुळे जे बाकी इच्छुक हाेते माजी आमदार जगदीश मुळीक किंवा माजी खासदार संजय काकडे किंवा अन्य कुणीही नाराज नाही. ते देखील प्रचारात सहभागी हाेतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

मोहोळ म्हणाले, दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांचे काळात पुणे विमानतळाचे टर्मिनलचा प्रश्न मार्गी लागला आहे. पुण्याची मेट्राे सुरु झाली, केंद्राच्या माध्यमातून चांदणी चाैकाचा कायापालट झाला. भविष्यात पुरंदर येथे हाेणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण आहे त्यादृष्टीने काम करणे. वेगवेगळ्या प्रकल्पासाठी जी कामे अपूर्ण आहे ती मार्गी लावणे. विकासकामांवर भर देणे यासाठी आगामी काळात आपले प्रयत्न राहतील. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर विराजमान करावयाचे आहे यादृष्टीने महायुतीतील सर्व पक्ष काम करत आहेत.

मागील 10 वर्षात पंतप्रधान यांनी देशाची व पुण्याची प्रगती करण्यासाठी माेठे याेगदान दिले आहे. आगामी काळात या कामाला अधिक गती देण्याचे काम करण्यात येईल. पुणेकर हे कामावर विश्वास ठेऊन विकासाला प्राधान्य देतील, असे मोहोळ म्हणाले.

अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका: घड्याळ चिन्ह आणि शरद पवारांचे फोटो वापरायचे नाहीत

तुम्हाला एवढा विश्वास असेल, तर तुम्ही तुमची छायाचित्रे वापरा, अशा शब्दात न्यायालयाने अजित पवार गटाला फटकारले आहे.आता स्वतःची ओळख निर्माण करा

आता शरद पवार यांचा फोटो वापरणार नाही, अशी बिनशर्थ लेखी हमी द्या

निवडणूक चिन्ह म्हणून दुसरे एखादे चिन्ह वापरण्याची सूचना

मुंबई-निवडणूक आयोगाने अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) म्हणून मान्यता दिलेल्या अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची छायाचित्रे प्रचार साहित्यात का वापरत आहात? असा सवाल केला. शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्याचे आदेश देखील न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत. पवार गटाने ‘घड्याळ’ या चिन्हाऐवजी दुसरे चिन्ह वापरावे, असेही न्यायालयाने तोंडी सांगितले आहे. मात्र, ही सूचना अजित पवार गटाला सध्या बाध्य नसेल. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

तुम्ही शरद पवार यांची छायाचित्रे का वापरत आहात? तुम्हाला एवढा विश्वास असेल, तर तुम्ही तुमची छायाचित्रे वापरा, अशा शब्दात न्यायालयाने अजित पवार गटाला फटकारले आहे. “आम्हाला तुमच्याकडून अत्यंत स्पष्ट आणि बिनशर्त हमी हवी आहे की तुम्ही त्याचे नाव, फोटो इत्यादी वापरणार नाही. यात कोणतेही ओव्हरलॅप होऊ शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने पक्षाचे ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयावरही शरद पवार गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना नवीन चिन्ह वाटप करायला हवे होते. आमच्याकडे नवीन चिन्ह आहे त्यांना मात्र, घड्याळाव्यतिरिक्त कोणतेही चिन्ह वापरू द्या. घड्याळ या चिन्हाची ओळख शरद पवार यांच्याशी अतूटपणे जोडलेली असल्याचे शरद पवार यांच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले. त्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेत न्यायपीठाने अजित पवार गटाला वेगळे चिन्ह वापरण्याची सूचना केली.

तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष आहात. शरद पवार यांच्यासोबत राहायचे नाही, असा निर्णय तुम्ही घेतला आहे. मग त्यांचा फोटो तुम्ही प्रचारासाठी का वापरतात? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला विचारला आहे. इतकेच नाही तर आता स्वतःची ओळख निर्माण करा. निवडणूक चिन्ह म्हणून दुसरे एखादे चिन्ह वापरा, आणि त्या नव्या विचारधारे आधारे निवडणूक लढा, अशा सूचना देखील न्यायालयाने अजित पवार गटाला केल्या आहेत. निवडणूक चिन्हावरुन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशावरुन अजित पवार गटाल्या वकिलांनी निवडणूक तोंडावर आली असल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. त्या नंतर न्यायालयाने आम्ही केवळ तुम्हाला सूचना करत असल्याचे सांगितले. मात्र, न्यायालयाच्या या सूचनेमुळे भविष्यात अजित पवार गटाचे निवडणूक चिन्ह बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अजित पवार गट हा शरद पवार यांच्या फोटोचा वापर करत असून हे चुकीचे असल्याचे शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करत असल्याचा आरोप देखील शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला आहे. शरद पवार गटाची बाजू मांडताना वकील अभिषेक मनू सिंगवी यांनी न्यायालयाच्या सदरील बाप निदर्शनास आणून दिली. यावरून सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाची चांगलीच कानउघडणी केली. आता शरद पवार यांचा फोटो वापरणार नाही, अशी बिनशर्थ लेखी हमी द्या, असे आदेशच सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सोनवणे 19 मार्च रोजी होणार आहे.

 आता केरळचे ज्ञानेश कुमार , पंजाबचे सुखबीर संधू हे २ निवडणूक आयुक्त

 नवी दिल्ली- केरळचे ज्ञानेश कुमार आणि पंजाबचे सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्त पदी निवड झाली आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीची गुरुवारी बैठक झाली. यानंतर विरोधी पक्षनेते अधीर रंजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, केरळचे ज्ञानेश कुमार आणि पंजाबचे सुखबीर संधू यांची नावे निश्चित झाली आहेत.

पंजाबचे सुखविंदर संधू हे उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि NHAI चे अध्यक्ष राहिले आहेत. दुसरीकडे, ज्ञानेश कुमार हे केरळ केडरचे 1988 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत आणि ते गृह मंत्रालयात तैनात आहेत. कलम 370 च्या निर्णयाच्या वेळी गृहमंत्रालयात नियुक्ती करण्यात आली होती.

मात्र, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर त्यांची नियुक्ती केली जाईल.

अधीर रंजन यांनी सभा सुरू होण्याच्या 10 मिनिटे आधी 6 नावे आल्याने नाराजी व्यक्त केली. मी म्हणालो की त्यांचा प्रामाणिकपणा आणि अनुभव तपासणे माझ्यासाठी अशक्य आहे. माझा या प्रक्रियेला विरोध आहे. हे व्हायलाच हवे होते. ही एक औपचारिकता आहे. सीजेआय असते तर गोष्ट वेगळी असती. काल रात्री दिल्लीला आलो तेव्हा 212 जणांची यादी माझ्या हाती लागली. इतक्या कमी वेळात प्रत्येकाचे प्रोफाईल तपासणे अशक्य होते.

नियमांनुसार, निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) व्यतिरिक्त दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे फेब्रुवारीमध्ये निवृत्त झाले. दुसरे, अरुण गोयल यांनी 8 मार्च रोजी सकाळी अचानक राजीनामा दिला, जो 9 मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला. 3 सदस्यीय निवडणूक आयोगात सीईसी राजीव कुमार हे एकमेव उरले होते.

अजित पवारांच्या उर्मटपणाला बारामतीकर कंटाळले-माजी मंत्री विजय शिवतारे

पुणे- बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे सहजपणे निवडून येतील कारण येथे अजित पवारांच्या उर्मटपणाला बारामतीकर कंटाळले आहेत , महायुतीला अजित पवार यांच्या माध्यमातून बारामती जिंकता येणार नाही.असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे.

विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी गोची झाली आहे. अजित पवार गटाने या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर शिंदे यांनी शिवतारे यांना तातडीने भेटण्यासाठी बोलावले आहे. पण शिवतारे यांनी पक्षाने कारवाई केली तरी आपण निवडणूक लढवणारच असा चंग बांधला आहे. एकनाथ शिंदे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मला भेटण्यासाठी बोलावले आहे. महायुती असल्यामुळे ते मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील. बारामतीतून लढू नका असेही सांगतील. पण मी त्यांना येथील वास्तव समजावून सांगेल. महायुतीचा हेतू बारामती जिंकण्याचा आहे. हा हेतू अजित पवार यांच्या माध्यमातून साध्य होणार नाही हे मी शिंदे यांना सांगेन, असे शिवतारे यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळणार, पीक वीमा योजनेची पुनर्रचना करणार: राहुल गांधी

काँग्रेस सरकारचे व माझे दरवाजे शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी सदैव खुले

भाजपा सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था नसल्यानेच शेतकऱ्यांची अवस्था बिकट: शरद पवार

भारत जोडो न्याय यात्रेमुळे एक गॅरंटी पक्की, ‘मोदी तो गयो!: संजय राऊत

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मोदी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करा: नाना पटोले

युपीए सरकारचे निर्णय जनतेच्या हिताचे पण मोदी सरकारचे निर्णय मुठभर लोकांसाठी: बाळासाहेब थोरात

चांदवडच्या शेतकरी मेळाव्यात एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना खा. संजय राऊतांची उपस्थिती.

चांदवड, नाशिक, दि. १४ मार्च
शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिलीच्या सीमेवर व रामलीला मैदानावर आंदोलन करत आहेत. हमी भावाचा कायदा करावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे पण मोदी सरकार त्यांची दखल घेत नाही. मोदी सरकारने २२ अरबपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले परंतु शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही कर्ज माफ केले नाही. ज्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव नाही, त्यांचे दुःख समजत नाही तो शेतकऱ्यांना मदत काय करणार? असा सवाल उपस्थित करत काँग्रेस सरकारचे व आपले दरवाजे सदैव शेतकरी व सर्वसामान्यांसाठी खुले असतील व इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळणार, पीक वीमा योजनेची पुनर्रचना करणार असे खासदार राहुल गांधी यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेदरम्यान चांदवड येथे शेतकरी मेळाव्याला राहुल गांधी संबोधित करत होते. राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशात आज शेतकरी समस्या, बेरोजगारी, महागाई, भागिदारी हे मुळे मुद्दे आहेत पण जनतेच्या या मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे. पिक विमा योजनेचा फायदा केवळ कंपन्यांना होतो, शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना मदत मिळत नाही हे चित्र बदलण्याची गरज आहे, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर पिक विमा योजनेची पुनर्रचना केली जाईल. आयात-निर्यात धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही याची काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांवर जीएसटी लावलेला आहे त्याचा काँग्रेस सरकार विचार करुन शेततकऱ्यांना जीएसटीतून वगळण्याचा प्रयत्न करेल. मुठभर उद्योगपतींचे कर्ज माफ होत असेल तर शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे व काँग्रेस सरकार ते करेल. सीमेवरील जवान व शेतकरी यांच्याशिवाय देश चालू शकत नाही म्हणून शेतकऱ्यांचे आवाज ऐकणारे काँग्रेसचे सरकार असेल असे राहुल गांधी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की, आज द्राक्ष, कांदा, कापूस या शेतमालाला भाव मिळत नाही अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पाहिजेत अशी भूमिका घेतली पाहिजे. आज शेतकरी संकटात आहे त्याला भाजपाचे सरकार जबाबदार आहे. युपीएचे सरकार असताना शेतकऱ्यांची ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करुन शेतकऱ्यांच्या खांद्यावरचे ओझे उतरवले होते. सध्याच्या भाजपा सरकारची शेतकऱ्यांबद्दल अनास्था असल्यामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला.

शिवसेना खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी शेतकऱ्याची, जनतेची बात ऐकत आहेत पण काही लोक फक्त मन की बातच करतात. या यात्रेमुळे देश जोडण्याचे, लोकांना जोडण्याचे काम केले आहे. चांदवड ही कांदा नगरी आहे पण या कांद्याने शेतकऱ्याला रडवले आहे. भाजपाच्या राज्यात गद्दार आमदार खासदारांना ५०-५० कोटी रुपयांचा भाव मिळतो पण कांद्याला भाव मिळत नाही. देशाच्या पंतप्रधानांनी जय जवान व जय किसानचा नारा दिला होता पण आज भाजपा राज्यात शेतकरी व जवान दोघेही मरत आहेत. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी राहुल गांधी यात्रा काढत आहेत. या यात्रेने एक गॅरंटी तर पक्की केली आहे आणि ती म्हणजे ‘मोदी तो गयो’ असे म्हणत मोदी सरकार पुन्हा येणार नाही, असे स्पष्ट केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सरकार आले की पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन असे आश्वासन दिले होते, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमी भाव देणार अशी आश्वासने यवतमाळमध्ये दिली होती पण १० वर्षात ती पूर्ण केली नाहीत, मोदींनी शेतकऱ्यांना फसवले आहे. कांदा नाही खाल्ला तर काही फरक पडत नाही असे भाजपच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण म्हणाल्या होत्या. या शेतकरीविरोधी व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजपा सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली आहे आणि लोकसभा निवडणुकीत तो करा, असे आवाहन पटोले यांनी केले.

विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, मणिपूरपासून राहुल गांधी हे शेतकरी, तरुण, कामगार, महिला वर्गाला गॅरंटी देत आहेत. २००४ ते २०१४ या काळात युपीए सरकार जनतेचे, शेतकरी हिताचे निर्णय घेत होते परंतु मागील १० वर्षात केवळ मुठभर लोकांसाठी निर्णय घेतले जात आहेत. आज शेतकरी संकटात आहे त्याला भारतीय जनता पक्षाचे सरकारच जबाबदार असेही थोरात म्हणाले.

या शेतकरी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात, AICC मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश, AICC सचिव आशिष दुआ, माजी मंत्री CWC सदस्य यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, NSUI चे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, सरचिटणीस ब्रिजेश दत्त, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, हेमलता पाटील, माजी आमदार शिरीष कोतवाल, कम्युनिस्ट नेते माजी आमदार जीवा पांडू गावात यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व हजारो शेतकरी उपस्थित होते.

आयुक्त साहेब हे धंदे बंद करा, तुमचे ३ वर्षे संपलेत

आयुक्त विक्रम कुमार आणि भाजपच्या लोकांनी मिळून महापालिकेची तिजोरी लुटली

पुणे – ३ वर्षाहून अधिक काल महापालिकेत विक्रम कुमार हे आयुक्त म्हणून कसे काम करतात? त्यांनी आणि भाजपच्या लोकांनी मिळून महापालिकेची तिजोरी लुटण्याचे काम सुरु ठेवले आहे,भाजपचा अजेंडा चालविण्याचा कारभार ते करत आहेत,दोघे मिळून भ्रष्टाचार करत असून त्यांनी हे धंदे बंद करावेत अन्यथा रोज मला त्यांच्या बंगल्यावर येऊन बसावे लागेल असा इशारा आज येथे कॉंग्रेसचे कसबा पेठेतील आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला . आज त्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या बंगल्या च्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून आंदोलन केले.

भाजपचे तत्कालीन खासदार गिरीश बापट यांनी कसबा पेठेतील पाणी प्रश्नासाठी आयुक्तांच्या बंगल्यावर आंदोलन करून त्यांच्या बंगल्यातील पाण्याचे प्रेशर तपासण्याची कृती केली होती , यावेळी त्यांच्या समवेत २/३ नगरसेवक सोडले तर महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व अन्य पदाधिकारी नव्हते या प्रसंगाची अनेकांना आठवण झाली.

ठिय्या मांडल्यावर माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले कि,’ गेल्या २ वर्षात आयुक्त विक्रम कुमार भाजपच्या ताटाखालचे मांजर होऊन काम करत आहेत .महापालिकेची तिजोरी लुटण्याचे काम विक्रम कुमार आणि भाजपा हे दोघे मिळून करत आहेत .अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेन्ज्चे १७४ कोटी काढून त्यांनी वार्डात वाटलेत , २ वर्षे निवडणुका नाहीत,या काळात उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक १८ ड यात १० लाख खर्च करणे असे शीर्षक टाकून हे बजेट खाण्याचे काम प्रशासन आणि भाजप करत आहेत, आता प्रशासकीय राजवट आहे पण अजून भाजपच्या नगरसेवकांचा असर यात दिसतो , एका एका वार्डात ५०/ ५० कोटी दिले , जे आरोग्यावर पैसे खर्च व्हायला हवे ते त्यांनी ड्रेनेज , गटारांच्या नावावर बोगस पणे खर्च दाखवून खिशात घालण्याचा प्रकार केला मिळकत करामध्ये अंदाधुंदी कारभार आहे. pcmc ला जसा एकपट मिळकत कर केला त्याकडे दुर्लक्ष यांचे आहे, या दोन वर्षातही अ ब क ड हे प्रभाग क्रमांक त्यांच्या डोक्यातून गेले नाही , दत्ता बहिरट यांच्या वार्डातला मुख्य सभेचा चा ठराव निरस्त न करता उद्घाटन केले ,कालच कोंढवा येथील एका लॅॅब मध्ये चुकीच्या पद्धतीने ठेका दिला गेला ,जलपर्णी काढण्याचाही ठेका हि चुकीच्या पद्धतीने दिला गेला अनेक भ्रष्टाचाराचे व्यवहार त्यांनी भाजपच्या लोकांना हाताशी धरून केलेत, ३ वर्षे पूर्ण होऊनही त्यांची बदली झाली नाही १/ १ दिवसात टेंडर काढून त्याच दिवशी किंवा दुसर्या दिवशी वर्क ऑर्डर दिल्यात , मी अनेकदा मुख्यमंत्र्याकडे तक्रारी करून उपयोग होत नाही , ठेकेदार भिंती रंगवून भाजपचा प्रचार करू लागले आहेत १०९ कोटीचा घोरपडी पेठ आणि विश्रांतवाडी उड्डाणपूल कामात ही भ्रष्टाचार झाला ,सॅनिटरी नॅॅपकीन मध्येही हे पैसे खातात , काही आमदारही त्यात आहेत , भारत सरकारच्या नव्हे तर मोदी सरकारच्या कार्यक्रमासाठी हे आयुक्त उधळपट्टी करतात , मी पोलिसात तक्रार दाखल केलीय ,पण गुन्हा दाखल केला जात नाही , लॅॅब ,वारजे पाणीपुरवठा, उड्डाणपूल याबरोबर आता सारसबागेत मॉल बांध्याचा प्रयत्न केला जातोय तिथे डीपी रोड आहे, अधिकाऱ्यांनी ताशेरे ओढलेत तरीही टेंडर काढून काम केले जातेय ,अतिक्रमण खात्यातही भ्रष्ट कारभार आहे महापालिकेची तिजोरी लुटून पुणेकरांचे पैसे भाजपच्या लोकांच्या खिशात घालायचे धंदे आयुक्त करत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेची टेंडर्स निघू लागली गुजरातीतून -पुण्यातून अरविंद शिंदेंचा हल्लाबोल

पुणे- एकीकडे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य सरकार सर्वोतपरी प्रयत्न केल्याची किंवा करत असल्याची जोरदार जाहिरातबाजी विविध माध्यमांतून करत असताना मुंबई महापालिका मात्र आपले टेंडर्स गुजराती भाषेतून काढायला प्राधान्य देऊ लागल्याचे स्पष्ट होऊ लागल्याचा आरोप पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे . ते म्हणाले,’मुंबई महापालिका कामाचे टेंडर गुजरातीत निघाली, तरी आपल्याला मत नक्की कुणाला द्यायचं हे समजत नसेल तर मग मुंबई भविष्यात महाराष्ट्राची राजधानी राहीलच याची खात्रीही बाळगू नका!!

काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसणार : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, 13 मार्च 2024 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होईपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसणार आहेत, असे सूचक भाष्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी यावेळी केले.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, ग्रामिण विकास मंत्री गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती. स्मिता वाघ, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आदी उपस्थित होते.

श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, काँग्रेसने आदिवासी समाज आणि मागासवर्गीयांची नेहमीच फसवणूक केली. या समाजातील नेत्यांना हे लक्षात आल्याने हे नेते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी श्री. वळवी यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा अनुभव व ज्येष्ठता लक्षात घेऊन संघटनेत त्यांचा सन्मान राखला जाईल, असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये असतानाच वळवी यांच्यासारखा निष्ठावंत नेता, माजी मंत्री काँग्रेसला सोडचिठ्ठी देतो यावरून या पक्षाची दारूण अवस्था लक्षात येते. राहुल गांधींच्या यात्रेचा समारोप होईपर्यंत राज्यातील अनेक काँग्रेस नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील, असेही ते म्हणाले.

श्री.वळवी यांनी सांगितले की, आपण काँग्रेसचे आजवर निष्ठेने काम केले. मोदी सरकारकडून होणार्‍या विकासकामांमुळे प्रभावित होऊन आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. भाजपा संघटनेचे काम आपण निष्ठापूर्वक करू. श्री. वळवी हे 1999 ते 2014 या काळात तळोदा व शहादा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. 2009 ते 2014 या काळात श्री. वळवी हे राज्य मंत्रिमंडळात मंत्री होते.
यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस विनायक देशमुख, जालना जिल्ह्यातील मनसे नेते ज्ञानेश्‍वर(माऊली) गायकवाड, प्रदेश काँग्रेस सचिव अर्चना राठोड, जळगाव जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मनोज सोनावणे, नंदुरबार पंचायत समितीचे माजी सदस्य लगन पावरा, महेंद्र बागुल, प्रदेश आदिवासी काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. रोशन गावित यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.