पुणे, दि. ०१ एप्रिल २०२४ : महापारेषण कंपनीच्या पिरंगुट २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचा नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम बुधवार (दि. ३) ते शनिवार (दि. ६) पर्यंत होणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत विजेच्या भारव्यवस्थापनासाठी महावितरणच्या काही २२ केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद ठेवावा लागणार असल्याने मुळशी तालुक्यातील काही गावांमध्ये चक्राकार पद्धतीने भारनियमन करण्यात येणार आहे.
यामध्ये बुधवारी, दि. ३ एप्रिलला महावितरणच्या २२ केव्हीच्या सहा वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहील. त्यामुळे रिहे, भरे, घोटावडे, मुळखेड, खांबोली, कातरखडक, पिंपोली, आंधाले या गावांसह काही उच्चदाब औद्योगिक अशा सुमारे ६५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील. गुरूवारी, दि. ४ एप्रिलला २२ केव्हीच्या दोन वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहील. त्यामुळे पिरंगुट गाव, पिरंगुट औद्योगिक परिसर, पौड, दारवली, करमोळी, चाले, दखणे, खुळे, साथेसाई, नांदगाव, कोंढावळे, रावडे, शेरे, वेलावडे, जामगाव, दिसली यासह कोळवण खोऱ्यातील सर्व गावे व वाड्यावस्त्यांमधील सुमारे १८ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील.
तसेच शुक्रवारी, दि. ५ एप्रिलला महावितरणच्या २२ केव्हीच्या तीन वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहील. त्यामुळे भुगाव, भूकूम, खातपेवाडी, लवळे, चांदे, नांदे या गावांतील सुमारे २७ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील. तर शनिवारी, दि. ६ एप्रिलला उरवडे, कासारआंबोली, धोत्रेवाडी, आंबेगाव, मारणेवाडी, कोंढूर, कोंढावळे, आंधगाव, आंबरवेत, आमराळेवाडी, गडगावणे यासह मुठा खोऱ्यातील सर्व गावे व वाड्यावस्त्यांमधील सुमारे ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरण व महापारेषणकडून करण्यात आले आहे.