Home Blog Page 1115

विद्यार्थ्यांनी आवडत्या विषयात करीअर करावे-राहुल सोलापूरकर यांचा सल्ला

 विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये पारितोषिक वितरण

पुणे : “विद्यार्थ्यांनो, पारंपरिक अभ्यासक्रम न निवडता, आपल्या आवडत्या विषयात करिअर करा. आपल्यावर ज्यांनी संस्कार केले, शिक्षण दिले, त्यांचा कधीही विसर पडू देऊ नका,” असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दिला. स्वभाषेचे महत्व जपण्याचे आवाहन करत सोलापूरकर यांनी स्वभाषा उत्तम आल्याशिवाय दुसरी भाषा शिकता येत नाही. त्यामुळे वाचन वाढवा, वृत्तपत्रे वाचा आणि आपला इतिहास पुस्तकांतून जाणून घ्या, असे सांगितले.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या विद्यार्थी विकास केंद्रातर्फे वसतिगृहनिहाय घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण डॉ. अ. शं. आपटे वसतिगृहातील मोडक सभागृहात सोलापूरकर यांच्या हस्ते झाले. प्रथम तीन विजेत्यांचा स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमासाठीचा प्रथम क्रमांक सिंहगड गटाला देण्यात आला. याशिवाय पाचही वसतिगृहातील व्यवस्थापन टीमचा गौरव करण्यात आला. जपानमधील कंपन्यांमध्ये नोकरी मिळालेल्या समितीच्या तीन विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थिनी स्नेहल कुलकर्णीने पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी विश्वस्त डॉ. ज्योती गोगटे, विनया ठोंबरे, संजय अमृते, कार्यकर्ते सीमा होस्कोटे, रवींद्र नामजोशी, राजेंद्र ततार, हरीष अष्टेकर, निसार चौगुले, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह सर्व वसतिगृहांचे पर्यवेक्षक उपस्थित होते. विद्यार्थी प्राजक्ता क्षीरसागर व ओंकार शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

मुळशीमधील काही गावांचा वीजपुरवठा ३ दिवस बंद राहणार..रात्री सुरु राहील

पुणे, दि०१ एप्रिल २०२४ : महापारेषण कंपनीच्या पिरंगुट २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचा नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम बुधवार (दि. ३) ते शनिवार (दि. ६) पर्यंत होणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत विजेच्या भारव्यवस्थापनासाठी महावितरणच्या काही २२ केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद ठेवावा लागणार असल्याने मुळशी तालुक्यातील काही गावांमध्ये चक्राकार पद्धतीने भारनियमन करण्यात येणार आहे.

यामध्ये बुधवारी, दि. ३ एप्रिलला महावितरणच्या २२ केव्हीच्या सहा वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहील. त्यामुळे रिहे, भरे, घोटावडे, मुळखेड, खांबोली, कातरखडक, पिंपोली, आंधाले या गावांसह काही उच्चदाब औद्योगिक अशा सुमारे ६५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील. गुरूवारी, दि. ४ एप्रिलला २२ केव्हीच्या दोन वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहील. त्यामुळे पिरंगुट गाव, पिरंगुट औद्योगिक परिसर, पौड, दारवली, करमोळी, चाले, दखणे, खुळे, साथेसाई, नांदगाव, कोंढावळे, रावडे, शेरे, वेलावडे, जामगाव, दिसली यासह कोळवण खोऱ्यातील सर्व गावे व वाड्यावस्त्यांमधील सुमारे १८ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील.

तसेच शुक्रवारी, दि. ५ एप्रिलला महावितरणच्या २२ केव्हीच्या तीन वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहील. त्यामुळे भुगाव, भूकूम, खातपेवाडी, लवळे, चांदे, नांदे या गावांतील सुमारे २७ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील. तर शनिवारी, दि. ६ एप्रिलला उरवडे, कासारआंबोली, धोत्रेवाडी, आंबेगाव, मारणेवाडी, कोंढूर, कोंढावळे, आंधगाव, आंबरवेत, आमराळेवाडी, गडगावणे यासह मुठा खोऱ्यातील सर्व गावे व वाड्यावस्त्यांमधील सुमारे ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरण व महापारेषणकडून करण्यात आले आहे.  

विधानपरिषद उपसभापतींच्या दालनाबाहेरील नामफलक बदलला, ‘डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे’ लावले नाव.

मुंबई दि.०१: शासकीय कागदपत्रांवर आता वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे विधानभवनाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या विधानपरिषद उपसभापतींच्या दालनाबाहेरील नामफलक आज दि.१ एप्रिल रोजी बदलला गेला आहे. विधानपरिषद उपसभापतींच्या दालनाबाहेर ‘डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे’ असा नामफलक लावला आहे.

राज्यातील नागरिकांना आता शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला. त्यावेळी सदर निर्णयाचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागत केले होते, त्याची अंमलबजावणी देखील त्यांनी केली आहे.

माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांचा बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो. तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. समाजात वडिलांएवढेच आईचे महत्त्व देखील अधोरेखित व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी आता विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देखील केली आहे.

कर्कश्श आवाज करणाऱ्या मोटारसायकलींबाबत तक्रार करा व्हॉटसअॅप क्र. ८०८७२४०४०० यावर.. पोलिसांनी ६१९ दुचाक्यांवर आणि ३१६ फिटरवर केली कारवाई –

पुणे-पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हददीत मोटर सायकलच्या विशेषतः बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरबदलकरून अनेक वाहनचालक मोटर वाहन कायदाकलम १९८ अन्वये उल्लंघनकरत आहेत. तसेच शहरातील अनेक वस्त्यांमध्येदिवसा रात्री असे फेरबदलकेलेले सायलेन्सर असलेले वाहन वापरूनकर्णकर्कश आवाज करूनध्वनी प्रदूषणात भर टाकत आहेत. अशी मोटरसायकलचालवणारे वाहनचालकांवर व मोटार सायकलचे सायलन्सर मांडीफाईड करुन देणारे इसमावर कारवाई करण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखे मार्फत संपूर्ण पुणेशहरातील एकुण २७ वाहतूक विभागामध्येदिनांक २९/०३/२०२४ ते ३१/०३/२०२४ रोजीदरम्यान पोलीस आयुक्तअमितेशकुमार.सह पोलीस आयुक्त प्रविण पवार,अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील ,पोलीसउप आयुक्त वाहतूक शाखा रोहिदास पवार यांचे मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम राबवण्यात आली.
या विशेष मोहिमे दरम्यानवाहतूक पोलीसांनी फेरबदलकेलेले सायलेन्सर असलेले ६१९ मोटर सायकलचालकांवर दंडात्मक कारवाया केल्या. कारवाई केलेल्या एकूण ६१९मोटार सायकलचालकांनीमॉडीफाईड केलेले सायलेन्सर काढून टाकले. तसेच मोटार सायकलचे सायलन्सर मॉडीफाईड करुनदेणा-या ३१६ इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. मोटार सायकलचे सायलन्सर मॉडीफाईड करणा-या गॅरेजवाले तसेच मॉडीफाईड सालन्सर विक्रेते यांना सक्त सुचना करण्यात आलेल्या आहेत. विशेष मोहिमे दरम्यानवाहतूक परिमंडळ १ मधील फरासखाना- १८, विश्रामबाग ४, खडक ०८, स्वारगेट- १३, सहकारनगर ०७, भारतीविद्यापिठ ३७, सिंहगड रोड २९, दत्तवाडी- १६, वारजे १६ कारवाई, वाहतूक परिमंडळ २ मधीलकोथरुड १७, डेक्कन २१, चतुः श्रृंगी १३, शिवाजीनगर १४, खडकी ४१, येरवडा २८, विमानतळ ३३, कोरेगाव पार्क ३६, लोणीकंद २० कारवाई व वाहतूक परिमंडळ ३ मधील समर्थ १२, बंडगार्डन- १२, लष्कर- ०६, वानवडी २१, कोंढवा-२५, हांडेवाडी ३३, हडपसर ४४, मुंढवा ८५ व लोणीकाळभोर- १० इतक्याकारवाया वाहतूक विभाग निहायकरण्यात आल्या आहेत.
तरी पुणे शहर वाहतूक शाखेतर्फनागरिकांना आवाहन करण्यात येतेकी, पुणे शहर आयुक्तालयाचे हददीत अशा फेरबदलकेलेल्या सायलेन्सर लावलेल्या मोटरसायकलचालवताना वाहनचालक आढळून आल्यास त्याची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेच्या व्हॉटसअॅप क्र. ८०८७२४०४०० यावर वाहन क्रमांक व लोकेशनसह कळवावी, त्यांचेवर कडककारवाई केली जाईल. तसेच मोंडीफाईड सायलन्सर विकणा-या दुकानदारांवर सुध्दा कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात देखील ही मोहिम अशीच राबण्यात येणार आहे.

कान व डोळे ही दोन मोठी इंद्रिये ज्ञानप्राप्तीची प्रमुख माध्यमे- आचार्य श्री महाश्रमणजी

; आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीच्या वतीने आयोजित प्रवचनाचा चौथा दिवस
पुणे : आपल्या शरीरात पाच ज्ञानेंद्रिये आहेत. त्यामध्ये इंद्रिये, त्याचा विषय आणि प्रवृत्ती हे तीन भाग आहेत. कान, डोळे, नाक, जीभ, स्पर्श या इंद्रियांचे विषय आणि प्रवृत्ती वेगवेगळे आहेत. इंद्रियांमधून आपण ज्ञान ग्रहण करू शकतो आणि विषयाचा बोध देखील मिळवू शकतो. कान आणि डोळे हे दोन कामी इंद्रिये आणि नाक, जीभ, स्पर्श हे तीन भोगी इंद्रिये आहेत. प्रत्यक्षात कान व डोळे ही दोन मोठी इंद्रिये ज्ञानप्राप्तीची प्रमुख माध्यमे आहेत, त्यांचा उपयोग ज्ञानप्राप्ती करिता अधिकाधिक व्हायला हवा, असे जैन तेरापंथचे धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांनी सांगितले.   
आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीतर्फे  गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात आचार्य श्री महाश्रमणजी यांची प्रवचनमाला सुरु आहे. त्याच्या चौथ्या दिवशी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ उद्योजक फत्तेचंद रांका, राजेंद्र बांठिया, माजी नगरसेवक प्रविण चोरबेले, ऍड. अभय छाजेड आदी उपस्थित होते. 
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, राजकारणात आध्यात्मिकता गरजेची आहे. राजकारणात आध्यात्म असेल, तर देशात चांगले राजकारण होउ शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अध्यात्माची जोड देत सर्व कार्य करीत आहेत. आम्हाला देखील अध्यात्मातून चांगले राजकारण करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.  

आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, तरुणाईमध्ये नशेचे प्रमाण अधिक वाढत आहे. पूर्वीच्या काळात या गोष्टीचे प्रमाण कमी होते. पुण्यात नशेचा प्रसार मोठया प्रमाणात होत आहे. त्यामुळे आजच्या पिढीला यातून बाहेर काढण्यासाठी आपण कार्य करीत असलेल्या एकता व धर्माच्या कार्याप्रमाणेच नशामुक्तीचे कार्य व्हावे. ‘ड्रग मुक्त महाराष्ट्र’ हे अभियान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविले जात आहे, त्यात आपणही सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

श्री महाश्रमणजी म्हणाले, माणूस कानाद्वारे ऐकून मोठ्या प्रमाणात ज्ञान ग्रहण करतो.  आजच्या काळात ऑनलाईन माध्यमाद्वारे हजारो मैल अंतरावरून देखील ज्ञान प्राप्त केले जाते. हजारो वर्षांपूर्वी गुरूकडून मिळणारे ज्ञान ऐकून म्हणजेच श्रोतृ इंद्रियांद्वारे शिष्य शिक्षण घेत असत. डोळ्याद्वारे पुस्तके वाचून देखील मोठया प्रमाणात ज्ञान प्राप्त केले जाते. 
ते पुढे म्हणाले, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये कान व डोळे ही ज्ञानसंपादनाची दोन सक्षम माध्यमे आहेत. शब्दाचा अर्थ माहीत आहे की नाही, हे महत्वाचे आहे. शब्दांचा अर्थ समजला तरच आपण ज्ञान मिळवू शकतो. भाषेच्या क्षेत्रात व्याकरणाचे ज्ञान नसेल, तर सगळेच व्यर्थ आहे. व्याकरणाचे ज्ञान नसेल तर याक्षेत्रात ती व्यक्ती दृष्टीहीन म्हणून ओळखली जाईल. आभूषणे आपण किती घालतो, हे महत्वाचे नाही. तर, सद्गुणांचे आभूषण सगळ्यांकडे असायला हवे. इंद्रियांचा दुरुपयोग न करता चांगला वापर केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.  
श्री महाश्रमणजी यांचे गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात दिनांक २ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ९.३० वाजता प्रवचन होणार असून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समिति एवं समस्त तेरापंथ समाज पुणे, श्री भिक्षु मेमोरियल फाउंडेशन, तेरापंथ युवक परिषद, तेरापंथ महिला मंडळ, तेरापंथ प्रोफेशनल फोरम, अणुव्रत समिती आयोजनात सहभागी झाले आहे.

संगीताच्या माध्यमातून  प्रार्थना-ब्राम्हो समाजाचा सर्वधर्म ‘समन्वय’ संदेश

शांतिनिकेतनच्या डॉ. शर्मिला रॉय पोम्मो यांचे सादरीकरण : पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने समन्वय कार्यक्रम

पुणे :  ब्राह्म संगीतात वेदोपनिषदांमधील संस्कृत वचने, बंगालमधील सुगम भक्तिसंगीत, बाउल लोकसंगीत याबरोबर संत मीराबाई, गुरु नानक तसेच रवींद्रनाथ टागोर यांच्या रचनांचा समावेश होतो. अशा प्रकारे सर्व धर्म समन्वय करणार्‍या ब्राह्म संगीताचे सादरीकरण व विवेचन शांतीनिकेतनच्या टागोर स्कॉलर विदुषी डॉ. शर्मिला रॉय पोम्मो यांनी केले. राजा राममोहन रॉय यांनी ऋग्वेदातील वचनांचा आधार घेऊन ब्राह्मो समाजाची स्थापना केली हे सांगून त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांनी संगीतबद्ध केलेली विश्वबंधुत्वाचा संदेश देणारी ऋग्वेदातील सूक्ते अत्यंत सुमधुर स्वरात म्हटली.

पुणे प्रार्थना समाजाने आयोजित केलेल्या “समन्वय” ह्या कार्यक्रमात  विदुषी डॉ. शर्मिला रॉय पोम्मो यांचे सादरीकरण व विवेचन झाले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर,  पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्ष डॉ. सुषमा जोग, सचिव डॉ. दिलीप जोग उपस्थित होते. पुणे प्रार्थना समाजाच्या शिष्यवृत्तीचे वितरण पाहुण्यांच्या हस्ते झाले.

डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले, आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्यासाठी लोक संकोच करतात. परंतु विविध जाचक रुढीपरंपरांनी ग्रासलेल्या समाजात ब्राह्मो समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन आणला. दूरदृष्टी असणाऱ्या विचारवंतांनी एकत्र येत महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना केली. आत्ताच्या काळात भारतीय समाजाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. एक समाजघटक दुसऱ्या समाजघटकाला लक्ष्य करतो आहे. प्रार्थना समाजामध्ये सामाजिक परिवर्तनाची ताकद आहे. त्यामुळे सर्व धर्म समन्वयाचा  संदेश प्रार्थना समाजाच्या माध्यमातून जनसमुदायापर्यंत पोहोचायला पाहिजे.

डॉ. सुषमा जोग म्हणाल्या,ब्राह्मो व प्रार्थना समाजाचा सर्व – धर्म – समन्वय साधणारा बंधुत्वाचा विचार स्वतंत्र भारताच्या संविधानातील कलम ५१ अ  मध्ये विशद केला आहे. या कलमाचे पालन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. समाजातील प्रत्येकाने सर्व धर्म समन्वयाचा प्रसार केला पाहिजे. 

या कार्यक्रमात पुणे येथील ग्लोबल उपासना फोरम यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या रचना सादर केल्या. पुणे प्रार्थना समाजाच्या नमिता मुजुमदार व इतरांनी या कार्यक्रमात संतरचना सादर केल्या.  शर्मिला मझुमदार आणि डॉ. दिलीप जोग यांनी सूत्रसंचालन केले.  अंजली राव (व्हायोलिन), प्रणव कुलकर्णी (संवादिनी), नीलेश कुलकर्णी (तबला) व शशिकांत भोसले(पखवाज) यांनी साथसंगत केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून १ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. १ : आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथकाने मावळ तालुक्यातील सिंहगड, कासुर्डे, शिरगाव व अंबी या ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या ३ ठिकाणांवर दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत छापे मारून ३ गुन्ह्यांची नोंद करून १ लाख ४४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत १०५ लिटर तयार गावठी हातभट्टी दारु, ३ हजार ६०० लिटर रसायन व गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचे इतर साहीत्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढेही अवैध दारु व्यवसायाविरुद्ध अशाच प्रकारच्या मोहिमा आखून सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नमूद केले आहे.

या कारवाईत दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्हि.एम. माने, जवान पी. टी. कदम, एस.एस. पोंधे, ए. आर. थोरात, एस.सी. भाट, आर. टी. तारळकर व महिला जवान यु.आर. वारे यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक व्हि. एम. माने व दुय्यम निरीक्षक ए.बी. पाटील करीत आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आचारसंहितेचा भंग, गुन्हा नोंद करून गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करा! : अतुल लोंढे

देवेंद्र फडणवीस व राम सातपुतेंविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई, दि. १ एप्रिल २०२४

लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना भाजपा नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची गृहमंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठवलेल्या तक्रारीत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणतात की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाटी आयोजित एका बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन एका समाजाच्या काही व्यक्तींवर कोविड काळात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ते गुन्हे मागे घेऊ, चिंता करण्याचे काही कारण नाही असे त्या बैठकीत उपस्थितांना आश्वासित केले. निवडणुकीच्या काळात अशा पद्धीतने प्रलोभन देणे, आश्वासन देणे हा आचारसंहितेचा भंग आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार राज्य सरकारच्या समितीने शिफारस केल्याशिवाय हे गुन्हे मागणे घेता येत नाहीत. तरीही मतदारांना प्रलोभन देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केलेली आहे.

आतापर्यंत या समाजातील व्यक्तींवरील गुन्हे का मागे घेतले नाहीत? आता निवडणुकीच्या दरम्यान या गुन्ह्यांची आठवण कशी झाली? फडणवीस गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यासाठी निवडणुकीची वाट पहात होते का? असे प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट दिसत आहे, फडणवीस यांना गृहमंत्री पदावरून तात्काळ दूर करावे तसेच सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करा, अशी तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे, असे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

रामलीला मैदानावरचा मेळावा म्हणजे ‘भ्रष्टाचार्‍यांचा महामेळा’भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी झालेला इंडी आघाडीचा मेळावा हा भ्रष्टाचार्‍यांचा महामेळा होता. या महामेळ्यात सहभागी झालेल्या नेतेमंडळींनी किती प्रयत्न केले तरी त्यांच्यावर कारवाई होणारच, असा घणाघात भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते.
श्री.उपाध्ये म्हणाले की, या महामेळ्यात घोटाळ्याचे अनेक आरोप असलेली नामवंत मंडळी एकत्र आली होती. देश लुटण्याचा आरोप असणारे अनेक नेते दिल्लीतल्या मेळाव्यात एकत्र आले होते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीही या महामेळ्याला उपस्थिती लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचार निपटून काढण्याचा निर्धार केला आहे. इंडी आघाडीने मात्र ‘भ्रष्टाचारी बचाव’ असा नारा देऊन आपले खरे रूप देशाला दाखवले आहे. इंडी आघाडीच्या नेत्यांनी कितीही कांगावा केला तरी न्यायव्यवस्थेने त्यांच्यावरच्या आरोपांना पुष्टी दिली आहे. कितीही कांगावा केला तरी या नेतेमंडळींना लोकसभा निवडणुकीत आपापल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर मतदारांना उत्तरे द्यावी लागणार आहेत.
यावेळी श्री.उपाध्ये यांनी इंडी आघाडीतील प्रमुख नेत्यांवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पाढा वाचून दाखवला. अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, खा.संजय सिंह या मंडळींना न्यायालयाने जामिन देण्यास नकार दिला आहे. यावरूनच त्यांचा घोटाळ्यातील सहभाग सिद्ध होतो. सोनिया गांधी, राहुल गांधी, लालूप्रसाद यादव यांच्यावरही भ्रष्टाचाराचे खटले चालू आहेत, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात कोरोना काळात अनेक घोटाळे घडले. दिल्लीमध्ये घडलेला मद्य घोटाळा महाराष्ट्रातही करण्याची तयारी ‘मविआ’ सरकारच्या काळात चालू होती का, याची उत्तरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आगामी काळात द्यावी लागणार आहेत, असेही श्री. उपाध्ये यांनी नमूद केले.

सांताक्रुझ येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवरील शारिरिक अत्याचाराची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

मुंबई दि.०१: सांताक्रुझ (प.) येथील एका शाळेत इयता तिसरीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर त्याच शाळेत काम करणाऱ्या एका शिपायाने शारीरिक अत्याचार केल्याची घटना दि. ३० मार्च, २०२४ रोजी उघड झाली आहे. सदरची घटना ही अत्यंत निंदनीय असुन याची सखोल चौकशी होणे आवश्यक असून संबंधित आरोपीने या प्रकारचे कृत्य अन्य मुलींसोबत केले आहे का याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रधान सचिव शिक्षण विभाग, शिक्षण निरीक्षक मुंबई महानगरपालिका, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना निवेदनाद्वारे दिले आहेत.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पुढीलप्रमाणे निवेदनाद्वारे निर्देश दिले आहेत,

१) सदरच्या घटनेचे CCTV फुटेज व ईतर आनुषंगिक पुरावे पोलीस तपास अधिकाऱ्यांना तात्काळ देण्यात यावे.

२) पीडीत मुलगी व तिच्या कुटुंबियांचे शाळेतर्फे चांगल्या समुपदेशकामार्फत समुपदेशन करण्यात यावे.

३)आरोपी शिपयास तात्काळ निलंबित करून त्यावर गुन्हा नोंद करावा. यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.

४)शाळेच्या आस्थापनेवर सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी यांचे चारित्र्य व सचोटी पोलीस यंत्रणेकडून तपासुन घेण्यात यावे.

५)सदरच्या घटना भविष्यात घडणार नाहीत याबाबत शाळेतर्फे करण्यात येणाऱ्‍या उपाययोजनाचा कृतिशील आराखडा सादर करावा.

६) पीडित मुलीला मनोधैर्य योजनेद्वारे मदत मिळवून द्यावी.

७) मुलींना शाळेत शिक्षण घेतांना सुरक्षितता वाटावी, त्यांना कुठलेही भय असू नये याबाबत तसेच त्यांच्या सुरक्षिततेकरिता करावयाची सर्वसमावेशक उपाययोजना याबाबत प्रधान सचिव शिक्षण विभागांतर्फे SOP (Standard Operating Procedure) बनविण्यात यावे व त्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळामधुन करण्यात यावी.

या निर्देशानुसार केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल तात्काळ माझ्या कार्यालयास सादर करण्यात यावा असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

मुंढव्यात मध्यरात्री दोनच्या सुमारास वाहने पेटली .. कि पेटवली ?

पुणे : रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या मोटार, तसेच टेम्पोला आग लागल्याची घटना मुंढवा भागात मध्यरात्री घडली. आगीत दोन वाहने पूर्णपणे जळाली. जुना मुंढवा रस्ता परिसरातील बोराटे वस्ती परिसरात एका इमारतीसमोर टेम्पो आणि मोटार लावण्यात आली होती.

मध्यरात्री दोनच्या सुमारास टेम्पो आणि मोटारीने पेट घेतला.

मोटार, टेम्पोने पेट घेतल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर झाला. नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्यााचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख सुभाष जाधव यांनी दिली.

आगीमागचे कारण समजू शकले नाही. एकंद परस्थिती पाहिल्यावर टेम्पो आणि मोटार हे एकमेकांपासून काही अंतरावर होते. तरी त्यांना आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून चाैकशी करण्यात येत आहे.

तानाजी सावंतांच्या आरोग्य विभागाने खाल्ली साडेसहा हजार कोटी रूपयांची दलाली

पुणे:राज्यातील आरोग्य विभागात ६५०० कोटी रूपयांचा अॅम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. दिवसाला ३८ बालके मृत्यूमुखी पडत असताना आरोग्य विभाग मात्र पैसे खाण्यामध्ये मग्न आहे.दिवसाला ३८ बालके मृत्यूमुखी पडत असताना आरोग्य विभाग मात्र पैसे खाण्यामध्ये मग्न आहे. आरोग्य विभागाने साडेसहा हजार कोटी रूपयांची दलाली खाल्ल्याचा आरोप करत त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला.आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या दूध, भोजनात भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांनी लोकांचा जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकामध्ये भ्रष्टाचार करण्याचे सोडले नाही. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या सुमित व बीव्हीजी या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आले.

त्याद्वारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी साडे सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केला. सक्तवसुली संचालनालयाने (इडी) बारामती अग्रो कंपनी वरील कारवाईनंतर पवार यांनी सरकार विरोधात आवाज उठवण्यास सुरवात केली.

पवार म्हणाले, “निवडणुकीला फंड देण्यासाठी बीव्हिजी आणि सुमित कंपनी यांच्यावर मेहरबानी दाखवली जात आहे. हा लढा सामान्य व्यक्तीचा असून नियम कसे वळविण्यात आले, टेंडर डिझाईन करून वळवले गेले.

या भ्रष्टाचाराबाबत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागातील मोठ्या लोकांनी साडे सहा हजार कोटीचा घोटाळा केला आहे. या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा घोटाळा केला असून राज्याला भिखारी केले आहे. सरकारने त्यांची सखोल चौकशी केली करावी, सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजे.”

पवार म्हणाले, “स्वच्छता काम टेंडर मध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढवले गेले. राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी स्पॅनिश कंपनी यांना टेंडर दिले गेले होते. त्यांच्या सोबत करार करण्यात आला. टेंडर हे सुमित कंपनी यांनी डिझाईन केले आणि त्यांनाच मिळाले.

त्यांना स्वच्छतेच्या कामाचा अनुभव नसताना ही नियमबाह्य पद्धतीने त्यांना रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचे कंत्राट दिले गेले. तेव्हा, त्यांच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या बीव्हिजी कंपनीला ही नाराज न करता त्यांना देखील टेंडरमध्ये सामावून घेण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडमधील अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीची सुमित कंपनी आहे.

या प्रकरणात साडे सह हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. हाच पैसा निवडणूक निधी म्हणून देण्यात आला आहे.” सावंत यांना मी पाच दिवसाचा वेळ देतो त्यांनी आपली बाजू मांडावी. आरोग्य विभाग हा खेकडा पोकरत असून पारदर्शक प्रक्रिया राबवावी असा टोला त्यांनी लगावला.

तानाजी सावंत यांनी ” खेकड्याने पोखरल्याने धरणांना गळती लागते” असे विधान केले होते, या विधानावरून पवार यांनी सावंत यांना धारेवर धरले. पवार म्हणाले, ” सावंत यांच्याकडून रुग्णवाहिका प्रकरणात साडे सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.खेकडा वळवळ करतो. धरण पोखरतो. बिळात जावून बसतो. लोकांचं लक्ष कमी झालं की पुन्हा बाहेर येतो. खेकडा महाराष्ट्राला पोखरतोय.”

केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज ( दि. १ एप्रिल) दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी २१ मार्च रोजी ‘ईडी’ने केजरीवाल यांना अटक केली होती.

आज त्‍यांच्‍या ‘ईडी’ काेठडीची मूदत संपली हाेती. दरम्‍यान, आजच्‍या सुनावणीपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्‍या पत्‍नी सुनीता केजरीवाल, आपचे नेते सौरभ भारद्वाज, आतिशी, गोपाल राय यांच्यासह अनेक नेते न्‍यायालयात उपस्थित होते.

दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने केजरीवाल यांना हजर करण्‍यात आले. सुनावणीवेळी न्‍यायालयाने ‘ईडी’ला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्याच्या अधिकारक्षेत्रावर भाष्य केलेले नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यावेळी ‘ईडी’ने केजरीवाल यांना १५ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्‍यात यावी, अशी मागणी केली. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणी २८ मार्च रोजी झालेल्‍या सुनावणीवेळी न्‍यायालयाने केजरीवाल यांच्‍या ईडी कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली होती.

भाजपाची मानसिकता महिलाविरोधी आणि दलितविरोधी पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? 

विनोद तावडे यांनी ट्विट केला व्हिडिओ आणि दिले स्पष्टीकरण

बाबरी मशीद विरोधी आणि राम मंदिर उभारणी च्या आंदोलनाच्या प्रमुख नायकांपैकी एक असलेले लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय षटकार लगावला होता. त्यानंतर आज मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः अडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला. उपराष्ट्रपती जगदीप धनखडही यावेळी उपस्थित होते. प्रकृतीच्या कारणास्तव लालकृष्ण अडवाणी शनिवारी राष्ट्रपती भवनात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याचा उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे मोदी आणि द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला. पुरस्कार प्रदान करताना काढण्यात आलेल्या फोटोवरून आता टीका होऊ लागली आहे.

लालकृष्ण आडवाणी यांना पुरस्कार देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी खुर्चीवर बसले आहेत. तर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उभ्या आहेत, असं प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

देशाच्या महामहिम राष्ट्रपती उभ्या आहेत आणि पंतप्रधान मोदी बसले आहेत. पुन्हा एकदा पीएम मोदींनी आदिवासी महिला राष्ट्रपतींचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे. ही पहिली वेळ नाही, नवीन संसदेचे उद्घाटन झाले तेव्हा त्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातही राष्ट्रपती दिसल्या नाहीत. या घटनांवरून पंतप्रधान मोदी आणि भाजपाची मानसिकता महिलाविरोधी आणि दलितविरोधी असल्याचे दिसून येते.

“देशाच्या प्रथम नागरिकाचा म्हणजेच महामहिम राष्ट्रपतींचा आदर हा सर्वांत महत्त्वाचा असायला हवा”, असं समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

“द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली, त्यावेळी भाजपाने त्यांच्या आदिवासी या समाजाचा हा सन्मान असल्याचं भासवलं होतं. पण आज त्याच महामहीम राष्ट्रपती महोदयांचा हा फोटो बघून मनात विचार आला, की भाजपा नेमका सन्मान करतंय की अवमान?”, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी उपस्थित केला.

या फोटोंवरून वादंग निर्माण झाल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. . दरम्यान, यावरून आता पुन्हा एकदा गदारोळ होण्याची शक्यता आहे. विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरीही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत खुलासा आलेला नाही.

दादागटाचा लग्नसोहळा अन् अमोल कोल्हेंची नामी शक्कल…

शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच अमोल कोल्हे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शनिवारी अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या लग्नसोहळ्यास हजेरी लावली.

या विवाह सोहळ्यातही खासदार कोल्हे यांनी तुतारीचा प्रचार करण्याची संधी मात्र सोडली नाही. विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यास उशीर झाल्यामुळे कोल्हे यांनी “घड्याळ निघून गेल्यामुळे वेळ जुळेना” पण “वधूवरांच्या आयुष्यात सुखाची, समाधानाची तुतारी वाजावी” अशा मिश्किल शब्दांत शुभेच्छा देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या राजकीय टोलेबाजीने दिलीप मोहिते पाटलांनाही हसू आवरता आले नाही.

तसेच यावेळी अमोल कोल्हे यांनी दिलीप मोहिते यांच्या पत्नीचे चरण स्पर्श केले. आणि तुम्ही मला आशीर्वाद दिला की मी तो अप्रत्यक्षपणे आमदार दिलीप मोहितेंनी मला खासदारकीसाठी आशीर्वाद दिला असं समजतो अशी प्रतिक्रिया दिली. अमोल कोल्हेंच्या या कोपरखळीने पुन्हा एकदा हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.