पुणे, दि. २: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, खडकवासला, दौंड, भोर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी मतदारांना मतदार यादीत नाव शोधण्यासह निवडणूक प्रक्रीयेची माहिती देण्यात आली.
इंदापूर येथे मतदार जागृती मंचाच्यावतीने क्युआर कोडद्वारे मतदार यादीत नाव शोधण्याची माहिती देण्याकरीता जिल्हा परिषद शाळा इंदापूर क्र.१ व २ येथे शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकाऱ्यांनी मतदारांना क्युआर कोडबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली. मतदार व त्यांच्या परिचयातील शिक्षक व पालकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
बारामती विधानसभा मतदारसंघात पियाजियो कंपनीतील सुमारे तीनशेपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली. यावेळी निवडणूकीत मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात वडगाव बुद्रुक येथे महिला बचत गटाच्यावतीने विठ्ठल मंदिर येथे मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी महिला मतदारांनी मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली.
दौंड विधानसभा मतदारसंघात यवत आणि दहिटने येथे अंगणवाडी स्तरावर गृहभेटीचे आयोजन करुन महिला मतदारांना मतदान प्रक्रीयेची माहिती देऊन मतदानाचे आवाहन करण्यात आले. अंगणवाडी सेविका आणि महिला मतदार यांनी मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली.
भोर विधानसभा मतदारसंघात अरिहंत महाविद्यालय बावधन येथे मतदार जनजागृती करण्यात आली. यावेळी मुळशी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, शिक्षक आणि ९२ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धेसोबतच मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.
अनंतराव पवार महाविद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी पिरंगुट बसस्थानक चौक येथे मतदार जनजागृती फेरीचे आयोजन केले. यावेळी सुमोर १५० पेक्षा अधिक विद्यार्थी-पालक उपस्थित होते. पुरंदर विधानसभा मतदार संघात माळवाडी (वाल्हे) तालुका पुरंदर येथे मतदार जनजागृती कार्यक्रम अंतर्गत मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रलोभनाला बळी न निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा. परिसरातील इतरही पात्र नागरिकांना मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.