Home Blog Page 1112

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर अखेर हातोडा

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर अखेर हातोडा चालवण्यात आला आहे. बेकायदा बांधकाम करून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे.

अनिल परब यांचे दापोलीच्या मुरूड समुद्र किनाऱ्यावर साईअनिल परब यांचे दापोलीच्या मुरूड समुद्र किनाऱ्यावर साई रिसॉर्ट हॉटेल आहे. या ठिकाणी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हे रिसॉर्ट बांधताना 200 मीटरच्या आत बांधकाम करून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून समुद्र गिळंकृत केला, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी अनिल परब व सदानंद कदम यांच्याविरोधात दापोली पोलिस ठाण्यात 14 नोव्हेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज अखेर या रिसॉर्टमध्ये पाडापाडी सुरू करण्यात आली आहे.किरीट सोमय्यांनी दिली पाडापाडीची माहितीकिरीट सोमय्या यांनी एका ट्विटद्वारे प्रशासनाच्या या कारवाईची माहिती दिली. अनिल परब चा दापोली साई रिसॉर्ट वर हातोडा… तोडकाम सुरू… साई रिसॉर्ट अनधिकृत बांधकाम विरोधात अनिल परब आणि सदानंद कदम वर फौजदारी कारवाई प्रक्रिया ही सुरू आहे सध्या दोघे जामीनावर आहेत. हिसाब तो देना पड़ेगा, असे ट्विट सोमय्या यांनी या प्रकरणी केले आहे.अनिल परब यांच्या रिसॉर्टवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या सोमवारीच रत्नागिरीच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा विषय काढला. तसेच या प्रकरणी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर दोनच दिवसांत ही कारवाई झाली आहे. सोमय्या यांनी या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांचीही भेट घेतली होती.दापोली येथील साई रिसॉर्टचे बांधकाम करताना केवळ सीआरझेड कायद्याचेच उल्लंघन झाले नाही तर मनी लाँड्रिंग झाल्याचाही संशय आहे. या रिसॉर्टच्या बांधकामासाठी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला. अधिकाऱ्यांना अवैध परवानगी देण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोपही सोमय्या यांनी या प्रकरणी केला होता.

आयुष्मान खुराना ने वॉर्नर म्युझिक इंडियासोबत जागतिक करारावर स्वाक्षरी केली

बॉलीवुड सुपरस्टार आयुष्मान खुराना, अभिनेता आणि रेकॉर्डिंग आर्टिस्ट, जो त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट आणि चार्टबस्टिंग गाण्यांसाठी ओळखला जातो, त्याच्या कलाकार कारकिर्दीच्या पुढच्या अध्यायात, देशातील आघाडीच्या संगीत लेबल वॉर्नर म्युझिक इंडियासोबत जागतिक रेकॉर्डिंग करारावर स्वाक्षरी केली आहे. .

वॉर्नर म्युझिक इंडियासोबत साइन केल्याने खुराना लेबलच्या ग्लोबल इकोसिस्टम मध्ये प्रवेश करू शकतील, ज्यामुळे त्यांना भारताच्या सीमेपलीकडे प्रेक्षक आणि कलाकारांशी संपर्क साधण्यात मदत होईल. या भागीदारीतील पहिले रिलीज  पुढील महिन्यात येण्याची अपेक्षा आहे.

भागीदारीबद्दल उत्साह व्यक्त करताना, आयुष्मान खुराना म्हणतो: “मला नेहमीच माझ्या सर्जनशील उत्कृष्टतेच्या शोधात समविचारी लोकांसोबत काम करायचे आहे. मला माझे संगीत जागतिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचे आहे आणि मला विश्वास आहे की वॉर्नर म्युझिक इंडिया सोबत  मी या क्षेत्रात काही महत्त्वपूर्ण प्रगती करेन. माझे पुढचे गाणे लोकांसमोर घेऊनयेण्यासाठी मी आणखी थांबू शकत नाही. हा एक नवीन आवाज असेल जो लोकांनी माझ्याकडून ऐकला नसेल जो माझ्यासाठी वैयक्तिकरित्या अत्यंत रोमांचक आहे.”

जय मेहता, वॉर्नर म्युझिक इंडिया आणि सार्कचे व्यवस्थापकीय संचालक, म्हणतात  “आयुष्मानने त्याच्या चित्रपटांद्वारे अतुलनीय यश अनुभवले आहे आणि आता त्याला पॉप स्टार म्हणून नवीन उंची गाठताना पाहून आम्हाला आनंद होत आहे. त्यांची संगीताची आवड, अष्टपैलू ओळख आणि आमची कलाकार-प्रथम इकोसिस्टम, त्यांच्या संगीत प्रवासात त्यांच्यासाठी एक प्रतिष्ठित रोडमॅप तयार करताना आम्हाला आनंद होत आहे.”

अल्फोन्सो पेरेझ सोटो, इमर्जिंग मार्केट्स, वॉर्नर म्युझिकचे अध्यक्ष पुढे म्हणतात: “आयुष्मानला भारतात आणि जागतिक भारतीय डायस्पोरामध्ये आधीच प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. आम्हाला विश्वास आहे की त्याच्याकडे जगभरातील आणखी प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याची आणि खरोखर जागतिक संगीत बनण्याची प्रतिभा आणि करिष्मा आहे.
वॉर्नर म्युझिक ग्रुपचे रेकॉर्डेड म्युझिकचे सीईओ मॅक्स लुसाडा म्हणतात : “आयुष्मान आणि त्याचा विशिष्ट आवाज रंगमंचावर आणि पडद्यावर प्रकाश टाकतो आणि त्याच्याकडे जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घालण्याची स्टार गुणवत्ता आहे. मी सध्या भारतातील संगीत संस्कृतीबद्दल खूप उत्सुक आहे – तिची विविधता, वेग आणि गतिशीलता प्रेरणादायी आहे – आणि आमच्या कलाकारांसाठी आणि आमच्या कंपनीसाठी आमच्याकडे मोठ्या जागतिक योजना आहेत.

आयुष्मानने गेल्या दशकभरात अनेक आयकॉनिक पॉप गाण्यांना आपला आवाज दिला आहे, ज्यात “मिट्टी दी खुशबू,” “पानी दा रंग,” आणि “मेरे लिए तुम काफी हो” सारख्या हिट गाण्यांचा समावेश आहे, प्रत्येकाने लाखो व्ह्यूज मिळवले आहेत. त्याच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासात, तो एकमेव भारतीय अभिनेता म्हणून उभा आहे ज्याला TIME मासिकाने केवळ तीन वर्षात दोनदा सन्मानित केले आहे, सामाजिक बदलासाठी सिनेमाची त्याची जान जागतिक स्तरावर त्याचा प्रभाव मजबूत करण्यासाठी ओळखला जातो.

चुरशीच्या लढतीत नाशिकचा हर्षवर्धन ठरला महाराष्ट्र कुस्ती महा-वीर किताबाचा मानकरी

पुणे : नाशिक येथील हर्षवधन सदगीर आणि सोलापूरचा जयदीप पाटील यांच्यातील चुरशीच्या लढतीत जयदीप पाटील याने टांग डाव मारायचा प्रयत्न केला परंतू हप्ते भरून हर्षवर्धन याने चितपट निकाली कुस्ती करून महाराष्ट्र कुस्ती महा-वीर हा खुल्या गटातील किताब मिळविला. रुपये १,००,०००/- रोख, चांदीची गदा, सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रधर्म पूजक – दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा रामेश्वर (रूई), ता.जि. लातूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा गेल्या १५ वर्षापासून भरविण्यात येत आहेत.
सोलापूर येथील जयदीप पाटील यांनी उपविजेते पद मिळविले. त्यांना रौप्यपदक व रोख रुपये ७५,०००/- चे पारितोषिक देण्यात आले. पुणे येथील प्रमोद सुळ यांला  समाधान मानावे लागले. त्याला रुपये ५०,०००/- रोख व कांस्य पदक, देण्यात आले. चतुर्थ  क्रमांकावर कुर्डृवाडी येथील सुहास गोडगे याला रुपये २५,०००/- रोख व पदक देण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण २०० पेक्षा अधिक मल्लांनी भाग घेतला होता.
हिंदकेसरी दीनानाथ सिंग, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, रामेश्वरचे माजी सरपंच श्री. तुळशीराम दा. कराड, श्री. काशीराम दा. कराड, आमदार श्री. रमेशअप्पा कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. हनुमंत कराड, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे विलास कथुरे, श्री. राजेश कराड, डॉ. पी.जी.धनवे व वस्ताद पै. निखिल वणवे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिके देण्यात आली.
तर वजन गटातील विजेते पुढीलप्रमाणे


(प्रथम क्रमांक – सुवर्णपदक, द्वितीय क्रमांक – रौप्य पदक, तृतीय क्रमांक – कांस्यपदक व रोख रक्कम पुढे दिल्या प्रमाणे)

वजन गट   प्रथम क्रमांक   द्वितीय क्रमांक  तृतीय क्रमांक       चतुर्थ क्रमांक

८६ किलो (रवी चव्हाण-पुणे ), (कौतुक डाफळे- कोल्हापूर), (अविनाश गावडे-पुणे), (एकनाथ बेद्रेे-सोलापूर)
रक्कम    रु. ४०,०००/-           रु. ३०,०००/-              रु.२५,०००/-              रु.२०,०००/-

७४ किलो (अभिजीत भोसले-सोलापूर) (मशिद शेख- कुर्डुवाडी), (विष्णू तातपूरे- लातूर ), (चौतन्य साबळे- पुणे)
रक्कम  रु.२५,०००/-                 रु.२०,०००/-            रु.१५,०००/-                रु.१०,०००/-

७० किलो  (विकी कारे-पुणे),  (महेश तातपूरे -रामेश्वर), (अमर मळगे- सोलापूर), (सुदेश बागल – कुर्डूवाडी)        
रक्कम       रु.१५,०००/-              रु.१२,०००/-            रु.१०,०००/-                रु.८,०००/-

६५ किलो (निखील  पवार – लातूर ), (पवण जेण्णर- नाशिक),   (सद्दम शेख – कोल्हापूर),    ( सुशांत पाटील – कोल्हापूर )
रक्कम         रु.१२,०००/-       रु.१०,०००/-                 रु.८,०००/-             रु.५,०००/-

६१ किलो   (विजय डोंगरे-सोलापूर),    ( अतुल चेचरे – सोलापूर),     (अविष्कार गावडे  – पुणे),   ( अनिकेत पाटील- कोल्हापूर)
रक्कम    रु.१०,०००/-                     रु.७,०००/-                         रु.५,०००/-                         रु.३,०००/-

५७ किलो   (आकाश गड्डे – रामेश्वर),    (धवल चव्हाण- धाराशिव),   (विशाल सुरवसे- सोलापूर),   (लहू चौरे- सांगली)
रक्कम       रु.७,०००/-                    रु.५,०००/-                   रु.३,०००/-                      रु.२,०००/-

७५ पेक्षा अधिक वर्षे वय असलेले अनेक मल्ल सहभागी झाले होते. या पैकी कमलाकर मुळे हे विजेते ठरले तर शिवाजी मोरे हे उपविजेते ठरले. या पैलवानांचा योग महर्षी स्वातंत्र्यसेनानी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलार मामा स्मृती-सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
प्रा.  डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, रामेश्वरच्या मातीतून आज ना उद्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू निर्माण होतील. भारताच्या कुस्तीक्षेत्रामध्ये आपले नाव उज्वल करतील. कुस्ती या क्रीडाप्रकारात आपले मन आणि मनगट मजबूत होते. आजच्या तरुणांनी कुस्तीकडे वळणे गरजेचे आहे.
श्री. बाबा निम्हण यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन व धावते वर्णन केले. तर प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.

३७ लाखांचा मद्य साठा जप्त

मुंबई : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वरळी येथील सासमीरा मार्गावरील सफेलो हॉटेल समोर आणि लोखंडवाला कॉम्लेक्स, अंधेरी (प) या ठिकाणी परदेशात निर्मित केलेली व दिल्लीतून आयात करुन मुंबईत आणलेल्या विविध ब्रँन्डच्या विदेशी मद्याचा साठा चारचाकी वाहनासह जप्त केला आहे. हा मुद्देमाल एकूण 37 लाख 28 हजार 560 रूपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील आहे.

लोखंडवाला कॉम्लेक्स येथील गुन्ह्यात 14 लाख 39 हजार 160 रूपये व वरळी येथील सफेलो हॉटेल समोर येथील गुन्ह्यात 22 लाख 89 हजार 400 रूपये किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमालाचा समावेश आहे. या गुन्ह्यापोटी सतीश शिवलाल पटेल (वय 35) या इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. इसमाने गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीदेखील परदेशातून, दिल्लीतून महाराष्ट्रात आयात केलेल्या विविध बँन्डच्या विदेशी स्कॉच मद्याच्या सिलबंद बाटल्यांची मुंबईमध्ये विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हे नोंद केले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, मुंबई शहर अधीक्षक प्रविण कुमार तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे गांभीर्य लक्षात घेता उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे. ही कारवाई निरीक्षक प्रकाश काळे यांनी केली असून दुय्यम निरीक्षक प्रज्ञा राणे, दुय्यम निरीक्षक लक्ष्मण लांघी तसेच जवान विनोद अहीरे यांनी सहकार्य केले. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक श्री. काळे करीत आहेत, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.

वंचित च्या शिरुर च्या उमेदवारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे,सध्या जामिनावर बाहेर आहेत पैलवान मंगलदास बांदल

पुणे: खंडणी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात दोन वर्षे तुरुंगात बंद असलेल्या आणि काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आलेल्या पैलवान मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.त्यामुळे आता शिरुरमध्ये आढळराव पाटील, अमोल कोल्हे आणि मंगलदास बांदल यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मंगलदास बांदल यांना 26 मे 2021 ला पोलीसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुढची दोन वर्षे मंगलदास बांदल तुरुंगात बंद होते. त्याआधी पुण्यातील एका सराफ व्यावसायिकाच्या कुटुंबातील व्यक्तींचे स्पाय कॅमेराच्या माध्यमातून चित्रीकरण करून त्या सराफ व्यावसायिकाला पन्नास कोटी रुपयांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून देखील मंगलदास बांदल यांना आधी अटक करण्यात आली होती. मंगलदास बांदल यांच्यावर पुण्यातील रांजणगाव एम आय डी सी परिसरात खंडणी आणि अपहरणाचे अनेक गुन्हे नोंद आहेत.

मंगलदास बांदल हे यांनी 2009 ला भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुक लढवली होती. त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तर त्याआधी ते अपक्ष उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. 2019 ला त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तुरुंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर मंगलदास बांदल यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न केला होता. शिरुरचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी देखील मंगलदास बांदल उपस्थित होते. त्यानंतर काहीच दिवसांत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर मनोज जरांगे यांचीही त्यांनी भेट घेतली होती.त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आलीय.

भीषण आग:एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

संभाजीनगर:

छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात किंग स्टाईल टेलर्स या कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे कपड्याचे दुकान छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला होते.

छत्रपती संभाजीनगर शहरात आगीच्या घटनेत एकाच वेळी सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरातील छावणी परिसरातील जैन मंदिराजवळ असलेल्या एका तीन मजली इमारतीला मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे.

आगीत दुसऱ्या मजल्यावर असलेल्या 7 जणांचा मृत्यू

या आग लागलेल्या इमारतीत एकूण 16 लोक होते. पहिल्या मजल्यावर 7 लोक होते. तर दुसऱ्या मजल्यावर 7 लोक होते आणि तिसऱ्या मजल्यावर 2 लोक होते. यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील सर्व सात लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र, तोपर्यंत सर्व दुकान जळून खाक झालं होतं. तसेच यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत अग्निशमाक दलाचा एक जवानही जखमी झाला आहे.

मृतांची नावे

आसिम वसीम शेख, 3 वर्ष मुलगा

परी वसीम शेख 2 वर्ष मुलगी

वसीम शेख, 30 वर्ष

तन्वीर वसीम,महिला 23 वर्ष

हमीदा बेगम, 50 वर्ष

शेख सोहेल 35 वर्ष

रेश्मा शेख 22 वर्ष

निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध

मुंबई, दि. 2 : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.

महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून याअनुषंगाने 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून 1 जून 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल साठी प्रतिबंध लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.

0000

गुगल फॉर्मव्दारे संकल्प पत्रासाठी भाजपा घेणार मुंबईकरांच्या सूचना

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. २ एप्रिल
लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईकरांच्या अपेक्षा, सूचनासह भाजपाचे संकल्प पत्र तयार करण्यात येणार असून आजपासून भाजपातर्फे गुगल फॉर्ममध्ये या सूचना घेण्यात येणार असून आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेतील मुंबईच्या लोकसभेचा जाहीरनामा तयार करताना मुंबईकरांच्या थेट सूचना भाजपाकडून गोळा करण्यात येत आहेत. त्यासाठी रेल्वे स्टेशन, भाजपा कार्यालये व ठिकठिकाणी सूचना पेटया ठेवण्यात आल्या आहेत. या माध्यमातून १५ हजार पेक्षा जास्त सुचना गोळा झाल्या आहेत. यामध्ये अधिकाधिक मुंबईकरांना आपल्या सूचना देता याव्यात, मुंबईबाबतच्या नवनविन कल्पना मांडता याव्यात म्हणून गुगल फॉर्मवर ही मोहिम राबविली जाणार आहे. भाजपाचे ९ हजार बुथ प्रमुख आपल्या मोबाईलवरुन हा गुगल फॉर्म मुंबईकरांपर्यंत पोहचवणार आहेत.

आज या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार अमित साटम, कालिदास कोळंबकर, तमिल सेलवन, प्रसाद लाड आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान या वेळी बोलताना आमदार ॲड.आशिष शेलार म्हणाले की, मी मुंबई भाजपाचा अध्यक्ष या नात्याने 1 कोटी 40 लाख मुंबईकरांना आवाहन करतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी व्हा. आपल्या मुंबईबाबतच्या नव्या कल्पना, संकल्पना, सूचना आपण मांडा. आपण मांडलेल्या या सूचना आम्हा सगळ्यांना पुढील काळामध्ये सेवक म्हणून काम करताना प्रेरणादायी, नवी ऊर्जा देणाऱ्या ठरतील. असे सांगून त्यांनी गूगल फॉर्मवर जास्तीत जास्त सूचना मांडाव्यात असे आवाहन त्यांनी केले.

निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी- निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला

पुणे, दि. २ :- आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करून निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त दिपक सिंगला यांनी केले.

मावळ लोकसभा मतदार संघांतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्यावतीने थेरगाव येथील स्व. शंकर गावडे कामगार भवन येथे सेक्टर अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री.सिंगला बोलत होते. प्रशिक्षण सत्राला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार अमोल कदम, समन्वय अधिकारी अजिंक्य येळे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, उप अभियंता प्रकाश कतोरे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. सिंगला यांनी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वृद्ध, अपंग, महिला यांचे मतदान त्वरेने होईल याची दक्षता संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश दिले.

श्री. जोशी यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातंर्गत नियुक्त करण्यात आलेल्या सेक्टर अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावरील संपुर्ण तयारी, मतदानापुर्वीची तयारी, मतदानावेळीची तयारी आणि मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतरची तयारी इत्यादी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली.

श्री. कदम यांनी मतदान साहित्य ताब्यात घेणे, जमा करणे याबाबतची माहिती देवून मतदान केंद्राची स्थिती आणि त्याठिकाणी करावयाच्या उपाययोजना याबाबत तपशीलवार मार्गदर्शन केले.

श्री. गायकवाड आणि श्री. कतोरे यांनी प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण दिले. यावेळी मतदान यंत्र सिलींग आणि कमिशनिंग याबाबतची माहिती देखील प्रशिक्षणार्थींना देण्यात आली.

प्रशिक्षणासाठी ४८ सेक्टर अधिकारी, ४८ सहाय्यक आणि ५ राखीव सेक्टर अधिकारी उपस्थित होते. यातील ५ सेक्टर अधिकाऱ्यांना जिल्हा स्तरावर मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले. शिवाय मतदान यंत्राच्या हाताळणीचेदेखील प्रशिक्षण त्यांनी घेतले. यानंतर प्रशिक्षणार्थींकडून मतदान यंत्र हाताळणीचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक देखील करून घेण्यात आले. प्रशिक्षणासाठी ४० मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती.

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाचे मत महत्त्वाचे- सूर्यकांत येवले

पुणे,दि.२: लोकशाही बळकट आणि प्रबळ करण्यासाठी प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असून नवमतदारांनी येत्या १३ मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासोबतच परिसरातील सर्व मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत येवले यांनी केले.

कसबा विधानसभा मतदार संघात आप्पासाहेब जेधे महाविद्यालयात आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आप्पासाहेब जेधे महाविद्यालयाच्या प्राचार्य, शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.

मागील निवडणुकीत कमी मतदान झालेल्या भागांमध्ये स्वीप अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे मतदार जागृती करण्यात येत आहे. विविध महाविद्यालयांमध्ये नवमतदार नोंदणी अभियान, पथनाट्य, रॅली, भित्तीपत्रकांचे प्रदर्शन असे विविध उपक्रम राबविण्यात येत असून जनतेच्या मनातील मतदान प्रक्रियेविषयी गैरसमज दूर करण्यासाठी ईव्हीएम यंत्राची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली असल्याचे श्री. येवले यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी ‘मेरा पहला वोट देश के लिए’ अशा वाक्याचा ५० फूट लांबीचा कापडी फलक घेऊन रॅलीद्वारे युवकांना मतदानाचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी मतदानाचा संदेश देणारे भित्तीपत्रकेही तयार केली होती. घोषवाक्य आणि पथनाट्य या माध्यमातूनही मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली.

पर्वती विधानसभा मतदारसंघातही जनजागृती
पर्वती विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृतीसाठी शहरातील सातारा रोड, शिवदर्शन, सहकार नगर, सिंहगड रोड, अंबेधरा कॉलनी, भारती विद्यापीठ, सारस बाग,मित्र मंडळ,सिटी प्राइड,राजीव गांधी प्राणी संग्रहालय इत्यादी बस स्थानकांवर
मतदान जागृतीपर भित्तीपत्रके लावून मतदान जनजागृती करण्यात आली. पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही मतदानाची शपथ देण्यात आली.

वसंत मोरेंना पुण्यातून वंचित ची उमेदवारी तर बारामतीतून सुप्रिया सुळेंना पाठींबा

मोरेंना उमेदवारी देताना सुप्रिया सुळे यांना पाठींबा दिल्याने अनेकांना आश्चर्य …

पुणे- वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हि जाहीर करताना बारामतीतून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या उमेदवारांना पाठींबा देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या रेखा ठाकूर यांनी हे पत्र ट्विटर वरून जाहीर केले आहे.

प्रस्थापित पक्षांनी लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडे गेलेल्या वसंत मोरे यांना प्रकाश आंबेडकर यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. चार दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी ‘राजगृह’ प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन लोकसभेच्या उमेदवारीवर चर्चा केली होती. भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील समीकरणे पाहून आज मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यातून काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर भाजपकडून मुरलीधर मोहोळ लोकसभेचे उमेदवार आहेत, आता पुण्यात तिरंगी लढत होईल. दुसरीकडे वंचितने बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. तर इकडे शिरूरमधून मंगलदास बांदल यांनाही वंचितने कोल्हे-आढळरावांच्या विरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलंय.

वंचितकडून पाच उमेदवारांची घोषणा

  • अविनाश बोसिकर (नांदेड )
  • बाबासाहेब भुजंगराव उगाळे (परभणी )
  • अफसर खान (औरंगाबाद )
  • वसंत मोरे (पुणे )
  • मंगलदास बांदल (शिरुर )

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या आधी दोन याद्या जाहीर केल्या होत्या. तर आज तिसरी यादी जारी करण्यता आली. वंचितकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात 11 उमेदवारांचा समावेश होता. हिंगोलीतून डॉ. बी.डी चव्हाण, सोलापुरमधून राहुल गायकवाड यांना उमेदवारी तर माढ्यातून रमेश बारस्करांना उमेदवारी दिली. यापूर्वी देखील वंचितने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं. ते अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहे. तर दुसऱ्या यादीत लातूरमधून नरसिंग उदगीरकर, साताऱ्यातून मारूती जानकर, धुळ्यातून अब्दुर रेहमान, हातकणंगले येथून दादासाहेब पाटील, रावेरमधून संजय ब्राम्हणे, जालन्यातून प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्य येथून अब्दुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून काका जोशी हे लोकसभा निवडणूक लढवणार आहे.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे अध्यक्षपदी सुनील मते,उपाध्यक्षपदी गुजर, सचिवपदी हजारे, तर खजिनदारपदी किल्लेदारपाटील

पुणे : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) पुणे केंद्राच्या अध्यक्षपदी सुनील मते यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी अजय गुजर, सचिवपदी राजाराम हजारे, तर खजिनदारपदी शशिकांत किल्लेदारपाटील यांची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक बैठकीत २०२४-२०२५ या वर्षांकरिता कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

अखिल भारतीय स्तरावर पुणे केंद्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डॉ. राजीव कृष्णानी, रणजित मोरे, चरणजित सिंग, जगन्नाथ जाधव व कर्नल संजय अडसर (निवृत्त) यांची निवड झाली आहे. पुणे केंद्राच्या कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून शिवकुमार भल्ला, करण पवार, सी. एच. रतलानी, रमेश लाल, मधुर डागा, सी. डी. राठोड, अक्षय देशपांडे, स्वप्नील कुदळे, महेश राठी यांचा समावेश करण्यात आला आहे.

मावळते अध्यक्ष डी. एस. चौधरी यांच्याकडून सुनील मते यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. या निवडीबद्दल आनंद व्यक्त करून सुनील मते म्हणाले की, ‘बीएआय’चे जन्मस्थान असलेल्या पुणे केंद्राच्या अध्यक्षपदी निवड होणे ही आनंदाची गोष्ट आहे. येत्या वर्षात बांधकाम व्यवसायाशी संबंधित विविध घटकांसाठी उपक्रम, कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे, वेल बिल्ट स्ट्रक्चर स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचा मानस आहे.

केजरीवाल तिहार तुरुंगात..14X8 फूट खोलीत रात्रभर फिरताना दिसले,थोडा वेळ सिमेंटच्या फरशीवर झोपले

नवी दिल्ली- दिल्ली मद्य धोरण प्रकरणी तिहार तुरुंगात कैदेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिली रात्र बराकमध्ये येरझरा करत घालवली. वृत्तसंस्था पीटीआयने तुरुंग अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, केजरीवाल रात्रभर 14X8 फूट सेलमध्ये फेऱ्या मारत होते. सिमेंटच्या फरशीवर ते थोडा वेळ झोपले.तिहार तुरुंगातील एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, मंगळवारी सकाळी केजरीवाल यांची साखरेची पातळी कमी होती. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. सोमवारी सायंकाळी चार वाजता त्यांना तिहार तुरुंगात आणण्यात आले. त्यांना बॅरेकमध्ये पाठवण्यापूर्वी मेडिकलमध्येही त्याची शुगर लेव्हल 50 वर नोंदवण्यात आली होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना औषधे देण्यात आली.

सोमवारी केजरीवाल तुरुंगात पोहोचले तेव्हा त्यांना चहा देण्यात आला. रात्रीच्या जेवणासाठी त्यांना घरी शिजवलेले अन्न देण्यात आले. त्यांना झोपण्यासाठी एक गादी, ब्लँकेट आणि दोन उशा देण्यात आल्या. केजरीवाल यांना दुपारी आणि रात्री घरी बनवलेले अन्न खाण्याची परवानगी आहे. त्यांची साखरेची पातळी सामान्य होईपर्यंत त्यांना घरी शिजवलेले अन्न दिले जाईल.

सकाळी ध्यान केले; हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइडस पुस्तक दिले

केजरीवाल यांनी मंगळवारी, 2 एप्रिल रोजी सकाळी उठून बॅरेकमध्ये ध्यान केले. यानंतर त्यांना चहा आणि दोन बिस्किटे देण्यात आली. त्यांना रामायण, महाभारत आणि हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइडस ही तीन पुस्तके देण्यात आली आहेत. त्यांच्या कक्षाबाहेर दोन सुरक्षा कर्मचारी आणि जेल वॉर्डन तैनात करण्यात आले आहेत. सेलच्या बाहेर क्विक ॲक्शन टीमही तैनात आहे. त्यांना धार्मिक लॉकेटही घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यापूर्वी आशियातील सर्वात मोठ्या तुरुंगात बंद असलेल्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंग क्रमांक दोनमध्ये ठेवण्यात आले आहे. मंगळवारी त्यांची पत्नी आणि मुले त्यांना भेटण्याची शक्यता आहे. नियमानुसार केजरीवाल यांनी त्यांना ज्यांना भेटायचे आहे अशा सहा जणांची यादी दिली आहे. यात त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल, त्यांचा मुलगा आणि मुलगी, त्यांचे वैयक्तिक सचिव बिभव कुमार आणि आपचे सरचिटणीस (संघटन) संदीप पाठक यांचा समावेश आहे.

पोलीस विभागाने लोकसभा निवडणूकीत कायदा व सुव्यवस्थेची चोख जबाबदारी बजावावी-पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे

पुणे, दि. २: निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्थेची महत्त्वाची जबाबदारी पाहता आगामी लोकसभा निवडणुक कालावधीत पोलीस विभागाने आपली भूमिका चोख बजावावी, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले.

मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत पिंपरी विधानसभा मतदानसंघाच्यावतीने निगडी येथील पोलीस मुख्यालयाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. चौबे बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, मतदान नोंदणी अधिकारी विनोद जळक, समन्वय अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप, तहसीलदार जयराज देशमुख, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पोलीस दलातील जवान, कर्मचारी उपस्थित होते.

श्री. चौबे म्हणाले, पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपअंतर्गत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांनी मतदानाचा हक्क बजावणेही महत्वाचे आहे. यासाठी येत्या १३ मे रोजी शहरात होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

श्री. सिंगला म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे आणि ती व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. विविध जिल्ह्यातून, ग्रामीण भागातून पिंपरी चिंचवड शहरात कामकाज करण्यासाठी येणाऱ्या आणि शहराबाहेर मतदान असणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर टपाली मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पोलीस जवानांनी मतदानाची शपथ घेतली.

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

पुणे, दि. २: यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर कि.मी. ९३/९०० येथे ३ व ४ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ ते २ या दरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार असून गॅन्ट्री बसविताना मुंबई व पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहील.

वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने किवळे ब्रिज वरून जुना मुंबई – पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळविण्यात येतील. मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका कि.मी ५५.००० वरुन (लोणावळा एक्झीट) येथून जुना मुंबई -पुणे मार्गावरुन पुणेच्या दिशेने मार्गस्थ होतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.