राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश योजनेपासून वंचित ठेऊ नका; आधार कार्ड साठी तात्काळ शाळेनिहाय शिबीर सुरू करा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : राज्यातील २ कोटी १२ लाख ५५ हजार ३५ शालेय विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेल्या आधार व्हॅलिडेशनसाठी ३० मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. प्रत्यक्षात १ कोटी ९४ लाख ६९ हजार २१५ विद्यार्थ्यांचेच आधार वैध ठरले. १२ लाख ३६ हजार ४८४ विद्यार्थ्यांचे आधार इनव्हॅलिड झाले आहे. गंभीर म्हणजे, ५ लाख १७ हजार २३२ विद्यार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांकच शिक्षण विभागाला उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे नव्या सत्रातील गणवेशासह शालेय पोषण आहाराच्या निधीला कात्री लागून त्यांना या दोन्ही लाभांपासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त काही दैनिकांनी प्रसिद्ध केले असून त्याची गंभीरपणे दखल महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून घेण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव देओल यांच्याशी संपर्क साधला असून त्यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
१)१२ लाख ५५ हजार विद्यार्थी का वंचित राहिली आहेत याबाबत सखोल तपासणी करावी,
२) शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून योग्य कार्यक्रम आखावेत, प्रत्येक शाळा निहाय आधार कार्ड चे शिबीर सुरू करावेत त्याद्वारे विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक नोंदणी करून घ्यावी,
३) विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळाल्याची खात्री झाली की तात्काळ गणवेश चे वाटप करण्यात यावे,
४) शाळांची बोगस पटसंख्या निदर्शनास आल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.
अशा कडक शब्दात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी निर्देश दिले आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल तात्काळ कार्यालयात पाठविण्यास देखील त्यांनी सांगितले आहे.