श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह ६५ ब्रह्मवृंदांचे पौरोहित्य
पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात जगाच्या कल्याणाकरिता, आरोग्यसंपन्न समाजाकरिता सुरु असलेल्या एकवीस दिवसीय अतिरुद्र महायज्ञाची सांगता ३३ कोटी देवता याग व हर्विद्रव्य वनौषधीसह पूर्णाहुतीने झाली. रुद्र होम, महा सुदर्शन होम, संतान गोपाल कृष्ण होम यांसह विष्णू सहस्त्रनाम अर्चना, गणेश याग, मेधा दक्षिणा मूर्ती होम, स्वयंवर पार्वती होमासह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी यज्ञाला प्रारंभ झाला होता. वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह एकाच वेळी तब्बल ६५ ब्रह्मवृंद यामध्ये सहभागी झाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे अतिरुद्र महायज्ञ मंदिरात करण्यात आला. त्याच्या सांगता प्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजू शेठ सांकला, ज्ञानेश्वर रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. सलग वीस दिवस रुद्र होम, गणेश याग यांसह विविध अभिषेक देखील करण्यात आले. गणपती मंदिरात सभामंडपात भव्य होमकुंड साकारण्यात आले होते. अतिरुद्र महायागाचे हे ४ थे वर्ष होते.
गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योर्तिलिंग नद्या, रामेश्वरम २१ कुंडांचे जल याकाळात वापरले गेले. तसेच, २१ आयुर्वेदिक औषधी वापर होम-हवनाच्या वेळी करण्यात आले. सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारीत पाण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात आला. अतिरुद्र होम हा या धार्मिक विधींतील सर्वोच्च बिंदू होता. श्री महालक्ष्मी श्री सुक्त, नवग्रह, अरुणाप्रश्न, पुरुषसुक्त, दुर्गा यांसह ३३ कोटी देवता याग व विविध अभिषेक असे धार्मिक विधी याअंतर्गत करण्यात आले. अतिरुद्र याग व इतर धार्मिक कार्यक्रमांत भाविक मोठया संख्येने सहभाग घेतला होता.