आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीच्या वतीने आयोजित वर्धमान सांस्कृतिक केंद्रातील प्रवचनाचा समारोप
पुणे : ज्ञानाचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. जैन साधना पद्धतीत तपस्येचे १२ प्रकार सांगितले आहेत. त्यात १० वा प्रकार स्वाध्याय आहे, त्याला मोठे महत्व दिले आहे आणि तब्बल ५० टक्के वेळ स्वाध्याय करण्यास सांगितले आहे. त्यामुळेच ज्ञान हे विकासाचे मोठे साधन आहे, असे जैन तेरापंथचे धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांनी सांगितले.
आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीतर्फे गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात आचार्य श्री महाश्रमणजी यांची प्रवचनमाला सुरु होती. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समिति संयोजक महेन्द्र मरलेचा, संजय मरलेचा, प्रकाश भंडारी, सुरेन्द्र कोठारी, वसंत तलेसरा एवं समस्त तेरापंथ समाज पुणे, या आयोजनात सहभागी झाले होते.
श्री महाश्रमणजी म्हणाले, वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या गोष्टी असू शकतील, असा कोणताही व्यक्ती नाही, की ज्याच्याकडे एकही कौशल्य नाही. मात्र, त्याला मार्गदर्शक व्यक्ती मिळणे गरजेचे आहे. जेथे ज्या व्यक्तीची आवश्यकता व सक्षमता आहे, तेथे त्या व्यक्तीचा उपयोग होणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, ग्रंथामध्ये देखील आपल्याला अनेक गोष्टींचा अभ्यास करायला मिळतो. साहित्याच्या अभ्यासाने ज्ञानाची समृद्धी होऊ शकते. साधू – साध्वी अभ्यास किंवा ध्यान दोन्ही करू शकतात. अभ्यास व ध्यान हे आपापल्या जागी योग्य आहेत. अभ्यासासोबत काही प्रमाणात ध्यानाला जोडले जाऊ शकते. शांतपणे बसून अभ्यास करणे, हे ध्यानाचे रूप असू असते. ध्यान खूप व्यापक असून विविध मार्गानी ते माणसांशी जोडले जाऊ शकते.
माणूस चुका करण्यामागचे एक कारण हे अज्ञान असू शकते. नियम व मर्यादेची माहिती नसल्याने कळत – नकळत माणसाकडून चूक होउ शकते. माहितीचा अभाव हे चुका होण्याचे कारण असू शकते. अभ्यासाने ज्ञान मिळते आणि अज्ञानाने होणाऱ्या चुका टाळता येऊ शकतात. त्यामुळे त्या त्या विषयातील प्रशिक्षण घेऊन अभ्यास करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. दि. ३ एप्रिल रोजी मगनकुंज, कल्याणी नगर आणि दि. ४ एप्रिल रोजी वाघोली येथे कार्यक्रम होणार आहेत.