पुणे-भारतीय जनता पक्षातर्फे पुणे लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर गुरुवारी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती येथे महायुतीतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र येत त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासह शहरातील विविध भागात अभिवादन रॅली काढली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे ,प्रवक्ते संदीप खर्डेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षात लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. परंतु निवडणुकीचे तिकिट हे एकालाच द्यावे लागते, त्यानुसार प्रातिनिधीक स्वरुपात ते मला दिले गेले. एकाला तिकिट दिले म्हणून दुसरा नाराज हाेताे असे भाजपात कधीच हाेत नाही. ही परंपरा पक्षाची आहे. त्यामुळे जे बाकी इच्छुक हाेते माजी आमदार जगदीश मुळीक किंवा माजी खासदार संजय काकडे किंवा अन्य कुणीही नाराज नाही. ते देखील प्रचारात सहभागी हाेतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
मोहोळ म्हणाले, दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांचे काळात पुणे विमानतळाचे टर्मिनलचा प्रश्न मार्गी लागला आहे. पुण्याची मेट्राे सुरु झाली, केंद्राच्या माध्यमातून चांदणी चाैकाचा कायापालट झाला. भविष्यात पुरंदर येथे हाेणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण आहे त्यादृष्टीने काम करणे. वेगवेगळ्या प्रकल्पासाठी जी कामे अपूर्ण आहे ती मार्गी लावणे. विकासकामांवर भर देणे यासाठी आगामी काळात आपले प्रयत्न राहतील. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर विराजमान करावयाचे आहे यादृष्टीने महायुतीतील सर्व पक्ष काम करत आहेत.
मागील 10 वर्षात पंतप्रधान यांनी देशाची व पुण्याची प्रगती करण्यासाठी माेठे याेगदान दिले आहे. आगामी काळात या कामाला अधिक गती देण्याचे काम करण्यात येईल. पुणेकर हे कामावर विश्वास ठेऊन विकासाला प्राधान्य देतील, असे मोहोळ म्हणाले.