सोनाली खरे आणि सनाया आनंद यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मायलेक’ येत्या १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. आई मुलीच्या सुंदर, संवेदनशील नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत असतानाच आता या चित्रपटातील आणखी एक चेहरा समोर आला आहे. ‘मायलेक’मध्ये उमेश कामतचीही महत्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून पोस्टरमध्ये उमेश सनाया आणि सोनालीसोबत दिसत आहेत.
पोस्टर पाहाता ‘मायलेक’मध्ये उमेशची नेमकी भूमिका काय असणार, हे मात्र उत्सुकता वाढवणारे आहे. दरम्यान, या चित्रपटात उमेश एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.
ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटाचे कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. या चित्रपटात बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
आपल्या भूमिकेबद्दल उमेश कामत म्हणतो, ” आई आणि मुलीच्या सुंदर नात्याची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे आणि अशा चित्रपटाचा मी भाग आहे. मी स्वतः या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. माझ्या व्यक्तिरेखेबद्दल जास्त काही सांगणार नाही. मात्र एक नमूद करेन माझ्या इतर भूमिकांपेक्षा ही भूमिका निश्चितच वेगळी आहे. सोनाली आणि सनायासोबत काम करायचा अनुभवही भन्नाट होता. सोनाली एक उत्तम अभिनेत्री आहे हे सर्वांना माहित आहेच परंतु सनाया मध्येही हे गुण आहेत. सनायालाही अभिनयाची उत्तम जाण आहे. ही ‘मायलेक’ची जोडी भन्नाट आहे. रिअलमध्ये ही जोडी कमाल असल्याने रिलमध्येही ही केमिस्ट्री उत्तम जुळून आली आहे.”