पुणे- बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे सहजपणे निवडून येतील कारण येथे अजित पवारांच्या उर्मटपणाला बारामतीकर कंटाळले आहेत , महायुतीला अजित पवार यांच्या माध्यमातून बारामती जिंकता येणार नाही.असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे.
विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी गोची झाली आहे. अजित पवार गटाने या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर शिंदे यांनी शिवतारे यांना तातडीने भेटण्यासाठी बोलावले आहे. पण शिवतारे यांनी पक्षाने कारवाई केली तरी आपण निवडणूक लढवणारच असा चंग बांधला आहे. एकनाथ शिंदे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मला भेटण्यासाठी बोलावले आहे. महायुती असल्यामुळे ते मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील. बारामतीतून लढू नका असेही सांगतील. पण मी त्यांना येथील वास्तव समजावून सांगेल. महायुतीचा हेतू बारामती जिंकण्याचा आहे. हा हेतू अजित पवार यांच्या माध्यमातून साध्य होणार नाही हे मी शिंदे यांना सांगेन, असे शिवतारे यांनी सांगितले आहे.