Home Blog Page 1114

देशाचे भवितव्य घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची-खासदार प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी

पुणे सार्वजनिक सभेच्या १५४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
पुणे ः  आज जगभरात भारताची प्रतिमा बदलली आहे. भारतीयांकडे अत्यंत आदराने पाहिले जाते. असा देश कसा घडतो? आधी विद्यार्थी घडतो मग तो सजग नागरिक होतो आणि त्यानंतर तो देशाला घडतो. हे सजग नागरिक शाळेतून घडतात. देशाचे भवितव्य हे शाळेच्या खोल्यातून घडत असते. हे भवितव्य घडविण्याची जबाबदारी शिक्षक करीत असतात, असे मत खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

पुणे सार्वजनिक सभेच्या १५४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बुधवार पेठेतील संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विद्याधर पंत नारगोलकर, कार्याध्यक्ष अनिल शिदोरे, कार्यवाह शरद गर्भे, विश्वस्त अरविंद नवरे, विमल भालेराव, धनाजी चेन्ने, सुरेश कालेकर, विजय मराठे, सुभाष कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याध्यक्षा कलावती सुर्वे यांना रमाबाई रानडे पुरस्कार, पुण्यातील महाराष्ट्र विद्यालयाचे शिक्षक ज्ञानेश्वर दाते यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, जगातील बलाढ्य देश भारताच्या अटींवर चालत आहेत इतकी ताकद आज देशाची निर्माण झाली आहे. याचे उदाहरण म्हणजे युक्रेनचे युद्ध. आपल्या देशाने जगाला कोविडची लस दिली, चंद्रावर यान उतरविले, इतकी क्षमता भारतातची निर्माण झाली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, बाजीराव पेशवे यांचा इतिहास पाठ्य पुस्तकात अत्यंत तोकडा सांगितला आहे. परंतु आणखी माहिती सांगण्याची, इतिहास रंगवून सांगण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. मुलांमध्ये तो इतिहास भिनला पाहिजे.  

त्या पुढे म्हणाल्या, नरेंद्र मोदी प्रथम प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथम संसदेत जाताना संसदेच्या पायरीवर डोके ठेवून नमस्कार करीत सांगितले होते की, मी प्रधानमंत्री नाही, मी प्रधानसेवक आहे. तिच भावना मनात ठेवून मी देखील त्याचे अनुकरण करणार आहे. मंत्री म्हणून नाही तर सेवक म्हणून पुण्याच्या विकासासाठी नेहमी तत्पर राहून काम करण्याचे वचन देते, असेही त्यांनी सांगितले.

पुरस्काराला उत्तर देत कलावती सुर्वे म्हणाल्या, माझे वडिल गिरणी कामगार होते. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गुप्त बातम्या स्वातंत्र्य सैनिकांनी देण्याचे काम माझ्या वडिलांनी केले होते. त्यामुळे देशासाठी काम करण्याचे बाळकडू हे घरातूनच मिळाले. देशासाठी काम कर, समाजासाठी काम कर ही त्यांची शिकवण आजही मी पूर्ण करीत आहे आणि करत राहणार. आज मिळालेला पुरस्कार ही समाजाची कृतज्ञता आहे, असेही त्यांनी सांगितले. पुरस्कारार्थी  ज्ञानेश्वर दाते यांनी देखील संस्थेचे आभार मानत मनोगत व्यक्त केले.

विद्याधर नारगोलकर म्हणाले,  या संस्थेच्या वास्तूचे असे भाग्य आहे की ज्याचा इथे सत्कार झाला तो वरच्या पदावर पोहचला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी होळीचा कार्यक्रम इथे केला, त्याची धग लंडनपर्यंत पोहोचली होती. येथे रश्मी शुक्ला यांचा सत्कार केला, आज त्या महाराष्ट्र पोलीस महासंचालक झाल्या आहेत. संस्थेच्या कार्यासाठी शहरात उत्तम जागा मिळावी, अशी विनंती त्यांनी केली. 
स्वागत व प्रास्ताविक अनिल शिदोरे यांनी केले. निबंध स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. संस्थेचे काही नवीन प्रकल्पही हाती घेण्यात येणार असल्याचे शिदोरे यांनी सांगितले. 

शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती

पुणे,दि. २:- भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करुन घेण्यात आले असून मतदार जागृती रॅली आणि गृहभेटीद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील आदर्श गाव गावडेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हिरकणी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती फेरी काढली. यावेळी १९३ मतदारांकडून लोकसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठीचे संकल्पपत्र भरुन घेतले. मतदारांना मतदानाचे महत्व यावर मार्गदर्शन करुन लोकसभा व विधानसभेसाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचे व गावाची मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. स्वीप अधिकारी नारायण गोरे, मुख्याध्यापिका शशिकला चिखले आदींनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आदर्श गाव अवसरी बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी १९६ ग्रामस्थांकडून संकल्पपत्रे भरून घेतली. विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना लोकसभा व विधानसभेसाठी निवडणूकीत जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन केले.शिरूर विधानसभा सभा मतदार संघात शिरूर ग्रामीण अंगणवाडी सेविकांमार्फत गृहभेटीद्वारे मतदान जागृती करण्यात आली. अंगणवाडी सेविकांनी मतदारांना मतदानाचे महत्व पटवून दिले आणि मतदानात सहभाग घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.

000

बारामती लोकसभा मतदार संघात मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन

पुणे, दि. २: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, खडकवासला, दौंड, भोर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी मतदारांना मतदार यादीत नाव शोधण्यासह निवडणूक प्रक्रीयेची माहिती देण्यात आली.

इंदापूर येथे मतदार जागृती मंचाच्यावतीने क्युआर कोडद्वारे मतदार यादीत नाव शोधण्याची माहिती देण्याकरीता जिल्हा परिषद शाळा इंदापूर क्र.१ व २ येथे शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकाऱ्यांनी मतदारांना क्युआर कोडबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली. मतदार व त्यांच्या परिचयातील शिक्षक व पालकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

बारामती विधानसभा मतदारसंघात पियाजियो कंपनीतील सुमारे तीनशेपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली. यावेळी निवडणूकीत मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात वडगाव बुद्रुक येथे महिला बचत गटाच्यावतीने विठ्ठल मंदिर येथे मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी महिला मतदारांनी मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली.

दौंड विधानसभा मतदारसंघात यवत आणि दहिटने येथे अंगणवाडी स्तरावर गृहभेटीचे आयोजन करुन महिला मतदारांना मतदान प्रक्रीयेची माहिती देऊन मतदानाचे आवाहन करण्यात आले. अंगणवाडी सेविका आणि महिला मतदार यांनी मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली.

भोर विधानसभा मतदारसंघात अरिहंत महाविद्यालय बावधन येथे मतदार जनजागृती करण्यात आली. यावेळी मुळशी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, शिक्षक आणि ९२ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धेसोबतच मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.

अनंतराव पवार महाविद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी पिरंगुट बसस्थानक चौक येथे मतदार जनजागृती फेरीचे आयोजन केले. यावेळी सुमोर १५० पेक्षा अधिक विद्यार्थी-पालक उपस्थित होते. पुरंदर विधानसभा मतदार संघात माळवाडी (वाल्हे) तालुका पुरंदर येथे मतदार जनजागृती कार्यक्रम अंतर्गत मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रलोभनाला बळी न निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा. परिसरातील इतरही पात्र नागरिकांना मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.

राज्यातील सर्वच्या सर्व 48 जागा जिंकण्याचा निर्धार भाजपा निवडणूक प्रभारी खा.दिनेश शर्मा यांचे प्रतिपादन

मुंबई:

राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरली आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयाची महाभेट देतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेश निवडणूक प्रभारी व उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री खा.डॉ. दिनेश शर्मा यांनी मंगळवारी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.शर्मा बोलत होते.भाजपा लोकसभा निवडणूक व्यापस्थापन समितीचे अध्यक्ष आ.श्रीकांत भारतीय, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, ज्येष्ठ नेते जयप्रकाश ठाकूर, प्रवीण घुगे आदी यावेळी उपस्थित होते.
खा.शर्मा यांनी सांगितले की, यावेळची निवडणूक मोदीमय झालेली आहे. देशातच नव्हे तर जगभरातही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा बोलबाला आहे. राम मंदिर निर्मिती,370 वे कलम रद्द करणे यासारख्या निर्णयांमुळे नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व झळाळून उठले आहे. केंद्र सरकार आणि भाजपा शासित राज्यांच्या सुशासनामुळे जनतेचा भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीवरील विश्वास वाढला आहे. महाराष्ट्रातही नरेंद्र – देवेंद्र या जोडीच्या जादूमुळे मतदार महायुतीला मोठा विजय मिळवून देतील,असे वातावरण आहे.
खा.शर्मा यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला नेहमीच प्रखर विरोध केला. हिंदुत्वाचे कडवे समर्थक असलेल्या बाळासाहेबांना काँग्रेसचे हिंदुविरोधी रूप माहित होते. उद्धव ठाकरे यांनी मात्र मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करत मतदारांचा विश्वासघात केला. या विश्वासघाताला मतदार या निवडणुकीत योग्य उत्तर देतील. मतदारांच्या मध्ये महाविकास आघाडीबद्दल असलेल्या संतापामुळे उबाठा, काँग्रेस आणि शरद पवारांच्या महाविकास आघाडीचा निवडणुकीत धुव्वा उडेल.
हिंदुविरोधी काँग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत कसे पराभूत केले हा इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे. अशा आंबेडकर विरोधी मंडळींशी उद्धव ठाकरे यांनी आघाडी करावी ही गोष्ट राज्यातील शोषित, वंचित जनतेला आवडली नाही. ही जनता उद्धव ठाकरे, काँग्रेसला निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही खा.शर्मा यांनी नमूद केले.

देशास आर्थिक दृष्ट्या खच्ची व परावलंबी करणाऱ्यांनीच् ‘आर्थिक-स्वावलंबनाची’ भाषा बोलणे.. ही देशाची कुचेष्टाच् … गोपाळ तिवारी

पुणे – दि २ एप्रिल
देशाची सर्वाधिक सार्व. संपत्ती खाजगी ऊद्योजक मित्रांच्या घशात घालणारेच् देश आर्थिक दृष्ट्या स्वावलंबनाची भाषा करतात हे केवळ हास्यास्पदच नव्हे तर कोडगे पणाचे लक्षण असल्साची प्रखर टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.
ते म्हणाले,” डॅा मनमोहन सिंग यांचे युपीए १ व २ काळात, देशातील २६ कोटी जनता ‘दारिद्र्य रेषे बाहेर’ आली, ज्या २०१४ च्या काळात देशाची आर्थिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल सुरु झाली होती.ही सत्य वास्तवता असतांना, ७० वर्षात पहील्यांदा खाजगी ऊद्योगपतींचे उच्चांकी कर्ज माफ केले, ७० वर्षात प्रथम ऊच्चांकी बँक धोटाळे करून, देशास आर्थिक चुना लाऊन भाषणजीवींचा मित्र परीवार पसार झाला,ज्या ‘मोदी सरकारच्या काळात’ आरबीआय च्या ‘गंगाजळीस पहील्यांदा नख लागले’, कोट्यावधींच्या
नोट बंदीच्या माध्यमातून ‘अब्जावघींचा काळा पैसा सफेद होऊन’ (ईति – सुप्रिम कोर्ट) देशाच्या अर्थ व्यवस्थेच्या पाठीत सुरा खुपसणारे व देशाशी प्रतारणा करणारे कुटील कृत्य केले… त्यांनी या विषयी बोलावे म्हणजे ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को’ म्हणी प्रमाणे आहे..! या धादांत खोटे पणाची, निर्लज्ज राज्य कर्त्यांना थोडी ही नैतिक पातळींवर चाड वाटत नाही.देशाच्या सार्वजनिक संपत्तीची लूट करणे, जनतेस महागाईच्या व बेरोजगारीच्या खाईत ढकलणे, देशातील तरुणांना रोजगारीच्या नावावर विदेशात गुलाम म्हणून जाऊ देणे या भयानक वास्तवास मोदी सरकार बगल देत असून, शिताफीने जाहिराती द्वारा सतत खोटा आभास निर्माण करण्याचा निंद्य प्रयत्न करत आहे.
नुकतेच भाषणजीवी प्रधान सेवकांनी “एक भी भ्रष्टाचारी को छोडुंगा नही”..हे वक्तव्य केल्याचे जनतेने पाहीले असुन.. त्या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना मोदी शहांच्या विकसीत भाजपचे लक्ष्य असल्याची प्रचीती देखील देशवासियांना रोज येत असल्याचे प्रतिपादन ही काँग्रेस ने केले.. कारण १० वर्षांत भ्रष्टाचाराचे आरोप करणारे दस्तूरखुद्द भाषणजीवी त्यांचे वर कारवाई करण्या ऐवजी.. ‘रेड कार्पेट’ टाकत असल्याचेच दिसुन येत आहे..धादांत खोटे बोलणे व दिशाभुल करणे हाच मोदी सरकारचा एकमेव अजेंडा असुन, ‘लातों के भूत बातोंसे नही मानते’ या उक्ती प्रमाणे,
मोदी – शहांच्या प्रयोग – शाळेतील “भ्रष्टाचारास राजमान्यता देणाऱ्या ‘विकसीत भाजप”ला निवडणुक प्रक्रिये द्वारे धक्के मारुन सत्तेवरून खाली खेचणे आवश्यक असल्याचे आवाहन देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले..

‘मायलेक’मध्ये उमेश कामत साकारणार महत्वपूर्ण भूमिका

सोनाली खरे आणि सनाया आनंद यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मायलेक’ येत्या १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. आई मुलीच्या सुंदर, संवेदनशील नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत असतानाच आता या चित्रपटातील आणखी एक चेहरा समोर आला आहे. ‘मायलेक’मध्ये उमेश कामतचीही महत्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून पोस्टरमध्ये उमेश सनाया आणि सोनालीसोबत दिसत आहेत.
पोस्टर पाहाता ‘मायलेक’मध्ये उमेशची नेमकी भूमिका काय असणार, हे मात्र उत्सुकता वाढवणारे आहे. दरम्यान, या चित्रपटात उमेश एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.

ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटाचे कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. या चित्रपटात बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

आपल्या भूमिकेबद्दल उमेश कामत म्हणतो, ” आई आणि मुलीच्या सुंदर नात्याची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे आणि अशा चित्रपटाचा मी भाग आहे. मी स्वतः या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. माझ्या व्यक्तिरेखेबद्दल जास्त काही सांगणार नाही. मात्र एक नमूद करेन माझ्या इतर भूमिकांपेक्षा ही भूमिका निश्चितच वेगळी आहे. सोनाली आणि सनायासोबत काम करायचा अनुभवही भन्नाट होता. सोनाली एक उत्तम अभिनेत्री आहे हे सर्वांना माहित आहेच परंतु सनाया मध्येही हे गुण आहेत. सनायालाही अभिनयाची उत्तम जाण आहे. ही ‘मायलेक’ची जोडी भन्नाट आहे. रिअलमध्ये ही जोडी कमाल असल्याने रिलमध्येही ही केमिस्ट्री उत्तम जुळून आली आहे.”

संवेदनशील चंद्रकांतदादा जेव्हा ‘डॉक्टर’ होतात…

पुणे:आपल्याकडे राजकारणात काही व्यक्ती मिळालेल्या पदामुळे मोठ्या होतात. पदामुळेच त्यांना जनमानसात प्रतिष्ठा मिळते. त्याउलट काहींच्या व्यक्तिमत्त्वामुळे पदाची उंची, प्रतिष्ठा वाढते. अशा फारच मोजक्या व्यक्तींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही मोठ्या पदावर गेल्यावरही त्यांचे पाय जमिनीवरच राहतात. त्यांना ना पदाचा गर्व असतो, ना वृथा अभिमानमहाराष्ट्राच्या राजकारणातील असे चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीत बोलावेसे वाटेल.
वास्तविक, भारतीय जनता पार्टीला कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखले जाते. रा. स्व. संघाच्या मुशीतून घडलेले सुसंस्कृत आणि संवेदनशील राजकारणी म्हणून चंद्रकांतदादा राज्यात सर्वदूर परिचित आहेत. पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी ते नेहमीच सज्ज असतात. कार्यकर्त्यांना कधी कशाचा त्रास होत असेल, तर वडिलधारेपणाच्या भूमिकेतून ते काळजी घेतात. त्यामुळे अनेक कार्यकर्ते दादांना पालकासमानच मानतात.
दादांचा हाच वडिलधारेपणा आज शिवाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.
लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने शिवाजीनगर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ०७ आणि १४ मधील पदाधिकाऱ्यांसोबत आज दादांची बैठक झाली.‌
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा निवडणुकीत ४००+ खासदारांचा संकल्प आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी हृदयामध्ये महाविजयाची आस, जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावून घरोघरी संपर्क करावा, असे आवाहन दादांनी या वेळी केले.
या बैठकीत पक्षाच्या पदाधिकारी अमृता म्हेत्रे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे दादांनी त्यांची आपुलकीने चौकशी केली. अन् बैठकीनंतर त्यांना आपल्याकडील आयुर्वेदिक औषधी गोळ्या देऊन औषध घेण्याची सूचनाही वडिलकीच्या नात्याने केली. दादांची संवेदनशीलता उपस्थित सर्वांनाच भावली.
या बैठकीला राजेश पांडे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, दत्ताभाऊ खाडे, गणेश बगाडे, रवी साळेगावकर, कुलदीप सावळेकर, शामराव सातपुते, सुतीज गोटेकर यांच्यासह मतदारसंघातील पक्षाचे सर्व पदाधिकारीही उपस्थित होते.

शालेय गणवेशासाठी १२ लाख मुले अपात्र प्रकरणाची उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश योजनेपासून वंचित ठेऊ नका; आधार कार्ड साठी तात्काळ शाळेनिहाय शिबीर सुरू करा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : राज्यातील २ कोटी १२ लाख ५५ हजार ३५ शालेय विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेल्या आधार व्हॅलिडेशनसाठी ३० मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. प्रत्यक्षात १ कोटी ९४ लाख ६९ हजार २१५ विद्यार्थ्यांचेच आधार वैध ठरले. १२ लाख ३६ हजार ४८४ विद्यार्थ्यांचे आधार इनव्हॅलिड झाले आहे. गंभीर म्हणजे, ५ लाख १७ हजार २३२ विद्यार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांकच शिक्षण विभागाला उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे नव्या सत्रातील गणवेशासह शालेय पोषण आहाराच्या निधीला कात्री लागून त्यांना या दोन्ही लाभांपासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त काही दैनिकांनी प्रसिद्ध केले असून त्याची गंभीरपणे दखल महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून घेण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव देओल यांच्याशी संपर्क साधला असून त्यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

१)१२ लाख ५५ हजार विद्यार्थी का वंचित राहिली आहेत याबाबत सखोल तपासणी करावी,

२) शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून योग्य कार्यक्रम आखावेत, प्रत्येक शाळा निहाय आधार कार्ड चे शिबीर सुरू करावेत त्याद्वारे विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक नोंदणी करून घ्यावी,

३) विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळाल्याची खात्री झाली की तात्काळ गणवेश चे वाटप करण्यात यावे,

४) शाळांची बोगस पटसंख्या निदर्शनास आल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.

अशा कडक शब्दात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी निर्देश दिले आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल तात्काळ कार्यालयात पाठविण्यास देखील त्यांनी सांगितले आहे.

विकासासाठी तुम्ही ब्रिटीशांबरोबर गेला असता का?

पुणे- ब्रिटिश काळात विकास झाला, मग ब्रिटिश किती ताकदवान आहेत, त्यांनी किती विकास केला, अनेक देशात त्यांची सत्ता आहे. मग सामान्य लोकांची साथ सोडून तुम्ही त्यावेळी ब्रिटीशांबरोबर गेला असता का? ही ब्रिटिश वृत्ती स्वीकारणार आहोत का? आज विचारांची लढाई आहे, ती विचारांनी लढली पाहिजे.लोकशाही पूरक विकास हवा कि हुकुमशाही पूरक हवा हा विचार एकदा स्वीकारायला हवा अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी सोमवारी भाजपवर टीका केली.भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला शरद पवारांची कारकीर्द संपवायची आहे, असे बोलून दाखवले आहे. त्यामुळे भाजप आमच्या जवळच्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार यांच्यावर निशाणा धरत आहे.पवार कुटुंबातील लोकांचा वापर करून भाजप पवार यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात आहे.जनता पवार साहेबांबरोबर असल्याने सुप्रिया सुळे या तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी बारामतीमधून निवडून येतील.’असे ते म्हणाले.

कसबा पोटनिवडणुकीत गुंडांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. तरीही धंगेकर निवडून आले. आताही गुंड मोठ्या नेत्यांना भेटत आहेत. गुंडांना राजकीय वरदहस्त आहे. पोलिसही त्यांचे काही करू शकत नाहीत. नीलेश घायवळ या गुंडाला पुणे पोलिसांनी बोलावले होते. त्यानंतरही त्याने रिल काढून समाजमाध्यमांमध्ये फिरवली. पुण्यात, महाराष्ट्रात गुंडांची दहशत वाढत असूनही पोलिस आयुक्त काहीही करत नाही. पैसा, गुंडांचा वापर करून लोकशाही संपविण्याचा प्रयत्न भाजप व त्यांचे इतर पक्ष करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

‘अजित पवार हा कामाचा माणूस आहे’ अशी बारामतीमध्ये चर्चा सुरु आहे, याबाबत रोहित पवार यांना प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावेळी पवार म्हणाले, ‘शरद पवार यांची, त्यांच्या विचारांची साथ सोडली तर उद्या तुम्ही सामान्य लोकांची साथ सोडून भ्रष्टाचाराचा मार्गावरही जाऊ शकता. मग विकासाचे नाव पुढे करून स्वतःचे घर भरणे कितपत योग्य आहे.मी फक्त अजित पवार यांच्याबद्दल बोलत नाही, तर विविध प्रकारचे आरोप असणारे इतर नेत्यांवरील आरोपांचे, सीबीआय, इडी चौकशीचे काय झाले? ब्रिटिश काळात विकास झाला, मग ब्रिटिश किती ताकदवान आहेत, त्यांनी किती विकास केला, अनेक देशात त्यांची सत्ता आहे. मग सामान्य लोकांची साथ सोडून तुम्ही त्यावेळी ब्रिटीशांबरोबर गेला असता का? ही ब्रिटिश वृत्ती स्वीकारणार आहोत का? आज विचारांची लढाई आहे, ती विचारांनी लढली पाहिजे. बारामती, पुणे जिल्ह्यात आयटी कंपन्या, एमआयडीसी, धरणे पवारांनीच उभारली आहेत”तटकरे सिंचनाच्या चिखलात अडकलेले नेते ‘मी लहान असल्याने सुनील तटकरे मला बालवाडीचे अध्यक्ष म्हणत असतील. पण ते सिंचनाच्या चिखलात अडकलेले नेते आहेत. त्या चिखलातून बाहेर निघण्याची बुद्धी त्यांच्याकडे नक्की आहे. एका घराच्या पत्त्यावर शंभर कंपन्या कशा? भाजपबरोबर जाऊन स्वतःवरील कारवाया थांबवायच्या, हे त्यांनी केले.तटकरे यांनी अंतुले, जयंत पाटील, देशमुख यांना सोडले. शरद पवार यांना सोडले, आज दादांबरोबर असले तरी उद्या भाजपमध्ये जाणारेही तेच पहिले नेते असतील, विचार व पक्ष सोडण्याची त्यांच्या इतकी बुद्धी मला नक्कीच नाही,’ अशी खोचक टीका पवार यांनी तटकरे यांच्यावर केली.

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाच्या निमित्ताने ‘गीतरामायण’च्या आठवणींना उजाळा

पुणे-संगीतविश्वातील एक मोठे नाव म्हणजे सुधीर फडके. स्वरगंधर्व सुधीर फडके म्हणजेच ‘बाबूजी’ यांच्या ‘गीतरामायण’ या अद्भुत निर्मितीस ६९ वर्षे पूर्ण झाली असून या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधत रिडिफाईन प्रॉडक्शन्सने पुण्यात ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात श्रीधर फडके, आनंद माडगुळकर ही सुधीर फडके, ग. दि. माडगुळकर यांची पुढील पिढी, आकाशवाणी पुणे केंद्राच्या काही सन्माननीय व्यक्ती, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सौरभ गाडगीळ, लेखक, दिग्दर्शक, निर्माते योगेश देशपांडे, कलाकार सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, धीरेश जोशी, परितोष प्रधान उपस्थित होते. यावेळी या मान्यवरांसोबत गप्पांची मैफलही रंगली. या कार्यक्रमादरम्यान ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या २० फूट उंच अशा भव्य पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. या पोस्टरवर चित्रपटातील सगळ्या नामांकित व्यक्तिरेखा झळकल्या आहेत. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे यावेळी चित्रपटातील ‘गीतरामायण’मधील प्रसिद्ध गाणी आणि ‘गीतरामायण’च्या प्रवासातील अविस्मरणीय क्षणही दाखवण्यात आले.

या कार्यक्रमात सुधीर फडके म्हणजेच ‘बाबूजीं’चे व्यक्तिमत्व, त्यांची गाण्याची आवड, गाणी तयार होताना घडलेले प्रसंग, शब्दांचे गीत होतानाच प्रवासही यावेळी मांडण्यात आला. १ एप्रिल १९५५ रोजी सुरु झालेल्या गीतरामायण शृंखलेचे ७० व्या वर्षात पदार्पण होत असताना, या अजरामर कलाकृतीचा भावपूर्ण, गंधयुक्त आणि सुमधुर आठवणींचा खजिना उलगडण्याचा एक प्रयत्न यावेळी करण्यात आला. एकंदरच ‘गीतरामायणा’चा रंजक प्रवास या कार्यक्रमाच्या निमित्ताने उलगडला. तर कलाकारांनी चित्रपटात व्यक्तिरेखा साकारताना, चित्रीकरणादरम्यान अनुभवलेले प्रसंग यावेळी उपस्थितांसोबत शेअर केले.

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीला आणखी बळ: नाना पटोले

भाजपाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी पुरोगामी शक्तींनी एकत्रित येण्याची गरज: बाळासाहेब खोब्रागडे

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा.

नागपूर/मुंबई, दि १ एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी देशभरात रुजविला त्या सर्व आंबेडकरी-पुरोगामी चळवळीतील सहकारी सोबत आल्याचा आनंद आहे. रिपब्लकिन पक्षाच्या पाठिंब्याने मविआ आघाडीला आणखी बळ मिळाले आहे. केंद्र सरकारचे अपयश जनतेसमोर उघडे करुन महाविकास आघाडी उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचारात सहकार्य होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नागपूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रविण ऊर्फ बाळासाहेब खोब्रागडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी खोब्रागडे यांनी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याची घोषणा केली. ते पुढे म्हणाले की, भाजप प्रणित केंद्र सरकारने मागील दहा वर्षात जातीय तेढ निर्माण करून अराजकता पसरविण्याचे काम केले आहे. संविधानातील हक्क आणि अधिकार यांना पायदळी तुडवून लोकशाहीची थट्टा केली आहे. आरक्षण, रोजगार, महिला सुरक्षा हे सर्व मुद्दे दुर्लक्षित करण्यात आल्याने भाजपा सरकारला सत्तेतून पायउतार करायचे असेल तर सर्व धर्मनिरपेक्ष पुरोगामी शक्तींनी एकत्रित येऊन संविधान आणि लोकशाही अबाधित राहावी यासाठी एकत्रित लोकसभा निवडणुकीत प्रचार करणे गरजेचे आहे.

यावेळी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वझाहत मिर्झा, काँग्रेस प्रदेश सचिव विजय नळे, रिपब्लिकन पक्षाचे महासचिव घनश्याम फुसे, उपाध्यक्ष अशोक निमगडे, कोषाध्यक्ष प्रतीक डोर्लीकर, स्टूडंट फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. राजस खोब्रागडे, प्रदेश अध्यक्ष मिलिंद तायडे, केंद्रीय समिती सदस्य संजय पाटील, विशाल अलोने, सुरेश पानतावणे, गुलाब नंदेश्वर, प्रेमदास बोरकर, अनुप चिंचखेडे, चंद्रकांत दहिवळे, सिद्धार्थ पाटील आदी उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांनी घेतल्या वारजे परिसरात विविध सदिच्छा भेटी

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या वारजे परिसरातील विविध सोसायटीमध्ये आज भेटीगाठी घेतल्या.वेस्ट विंड सोसायटी,हिल व्यू सोसायटी,मेघ मल्हार सोसायटी,साई सयाजी टॉवर,साई सयाजी नगर,महालक्ष्मी नगर,शोभापुरम सोसायटी याठिकाणी सुनेत्रा पवार यांनी सदिच्छा भेटी घेतल्या.यावेळी सोसायटीत मधील नागरिकांशी त्यानी संवाद साधला. पुण्याच्या विकासासाठी सदैव तत्पर राहून येणाऱ्या निवडूकीत घड्याळ्याचे बटण दाबून विकासाला निवडण्याचे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.
संवाद साधत सुनेत्रा पवार यांनी लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

अजितदादांनी नेहमीच गटतट न पाहता, पक्षपातीपणा न करता नेहमीच लोकांच्या कामांना महत्व दिलं आहे.. विकासाशी बांधिलकी जपणाऱ्या अजितदादांच्या विचाराचा खासदार व्हावा यासाठी घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी सुनेत्रा पवार यांनी केलं.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण दिवसभरात वारजे येथील विविध सोसायटीत मध्ये जाऊन नागरीकांच्या भेटीगाठी घेतल्या.

वडगाव शेरीतील भाजपा मेळाव्यात विजयाचा महानिर्धार

पुणे-‘अन्य पक्षांप्रमाणे आमच्या पक्षातील निवडणुकीत उमेदवारीसाठी स्पर्धा, चुरस असते. पक्षाची उमेदवारी फक्त एकालाच मिळते. पण भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठीही चुरस असते. पण उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मी काय किंवा मुरलीधरआण्णा काय आमच्या सर्वांसाठी फक्त कमळ हाच उमेदवार असतो. त्याच्या विजयासाठीच सर्वजण प्रयत्न करतो. यावेळीही माझ्यासह आपण सर्वांनी सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य देण्यासाठी पुढील सर्व दिवस कार्यरत राहू’, असे आवाहन माजी आमदार आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी वडगाव शेरीतील मेळाव्यात केले.

वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, माजी आमदार बापूसाहेब पठारे, शिरूर पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जासुद, हवेली बाजार समितीचे माजी उपसभापती राजेद्र कंद, हवेली बाजार समितीचे संचालक नानासाहेब आबनावे, भाजपाचे तालुका अध्य़क्ष आबासाहेब सोनावणे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल पाचरणे, भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप सोनावणे, नगरसेवक राहुल भंडारे, सचिन पलांडे, रोहित खैरे, केशव पाचरणे, संतोष भरणे, सचिन सातपुते, अनिल नवले यांच्यासह श्रीगोंदा-पारनेर-हवेली तालुक्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात रहायला असलेले नागरीक, तरूण मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते.

जगदीश मुळीक म्हणाले, ‘ही निवडणूक देशासाठी फार महत्वाची आहे. कारण आपण सन २००४ ते २०१४ काँग्रेस-युपीएचे सरकार आणि २०१४ ते २०२४ भाजपचे एनडीएचे सरकार देशात बघितले आहे, अनुभवले आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशात विकासाची कामे केली. पण कोणीही विरोधक भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही. या उलट सर्वसामान्य व्यक्तींशी सहजपणे संवाद साधणारा पंतप्रधान देशवासीयांनी प्रथमच बघितला. काय करणार यापेक्षा काय केलं, हे सांगणारे सरकार मोदी यांनी दिले असल्यानेच त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देशवासी उत्सुक आहेत. त्यात आपण वडगावशेरीतील सर्वांनी आपला वाटा उचलूयात आणि कमळ फुलवत मुरलीधर मोहोळ यांनी प्रचंड मताधिक्याने दिल्लीत पाठवू या’.

आमदार सुनील टिंगरे म्हणाले, ‘वडगाव शेरी आणि नगर रोड परिसरातील नागरीकांसाठी भामा आसखेडमधून पाणीपुरवठा करणार, असे आम्ही ऐकत होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयाला चालना दिली. एक गोष्ट सांगितलीच पाहिजे की महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ हेसुद्धा यासाठी किती आग्रही होते, हे मी बघितले आहे. जनहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करणारा एक चांगला उमेदवार आपल्याला त्यांच्या रूपाने मिळालेला आहे. ते निवडून येतीलच, पण आता त्यांनाजास्त मताधिक्य देणे ही माझ्यासह आपली सर्वांची जबाबदारी आहे.

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले, मी एक कार्यकर्ता आहे. आमच्यासाठी देश सर्वप्रथम, नंतर पक्ष असतो. पुण्यात विकासाला मोठा निधी मिळू शकतो आणि पुण्याचा महापौर म्हणून काम करताना विकासाची सर्वाधिक संधी ही वडगावशेरी मतदार संघात आहे. असे माझे मत आहे. त्यामुळे या परिसरात मेट्रोचे विस्तारीकरण, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्यासाठीच्या पायभूत सुविधा विकसित करण्यासाठी माझे प्राधान्य असेल. आपले यावेळचे एक बहुमोल मत हे भाजपला नाही तर आपले एक मत हे राष्ट्रासाठी द्यावयाचे आहे. त्यामुळे आपण सर्वानीच जास्तीतजास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा संकल्प आज करूयात. मेळाव्यात सर्वच मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

आयुक्त साहेब इकडे लक्ष द्याल काय ? मेट्रोची कृपा अन गटारे रस्त्यावर ..डेक्कन बसस्टॉपमागे,पुलाच्या वाडीत दुरावस्था

पुणे-शहरात सौंदर्याची भर टाकायला ,आणि वाहतुकीची समस्या सोडवायला आलेल्या मेट्रोने पुलाच्या वाडीतल्या घरांची मात्र बिकट अवस्था करवून ठेवली आहे. डेक्कन बस स्टॉप मागे , पुलाचीवाडी येथे ड्रेनेज लाईन बंद, गटारीचे पाणी लोकांच्या घरात, आणि रस्त्यावर वाहताना दिसते आहे . मेट्रोचा ओव्हरब्रीज बांधताना भिडे पुलाकडे जाणारी जुनी गटार लाईन खोदण्यात आली ती खोदून त्यावर ब्रिज बांधण्यात आला, पण नंतर नवी गटार बांधताना जुनी लाईन त्याला जोडलीच नाही , ती पूर्ण बंद करण्यात आली, त्यामुळे पुलाच्या वाडीतील सर्व गटारे पूर्णपणे भरून गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत आहे, जुन्या बसक्या घरात पाणी शिरून नागरिकांना प्रचंड त्रास होत असून, लहान मुले वयस्कर नागरिक यांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. मागील एक महिना लोक हा त्रास सहन करीत आहेत , महानगर पालिकेचे अधिकारी पाहणी करून जातात पण टेंडर पास नाही असे सांगून निघून जातात. राजकीय नेत्याना पण आता प्रशासक राज आहे बाबा असे सांगायची संधी मिळालीआहे कोणीही या कडे जातीने लक्ष देत नाहीत . सामान्य नागरिकाने कोणा कडे धाव घ्यायची म्हणून माय मराठी कडे लोकांनी तक्रारी केल्या आहेत .

निवडणूक विषयक तक्रारींसाठी ‘सी-व्हिजील’ची सुविधा जिल्ह्यात आतापर्यंत २७८ तक्रारींवर कार्यवाही पूर्ण

पुणे, दि. १: स्वतंत्र, पारदर्शक, निष्पक्ष, सर्वसमावेशक निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य असून भारत निवडणूक आयोगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत अनेक नवनवीन उपयोजके (ॲप) विकसित करत नागरिकांचा निवडणूक सहभाग वाढविण्यावर भर दिला आहे. त्यापैकीच एक असलेले ‘सी-व्हिजील’ हे ॲप नागरिकांचा निवडणूक सहभाग वाढविण्यास उपयुक्त ठरत आहे. सी-व्हिजील ॲपवर जिल्ह्यात एकूण २७८ तक्रारी दाखल झाल्या असून सर्व तक्रारींवर कार्यवाही पूर्ण झाली आहे.

लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठी जागरुक मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते असे नेहमीच म्हटले जाते. त्यासाठी नागरिकांचा सहभाग मतदानापुरताच मर्यादित न राहता निवडणूक प्रक्रियवेर लक्ष ठेवण्याचा असावा असा प्रयत्न भारत निवडणूक आयोगाचा आहे. त्यादृष्टीने आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन करण्यासाठी ‘सी-व्हिजील’ ॲप उपलब्ध करुन दिले आहे. हे ॲप म्हणजे नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सादर करण्यासाठी मिळालेले अत्यंत प्रभावी शस्त्र आहे.

कशी कराल ‘सी- व्हिजील’ वर तक्रार:
मतासाठी रोख रक्कमेची लाच देणे, मोफत वस्तू वाटणे, मद्य वाटप, विहित वेळेनंतर ध्वनीवर्धकाचा वापर, प्रतिबंधित कालावधीत निवडणूक प्रचार आदी विविध स्वरुपाच्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारी या ॲपवर साईन इन करुन करता येतात. याशिवाय नागरिक आपली ओळख जाहीर न करताही तक्रार दाखल करु शकतात.

आचारसंहिता भंगाचे पुरावे म्हणून त्या घटनेची छायाचित्रे, व्हिडीओ, ध्वनीफीती (ऑडिओ) अपलोड करावे. आपण ज्या ठिकाणी ही छायाचित्रे, व्हिडीओ घेऊन अपलोड केली ते ठिकाण जीपीएसद्वारे आपोआप जिओ टॅग होते. तसेच आचारसंहिता भंगाच्या ठिकाणाचा अधिक तपशिल भरण्याची सुविधादेखील यात आहे. यानंतर आचारसंहिता भंगाचे स्वरुप ड्रॉपडाऊन यादीतून निवडल्यानंतर संबंधित घटनेचे थोडक्यात वर्णन नमूद करणे आवश्यक असून तक्रार दाखल (सबमिट) करावी.

सी-व्हिजील ॲप हे जिल्हा नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी, भरारी पथक, स्थीर संनियंत्रण पथकाशी जोडलेले असते. त्यामुळे तक्रार प्राप्त होताच सर्व संबंधित यंत्रणा गतीने कार्यवाही करते. भरारी पथकाला घटनेच्या ठिकाणी १५ मिनीटाच्या आत पोहोचणे बंधनकारक करण्यात आले आहे. तक्रार दाखल केल्यानंतर १०० मिनीटांच्या आत या तक्रारीवर कार्यवाही करुन त्याची माहिती तक्रारकर्त्याला पोहोचवली जाते.

तक्रारकर्त्याची ओळख गुप्त राखण्यात येत असल्यामुळे त्याला संरक्षण प्राप्त होते हेदेखील या ॲपचे वैशिष्ट्य आहे. नागरिकांनी आचारसंहिता भंगाचे प्रकार आढळल्यास सी-व्हिजीलवर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.