Home Blog Page 1113

 निवडणुकांमध्ये चुकीची माहिती खोडून काढण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘मिथक  विरुद्ध तथ्ये  रजिस्टर’ केले सुरु

नवी दिल्ली-चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेची सचोटी टिकवून ठेवण्यासाठी, केंद्रीय  निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुका 2024 चा एक भाग म्हणून ”मिथक  विरुद्ध तथ्ये  रजिस्टर’ सुरु केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्यासह  नवी दिल्ली येथील निर्वाचन  सदन येथे आज या उपक्रमाचा प्रारंभ केला. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे  (https://mythvsreality.eci.gov.in/ )  ”मिथक  विरुद्ध तथ्ये रजिस्टर’ जनतेसाठी  उपलब्ध आहे. खोटी माहिती खोडून काढून खरी माहिती समोर आणण्यासाठी तसेच नवीन एफएक्यू (वारंवार विचारले जाणारे प्रश्न ) समाविष्ट करण्यासाठी रजिस्टरचे तथ्यात्मक मॅट्रिक्स नियमितपणे अपडेट  केले जातील.  निवडणूक प्रक्रियेचे चुकीच्या माहितीपासून रक्षण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये ”’मिथक  विरुद्ध तथ्ये  रजिस्टर’ हा एक मैलाचा दगड  ठरेल.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सार्वत्रिक निवडणुका 2024 चे वेळापत्रक घोषित करताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की संपूर्ण मतदान प्रक्रियेची पारदर्शकता आणि सचोटी सुनिश्चित करताना   पैसा, ताकद आणि आदर्श आचारसंहिता उल्लंघन यासह चुकीची माहिती हे देखील एक प्रमुख आव्हान आहे. चुकीची माहिती आणि खोट्या गोष्टींचा प्रसार हा जागतिक स्तरावर अनेक लोकशाही देशांसाठी वाढता चिंतेचा विषय बनत असून केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा अभिनव आणि स्तुत्य  उपक्रम मतदारांना संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान अचूक आणि सत्यापित माहिती उपलब्ध करून देण्याचा  प्रयत्न आहे.

”मिथक  विरुद्ध तथ्ये  रजिस्टर’ ‘ हे निवडणुकीच्या काळात प्रसारित होणाऱ्या मिथक आणि खोट्या बातम्या खोडून काढण्यासाठी खऱ्या  माहितीचे सर्वसमावेशक भांडार म्हणून काम करेल आणि मतदारांना योग्य  निर्णय घेण्यास सक्षम बनवेल. ईव्हीएम /व्हीव्हीपीएटी संबंधी मिथक आणि चुकीची माहिती, मतदार यादी/मतदार सेवा, निवडणुकांचे आयोजन  आणि इतर क्षेत्रांना व्यापकपणे समाविष्ट करून वापरकर्त्यासाठी अनुकूल स्वरूपात याची  रचना केली  आहे. हे रजिस्टर निवडणूक संबंधित खोटी माहिती खोडून काढून खरी माहिती, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत असलेली संभाव्य मिथके , महत्त्वाच्या विषयांवरील एफएक्यू आणि सर्व संबंधितांसाठी विविध  विभागांतर्गत संदर्भ साहित्य उपलब्ध करून देते. रजिस्टर नियमितपणे अपडेट केले जाईल.

सर्व संबंधितांना  ”मिथक  विरुद्ध तथ्ये  रजिस्टर’ मध्ये उपलब्ध  माहितीबरोबर अन्य कोणत्याही मार्गाने  प्राप्त  संशयास्पद माहितीची पडताळणी आणि पुष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.  या प्लॅटफॉर्मचा वापर माहितीची पडताळणी करण्यासाठी, चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी, मिथके खोडून काढण्यासाठी  आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत सतर्क राहण्यासाठी केला जाऊ शकतो. वापरकर्ते रजिस्टरवरून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती सामायिक करू शकतात.

एप्रिल ते जून देशातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान अधिक राहण्याची शक्यता-भारतीय हवामान विभागाची माहिती

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी ) ने नवी दिल्लीतील पृथ्वी भवन मधील माहिका सभागृहात, ग्रीष्म  ऋतू (एप्रिल ते जून) 2024 तसेच एप्रिल 2024 चा पाऊस आणि तापमानासंदर्भात मासिक अंदाज जाहीर केला.

प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणाली मार्फत सहभाग अशा संमिश्र पद्धतीने आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय हवामान विभागाने, आगामी ग्रीष्म  ऋतूत (एप्रिल ते जून), देशातील बहुतांश  भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याचे आणि विशेषत: मध्य भारत तसेच पश्चिम द्वीपकल्पीय भारतामध्ये तापमान वाढीची संभाव्यता असल्याचे जाहीर केले.  “या ग्रीष्म  ऋतूच्या काळात पश्चिम हिमालयीन प्रदेश, ईशान्येकडील राज्ये आणि उत्तर ओडिशाच्या काही भागात सामान्य ते सामान्यपेक्षा कमी तापमानाची शक्यता आहे”, असे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.

“एप्रिल-जून 2024 पर्यंत एल निनो ते ENSO-न्यूट्रलमध्ये संक्रमण अपेक्षित आहे आणि त्यानंतर जून-ऑगस्ट, 2024 मध्ये ला निना अनुकूल होईल”, असेही डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

एप्रिल ते जून या कालावधीत आणि एप्रिल 2024 या महिन्यात उष्णतेच्या लाटेच्या प्रभावाविषयी बोलतांना, डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, “उष्णतेच्या लाटेदरम्यान वाढलेल्या तापमानामुळे लक्षणीय धोके निर्माण होतात, विशेषत: वृद्ध, लहान मुले आणि विविध शारीरिक व्याधींनी आधीपासूनच ग्रस्त असल्यामुळे संवेदनक्षम झालेल्या लोकांसाठी तसेच उष्णतेशी संबंधित आजार जसे की उष्णतेमुळे जाणवणारा थकवा आणि उष्माघात, अशा लोकांना हा ऋतू जास्त त्रासदायक ठरू शकतो.” तीव्र उष्णतेच्या दीर्घ कालावधीमुळे निर्जलीकरण होऊ शकते तसेच पॉवर ग्रीड्स आणि वाहतूक व्यवस्था यासारख्या पायाभूत सुविधांवर ताण येऊ शकतो, असेही ते म्हणाले.  या आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिकाऱ्यांनी कूलिंग सेंटर्सची सुविधा उपलब्ध करून देणे, उष्माविषयक सूचना जारी करणे आणि प्रभावित भागात शहरी उष्ण क्षेत्रात परिणाम कमी करण्यासाठी धोरणे राबवणे यासारख्या सक्रिय उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुका 2024 च्या पार्श्वभूमीवर, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उष्णतेच्या लाटेपासून मतदारांचा बचाव करण्यासाठी सावधगिरीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात निवडणूक आयोगासाठी मार्गदर्शन सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य आणि प्रमुख कमल किशोर यांनी दिली.

अरण्येश्र्वर एकता मित्र मंडळाच्या वतीने शिव विचार प्रसार आणि आचार मोहीम

वेगळ्या रुपात व अनोख्या पद्धतीने विचारांची शिवजयंती

पुणे- वेगळ्या अनुख्या रुपात साजरी करूयात विचारांची शिवजयंती… जीवनामध्ये घडवूयात चांगल्या परिवर्तनाची क्रांती या ओळींच्या माध्यमातून सामाजिक भान राखत ध्वनीवर्धक डिजे, वाहतुकीस अडथळा व अनेक निरुपयोगी बाबींना डावलून एकता मित्र मंडळाच्या वतीने तळजाई टेकडी येथे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना विचारांच्या शिवजयंतीची पत्रके वाटप करत अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. एक दिवस शिवराय आपल्यासोबत आहेत या अनुभूतीने, आनंदाने आणि शिवविचारांनी प्रेरित होऊन कमीत कमी आजच्या दिवशी वेळ आली तरी खोटे बोलणार नाही, आजच्या दिवशी जरी एखादे व्यसन मला असेल, तरी ते मी करणार नाही, प्रत्येक माता-भगिनींचा सन्मान करेल, कोणाच्याही प्रती कटुता आणि द्वेषाची भावना बाळगणार नाही, शर्मेने स्वतःची आणि कुटुंबाची मान खाली जाईल असे कोणतेही गैरवर्तन करणार नाही, मी जेथे कुठे नोकरी – व्यवसाय करत असेल तेथे रोजच्या हून अधिक १००% टक्के योगदान देईल, भ्रष्टाचाराचा एक रुपयाही आज तरी घरी नेणार नाही, स्वधर्माचा अभिमान बाळगून परधर्माचा सन्मान राखील. असे अनेक क्षण आजच्या दिवशी शिवरायांना जगून दाखवूयात याप्रमाणे सुरुवात एक दिवसाची, शिव छत्रपतींच्या छत्रछायेखाली स्वयंशासित जीवन जगण्याची असा संदेश सर्वत्र पोहचविण्यासाठी अशा वेगळ्या रूपात शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. या आगळ्या वेगळ्या विचारांच्या शिवजयंतीचे सर्व नागरिकांकडून आणि अनेक स्तरावरून कौतुकाची थाप मिळाली.

या विचारांच्या शिवजयंती सोहळ्यामध्ये एकता मित्र मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व संकल्पना मांडणारे संतोष वाडघरे, अविनाश खंडागळे, अध्यक्ष सुधीर ढमाले व तसेच बाल युवा कार्यकर्ते आदर्श चावट, देवांग करकंडे, प्रथमेश शिंदे, हर्षद खंडागळे, सोफिया शेख, साहिल बोबडे, चैतन्य बोबडे, संचित शिंदे, ओवी ढमाले यांनी सहभागी घेतला.

महायुतीच्या महिला करणार घरोघरी प्रचार – मतदारांपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या योजना पोहचविणार

पुणे-आज महायुतीतील घटक पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची महाबैठक पार पडली.मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भ्रमणध्वनी च्या माध्यमातून महिलांशी संवाद साधताना नावामध्ये वडिलांप्रमाणे आईच्या नावाचा उल्लेख करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आवर्जून उल्लेख केला, तसेच केंद्र सरकार च्या महिलांसाठीच्या विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणी ची माहिती देताना हे सर्व आणि विकासाचे मुद्दे हे प्रचाराच्या केंद्रस्थानी असावेत असे सांगितले.यावेळी महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सर्व भगिनींशी संवाद साधताना “महिलांकडून मोठ्या अपेक्षा असून त्यांनी स्वतंत्रपणे प्रचाराची यंत्रणा राबवावी आणि घरोघरी जाऊन केंद्र व राज्य सरकार ने महिलांसाठी चे घेतलेले निर्णय मतदारांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन केले.” आम्ही एक परिवार म्हणून काम करत असून महायुतीतील सर्व सहयोगी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी एकदिलाने प्रचाराला लागले असून मला पुरेसा अवधी मिळाल्याने विजयाची खात्री वाटते असेही ते म्हणाले.
खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी देशभर मोदी लाट असल्याचा उल्लेख करून महिला ह्या मतदारांच्या घरापर्यंत जाऊ शकतात आणि महायुतीच का हे जास्त चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतात असे सांगितले.तसेच पुणे महिलांसाठी कसे सुरक्षित करता येईल यासह बचत गटाच्या महिलांचे प्रश्न, घरेलू कामगारांचे प्रश्न, महिलांना उद्योग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न हे आमच्या जाहीरनाम्याचा भाग असू शकतात असेही त्या म्हणाल्या.राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष दीपक मानकर महिलांशी संवाद साधताना म्हणाले ” विजय आपलाच आहे पण तो विक्रमी मतांनी व्हावा यासाठी महिलांना विशेष परिश्रम घ्यावे लागतील, महिलांनी किमान दीड लाख मतांनी लीड वाढविण्यासाठीचे नियोजन करावे, नारी शक्ती ने ठरविले तर ते कोणतेही परिवर्तन घडवू शकतात असे आवाहन ही दीपकभाऊ मानकर यांनी केले.आजची महाबैठक ही मुरलीधर मोहोळ, सुनेत्रावहिनी पवार आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजयाची नांदी असल्याचेही ते म्हणाले.
ह्या वेळी भाजपा चे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेनेचे नेते अजय भोसले, युवा सेनेचे प्रदेश सचिव किरण साळी,आर पी आय चे शहराध्यक्ष संजय सोनावणे, महायुतीचे पुणे, शिरूर, बारामती लोकसभा क्लस्टर चे समन्वयक संदीप खर्डेकर, राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष दत्ता सागरे, आरपीआय चे मंदार जोशी,व इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रमुखांच्या मार्गदर्शनानंतर भाजपच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे, शहर सरचिटणीस वर्षाताई तापकीर,शिवसेनेच्या सुदर्शना त्रिगुणाईत, पूजा रावेतकर,नेहा शिंदे,श्रुती नाझिरकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजलक्ष्मी भोसले,गौरी जाधव, पूनम पाटील,आरपीआय च्या सुनिताताई वाडेकर, ऍड. अर्चिता जोशी, हिमाली कांबळे, लोकजनशक्ती पक्षाच्या कल्पनाताई जावळे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना प्रचाराची दिशा निश्चित केली.
हर्षदा फरांदे यांनी उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत दिलेले 20 कोटी जोड,जल जीवन मिशन अंतर्गत 10 कोटी नवीन घरांना नळजोडणी,तिहेरी तलाक गुन्हा ठरविण्याचा निर्णय ह्या सगळ्याचा अंतर्भाव आमच्या प्रचारात असेल असे सांगितले.
महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी ” मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे महिलांचे आयुष्य सुकर बनले असून,प्रधानमंत्री मातृ वंदन योजना,28 कोटिहून अधिक महिला जनधन योजने मूळे बँकांशी जोडल्या गेल्याची उपलब्धी, मातृत्व रजेत 12 आठवड्यावरून 26 आठवड्यापर्यंत केलेली वाढ, महिलांना सुरक्षितता मिळावी यासाठी ची महिला हेल्पलाईन योजना या माध्यमातून महिलांना अधिकाधिक मतदान करण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन केले.
संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन तर हर्षदा फरांदे, गौरी जाधव, संगीता बराटे, पूजा रावेतकर, सुदर्शना त्रिगुणाईत, अर्चिता जोशी यांनी संयोजन केले.

शेतकऱ्याच्या पोराला घेरण्यासाठी मोठे मोठे नेते येत आहेत – डॉ. अमोल कोल्हे


पुणे /आळंदी-खेड तालुक्यातील आळंदी परिसरात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज मंगळवार (दि. २) रोजी गावभेट दौरा केला. या निमशहरी भागातील दौऱ्यात नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी “मी सेवेकरी” फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. आळंदी येथे श्री. ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी माथा टेकवत आशीर्वाद घेतले

दरम्यान केळगाव (ता. खेड) येथे सुरु असलेल्या यात्रेला भेट देत बैलगाडा घाटात जाऊन १९ वर्षांच्या “धिंगाण्या” या बैलाचा सन्मान केला. यावेळी बैलगाडा शौकिनांशी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संवाद साधला यावेळी ते बोलताना म्हणाले की, “नुसती बारी पुकारून चालत नाही जुंपनी कोणी टाकायची आणि जुकाट कोणाच्या खांद्यावर टाकायचं हे राजकारणात अनेकांना सद्या समजत नाही. एवढे मोठे नेते मंडळी एका शेतकऱ्याच्या पोराला घेरण्यासाठी शिरुर लोकसभा मतदारसंघात येत आहेत परंतु माझा सर्व बैलगाडा मालकांवर आणि सर्वसामान्य जनतेवर विश्वास आहे, मी तुमच्यासाठी लढतोय शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढतोय, म्हणून माझा तुमच्यावर विश्वास आहे.”

दरम्यान कुरुळी, निघोजे, मोई, केळगाव, आळंदी या भागात दौरा सुरू असताना अशोक खांडेभराड, राहुल गोरे, सुधीर मुंगसे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून आमच्या १९ वर्षीय धिंगाण्या बैलाचा सत्कार केल्यामुळे आमच्या बैलाचा नावलौकिक आणखी वाढला आहे. १९ वर्षे याला सांभाळल्याचं चीज झाले. अनेक बक्षिसे धिंगाण्याने मिळवली परंतु आजचा सत्कार हा खूप बहुमूल्य आहे. मी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे मनापासून आभार मानतो.

सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे, दि. २: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघात नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आले.

यावेळी मतदारसंघाच्या प्रशिक्षण कक्षप्रमुख माधुरी माने यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या भूमिका, निवडणुकीच्या दरम्यान येणाऱ्या आव्हानांविषयी माहिती दिली.

प्रशिक्षण कक्ष समन्वयक संजय भोर आणि तुषार राणे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट, मतदानाच्या दिवशी करावयाचे नियोजन, संपर्क आराखडा, स्वीप उपक्रमाअंतर्गत करण्यात येणारी कार्यवाही, मतदार चिठ्ठीचे वितरण, आदर्श आचार संहितेचे पालन, मतदार यादी अद्ययावतीकरण आदीबाबत माहिती दिली.

आशिष शेलारांनी आधी भारतीय जनता पक्षात स्वतःच्या पक्षाचे किती ते तपासावे… अहंकारी तानाशाहचे दिवस भरले

४०० पार चा नारा देणाऱ्या भाजपाकडे उमेदवारही नाहीत, दुसऱ्या पक्षातून धमकावून उमेदवार आणावे लागतात ही भाजपाची परिस्थिती

मुंबई, दि. २ एप्रिल

भारतीय जनता पक्ष हाच मुळात मिस कॉल, इव्हेंट व जाहिरातबाजीवर फुगलेला पक्ष आहे, त्या पक्षाने काँग्रेसच्या जाहिरातीवर टिका करणे हास्यास्पद आहे. ४०० पार चा नारा देणाऱ्या भाजपाकडे उमेदवारही नाहीत, दुसऱ्या पक्षातून धमकावून उमेदवार आणावे लागतात ही भाजपाची परिस्थिती आहे परंतु उगाच हवाबाजी करण्याचा ‘शौक’ भाजपा व आशिष शेलार सारख्या सुमार नेत्याना जडला आहे. अहंकारी तानाशाहचे दिवस भरले असून जनताच काँग्रेस व मित्रपक्षाला साथ देणार आणि ‘हात देशाची परिस्थिती बदलेल’ असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

मुंबई भाजपाचे शहराध्यक्ष आशिष शेलार यांच्या टिकेला उत्तर देताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रकाशित केलेल्या पहिल्याच जाहिरातीने आशिष शेलार व भाजपाची झोप उडवल्याचे दिसत आहे. मागील जुमल्यांचे उत्तर तर भाजपाला द्यावेच लागेल असा जळजळीत प्रश्न विचारल्याने ‘हाथ बदलेगा हालात’या काँग्रेसच्या जाहिरातीवर टीका करावी लागत आहे. टीका करताना आशिष शेलार यांना बियर, व्हिस्की, वाईन,पेग याचीच आठवण आली यात नवल करण्यासारखे काहीच नाही कारण त्यांचा पक्ष यातच आकंठ बुडालेला आहे. भ्रष्टाचारावर भाजपा व आशिष शेलार यांनी बोलावे हा तर सर्वात मोठा राजकीय विनोद आहे. देशभरातील सर्व पक्षातील भ्रष्टाचारी लोकांना ईडी, आयकर, सीबीआयच्या कारवाईची धमकी देऊन भाजपात आणले आहे. आता भारतीय जनता पक्षात भाजपाचे मुळ नेते व कार्यकर्ते दुर्बिण लावूनही सापडत नाहीत ही शेलरांच्या भाजपाची अवस्था आहे. पाणी, जमीन, कोळसा, आसमान खाल्लेले भ्रष्ट नेते आशिष शेलारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत याचेही शेलारांना भान राहिले नाही.

काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून देत सर्व जाती धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन देशाचा विकास केला व जगात भारताची ओळख निर्माण केली आहे. ज्या लोकांना देश २०१४ ला स्वतंत्र झाला व २०१४ नंतरच देशाने प्रगती केली असे वाटते त्यांना फार काही सांगण्याची गरज नाही, त्यांनी त्याच स्वप्नरंजनात रमावे. परंतु देशातील जनतेने परिवर्तनाचा निश्चय केला आहे. जगातील सर्वात शक्तीशाली ब्रिटिश साम्राज्यालाही या देशाच्या जनतेने पळून लागवले तर भाजपा काय चिज आहे? ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक करणाऱ्या जुमलेबाज, फेकू भाजपाला जनताच ‘बुरे दिन’ आणणार ह्याची नोंद आशिष शेलार व भाजपाने घ्यावी, असेही अतुल लोंढे म्हणाले.

पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार : नारायण राणे

पुणे-
पुण्याला कै. केशवराव जेधे, कै. विठ्ठलराव गाडगीळ, कै. आण्णा जोशी अशी लोकसभेत खासदारांची विशेष परंपरा आहे. हीच परंपरा मुरलीधर मोहोळ दिल्लीत येऊन नक्की जोपासतील, वाढवतील, असा विश्वास केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस-रिपब्लीकन पक्ष (आठवले गट) व मित्र पक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी राणे यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी शुभेच्छा देताना राणे बोलत होते.

या औपचारिक भेटीच्या वेळी बोलण्याची सुरूवातच राणे यांनी मोहोळ हे निवडून येणार आहेतच, अशी केली. ते म्हणाले, ‘मोहोळ हे १०० टक्के विजयी होणार आहेत. मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्यापर्यंत सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. विजयानंतर ते दिल्लीला आमच्या सोबतच असतील’. यावेळी मोहोळ यांनी आतापर्यंत आपण मतदारांपर्यंत पोचण्यासाठी काय केले याची महिती दिली. त्यानंतर राणे यांनीही काही मौलिक सूचना यावेळी केल्या.

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इतिहासाला उजाळा

अभिनेते रणदीप हुडा यांनी पाळला पुनीत बालन यांना दिलेला शब्द

पुणे : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात रसिक प्रेक्षकांना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे. या चित्रपटाचे अभिनेते रणदीप हुडा यांनी २०२२ मध्ये रंगारी भवनाला भेट देऊन सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात आणि त्यामागील इतिहास याची माहिती घेतली होती, तसेच हा सर्व इतिहास त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून मांडला जाईल असा शब्द प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन यांना दिला होता. या प्रसंगाने त्या शब्दाची पूर्तता झाल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती अशी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची ख्याती आहे. स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी सामाजिक एकतेची जी पार्श्वभूमी आवश्यक असते त्यावरुन गणेशोत्सव हा केवळ एक सांस्कृतिक किंवा धार्मिक उत्सव नाही तर स्वातंत्र्य चळवळीचाच एक भाग असल्याचे मानता येणार आहे. याच अनुषंगाने स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणपती बाप्पाचं दर्शन होत आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या मूर्तीप्रमाणे दिसणारी हुबेहूब दुसरी मूर्ती बनवून ती या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या उत्सवात क्रांतिकारक हत्यारे, पुस्तकं, पत्र आदी गोष्टींची देवाण-घेवाण करताना स्पष्ट दिसत आहेत. यावरुन स्वातंत्र्यपूर्व काळात उत्सवाच्या माध्यमातूनही स्वातंत्र्य चवळवळ कशी चालवली जात होती, याचं दर्शन रसिक प्रेक्षकांना होते. हा प्रसंग पाहताना रसिकांच्या अंगावर देशभक्तीच्या भावनेतून शहारे आल्याशिवाय रहात नाहीत.

२०२२ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचे काम सुरू असताना गणेशोत्सवा दरम्यान अभिनेते रणदिप हुडा यांनी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’ येथे भेट देऊन भवनाचा क्रांतिकारी इतिहास जाणून घेतला होता. त्यावेळी ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी स्वतः मोबाईलमध्ये भवनाचा इतिहास छायाचित्राच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून कैद केला होता. त्यामध्ये भुयारी मार्ग, गुप्त बैठका ज्या ठिकाणी होत असत त्या जागेचे फोटो घेतले होते आणि या बाप्पाच्या उत्सवाचा प्रसंग चित्रपटात दाखवणार असल्याचा शब्दही त्यांनी पुनीत बालन यांना दिला होता. अखेर एका जाज्वल्य देशभक्तावर आधारीत असलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात त्यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याचे दिसत आहे.


‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चं इतिहास एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पण याच ट्रस्टला आपल्या चित्रपटात स्थान देऊन ते महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचा शब्द अभिनेते रणदिप हुडा यांनी दिला होता. आज त्यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता झाल्याने बाप्पाच्या भाविकांप्रमाणेच ट्रस्टचा उत्सवप्रमुख म्हणून माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. याबाबत मी अभिनेते रणदिप हुडा यांचे मनस्वी आभार मानतो.’’

पुनीत बालन
(विश्वस्त व उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

“इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा उभारण्यासाठी
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. या बाप्पाची मूर्ती ही राक्षसाचा संहार करताना दिसत असल्याने ती एक प्रेरणादायक आहे. इथं राक्षस म्हणजे ब्रिटिश असंच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांना त्यावेळी सांगायचं होतं. गणेशोत्सवातील या मूर्तीमुळे अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची ताकद मिळाली. हा सर्व इतिहास जाणून घेतल्यानंतर ही मूर्ती चित्रपटात वापरण्याचा निर्णय घेतला.”

रणदीप हुडा(अभिनेता )

कैद्यांना मिळू लागली व्हिडीओ कॉन्फरसिंगची सुविधा, देशी विदेशी कैद्यांचा आता होऊ लागला घरी संपर्क

0

अमिताभ गुप्तांच्या कार्यवाहीने कोमेजलेल्या चेहऱ्यांना मिळू लागली उमेदीची संजीवनी

पुणे-राज्यातील कारागृहांमध्ये सुमारे ६०० पेक्षा अधिक विदेशी बंदी असून अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून किंवा वर्षांपासून त्यांचा आपले कुटुंबिय, आई-वडील, मुले-मुली यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नव्हता. परंतु e-Mulakat सुविधा सुरू झाल्यामुळे विदेशी बंद्यांचा त्यांच्या कुटुंबियांशी संवाद होऊ लागला असून त्यांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ लागले आहेत. अनेक वर्षांनंतर आपल्या कुटुंबियांशी ई-मुलाखतीद्वारे संवाद साधतांना विदेश बंद्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसून येत आहे.दिनांक 01 जानेवारी २०२४ ते दिनांक 31 मार्च २०२४ या कालावधीमध्ये सुमारे 21,963 पुरूष व महिला बंद्यांनी eMulakat सुविधेचा लाभ घेतला आहे. या कालावधीमध्ये ई-मुलाखत सुविधेचा लाभ घेणाऱ्या बंद्यांमध्ये तळोजा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांची संख्या सर्वात जास्त म्हणजे 3478 असून त्याखालोखाल ठाणे मध्यवर्ती कारागृह–3438, नागपूर मध्यवर्ती कारागृह- 3425, मुंबई मध्यवर्ती कारागृह – 1797, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह-1559, कल्याण जिल्हा कारागृह – 1442, येरवडा मध्यवर्ती कारागृह – 1228, इतक्या बंद्यांनी ई-मुलाखत सुविधेचा लाभ घेतला आहे. राज्यातील उर्वरित कारागृहांमधील ई-मुलाखत सुविधेचा लाभ घेणाऱ्या बंद्यांची संख्या देखील लक्षणीय दिसून येत असून दिवसेंदिवस त्यामध्ये वृध्दी होतांना दिसून येत आहे.कारागृह महानिरीक्षकअमिताभ गुप्ता यांनी बंद्यांना सदरची सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे जास्तीत जास्त बंद्याच्या नातेवाईकांचा eMulakhat सुविधा वापरण्याकडे कल दिसून येत आहे व त्यामुळे बंद्यांच्या कुंटुंबियांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी येण्याच्या खर्चात देखील बचत झालेली आहे. या सुविधेच्या अंमलबजावणीबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर,यांचेकडून वेळोवेळी मार्गदर्शन होत असून सदरची सुविधा चांगल्या प्रकारे बंद्यांना उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. हि सुविधा लागू झाल्याची माहिती बंद्यांच्या नातेवाईकांना मिळण्याकरीता सर्व कारागृहांच्या दर्शनी भागांमध्ये नातेवाईकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. परिणामी बंद्यांच्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉलींगद्वारे बंद्यांची भेट घेणे अधिक सुलभ झाल्यामुळे बंदी व नातेवाईकांमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे. ई-मुलाखतीस बंद्यांचे नातेवाईकांनी चांगला प्रतिसाद देण्यास सुरूवात केलेली असून सदरील बाब कारागृह विभागाची आधुनिकतेकडे वाटचाल सूरू असल्याचे सुतोवाच करणारी आहे.

पोलीस विभाग, न्यायपालिका, कारागृह विभाग, अभियोग संचालनालय व न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा संचालनालय हे भारतातील फौजदारी न्याय प्रणालीचे पाच प्रमुख स्तंभ आहेत. भारतीय फौजदारी न्याय प्रणालीच्या या पाच स्तंभांमध्ये माहितीचे हस्तांतरण आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत सुलभरित्या करता यावे याकरीता सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटीच्या शिफारशीनुसार केंद्रीय गृह विभागाच्या अधिनस्त NIC (National Informatics Centre) द्वारे ICJS (Inter-operable Criminal Justice System) हा ePlatform तयार करण्यात आला असून फौजदारी न्याय प्रणालीचे पाचही स्तंभ एकाच छत्राखाली स्वतंत्र वैयक्तिक Application Suite ने एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. त्याअंतर्गत पोलीस विभागासाठी CCTNS, न्यायपालिकेसाठी eCourts, कारागृहांसाठी ePrisons, अभियोग संचालनालयासाठी eProsecution व न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांसाठी eForensics असे स्वतंत्र परंतु एकमेकांशी संलग्न असलेले ePlatforms तयार करण्यात आलेले आहेत.कारागृह विभागासाठी असलेले ePrisons हे Application Suite महाराष्ट्र कारागृह विभागाने अंगिकृत केले असून राज्यातील कारागृहांतील बंद्यांसंबंधीचे दैनंदिन कामकाज व बंद्यांना पुरविल्या जाणाऱ्या विविध सुविधा यांचे व्यवस्थापन हे ePrisons (ICJS) द्वारे सुरू आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कारागृहांमध्ये बंदीस्त असलेल्या भारतीय व विदेशी बंद्यांना त्यांच्या कुटुंबियांशी व वकिलांशी संवाद साधण्यासाठी eMulakat सुविधा ePrisons (ICJS) प्रणालीद्वारे दिनांक 04 जुलै 2023 पासून सर्व कारागृहांत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यापूर्वी मुलाखत नाव नोंदणीसाठी नातेवाईकांना खूप दूरवरून प्रवास करत येवून कारागृहाबाहेर तासन्-तास वाट पाहत बसावे लागत असल्याने बंद्याच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. परंतु आता बंद्यांसोबत मुलाखत घेण्याकरीता बंद्यांचे नातेवाईक काही दिवस अगोदरच ePrisons (ICJS) प्रणालीद्वारे नोंदणी करतात व त्यामुळे त्यांना त्यांच्या इच्छित दिवशी व वेळी बंद्यांची मुलाखत घेता येते.राज्यातील विविध कारागृहांमध्ये विविध देशातील नागरिक विदेशी बंदी म्हणुन दाखल असून त्यांचे परदेशातील मुले मुली व नातेवाईकाशी ई मुलाखत/व्हीडीओ कॉन्फरसद्वारे विहीत अटीवर ही सुविधा लागू करण्यात आलेली आहे. मात्र ही सुविधा दहशतवादी कारवाया मधील कैदी व पाकिस्तानी कैदी यांना सुरक्षेच्या कारणास्तव देण्यात येत नाही.

कामगारांनी आपल्या प्रगतीसाठी मोदींना साथ देण्याचे आवाहन

पुणे (प्रतिनिधी) – शेतकरी, कामगार या दोन्ही घटकांना गेल्या पंच्याहत्त्तर वर्षात काँग्रेस सरकारने फारसे महत्व न देता कामगारांच्या संघटित ताकदीचा उपयोग फक्त सत्ता मिळवण्यासाठी केलेला बघायला मिळतो. अशा परिस्थितीत केंद्रात सत्तेत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या पाच वर्षात जवानांनांसाठी, गेल्या पाच वर्षात शेतकरी, कामगार, श्रमजीवींसाठी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे ही निवडणूक आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाची आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कामगार, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे असल्याने त्यांनी आपल्या प्रगतीसाठी यावेळी मोदींना साथ द्यावी, असे आवाहन भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लीकन पक्ष (आठवले गट) व मित्र पक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केले.

महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचाराचे नियोजन करण्यासाठी भाजपच्या कामगार आघाडीच्या वतीने मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे होते. कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. शहर सरचिटणीस बापू मानकर, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष निवेदिता एकबोटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष करण मिसाळ, अनुप मोरे, नामदेव माळवदे, बाळासाहेब टेंमकर, उमेश शहा आदी पदाधिकारी व मान्यवर मेळाव्याला उपस्थित होते.

‘आपला देश तरूणांचा देश आहे. या युवा शक्तीच्या जोरावार विकसित भारताचे स्वप्न मोदीजींनी बघितले आहे, असे सांगून मोहोळ म्हणाले, ‘विकसित भारतासाठी देशाने संघटित होणे गरजेचे आहे. देशातील कामगार शक्ती ही मोठी संघटित शक्ती असून या संघटन शक्तीच्या जोरावारच देशात औद्योगिक क्रांती कामगारांनी यशस्वी करून दाखवली आहे. आता बदलता काळ आणि विकसित होणारे तंत्रज्ञानाला श्रमांची जोड मिळणे गरजेचे आहे.

शहरध्यक्ष घाटे म्हणाले, ‘ही निवडणूक प्रत्येक देशवासीयांचे आणि आपल्या घरातील भावी पिढीचे भवितव्य ठरवणारी असल्याने प्रत्येक देशवासियांच्या भविष्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे या निवडणुकीत होणारे मतदान हे कोणा उमेदवार किंवा पक्षासाठी होणार नाही, तर देशासाठी केलेले मतदान असणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात जशी कामगार शक्तीने महत्वाची भूमिका बजावली होती, तशीच भूमिका बजावण्याची वेळ पुन्हा या निवडणुकीच्या निमित्ताने आलेली आहे. फरक फक्त इतकाच आहे की, यावेळी मतदानातून स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर करावयाची ही क्रांती आहे. त्यामुळे कामगारावर्गानेही मतदारांपर्यत पोचण्याची गरज आहे. ही जबाबदारी कामगारबंधू आनंदाने पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ज्ञान हे विकासाचे मोठे साधन- आचार्य श्री महाश्रमणजी

आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीच्या वतीने आयोजित वर्धमान सांस्कृतिक केंद्रातील प्रवचनाचा समारोप
पुणे : ज्ञानाचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे.  जैन साधना पद्धतीत तपस्येचे १२ प्रकार सांगितले आहेत. त्यात १० वा प्रकार स्वाध्याय आहे, त्याला मोठे महत्व दिले आहे आणि तब्बल ५० टक्के वेळ स्वाध्याय करण्यास सांगितले आहे. त्यामुळेच ज्ञान हे विकासाचे मोठे साधन आहे, असे जैन तेरापंथचे धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांनी सांगितले.  

आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीतर्फे  गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात आचार्य श्री महाश्रमणजी यांची प्रवचनमाला सुरु होती. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समिति संयोजक महेन्द्र मरलेचा, संजय मरलेचा, प्रकाश भंडारी, सुरेन्द्र कोठारी, वसंत तलेसरा एवं समस्त तेरापंथ समाज पुणे, या आयोजनात सहभागी झाले होते. 

श्री महाश्रमणजी म्हणाले, वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या गोष्टी असू शकतील, असा कोणताही व्यक्ती नाही, की ज्याच्याकडे एकही कौशल्य नाही. मात्र, त्याला मार्गदर्शक व्यक्ती मिळणे गरजेचे आहे. जेथे ज्या व्यक्तीची आवश्यकता व सक्षमता आहे, तेथे त्या व्यक्तीचा उपयोग होणे आवश्यक आहे.  

ते पुढे म्हणाले, ग्रंथामध्ये देखील आपल्याला अनेक गोष्टींचा अभ्यास करायला मिळतो. साहित्याच्या अभ्यासाने ज्ञानाची समृद्धी होऊ शकते. साधू – साध्वी अभ्यास किंवा ध्यान दोन्ही करू शकतात. अभ्यास व ध्यान हे आपापल्या जागी योग्य आहेत. अभ्यासासोबत काही प्रमाणात ध्यानाला जोडले जाऊ शकते. शांतपणे बसून अभ्यास करणे, हे ध्यानाचे रूप असू असते. ध्यान खूप व्यापक असून विविध मार्गानी ते माणसांशी जोडले जाऊ शकते.

माणूस चुका करण्यामागचे एक कारण हे अज्ञान असू शकते. नियम व मर्यादेची माहिती नसल्याने कळत – नकळत माणसाकडून चूक होउ शकते. माहितीचा अभाव हे चुका होण्याचे कारण असू शकते. अभ्यासाने ज्ञान मिळते आणि अज्ञानाने  होणाऱ्या चुका टाळता येऊ शकतात. त्यामुळे त्या त्या विषयातील प्रशिक्षण घेऊन अभ्यास करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. दि. ३ एप्रिल रोजी मगनकुंज, कल्याणी नगर आणि दि. ४ एप्रिल रोजी वाघोली येथे कार्यक्रम होणार आहेत. 

MIRC चा 45 वा स्थापना दिवस पारंपारिक आनंदाने साजरा

मेकॅनाइज्ड इन्फंट्रीने 02 एप्रिल 2024 रोजी आपला 45 वा स्थापना दिवस पारंपारिक आनंदाने साजरा केला. या सोहळ्याच्या स्मरणार्थ, अहमदनगर येथील मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर आणि स्कूलने केंद्राच्या युद्ध स्मारकावर शूरवीरांना पुष्पहार अर्पण करून हा कार्यक्रम साजरा केला. ब्रिगेडियर रसेल डिसोझा, कमांडंट मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल यांनी पुष्पहार अर्पण केला.

मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (MIRC) 02 एप्रिल 1979 रोजी उभारण्यात आले आणि 17 सप्टेंबर 2021 रोजी MIC&S म्हणून पुन्हा डिझाइन करण्यात आले. हे केंद्र पायदळ लढाऊ वाहने आणि यांत्रिकी पायदळ संकल्पनांशी संबंधित सर्व तांत्रिक आणि सामरिक बाबींच्या प्रमुखाचा पाया आहे. यांत्रिकी पायदळ दलाच्या सर्व श्रेणींच्या प्रशिक्षणाव्यतिरिक्त, MIC&S वर भारतीय सैन्यातील तरुण सैनिकांना तांत्रिक प्रशिक्षणावर परिणाम करण्याची जबाबदारी देखील सोपविण्यात आली आहे जे पायदळ लढाऊ वाहनांनी सुसज्ज आहेत आणि अधिकारी, कनिष्ठ आयुक्त अधिकारी आणि गैर-अधिकारी यांच्यासाठी तांत्रिक अभ्यासक्रम आयोजित करतात. सर्व शस्त्रास्त्रांचे कमिशन केलेले अधिकारी ज्यात अधिकारी आणि मैत्रीपूर्ण परदेशी देशांच्या इतर श्रेणींचा समावेश आहे.

या शुभ प्रसंगी मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या सर्व रँक, कुटुंबे आणि दिग्गजांचे अभिनंदन करताना, ब्रिगेडियर डिसूझा यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले आणि त्यांना स्थिर राहण्यासाठी आणि राष्ट्र उभारणी आणि भारतीय सैन्याच्या सर्वांगीण वाढीसाठी त्यांचे सकारात्मक योगदान सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले.

लष्कराच्या दक्षिण  मुख्यालयाचा 130 वा स्थापना दिवस साजरा

पुणे-

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने (सदर्न कमांड) 01 एप्रिल 2024 रोजी आपला 130 वा स्थापना दिवस साजरा केला.जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, दक्षिण कमांड लेफ्टिनंट जनरल अजय कुमार सिंह , पीव्हीएसएम,एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, यांनी या प्रसंगी कमांडच्या सर्व श्रेणीतील अधिकारी, जवान   आणि त्यांच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

आज, सोमवार दिनांक 01 एप्रिल 2024 रोजी शूरवीरांना आदरांजली वाहण्यासाठी सदर्न कमांडच्या युद्ध स्मारकावर पुष्पचक्र  अर्पण करण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. तसेच पुणे मिलिटरी स्टेशनच्या  वतीने लेफ्टनंट जनरल मनजीत कुमार, एव्हीएसएम, चीफ ऑफ स्टाफ, मुख्यालय दक्षिण कमांड यांनी स्मारकाला पुष्पचक्र  अर्पण केले . या सोहळ्याला लष्करी जवान आणि पुणे स्टेशनचे मान्यवर अधिकारी वर्ग उपस्थित होते .

1 एप्रिल 1895 रोजी उभारलेल्या, सदर्न कमांडने काळाच्या कसोटीवर सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि 1947-48 मध्ये जुनागढ आणि हैदराबादचे एकत्रीकरण, 1961 मध्ये गोवा मुक्ती, 1965 आणि 1971मधील  भारत-पाकिस्तान संघर्ष , ऑपरेशन पवन, ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रम,यासह स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या विविध ऑपरेशन्समध्ये यशस्वीपणे भाग घेतला आहे. 129 वर्षांचा विशाल इतिहास आणि गौरवशाली परंपरा असलेली सदर्न कमांड हे शौर्य, त्याग आणि निःस्वार्थ सेवेचे जिवंत उदाहरण आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, कमांडने बदलत्या काळानुसार वातावरणाशी झपाट्याने स्वतःला जुळवून घेतले आहे आणि स्वतःला समकालीन तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींबद्दल अवगत करुन घेत स्वतःला सुसज्ज ठेवले आहे.

भौगोलिकदृष्ट्या देशाच्या उद्योग केंद्रां जवळ असलेल्या आणि मोठ्या संख्येने फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह (FFRs) असल्याने, दक्षिण कमांडने संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याच्या धोरणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. वर्षभर होत असलेल्या अनेक विदेशी सरावांमुळे हे “मुत्सद्देगिरीसाठी विशेष केंद्र” देखील बनले  आहे. अलीकडेच याला जोधपूर येथे पहिले अपाचे स्क्वॉड्रन मिळाले असून भारतीय सैन्याची युद्ध क्षमता वाढवण्याची आणि भविष्यातील त्याच्या समावेशासाठी मार्ग मोकळा करण्याची क्षमता यामध्ये आहे.

यावेळी त्यांचे अभिनंदन करत, आर्मी  कमांडरांनी सर्व नागरिक आणि सैनिकांना एकत्रितपणे काम करण्याचे आणि राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे आवाहन केले.

‘संजय आणि लीला’च्या लग्नाची ऐन लग्नसराईत जबरदस्त हिट कहाणी!

लग्न करण्यापेक्षा लग्न जमवणं जास्त अवघड असतं, मात्र संजय आणि लीला यांनी ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपटात लग्न जमवण्याचा विडा उचलला आहे. ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपट मूळ कन्नड भाषेत असून ‘संजय लीलाची प्रेम कहाणी’ या नावाने मराठीत पहायला मिळणार आहे. ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर ५ एप्रिल २०२४ रोजी चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

एकाच शाळेत आणि ट्यूशनला जाण्यापासून संजय आणि लीला एकत्र मोठे झाले आहेत. शिक्षण पूर्ण  केल्यानंतर विवाह संस्था उघडतात. तेव्हा त्यांना राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या एका लग्नाच्या  नियोजनाची संधी मिळते. या लग्नादरम्यान १०० कोटींचा एक रहस्यमय गोंधळ उद्भवतो आणि गोष्टीला एक अनपेक्षित वळण मिळतं. हे वळण नेमकं कुठे जाऊन पोहचणार, हे चित्रपटात कळणार आहे. चित्रपटाचे विलक्षण दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक सौरभ कुलकर्णी यांनी केले असून अंजन भारद्वाज आणि दिशा रमेश या जोडीचे या चित्रपटातून सुपरहिट पदार्पण झाले आहे.

“दाक्षिणात्य चित्रपटांतून दाक्षिणात्य संस्कृती आणि खास कला आपल्याला पहायला आणि अनुभवायला मिळते. चित्रपटांमधून विविध संस्कृतींची देवाण घेवाण व्हावी, आणि चांगली कलाकृती भाषेच्या बंधनात अडकून न राहता प्रेक्षकांपर्यंत पोहचावी म्हणून हा आमचा प्रयत्न आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी:- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies