Home Blog Page 1111

इंदापूर येथे निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे, दि. ३: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी इंदापूर विधानसभा मतदारसंघात नियुक्त क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पंचायत समिती सभागृह इंदापूर येथे आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये ईव्हीएमचे बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट तसेच आणि व्हीव्हीपॅट बाबत प्रथम स्तरीय तपासणी (एफएलसी), द्वितीय स्तरीय तपासणी (एसएलसी), सरमिसळ (रँडमायझेशन) व कार्यान्वयन (कमिशनिंग) प्रक्रियेविषयी आणि व्हीव्हीपॅट वाहतूकीबाबत माहिती देण्यात आली. निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या अभिरूप मतदान (मॉकपोल), मतदानाच्यावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांबाबतही माहिती देण्यात आली.

इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शखाली आयोजित करण्यात आले. प्रशिक्षक रवींद्र पिसे, उप अधीक्षक भूमी अभिलेख विजयकुमार आतार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

पोलीस ठाण्यात मतदान जनजागृती
इंदापूर पोलीस ठाण्यात शिक्षण विभाग इंदापूर मतदार जागृती मंचाच्यावतीने मतदार जागृती अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक आर. बी. कदम आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी संजय रुईकर यांनी मतदार नोंदणी व नावात दुरुस्ती तसेच क्यूआर कोडद्वारे मतदार यादीत नाव शोधणे आदींचे मोबाईलवरून प्रात्यक्षिक दाखविले.

पिंपरी चिंचवड शहरातील सनदी लेखापालांचा लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदानाचा निर्धार

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा-दीपक सिंगला

पुणे, दि. ३ : पिंपरी चिंचवड शहरातील सनदी लेखापाल, नवोदीत मतदार आणि नागरिकांनी १३ मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणुकीत मतदान करून जगातील सर्वात मोठ्या लोकशाही उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांनी केले.

निगडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या पिंपरी चिंचवड शाखेत आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, मतदान नोंदणी अधिकारी विनोद जळक, तहसीलदार जयराज देशमुख, समन्वयक अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आयसीएआय संस्थेचे अध्यक्ष पंकज पाटणी, उपाध्यक्ष वैभव मोदी यांच्यासह प्रक्षिक्षणार्थी सनदी लेखापाल उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमाद्वारे मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात सहभाग घेवून सर्व सनदी लेखापाल, प्रशिक्षणार्थी यांनी स्वत: मतदान करण्यासोबत इतरांनाही प्रोत्साहीत करावे, असे आवाहन श्री.सिंगला यांनी केले. संस्थेतील यंदा प्रथमच मतदान करणाऱ्‍या नवोदीत मतदारांचे त्यांनी अभिनंदन केले.

मतदान हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत हक्क असून सर्व सनदी लेखापाल तसेच प्रशिक्षण घेत असलेल्या नवोदित विद्यार्थ्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन श्री.पाटणी यांनी केले.

यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील प्रशिक्षणार्थी सनदी लेखापालांनी निवडणूकीत मतदान करण्याची शपथ घेतली.

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामाची जबाबदारी चोखपणे पार पाडावी-अजय मोरे

पुणे, दि.3 :- निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे निर्देश शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिले.

शिरूर लोकसभा मतदार संघांतर्गत आंबेगाव तहसील कार्यालयात आयोजित क्षेत्रीय अधिकारी, मतदानस्तरीय अधिकारी, क्षेत्रीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार संजय नागटिळक उपस्थित होते.

श्री.मोरे म्हणाले, लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी दक्ष रहावे. मतदार यादीशी संबंधित कामे वेळेवर करण्यात यावी. निवडणूक विषयक कामकाजाचे प्रशिक्षणाचे योग्यरितीने आयोजन करण्यात यावे. प्रशिक्षणात मतदान प्रक्रीयेसंबंधी सूक्ष्म बाबींचा समावेश करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.

बैठकीला निवडणूक शाखा नायब तहसीलदार सचिन वाघ, पॉलिटेक्निक कॉलेज अवसरी प्रा. बांदल, सतीश कांबळे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकारी, मतदानस्तरीय अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्ट्राँग रुम परिसराची पाहणी
निवडणूक निर्णय अधिकारी श्री.मोरे यांनी बैठकीनंतर अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रस्तावित स्ट्राँग रुम परिसराला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना केली. यावेळी अवसरी खुर्द येथील काही मतदान केंद्रांनाही त्यांनी भेट देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला.

गोहे बु. येथे मतदान जनजागृती
आंबेगाव तालुक्यातील पाडळवाडी गोहे बुद्रुक येथे मतदान जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना मतदान प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली व मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. नागरिकांकडून मतदान करण्याविषयी संकल्प पत्र भरून घेण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांच्या मदतीसाठी कक्ष स्थापन

पुणे,दि.३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बी विंगमधील चौथ्या मजल्यावर तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे.

या कक्षात मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि तक्रारी स्विकारण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले असून कक्षाकडे १८००२३३०१०२ आणि १९५० या टोल फ्री क्रमांक किंवा cvigilldccelection2024@gmail.com या ई-मेल पत्त्यावर तक्रार करता येईल. प्राप्त झालेल्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित सहायक निवडणूक अधिकारी यांना कळविण्यात येते.

कक्षाकडे दूरध्वनीद्वारे नवीन मतदान ओळखपत्र, ओळखपत्रात दुरुस्ती, मतदान यादीत नाव नोंदणी, ऑनलाइन पद्धतीने ओळखपत्र काढताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात येते, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

महेश मांजरेकरांच्या हस्ते ‘चांदवा’ प्रकाशित

‘प्रेम’ या अडीच अक्षरी शब्दांत दडलेली भावना लाखमोलाची असते. प्रत्येकाच्या प्रेमाची एकवेगळीच कहाणी असते. निस्सिम प्रेमाचा आणि साथीचा असाच मनस्पर्शी ‘चांदवा’ अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. स्टारक्राफ्ट मनोरंजन प्रस्तुत ‘चांदवा’ या मराठी म्युझिक अल्बमचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत फिल्मसिटीच्या बॉलीवूड थीमपार्क मध्ये झाले.‘चांदवा’ या नव्या अल्बमला आघाडीचा तरुण गायक स्वप्नील बांदोडकर आणि प्रथमच व्यावसायिक गायिका म्हणून पदार्पण करणाऱ्या श्रेया भारतीय यांचा स्वरसाज लाभला आहे.  संतोष मिजगर आणि प्रणाली मेने हे कलाकार या अल्बम मध्ये दिसणार आहेत.

विशेष म्हणजे ‘चांदवा’अल्बमचे निर्माते संतोष मिजगर यांनी  चित्रनगरी मधील बॉलीवूड थीमपार्क सर्वसामान्यांसाठी खुलं केलं आहे. ‘पाहिलेल्या स्वप्नांचा ध्यास घेता यायला हवा, असं सांगताना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अल्बमचे निर्माते संतोष मिजगर यांचं भरभरून कौतुक केलं’. प्रेमाच्या उर्मीची  जाणीव करून देणारं  हे गाणं गाताना खूपच समाधान लाभल्याची भावना गायक स्वप्नील बांदोडकरने व्यक्त केली. स्वप्नील सारख्या कसलेल्या दिग्ग्ज गायकासोबाबत पहिलं  व्यावसायिक गीत गाण्याची संधी मिळाल्याचा आनंद गायिका  श्रेया भारतीय यांनी  व्यक्त केला.  एकमेकांच्या सहवासातून फुलणारं प्रेम आणि मिळणारी साथ  खूप महत्त्वाची असते  हे सांगू पाहणारं हे गाणं प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल,  असा विश्वास ‘चांदवा’ अल्बमचे  निर्माते, अभिनेते संतोष राममीना मिजगर यांनी व्यक्त केला.याप्रसंगीबॉलीवूड थीम पार्कचे टीम चें चिराग शाह ,रवी रुपरेलिया, संतोष वाईकर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

‘आज वाटे मला जन्म झाला नवा I तुला पाहता मनी चांदवा’ I असे बोल असणाऱ्या या गाण्यातून एका जोडप्याचा निस्सिम प्रेमाचा प्रवास दाखविण्यात आला आहे.  या  गाण्यातून संतोष आणि प्रणाली या जोडीने प्रेमामागाची उत्कटता व त्यातील भावनेची खोली याचा सुरेख मेळ साधला आहे.  दया होलंबे यांनी  शब्दबद्ध  केलेल्या गीताला संगीत देण्याची जबाबदारी डी. एच हार्मनी, एस.आर.एम एलियन यांनी सांभाळली आहे. झी  म्युझिकने हे गाणं वितरीत केलं आहे.  

एशिया सोसायटी इंडिया सेंटर बोर्डाच्या नवीन अध्यक्षपदी संगीता जिंदाल

मुंबई : एशिया सोसायटी इंडिया सेंटर बोर्डाने संगीता जिंदाल यांची बोर्डाच्या नवीन अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले आहे. त्यांचा कार्यकाळ १ एप्रिल २०२४ पासून सुरू होत आहे. “एशिया सोसायटी इंडिया सेंटर बोर्डाच्या अध्यक्षपदी संगीता जिंदाल यांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. दक्षिण आशियातील आमच्या कार्याला त्यांचा मोठा पाठिंबा आहे आणि भारत आणि दक्षिण आशियातील समकालीन कलेला समर्थन देण्यासाठीचे त्यांचे काम ही एक परिवर्तनकारी शक्ती आहे.  दक्षिण आशियामध्ये एशिया सोसायटीचा ठसा मजबूत करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत,” असे एशिया सोसायटी इंडिया सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इनाक्षी सोबती म्हणाल्या.

संगीता जिंदाल या आर्ट इंडियाच्या आणि JSW फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. JSW ग्रुप ऑफ कंपनीजच्या सामाजिक विकास प्रकल्पांसाठी JSW फाउंडेशन कारणीभूत आहे. जेएसडब्ल्यू फाऊंडेशनचच्या त्यांच्या २० वर्षांच्या नेतृत्व काळात शिक्षण, आरोग्य, उपजीविका निर्मिती, स्थानिक क्रीडा विकास आणि कला आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन या क्षेत्रांत फाउंडेशनने आपल्या उपक्रमांची व्याप्ती वाढवली आहे. त्यांनी १९९२ मध्ये जिंदाल आर्ट्स सेंटरची स्थापना केली आणि १९९४ मध्ये आर्ट इंडिया या भारतातील प्रमुख कला मासिकाचा पाया रचला. काळा घोडा कला महोत्सवाची संकल्पना मांडणाऱ्या टीममध्ये त्या होत्या आणि २००४ मध्ये त्यांना आयझेनहॉवर फेलोशिप देण्यात आली. त्यांनी हंपी फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनने हम्पी येथील तीन मंदिरांमध्ये संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. त्या एशिया सोसायटीच्या जागतिक विश्वस्त आणि राष्ट्रीय संस्कृती निधी मंडळाच्या सदस्य आहेत. जागतिक स्मारक निधी विश्वस्त, TEDxGateway च्या सल्लागार आणि IMC लेडीज विंग आर्ट, कल्चर आणि फिल्म कमिटीच्या सदस्य आहेत.

जॉन डी. रॉकफेलर ३ रे यांनी १९५६ मध्ये स्थापन केलेली, एशिया सोसायटी ही एक निष्पक्ष, ना नफा तत्वावर चालणारी संस्था असून न्यूयॉर्क, ह्यूस्टन आणि हाँगकाँग येथे प्रमुख केंद्रे आणि सार्वजनिक इमारती आहेत. लॉस एंजेलिस, मनिला, मेलबर्न, मुंबई, सॅन फ्रान्सिस्को, सिएटल, सेऊल, सिडनी, टोकियो, वॉशिंग्टन डीसी आणि झुरिच येथे कार्यालये आहेत. इंडिया सेंटरची स्थापना २००६ मध्ये झाली. हे दक्षिण आशियातील एकमेव आशिया सोसायटी केंद्र असून आधुनिक आशियावरील विविध दृष्टीकोनांना एकत्र आणण्यासाठी आणि आशिया पॅसिफिक प्रकरणांची सूक्ष्म समज विकसित करण्याच्या उद्देशाने संपूर्ण उपखंडाचा समावेश करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. एशिया सोसायटी इंडियाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी asiasociety.org/india वर भेट द्या.

तनुश्री सूरसंगम ‘मिले सूर हमारा तुम्हारा’ कार्यक्रम७ एप्रिल रोजी गर्भवती महिलांसाठी विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि.३ एप्रिल : तनुश्री गर्भसंस्कार परिवारातर्फे ‘मिले सूर हमारा तुम्हारा’ या अनोख्या थीमच्या माध्यमातून गर्भवती महिलांसाठी विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ.संजय उपाध्ये यांना पहिला तनुश्री ‘जन संस्कार पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. ७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत न्यू सांगवी येथील साई चौक स्थित संस्कृती लॉन्स मध्ये होणार आहे. अशी माहिती तनुश्री गर्भसंस्कार परिवाराचे संस्थापक डॉ. अनिल गुगळे व डॉ. सुप्रिया गुगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी श्री. कांतीलाल मुनोत हे उपस्थित होते.
डॉ. अनिल गुगळे यांनी सांगितले की, डॉ. संजय उपाध्ये हे ‘मन करा रे प्रसन्न’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकजागृतीचे कार्य करीत आहेत. आपल्या प्रबोधनातून समाज मनावर चांगले संस्कार घडविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. ज्या पद्धतीने आमची संस्था ही सतत गर्भवती महिलांसाठी उत्तम संस्कार देऊन नव पीढी घडविण्याचे कार्य करीत आहेत. त्यामुळेच आम्ही या वर्षापासून तनुश्री ‘जन संस्कार पुरस्कार’ देण्याची घोषणा केली आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  
डॉ. सुप्रिया गुगळे म्हणाल्या, तनुश्री स्नेहमेळाव्याचे हे ११ वर्ष आहे. तनुश्री संस्कार स्नेह मेळावा तर्फे आयोजित तनुश्री सूरसंगमच्या गर्भवती महिलांसाठी सकारात्मक जीवन शैली या विषयांमध्ये डॉ. संजय उपाध्ये-मन करा रे प्रसन्न व तनुश्री जन संस्कार पुरस्कार, डॉ. अनुप भारती- मोबाईलचे मालक का गुलाम, डॉ. यश वेलणकर-नाते तुझे माझे, वैद्य सुविनय दामले-या हदयी ते त्या हदयी , डॉ भाग्यश्री कश्यप यांचे सूत्र संचलन आणि हिमांश बक्षी-सुरेल बासुरी साथ असेल. मान्यवर वेगवेगळ्या विषयांवर विचार मांडतील.
गर्भवती महिलांना त्यांचे अंतर्गत सामर्थ्य जाणून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे. पूर्वी स्त्रीला एकत्र कुटुंब पद्धतीत मार्गदर्शन मिळत असे. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ते मार्गदर्शन मिळत नाही. आपली श्रीमंत परंपरा पुनर्जीवित करण्यासाठी, माता व बालक यांच्यातील पवित्र नात्याचे संगोपन करण्यासाठी पालकांना  अमूल्य   मार्गदर्शन , तत्व शिकवून त्यांना सुजाण पालक बनवून दोन पिढीतील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करणे हा या कार्यशाळेचा उद्देश्य आहे.
डॉ. अनिल गुगळे व डॉ. सुप्रिया गुगळे हे गेल्या २५ वर्षापासून सांगवी येथे गर्भसंस्कार केंद्र यशस्वी रित्या चालवित आहेत. यांच्यातर्फे आयोजित गर्भसंस्कार कार्यक्रमात आतापर्यंत ५२०० पालकांनी सहभाग घेतला आहे. या मध्ये आईची शारीरिक, मानसिक आरोग्य वृध्दी व बाळ निरोगी, आनंदी व सुसंस्कारीत होण्यासाठी केली आहे. त्याचप्रमाणे तनुश्री ब्रम्ह मुहूर्त कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये आरोग्य संपन्न जीवनशैलीसाठी मार्गदर्शन केेले जाते. गेल्या दोन वर्षापासून ९ हजार कुटुंबाने ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ घेतला.गर्भ संस्कार व सकारात्मक मनाद्वारे नितिमान पिढी निर्माण करण्यासाठी पालकांना मदत केल्या जाते.
इच्छुकांना सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी विनामूल्य पण आवश्यक आहे. नोंदणी साठी मो.नं.९११२२३१७१५, ८००७२३२०११, +९१ ९९७५२  ७१३७१ वर संपर्क साधावा.

परिचारिकांची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ शकत नाही

पुणे, ता.3 – नर्सिंग व्यवसायात परिचारिका घेत असलेल्या रूग्णांच्या वैयक्तिक काळजीची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ शकत नाही, असे मत जहांगीर रुग्णालयाच्या मुख्य नर्सिंग सुपरिटेंडंट नीता अहिरराव यांनी व्यक्त केले. 

डीईएस सुभद्रा के. जिंदाल कॉलेज ऑफ नर्सिंगचा सोळावा लॅम्प लायटिंग समारंभ महापालिकेच्या वैद्यकीय उपाधिकारी डॉ. कल्पना बलिवंत यांच्या हस्ते संपन्न झाला. जहांगीर रुग्णालयाच्या मुख्य नर्सिंग सुपरिटेंडंट नीता अहिरराव यांची प्रमुख उपस्थिती होती. डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत अध्यक्षस्थानी होते. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्राचार्या शारदा चव्हाण यांनी प्रमुख उपस्थिती होती.

सोनाली गोरे, शीतल ठाकूर, महिमा मेश्रामकर, स्नेहल बदक, आसिफ शेख, प्रथमेश आंबुरे या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला.

रुग्ण आणि नर्स यांच्यामध्ये निर्माण झालेल्या भावनिक नात्यामुळे आजारपणातून लवकर बरे होण्यास मदत होते, असे मत डॉ. बलिवंत यांनी व्यक्त केले.

नर्सिंग व्यवसायाची तुलना अन्य कोणत्याही व्यवसायाशी होऊ शकत नाही. या व्यवसायात अर्थाजन होतेच, सेवाभावामुळे आत्मीक समाधान मिळते असे रावत यांनीसांगितले. 

ॲल्युमिनियम विंडो आणि डोअर्स व्यवसायात 5% मार्केट शेअर मिळवण्यासाठी अपर्णा एंटरप्रायझेस करणार महाराष्ट्रात प्रवेश

~वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी पुणेनागपूर,
कोल्हापूरनाशिकऔरंगाबाद आणि विदर्भात काम सुरू ~

पुणे, 03 एप्रिल 2024 : अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी बांधकाम साहित्य उत्पादक कंपनी असून, कंपनीने महाराष्ट्राच्या बाजारपेठेत प्रिमियम ॲल्युमिनियम विंडो आणि डोअर ब्रँड अल्टेझाच्या प्रवेशाची घोषणा केली. पुण्यापासून सुरुवात करून, कंपनीने नागपूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि विदर्भ यांसारख्या प्रमुख शहरांना लक्ष्य करण्यासह राज्यभर आपला विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्याच्या कार्याच्या पहिल्या वर्षात, राज्यातील 5% बाजारपेठेचा हिस्सा मिळवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रात ॲल्युमिनियमच्या खिडक्या आणि दरवाजांची बाजारपेठ 600 कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर (CAGR) 20% पेक्षा हे प्रमाण जास्त आहे. एक प्रमुख आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्यामध्ये पुणे येथे यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त वाढ होत आहे. ही वाढ विविध घटकांमुळे वाढली आहे, ज्यात उच्च मालमत्ता व्यक्तींच्या (HNIs) संख्येत लक्षणीय वाढ होण्याबरोबरच ॲल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजांच्या फायद्यांना महत्त्व देणाऱ्या विवेकी ग्राहकांच्या वाढत्या लोकसंख्येचा समावेश आहे. ही क्षमता ओळखून अल्टेझाने महाराष्ट्रात लाँच करण्यासाठी पुण्याची धोरणात्मकदृष्ट्यानिवड केली आहे.

अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेडच्या कार्यकारी संचालक अपर्णा रेड्डी यांनी सांगितले की“भारताच्या पश्चिम भागात रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांच्या गरजा वाढल्याने टिकाऊ आणि प्रीमियम दर्जाच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. आमच्या प्रिमियम ब्रँड अल्टेझाद्वारे ॲल्युमिनियमच्या खिडक्या आणि दरवाजांच्या बाजारपेठेतील आमच्या प्रस्थापित कौशल्यासह, आम्ही झपाट्याने वाढणाऱ्या सेगमेंटचा फायदा घेण्यासाठी आणि विवेकी ग्राहकांना दर्जेदार समाधाने देण्यासाठी सज्ज आहोत. महाराष्ट्रातील आमचा विस्तार हा एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे कारण यामुळे आम्हाला राज्यातील अनेक ठिकाणे तसेच पश्चिम विभागातील मोठ्या विस्ताराची दारे खुली झाली आहेत.”

अल्टेझाचे (AEL) प्रमुख श्री अमर देशपांडे यावेळी बोलताना म्हणाले की“आम्ही पुण्यात अल्टेझा लाँच करण्यास उत्सुक आहोत आणि महाराष्ट्रातील ग्राहकांना आमची ॲल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजांची अभिनव श्रेणी ऑफर करण्यास उत्सुक आहोत. आमचे अद्वितीय सामर्थ्य टर्नकी आधारावर प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या आमच्या क्षमतेमध्ये आहे. यामध्ये डिझाइन, फॅब्रिकेशन आणि इंस्टॉलेशन यांचा समावेश आहे. त्यामुळे उच्च दर्जाची मानके राखून आमच्या क्लायंटसाठी अखंड आणि त्रास-मुक्त अनुभव मिळेल याची खात्री आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना समाधान मिळावे आणि त्यांना ब्रँड लक्षात राहावा यासाठी आमचा D2C दृष्टीकोन आहे. 

भारतातील भारतीय ॲल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजांची बाजारपेठ प्रामुख्याने बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रांद्वारे चालविली जाते. या क्षेत्रात ऊर्जा-कार्यक्षम आणि सौंदर्यदृष्ट्या सुखकारक इमारत घटकांची वाढती मागणी आहे. परवडणारी घरे आणि शहरी विकासाला चालना देण्यासाठी सरकारच्या पुढाकारांमुळे याला गती आली आहे. 2019 मध्ये अपर्णा एंटरप्रायझेस लि. मध्ये एक विभाग म्हणून सुरू झालेली अल्टेझा सध्या पश्चिम आणि मध्य भारतातील निवडक ठिकाणांव्यतिरिक्त दक्षिण भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये उपस्थित आहे आणि महाराष्ट्रातील ॲल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजांच्या बाजारपेठेतील अग्रगण्य ब्रँड बनण्यास तयार आहे.

राष्ट्रीय युवा महोत्सवात भारती विद्यापीठाची लक्षवेधी कामगिरी

उच्च शिक्षण मंत्रालय आणि भारतीय विश्वविद्यालय संघ यांच्यावतीने राष्ट्रीय युवा महोत्सव
पुणे : राष्ट्रीय युवा महोत्सवात भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध पारितोषिके पटकावली. लुधियाना मधील पंजाब शेतकी विश्विविद्यालय येथे उच्च शिक्षण मंत्रालय आणि भारतीय विश्वविद्यालय संघ यांच्यावतीने राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय युवा महोत्सवात १२० विद्यापीठांनी, २७ प्रकारच्या स्पर्धेत भाग घेतला होता.

महोत्सवात भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी २ सुवर्ण पदके आणि २ रौप्य पदके पटकाविली. सांघिक लोक वाद्यवृंद स्पर्धेत सुवर्ण पदक आणि शास्त्रीय तालवाद्य स्पर्धेत सुर्यकांत शिंदे याला सुवर्ण पदक मिळाले. सांघिक लोकनृत्य स्पर्धेत रौप्य पदक व सुगम संगीतात नंदिनी गायकवाड हिने रौप्यपदक पटकावले. शेवटच्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभात   भारतीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा वाद्यवृंदाचा विशेष कार्यक्रम सादर झाला.

या विद्यार्थांना भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे संचालक प्रा. शारंगधर साठे, देविका बोरठाकूर, प्रवीण कासलीकर, दीपक बिडकर यांचे  मार्गदर्शन लाभले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे संचालक प्रा. शारंगधर साठे  या महोत्सवात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. 

कुलगुरू प्रा. डॉ शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठ संस्थेचे कार्यवाह आणि प्र – कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

दिग्गजांच्या कलाविष्काराने सजणार ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टचा संगीत महोत्सव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ४० वा वर्धापनपदिन ; बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. प्रशालेच्या प्रांगणात आयोजित महोत्सवास विनामूल्य प्रवेश

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून म्हणजेच दि. ९ ते १३ एप्रिल पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी महाराष्ट्रातील दिग्गज कलाकारांचा कलाविष्कार अनुभविण्याची संधी पुणेकरांना मिळणार असून बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदाचा संगीत महोत्सव वैविध्यपूर्ण कलांनी सजलेला असून महोत्सवात शास्त्रीय संगीत, लोकगीते, भारुड, पोवाडे, चित्रपट गीते, नाट्य गायनासह गीतरामायण, लाईव्ह ईन कॉन्सर्ट, शिवकल्याण राजा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. संगीत महोत्सवाचा प्रारंभ मंगळवार, दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता प्रख्यात कलाकार महेश काळे यांचा महेश काळे लाईव्ह कॉन्सर्ट या कार्यक्रमाने होणार आहे. त्यापूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याला सकाळी ९ वाजता मंदिरामध्ये परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्या हस्ते गुढीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

संगीत महोत्सवात बुधवार, दि. १० एप्रिल रोजी गणेश चंदनशिवे यांचा महाराष्ट्राचा लोकमेळा हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित कार्यक्रम होईल. गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी प्रख्यात गायक व संगीतकार श्रीधर फडके यांचा गीतरामायण कार्यक्रम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. शुक्रवार दि. १२ एप्रिल रोजी संगीत महोत्सवात प्रथमच गायक अवधूत गुप्ते यांचा लाईव्ह ईन कॉन्सर्ट कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाचा समारोप पं.हृदयनाथ मंगेशकर यांच्या शिवकल्याण राजा या कार्यक्रमाने होणार असून यामध्ये विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर हे देखील सहभागी होणार आहेत.

रसिकांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटर समोरील नू.म.वि.प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

‘आरोग्य गणेशा’ अंतर्गत ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे ४१ हजार ८७७ रुग्णांना मदतीचा हात

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत २०२३-२४ वर्षातील ट्रस्टचे आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत ‘आरोग्य गणेशा’ मध्ये रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारून २०२३-२४ आर्थिक वर्षात मोठे योगदान देण्यात आले आहे. यामध्ये वर्षभरात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, तपासण्या, साहित्य व औषधे वाटप अशी विविध प्रकारची सर्वतोपरी मदत तब्बल ४१ हजार ८७७ रुग्णांना करण्यात आली आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ रायकर, मंडळाचे पदाधिकारी तुषार रायकर, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सन २०२३-२४ या वर्षात विविध प्रकारच्या तब्बल १०,९८८ शस्त्रक्रिया, सुमारे २४६७ रुग्णांच्या विविध तपासण्या, ८९८ रुग्णांना मोफत श्रवणयंत्र वाटप, २७,३९२ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप आणि १३२ रुग्णांना कृत्रीम अवयव वाटप ट्रस्टतर्फे पुण्यातील १८५ विविध रुग्णालयाच्या सक्रीय सहभागाने व सहकार्यातून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, हे अनेक रुग्णांना माहीत नसते. त्या रुग्णांना ट्रस्टतर्फे योजनांचा लाभ करून दिला जातो. तसेच, ज्या रुग्णांकडे अपुरी कागदपत्रे असतील, त्यांना नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून कागदपत्रे मिळवून देण्याकरिता देखील ट्रस्ट सदैव तत्परतेने कार्य करीत आहे.

वर्षभरात ट्रस्ट शी संलग्न असलेल्या विविध १८५ रुग्णालयामधून १० हजाराहून अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया विनामूल्य स्वरुपात करुन देण्यात आल्या. त्यामध्ये विशेषत: ७१ लहान मुलांच्या ह्रदयाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या तसेच ह्रदय विकार, कर्करोग आजार, मोतीबिंदू काचबिंदू,पडद्याशी संलग्न शस्त्रक्रिया, लॅसिक तसेच खुबा प्रत्यारोपण, गुडघा प्रत्यारोपण, किडनी स्टोन, प्रोस्टेट ग्रंथी वाढणे शस्त्रक्रिया, हर्निया, मूळव्याध, फिशर, पित्ताशय खडे काढणे, गर्भाशय पिशवी काढणे, लहान मुलांच्या तिरळेपणा शस्त्रक्रिया, मोफत फिजिओथेरपी त्याच बरोबर माफक दरात पेट सीटी स्कॅन, एम आर आय,सीटी स्कॅन, सोनोग्राफी इत्यादी वैद्यकीय सुविधा आणि ट्रस्टच्या केंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारच्या रक्त तपासण्या मोफत व यशस्वीरित्या करुन देण्यात आल्या. केवळ पुणे शहरातूनच नव्हे तर पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील रुग्णांना याकरिता सर्वतोपरी मदत ट्रस्टने केली आहे. आरोग्यविषयक मदतीकरिता ०२०- २४४७९२२२, २४४३०५२७, ८६९८८३८८३०, ९९२२२६२१७४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

*जय गणेश प्रांगण येथे प्रत्येक महिन्याला आरोग्य शिबिर
उत्सवाची पारंपारीक जागा असलेल्या बुधवार पेठेतील दत्त मंदिरासमोर जय गणेश प्रांगण येथे प्रत्येक महिन्याला आरोग्य शिबिर आयोजित केले जाते. त्यामध्ये विविध रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर्स रुग्णांची विनामूल्य तपासणी करुन आजाराचे रोग निदान करतात तसेच शिबिरात मोफत औषधोपचाराचे वाटप देखील करण्यात येते. दानपेटी आणि देणगीच्या माध्यमातून मंदिरात जमा होणारा समाजाचा पैसा, देवाचे सर्व धार्मिक उपक्रम करुन उरलेला निधी परत समाजाला देण्याचा प्रयत्न यामाध्यमातून ट्रस्ट करीत आहे, यातून ट्रस्टने श्रध्देला सेवेची जोड दिलेली आहे.

*फिरत्या नेत्र रुग्णवाहिकाद्वारे झोपडपट्टी विभागात दररोज मोफत नेत्र तपासणी
फिरत्या नेत्र रुग्णवाहिकाद्वारे पुणे शहरातील विविध झोपडपट्टी वसाहत भागातील रुग्णांची विनामूल्य तपासणी केली जाते. जनता वसाहत, येरवडा भाग, लोहियानगर गंज पेठ, पाटील इस्टेट वसाहत शिवाजीनगर, वडारवाडी वसाहत, गोखलेनगर वसाहत, दत्तवाडी भाग, राजेंद्रनगर याठिकाणी ट्रस्टची नेत्र रुग्णवाहिका जावून २७ हजार ३९२ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करुन देण्यात आली. तसेच गरजेनुसार मोफत चष्मे वाटपही ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

*दगडूशेठ ट्रस्टचे मोफत पॅथॉलॉजिकल टेस्ट सेंटर – तीन महिन्यात १९४१ रुग्णांच्या मोफत तपासण्या
पुण्यातील धनकवडी भागात काशिनाथ पाटील नगर येथे दगडूशेठ ट्रस्टने नुकतेच मोफत रक्त व विविध प्रकारची रुग्णतपासणी करणारे केंद्र सुरु केले आहे. याकेंद्रामध्ये दररोज किमान ५० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी मोफत केली जाते. रक्त तपासणी व विविध तपासण्या अंतर्गत सीबीसी,रक्तगट,थायरॉइड, लिपिड प्रोाइल, लिव्हर फंक्शन टेस्ट, फास्टींग पीपी शुगर, एसजीओटी/एस जी पीटी, युरिया, ईएस आर, युरीन, एच आयव्ही इत्यादी विविध प्रकारच्या तपासण्या विनामूल्य केल्या जात आहेत. आजपर्यंत मागील तीन महिन्यात १ हजार ९४१ रुग्णांची रक्ततपासणी केली आहे.

*श्रवणदोष असणा-या गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्र मोल्ड व श्रवणयंत्र वाटप
प्रख्यात गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सुर्याेदय फाउंडेशन तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने गरजू रुग्णांना मोफत मोल्ड व श्रवणयंत्र वाटप केले जात आहे. यावर्षी ९२३ कर्णबधिर रुग्णांना यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमास अगदी लहानमुलांपासून ते ज्येष्ठ नागरीकांपर्यंत मोठा प्रतिसाद मिळत आहे.

*तब्बल ११ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अखंडीतपणे विनामूल्य

पुणे शहरातील मोफत रुग्णवाहिका एकूण कॉल – १२२६
पुणे शहराबाहेर डिझेल खर्चात रुग्णवाहिका उपलब्ध संदर्भात एकूण कॉल – ६१७
ससून रुग्णालयच्या बेवारस रुग्णांचे मोफत कॉल – ०७

ट्रस्टच्या एकूण ११ रुग्णवाहिका असून अखंडपणे २४ तास पुणे शहर ,पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात विनामूल्य सेवा दिली जाते. तसेच महाराष्ट्रात डिझेल खर्चात सेवा दिली जात आहे. विशेषत: जे पॅरालिसिसचे रुग्ण आहेत, त्यांना कर्नाटकमधील निपाणी येथे ३-४ रुग्णवाहिका घेऊन जातात. गणपती मंदिराच्या येथे चालकासह २४ तास ही रुग्णवाहिका उपलब्ध असते. याशिवाय संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळानिमित्त वारक-यांना ट्रस्टच्या रुग्णवाहिकाद्वारे तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत वैद्यकिय सेवा औषधोपचार पुणे ते पंढरपूर वाटप केले जाते. तसेच पालखी सोहळा निमित्त वारक-यांसाठी जय गणेश प्रांगण येथे मोफत डोळ्यांची तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिर देखील घेतले जाते.

*ससून सर्वाेपचार रुग्णालय पुणे येथे दररोज ३००० रुग्णांना मोफत भोजन
जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत राबविण्यात येणारे ससून सर्वाेपचार रुग्णालयातील कार्य समाजाभिमुख आहे. यामध्ये सुमारे ३००० रुग्णांकरीता दररोज २ वेळचे भोजन,चहा आणि नाश्त्याची सोय केली जाते. रुग्णालयातील गरोदर महिलांच्या पाच वाडार्चे नूतनीकरण हा दगडूशेठ ट्रस्टच्या कार्यातील महत्वाचा टप्पा आहे. याशिवाय ५९ नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग आणि रुग्णांकरीता अतिदक्षता विभाग देखील अद्यावत करण्यात आला. गरोदर महिलांसाठी ५ कक्ष तसेच रुग्णांच्या नातेवाईकांकरीता विश्रांती गृहाची व्यवस्था दगडूशेठ ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.

*दरवर्षी गणेशोत्सव कार्यकाळात भाविकांसाठी मोफत वैद्यकिय मदत केंद्राची व्यवस्था
गणेशोत्सवामध्ये येणा-या भाविकांची गर्दी पाहता दत्तमंदिर ते मुख्य गणपती मंदिरापर्यंत एकूण ४ वैद्यकिय मदत केंद्रांची व्यवस्था करण्यात येते. त्यामध्ये विविध नामांकित रुग्णालयांमार्फत तातडीची वैद्यकिय मदत उपलब्ध करुन दिली जाते. यामध्ये केंद्रावर मोफत औषधोपचार, काडीर्याक अ‍ॅम्ब्युलन्स, डॉक्टर्स, नर्सेस व इतर स्टाफ इत्यादी प्रकारची वैद्यकिय सुविधा दगडूशेठ ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांसाठी दिली जाते.

आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल शंका घेण्यापेक्षा अजितदादा, एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी भाजपकडे गेलेत हे पहा -वसंत मोरे

पुणे- केवळ बाळासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित करण्यापेक्षा अजित दादा , एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर शंका घ्या , प्रश्न उपस्थित करा , ते केवळ सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडे गेलेत आम्ही मात्र वंचितांच्या शोषणाविरोधात मैदानात आहोत अशी स्पष्टोक्ती आज येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी दिली .

वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर आज त्यांनी वंचित आणि आपले कार्यकर्ते यांचासह जाऊन भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला . त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,’

२५ वर्षे मी ज्या पक्षात निष्ठेने राहिलो त्या पक्षात कार्यकर्त्यांना न्याय मिळेनासा झाल्यावर मी त्या पक्षातून बाहेर पडलो

भाजपच्या विरोधात जे जे पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करत त्यांची मोट बांधण्याचा मी प्रयत्न करत होतो.

माझी लढाई देशाच्या संविधानाच्या विरोधात जे आहेत त्यांच्याविरोधात आहे.

मला वंचित ने उमेदवारी जाहीर करताक्षणी दीड लाख मतदान माझ्या म्हणजे वसंत मोरेच्या सोबत आले आहे.

राहुल गांधी यांनी वायनाडमधून उमेदवारी दाखल केली:प्रियंकांसोबत रोड शो केला

वायनाड-काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी त्यांनी बहीण प्रियंका गांधी यांच्यासोबत रोड शो केला. यावेळी राहुल यांनी परिसरातील जनतेला सांगितले की, तुमचा खासदार होणे ही भाग्याची गोष्ट आहे.

इंडियाचा भाग असलेल्या सीपीआयच्या ॲनी राजा वायनाडमधून राहुल यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. ॲनी राजा यांनीही बुधवारी रोड शो करून उमेदवारी दाखल केली. त्याचवेळी भाजपने राहुल यांच्याविरोधात के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवले आहे.

यासोबतच पक्षाचे ‘पाच न्याय, पंचवीस गॅरंटी’ देशातील जनतेपर्यंत नेण्यासाठी काँग्रेसने ‘घर घर गॅरंटी’ अभियान सुरू केले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्याची सुरुवात ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून केली. किमान 8 कोटी घरांमध्ये गॅरंटी कार्ड पोहोचवण्याची पक्षाची योजना आहे.

राहुल म्हणाले – तुमचा खासदार होणे हा सन्मान आहे

राहुल वायनाडच्या लोकांना म्हणाले – तुमचा खासदार होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी तुम्हाला मतदार म्हणून वागवत नाही. माझी धाकटी बहीण प्रियांकाशी जसा वागतो तसाच मी तुमच्याशी वागतो. वायनाडमध्ये माझ्या घरी बहिणी, आई, वडील आणि भाऊ आहेत आणि त्यासाठी मी मनापासून आभार मानतो.

तिकिटासाठी बाजीरावशेठ १० वेळा दिल्लीला जातात ,पण …. अमोल कोल्हेंचे प्रचार यात्रेतून विरोधकांवर वार

पुणे- तिकिटासाठी बाजीरावशेठ १० वेळा दिल्लीला जातात पण शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी आणि प्रश्न सोडविण्यासाठी मात्र जात नाहीत अशी टीका शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.१८ टक्के जीएसटी घेणारे मोदी खतांच्या गोण्यांवर देखील आपले फोटो लावतात , हजारो कोटी जाहिरातीवर उधळतात पण शेतकऱ्यांकडे पाहायला त्यांना वेळ नाही अशीही टीका त्यांनी केली आहे. आणि आता निवडणूक आयोगाचे नियम पाळण्यासाठी मोदींचे फोटो गोण्यांवरून हटवायचे म्हणून शेतकऱ्यांना खतांच्या गोण्या मिळणे मुश्कील झालेय त्यासाठी उन्हातान्हात त्यांना रांगा लावाव्या लागतात असेही ते म्हणाले.

कोल्हे म्हणाले,’ भाजपला केवळ निवडणूक दिसते त्यामुळे प्रचाराच्या हव्यासापोटी जाहिरातबाजीवर हजारो कोटी रुपये खर्च होतात. खतांच्या गोणीवर देखील पंतप्रधान मोदींचा फोटो छापले गेले, आता आचारसंहितेची बंधनं आल्यामुळे पंतप्रधान नोंदींचा फोटो हटविण्यासाठी हा वेळ लागतोय म्हणून युरियासाठी ताटकळत उभं राहावं लागत आहे, याचं स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाने द्यायला हवे.आपला भरतदेश कृषिप्रधान देश आहे आणि या देशाला मध्यप्रदेशच्या निवडणुका झाल्यापासून पूर्णवेळ कृषिमंत्री नाही, त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणीही वाली राहिला नाही. म्हणून हे सरकार पूर्णपणे शेतकरी विरोधी सरकार आहे, यावर आता अनेकजण म्हणतील की, पीएम किसान सन्मान निधी दिला जातो. परंतु सर्वसामान्य शेतकरी लाखभर रुपयांची खते घालतो आणि त्यावर हे सरकार १८ % GST वसूल करून ६००० रुपये देऊन त्याला जो सन्मान म्हणता येत नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, खेड तालुक्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी युरियासाठी उन्हातान्हात रांगेत उभं राहावं लागतं त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रति भाजपच्या काय भावना आहेत हे लक्षात येतं..

दरम्यान कोल्हे यांच्या प्रचार यात्रेने रंगत निर्माण करण्यास प्रारंभ केल्याचे दिसते आहे. गावोगावी वाड्या वस्त्यांवर त्यांच्या भेटीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. त्यांचे उत्साहाने स्वागत होताना दिसते आहे. कुठे कोणी खांद्यावर घेऊन त्यांना मिरवते आहे तर कुठे बैल गाडी तून त्यांची मिरवणूक काढली जातेय .आपला शेतकऱ्यांचा बालेकिल्ला आपला गड आहे म्हणून मला महाराष्ट्रभर देखील फिरायचे आहे. तुम्ही इथला किल्ला सांभाळा असेही कार्यकर्त्यांना सांगायला ते विसरत नाहीत .

आज त्यांनी जुन्नर तालुक्यातील डिंगोरे पिंपळगाव जोगा जिल्हा परिषद गटात गावभेटी घेतल्या, यावेळी उदापूर येथे आयोजित कोपरा सभेत कोल्हे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला अमोल कोल्हे म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री तिकीट वाटपासाठी दहा वेळा दिल्लीला जातात. मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला जात नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मंत्री शिरूरमध्ये येतात पण आम्हाला दिवसा थ्री फेज लाईट द्या या मागणीवर काही बोलत नाही. बिबट्याच्या प्रश्नाविषयी कुणी ठोस भुमिका घेत नाही, अशी तक्रार कोल्हे यांनी केलीया वेळी आमदार बाळासाहेब दांगट, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपजिल्हाप्रमुख अनंतराव चौगुले,तालुकाध्यक्ष तुषार थोरात, माजी जि.प. सदस्य शरद लेंडे, अंकुश आमले, मोहित ढमाले, माजी सभापती बाजीराव ढोले,शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक संभाजी तांबे, शरद चौधरी, सुनिल मेहेर, राहुल सुकाळे, ज्योसना महाबरे,चैताली केंगले, उदापूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव कुलवडे, सरपंच सचिन आंबडेकर,
विद्याविकास विकास मंडळ अध्यक्ष प्रभाकर शिंदे, पाडुरंग शिंदे, रोहिदास शिंदे, प्रकाश कुलवडे,
संजय शिंदे, संजय बुगदे, संतोष होनराव, पुष्पलता शिंदे, प्रमिला शिंदे, उदापूर ग्रामपंचायत सदस्य व नागरीक उपस्थित होते.