मुंबई दि.०१: शासकीय कागदपत्रांवर आता वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे विधानभवनाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या विधानपरिषद उपसभापतींच्या दालनाबाहेरील नामफलक आज दि.१ एप्रिल रोजी बदलला गेला आहे. विधानपरिषद उपसभापतींच्या दालनाबाहेर ‘डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे’ असा नामफलक लावला आहे.
राज्यातील नागरिकांना आता शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला. त्यावेळी सदर निर्णयाचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागत केले होते, त्याची अंमलबजावणी देखील त्यांनी केली आहे.
माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांचा बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो. तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. समाजात वडिलांएवढेच आईचे महत्त्व देखील अधोरेखित व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी आता विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देखील केली आहे.