भाजपाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी पुरोगामी शक्तींनी एकत्रित येण्याची गरज: बाळासाहेब खोब्रागडे
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा.
नागपूर/मुंबई, दि १ एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी देशभरात रुजविला त्या सर्व आंबेडकरी-पुरोगामी चळवळीतील सहकारी सोबत आल्याचा आनंद आहे. रिपब्लकिन पक्षाच्या पाठिंब्याने मविआ आघाडीला आणखी बळ मिळाले आहे. केंद्र सरकारचे अपयश जनतेसमोर उघडे करुन महाविकास आघाडी उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचारात सहकार्य होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नागपूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रविण ऊर्फ बाळासाहेब खोब्रागडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी खोब्रागडे यांनी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याची घोषणा केली. ते पुढे म्हणाले की, भाजप प्रणित केंद्र सरकारने मागील दहा वर्षात जातीय तेढ निर्माण करून अराजकता पसरविण्याचे काम केले आहे. संविधानातील हक्क आणि अधिकार यांना पायदळी तुडवून लोकशाहीची थट्टा केली आहे. आरक्षण, रोजगार, महिला सुरक्षा हे सर्व मुद्दे दुर्लक्षित करण्यात आल्याने भाजपा सरकारला सत्तेतून पायउतार करायचे असेल तर सर्व धर्मनिरपेक्ष पुरोगामी शक्तींनी एकत्रित येऊन संविधान आणि लोकशाही अबाधित राहावी यासाठी एकत्रित लोकसभा निवडणुकीत प्रचार करणे गरजेचे आहे.
यावेळी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वझाहत मिर्झा, काँग्रेस प्रदेश सचिव विजय नळे, रिपब्लिकन पक्षाचे महासचिव घनश्याम फुसे, उपाध्यक्ष अशोक निमगडे, कोषाध्यक्ष प्रतीक डोर्लीकर, स्टूडंट फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. राजस खोब्रागडे, प्रदेश अध्यक्ष मिलिंद तायडे, केंद्रीय समिती सदस्य संजय पाटील, विशाल अलोने, सुरेश पानतावणे, गुलाब नंदेश्वर, प्रेमदास बोरकर, अनुप चिंचखेडे, चंद्रकांत दहिवळे, सिद्धार्थ पाटील आदी उपस्थित होते.