आदिवासी महिला असलेल्या राष्ट्रपतींना राम मंदिराच्या कार्यक्रमात डावलले–जनतेचे मूळ मुद्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न–22 जणांकडे 70 कोटी लोकांएवढे धन
नाशिक – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आज येथे राहुल गांधी यांनी टीकेची झोड उठवली. कोणत्याही क्षेत्रात मागास वर्गाचे योग्य प्रतिनिधित्व नाही. या वर्गाच्या लोकसंख्येचा खरा आकडा कुणीही सांगू शकत नाही. त्यांचा आकडा 50 टक्क्यांच्या आसपास असल्याचा दावा केला जातो. पण प्रत्यक्षात आदिवासी, दलित, मागासवर्ग यांचा आकडा 90 टक्क्यांच्या आसपास आहे. या वर्गाने आपली ताकद ओळखली पाहिजे. त्यांनी जातगणनेची मागणी केली तर नरेंद्र मोदींना एकतर जातगणना करावी लागेल किंवा पळून जावे लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी आहेत. त्यामुळेच त्यांना राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही. कारण, भाजप त्यांना आदिवासी नव्हे वनवासी मानते. या कार्यक्रमाला धनदांडगे दिसून आले. पण तिथे एकही शेतकरी, कामगार, दिनदुबळे दिसला नाही. सरकार 24 तास तुमचा खिसा कापत असताना तुम्ही काहीच बोलत नाही ही खरी समस्या आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सर्वसामान्य जनतेचे लक्ष मूळ मुद्यांवरून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर उद्योगपती गौतम अदामी जनतेची लूट करत आहे. या दोघांनंतर अमित शहा ईडी, सीबीआय, आयटीच्या माध्यमातून जनतेला दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राहुल म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्राच्या अग्निवीर योजनेवरूनही सरकारवर निशाणा साधला.
22 जणांकडे 70 कोटी लोकांएवढे धन आहे. सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करत असेल तर शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे. हे कसे होत नाही हे मी पाहतो. सरकारला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करता येत नसेल तर उद्योगपतींचेही करू नये, असे राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा गुरुवारी नाशिकमध्ये रोड शो झाला. यावेळी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी राहुल यांना जेसीबीच्या मदतीने हार घालण्याचा प्रयत्न केला. पण राहुल यांच्या अंगरक्षकांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तसे करण्यापासून रोखले. यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच नाराजी झाली. दरम्यान, देशातील आदिवासी, दलित, मासागवर्गीयांनी जातगणनेची मागणी केली तर नरेंद्र मोदींना एकतर जातगणना करावी लागेल किंवा पळून जावे लागेल, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या नाशिकमध्ये आहे. राहुल यांनी गुरुवारी दुपारी नाशिकमध्ये रोड शो काढला. दुपारी 3 च्या सुमारास हा रोड शो द्वारका चौकातून सुरू झाला. त्यानंतर हा रोड शो शहरातील सारडा सर्कल परिसरात आला असता काँग्रेसच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल यांना जेसीबीच्या मदतीने हार घालण्याचा प्रयत्न केला. पण राहुल यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मज्जाव केला. ते एवढ्यावर थांबले नाही. त्यांनी जेसीबीवरील हार तोडून टाकला. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.या घटनेनंतर राहुल यांचा ताफा शालिमार परिसराकडे रवाना झाला. तिथे राहुल गांधींची जाहीर सभा झाली.