पुणे- शिरूर लोकसभा मतदारसंघाची महायुतीची समन्वय बैठक दि.1 एप्रिल सोमवारी हॉटेल आरती एक्झिक्युटीव्ह,प्रोटेक्ट कंपनी समोर, एकता नगर, चाकण,पुणे नाशिक हायवे येथे दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी येथे दिली
शिरूर, बारामती, पुणे लोकसभा क्लस्टर चे प्रमुख मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीस दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय माशिलकर, उपनेते इरफान सय्यद,आपले उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आ. दिलीप मोहिते पाटील, आ.महेश लांडगे, आ. राहुल कुल,आ. अतुल बेनके, आ. चेतन तुपे, माजी आ. शरद सोनावणे,माजी आ.योगेश टिळेकर,माजी आ. विलास लांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील,राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,भाजपा पिं.चिं अध्यक्ष शंकरभाऊ जगताप,पि. चिं. राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर,आर पी आय (आठवले गट )जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार,आर पी आय (खरात गट ) प्रदेशाध्यक्ष सचिन खरात,रासप चे शिवाजी कुऱ्हाडे , शिवसंग्राम चे संदेश बारवे,पीपल्स रिपब्लिकन पार्टी ( जोगेंद्र कवाडे गटाचे ) प्रकाश भालेराव ,लोकजनशक्ती पक्षाचे संजय आल्हाट, जनता दल सेक्युलर चे प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे तसेच प्रहार संघटना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, महाराष्ट्र क्रांती सेना,लहुजी सेना,लहुजी शक्ती सेना, ह्या मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह……सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहेत असे महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
ह्या बैठकीत विजयाच्या संकल्पासह प्रचाराचे नियोजन करण्यात येईल असेही संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
उद्या चंद्रकांतदादा पाटील व उदय सामंतांच्या उपस्थितीत शिरूर लोकसभा महायुती समन्वय बैठक
कर्करोगावर गुणकारी ‘मात्रा’ होमिओपॅथीची – डॉ. राजकुमार पाटील
लोकमान्य होमिओपॅथी मेडिकल काॅलेजच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पिंपरी, पुणे (दि. ३१ मार्च २०२४) असाध्य अशा कर्करोगावर जगभरात विविध उपचार पद्धतींनी औषधोपचार केले जात असून खात्रीशीर इलाजासाठी प्रयोगशाळांमधून संशोधक नवनवीन संशोधन करीत आहेत. कर्करोग रूग्णांवर होमिओपॅथीव्दारे औषधोपचार गुणकारी ठरतात हे सिध्द झाले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या होमिओपॅथी विभागाचे अधिष्ठाता डॉ. राजकुमार पाटील यांनी केले.
चिंचवड येथील स्व. फकिरभाई पानसरे एज्युकेशन फाऊंडेशन, लोकमान्य होमिओपॅथी मेडिकल काॅलेजच्या वतीने ‘होमिओपॅथी व्दारे कर्करोगावर उपचार’ या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन निगडीतील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ होमिओपॅथी डॉ. कटेकरी, डॉ. धर्मेंद्र शर्मा, डॉ. आर. एस. गुंजाळ, डॉ. मनिषा सोलंकी, डॉ. अरुण जाधव, डॉ कमलेश घोलप, डॉ जयकुमार भानुसे, डॉ. राहुल फेरवानी, परिषदेचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. श्रीकांत तलारी, डॉ. राजन शंकरन, फाऊंडेशनचे कार्यकारी विश्वस्त निहाल पानसरे, व्यवस्थापकीय संचालिका डॉ. झोया पानसरे, विश्वस्त डॉ. श्याम अहिरराव, प्राचार्या डॉ. नंदिनी जोशी, संयोजिका डॉ. विद्या इंडी, डॉ. समीर बोडस, डॉ. सोनाली मोहरील, डॉ शिशिर परांजपे, डॉ जानकी दोशी, डॉ. कविता पाटील व संस्थेचे प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
होमिओपॅथी औषधांव्दारे कर्करोग रूग्णांवर प्रभावी उपचार करता येतात. या उपचारांमुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. आजाराचे योग्य निदान, रूग्णांची शारीरिक, मानसिक परिस्थिती औषधांची योग्य निवड करून उपचार केले तर रूग्ण लवकर बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञ डॉ. श्रीकांत तलारी यांनी सांगितले.
दुपारच्या सत्रात डॉ. राजन शंकरन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. होमिओपॅथी उपचार पध्दती प्रभावी आहे. विशेषतः असाध्य रोगांवर होमिओपॅथी औषधे गुणकारी ठरतात. या औषधोपचारांनी रूग्ण कर्करोगावर पूर्णपणे मात करू शकतो, असे डॉ. शंकरन यांनी सांगितले. त्यांनी काही चित्रफित द्वारे मार्गदर्शन केले.
स्वागत डॉ. नंदिनी जोशी, सूत्रसंचालन डॉ. उल्का ठाकूर व डॉ. समीर बोडस यांनी तर डॉ. आरती खळदकर यांनी आभार मानले. परिषदेस महाराष्ट्रासह देशभरातून विद्यार्थी, डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीसांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पहावा, थिएटर बुक करतो, गांधी विचारांसाठी सिनेमा पहाणे गरजेचे.
सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने व वंचितचे लातूर जिल्हाध्यक्ष जगदिश माळींचा काँग्रेस पक्षात प्रवेश.
मुंबई, दि. ३१ मार्च
महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असून पहिल्या टप्यातील विदर्भातील पाचही जागांवर काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील. मोदी सरकारची जुमलेबाजी व फेकुगिरी आता चालणार नाही, लोकसभा निवडणुकीत जनता भारतीय जनता पक्षाच्या तानाशाही सरकारला सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
टिळक भवनमध्ये पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते, ‘राहुल गांधी जर सावरकर चित्रपट पाहायला येणार असतील तर मी अख्खं थिएटर बुक करेन’ या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा पटोले यांनी समाचार घेतला, मोदींवरचा सिनेमा फ्लॉप झाला, नितीन गडकरींवरील हायवे मॅन सिनेमा फ्लॉप झाला, गोडसेवरील चित्रपट फ्लॉप झाला आणि सावकर चित्रपटही फ्लॉप झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पहावा, गांधी विचारासाठी फडणवीसांनी हा चित्रपट पहावा, त्यांच्यासाठी थिएटर बुक करतो, असे आवाहन पटोले यांनी केले आहे. राहुल गांधी यांच्याशी तुलना करु नका, राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून देशाच्या जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली आहे, टिंगळटवाळी करण्यापेक्षा कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्या व जनतेच्या मुलभूत प्रश्नांवरही लक्ष द्या, असेही नाना पटोले म्हणाले.
सोलापूरचे माजी आमदार दिलीप मानेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश..
सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने व वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष जगदिश माळी यांनी समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. नाना पटोले यांनी दोघांचेही काँग्रेस पक्षात स्वागत केले.
यावेळी नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे तानाशाही सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी तसेच लोकशाही व्यवस्था व संविधान टिकवण्यासाठी हा लढा सुरु. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भिती दाखवून भाजपा दुसऱ्या पक्षातील लोकांना पक्षात प्रवेश देते पण त्याचाही काही फरक पडत नाही.
यावेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, दिलीप माने हे काँग्रेस पक्षाचेच होते पण मध्यंतरी इतर पक्षात गेले परंतु योग्यवेळ पाहून ते आज पुन्हा स्वगृही परतले आहेत. कार्यकर्त्यांशी चांगले संबंध असलेला नेता अशी त्यांची ओळख असून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यात पक्षाला आणखी बळ मिळाले आहे. भाजपाकडून प्रणिती शिंदेंनाही ऑफर होती पण आम्ही काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही, असा निर्वाळा सुशिलकुमार शिंदे यांनी दिला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे आदी उपस्थित होते.
सुनेत्रा पवार यांचा बावधन दौरा.
पुणे :सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदार संघाच्या मुळशी तालुका दौऱ्यावर बावधन परिसरात सुनेत्रा पवार यांचं स्वागत करण्यात आले.भोर विधानसभा मतदार संघांचे भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख आणि कोथरूडचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याकडून सुनेत्रा पवार यांचं जंगी स्वागत झाले.
फटाक्यांची आतिषबाजी आणि क्रेनने हार घालत झाले स्वागत
सुनेत्रा पवार यांच्या बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवारीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज मुळशी तालुक्यातील बावधन दौऱ्यावर होत्या.या दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार यांनी बावधन परिसरातील विविध सोसायट्यांना भेट देत स्थानिक नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या.. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी घड्याळाच्या चिन्हाला मत देवून प्रचंड मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन नागरिकांना केलं. घड्याळाला मत म्हणजे विकासाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत असल्याचं त्यांनी सांगितलं. येथील नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटीबद्ध राहू अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली..
रत्ने आणि दागिने आभूषण पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण
मुंबई : रत्ने आणि दागिने निर्यात संवर्धन प्रोत्साहन परिषद देशाच्या निर्यात प्रोत्साहनाला पुढे नेण्यासाठी सरकारने सुरू केलेला सर्वात महत्त्वाचा उपक्रम असून रत्न आणि दागिने निर्यातीस प्रोत्साहन देण्यात परिषदेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रत्ने आणि दागिने आभूषण पुरस्कार वितरणाचे आयोजन हॉटेल ट्रायडंट, मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

रत्ने आणि दागिने निर्यात संवर्धन प्रोत्साहन परिषद
राज्यपाल श्री.बैस म्हणाले की, जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट यामध्ये प्रमोशन कौन्सिलच्या सदस्यांची संख्या 9600 आहे. ही मोठी बाब असल्याचे ते म्हणाले.सरकार आणि उद्योग यांच्यातील इंटरफेस म्हणून रत्न आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषद धोरण तयार करण्यात शासनाची भूमिका कौतुकास्पद आहे.
जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन परिषद दरवर्षी दुबई, जयपूर येथे आंतरराष्ट्रीय रत्न आणि आभूषण ज्वेलरी शो आयोजित करते.याच धर्तीवर मुंबई या ठिकाणी भव्य एकात्मिक ‘आंतरराष्ट्रीय’ शो सुरू करावे असे आवाहन ही राज्यपाल यांनी केले.
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे.तसेच चित्रपट राजधानी सुध्दा आहे. मध्यपूर्वेतील बरेच लोक मुंबईत उपचार घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे मुंबई हे वैद्यकीय पर्यटनस्थळ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रकारच्या संयुक्त आंतरराष्ट्रीय मुंबई महोत्सवामध्ये रत्न आभूषण शो च्या व्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन शो,फूड फेस्टिवल, फिल्म फेस्टिवल चे आयोजन करण्यात यावे. अनेक वर्षापासून भारत देश हा रत्न, आभूषण, हिरे, कलर स्टोन, यासाठी प्रसिद्ध आहे.भारताच्या कोहिनूर हिऱ्याची जगात ख्याती आहे. आपल्याला मौलिक शिल्प, कौशल्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील 27 विद्यापीठांच्या कुलगुरूच्या वतीने समितीला विनंती करतो की, महाराष्ट्रातील विद्यापीठात आणि महाविद्यालयाने सोबत मिळून काम करण्यासाठी रत्न आणि आभूषण क्षेत्रात प्रशिक्षणार्थी/इंटरशिप सुरू करण्यासाठी आवाहन करण्यात असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. आभूषण निर्यात संवर्धन परिषद मार्फत नवी मुंबई येथे एक आभूषण पार्क चालू करण्यात येत आहे. महिला रत्न आभूषण उद्योगक्षेत्रात सर्वात मोठी उपभोक्ता आहे. आता वेळ आली आहे की, महिलांना या उद्योगक्षेत्रामध्ये समाविष्ट करुन त्यांना आत्मनिर्भर बनवावे. महिलांना उद्योगक्षेत्रामध्ये नेतृत्व सांभाळण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्कता असल्याचेही त्यांनी यावेळेस सांगितले.

सन 2022-23 या वर्षातील उत्कृष्टरत्ने आणि दागिने निर्यात कामगिरीसाठी व त्यांच्या योगदानाबद्दल ‘रोझी ब्लू’चे व्यवस्थापकीय संचालक रसेल मेहता यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘लाइफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशसेवेबद्दल त्यांचे व इतर सर्व पुरस्कार विजेत्यांचे राज्यपाल श्री. बैस यांनी अभिनंदन केले.
यावेळी रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष विपुल शहा, उपाध्यक्ष किरीट भन्साळी, पुरस्कार समितीचे निमत्रंक मिलन चोक्सी, भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहताआदी मान्यवर उपस्थित होते.
महसूलवाढ, उत्कृष्ट ग्राहकसेवेसाठी विभागनिहाय नियोजन तयार करा
महावितरणचे संचालक अरविंद भादिकर यांचे निर्देश
पुणे, दि. ३१ मार्च २०२४: पुणे परिमंडल अंतर्गत अचूक वीजबिल व इतर उपाययोजनांमधून महसूलवाढ तसेच उत्कृष्ट ग्राहकसेवा देण्यासाठी विभागनिहाय नियोजन तयार करावे. सोबतच यापुढे कोणत्याही परिस्थितीत वीजबिलांच्या थकबाकीमध्ये वाढ खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक कार्यालयाने ‘शून्य थकबाकी’च्या उद्दिष्टानुसार कामकाज करावे असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) श्री. अरविंद भादिकर यांनी दिले.
रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात रविवारी (दि. ३१) संचालक श्री. भादिकर यांनी पुणे परिमंडलमधील वीजबिलांच्या थकबाकीसह इतर विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
संचालक (संचालन) श्री. अरविंद भादिकर म्हणाले की, पुणे परिमंडलामध्ये एकीकडे विजेची मागणी व वीजवापर वाढत आहे. त्याच प्रमाणात महसूलवाढ देखील होणे आवश्यक आहे. यासह प्रामुख्याने औद्योगिकसह इतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी तात्काळ व उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयाने नियोजनाचा व अंमलबजावणीचा कृती आराखडा तयार करावा. येत्या काही दिवसांत या नियोजनाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
महसूलवाढ व वीजबिल वसूलीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपविभाग कार्यालयांचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीप मदने (वडगाव शेरी), सचिन पाटील (गणेशखिंड) रामचंद्र लोंढे (फायरब्रिगेड), उमेश कवडे (पेशवेपार्क), भूजंग बाबर (खराळवाडी) तसेच सहायक अभियंता भरत पवार (कॅम्प शाखा), जनमित्र देविदास शिंदे, मंगेश घोडे व उमाकांत ढोले यांचा संचालक (संचालन) श्री. भादिकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
रास्तापेठ येथील ग्राहक सुविधा केंद्राला संचालक श्री. भादिकर यांनी भेट दिली. या केंद्रातून वीजग्राहकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवांच्या कार्यप्रणालीचा व प्रतिसादाचा आढावा घेत त्यांनी विविध सूचना दिल्या. तसेच भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. ग्राहकसेवा, सौर ऊर्जा व इतर विषयांच्या प्रशिक्षणाच्या आयोजनांची संचालक (संचालन) श्री. अरविंद भादिकर यांनी माहिती घेत समाधान व्यक्त केले.
या बैठकीला अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, श्री. संजीव राठोड, श्री. संजीव नेहेते, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त व लेखा) व ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) यांच्यासह कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.
योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराज इंदौर यांचे साधने समयी आसन असलेले ९० पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचे व्याघ्रांबर व शाल पूजन
कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजन
पुणे : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे नाथषष्ठी निमित्त योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराज इंदौर यांचे साधने समयी आसन असलेले ९० पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचे व्याघ्रांबर व शाल यांचे पूजन मंदिरात झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई व कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांचे प. पू. माधवनाथ महाराज हे अध्यात्मिक गुरु होते. त्यामुळे या वस्तूंचे पूजन दरवर्षी मंदिरात करण्यात येते.
पूजन प्रसंगी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, खजिनदार अॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागिरदार यांसह ट्रस्टचे माजी विश्वस्त बी. एम. गायकवाड आदी उपस्थित होते. ट्रस्टचे माजी अध्यक्ष शिरीष मोहिते यांच्यातर्फे १००० भाविकांना खिचडीचा प्रसाद देखील वाटण्यात आला. याप्रसंगी दिल्ली येथे कार्यरत आयपीएस अधिकारी केतन पाटील यांच्या हस्ते आरती झाली. आरतीसाठी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, विश्वस्त महेंद्र पिसाळ व राजू बलकवडे उपस्थित होते.
अध्यक्ष युवराज गाडवे म्हणाले, योगाभ्यानंद प. पू. माधवनाथ महाराजांची पुण्यतिथीचा हा दिवस नाथषष्ठीचा. महाराजांचा जन्म १८५७ रोजी चित्रकूट येथे झाला. त्यांच्या नित्य साधनेच्यावेळी त्यांनी वापरलेले व्याघ्रासन व शाल रविवार पेठ येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे पुजारी कै. रंगनाथ नारायण होशिंग-आलेगांवकर यांना दिले होते. हे साहित्य गेली ९० वर्षे येथील पुजारी कै. बाळकृष्ण आलेगांवकर, कै. विनायक आलेगांवकर यांनी जतन केले.
त्यांच्या पश्चात पत्नी कै. पद्मजा आलेगांवकर व मुलगी गौरी गुमास्ते, जावई राहुल गुमास्ते व नातू देवेश गुमास्ते यांनी हा अध्यात्मिक वारसा जोपासला असून दत्तमंदिरात दरवर्षी भाविकांना दर्शनासाठी नाथषष्ठीला घेऊन येतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई व त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती लक्ष्मीबाई यांचे माधवनाथ महाराज हे अध्यात्मिक गुरू. त्यांच्या प्रेरणेनेच श्रीमंत दगडूशेठ यांनी पुण्यातील धार्मिक वैभव असलेले जगद् विख्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती व श्रीमती लक्ष्मीबाई यांनी श्री दत्त मंदिराची स्थापना केली.
ऍड. जयदेव गायकवाड, नलिनी व्यंकटराव यांना’डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वबंधुता पुरस्कार’ जाहीर
पुणे : बंधुता लोकचळवळीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पहिल्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वबंधुता पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी आमदार व साहित्यिक ऍड. जयदेव गायकवाड, सिकंदराबाद (तेलंगणा) कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ज्येष्ठ सदस्या नलिनी व्यंकटराव पणसा आणि भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील महाविद्यालय यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. नवी पेठेतील एसएम जोशी सभागृहात येत्या १२ एप्रिल २०२४ रोजी आयोजित समारंभामध्ये संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.
प्रकाश रोकडे म्हणाले, “संमेलनामध्ये विविध संस्थांचा सहभाग असून, सकाळी ९ वाजता सभागृहाच्या संविधान कट्ट्यावर बंधुताप्रेमी साहित्यिकांचा आनंद सोहळा होईल. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. सुभाष वारे, डॉ. विजय ताम्हाणे, मनुद्दीन शेख, मधुश्री ओव्हाळ, प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोककुमार पगारिया, डॉ. अरुण आंधळे, डॉ. संजय गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे.”
“दुपारच्या सत्रात ‘अभिजात मराठी काव्यपंढरी’मध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवींचा सहभाग राहील. दुपारी ४ वाजता पुरस्कार वितरणाने संमेलनाचा समारोप होईल. याप्रसंगी ‘बंधुता काव्यप्रतिभा’, ‘बंधुता शब्दक्रांती’, ‘प्रकाशयात्री’, ‘प्रकाशपर्व’ आणि ‘प्रकाशगाथा साहित्य पुरस्कार’ प्रदान केले जातील. प्रा. शंकर आथरे, संगीता झिंजुर्के, प्रा. प्रशांत रोकडे, डॉ. प्रभंजन चव्हाण, प्रा. सदाशिव कांबळे आणि डॉ. सहदेव चव्हाण आदी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत,” असेही प्रकाश रोकडे यांनी नमूद केले.
‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ने उचित माध्यमचे जीवराज चोले सन्मानित
पुणे : रोटरी इंटरनॅशनल झोन-४ अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पुणे डायमंड व रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज यांच्या वतीने दिला जाणारा ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ उचित माध्यमचे प्रमुख जीवराज भागाबाई महादेव चोले यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक, जनसंपर्क व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल चोले यांना सन्मानित करण्यात आले.
सेनापती बापट रस्त्यावरील ‘एमसीसीएआय’च्या मुळगावकर सभागृहात झालेल्या या सोहळ्यात रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१चे निर्वाचित प्रांतपाल शीतल शाह यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी व्होकेशनल डायरेक्टर वसंतराव माळुंजकर, झोनल डायरेक्टर प्रकाशकुमार सुतार, शिरीष पुराणिक, रोटरी क्लब पुणे सनराईजचे अध्यक्ष विनीत अग्रवाल, सचिव संध्या तायल, असिस्टंट गव्हर्नर फिरोज मास्तर, राजेश जैन, महेश माखिजा, मनोजीत चौधरी, समीर भिडे आदी उपस्थित होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १२ व्यक्तिमत्त्वांना ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये अवयवदान चळवळीसाठी धीरज गोडसे, शिक्षणासाठी प्रा. रफिक सौदागर, डॉ. एम. डी. लॉरेन्स, सामाजिक कार्यासाठी राम भागवत, झैनाब चिनीकमवला, अनाथांसाठी कार्यरत केशव धेंडे, दिव्यांगांसाठी कार्यरत जाई खामकर, अपंग सैनिकांसाठी कार्यात कर्नल वसंत बल्लेवार, आरोग्य क्षेत्रात कार्यरत ब्रिगेडियर अमरजित सिंग, कर्नल एन. एस. न्यायपती, डॉ. शिवलाल जाधव यांचा समावेश होता.
हा सन्मान विद्यार्थी सहायक समिती, वंचित विकास या संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक कार्यात योगदान देण्यासाठी प्रोत्साहन देईल. उचित माध्यमच्या साहाय्याने समाजातील अनेकांचे उचित कार्य समाजासमोर आणण्याचा प्रयत्न यापुढेही करणार असून, सामाजिक कार्यात अधिक योगदान कसे देता येईल, यावर अधिक लक्ष्य केंद्रित करणार आहे.- जीवराज भागाबाई महादेव चोले, प्रमुख, उचित माध्यम पुणे.
चांगल्या किंवा वाईट स्थितीत वाणीमध्ये समत्व भाव ठेवणे गरजेचे- आचार्य श्री महाश्रमणजी
आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीच्या वतीने आयोजित प्रवचनाचा तिसरा दिवस
पुणे : जीवनात विचारांची देवाणघेवाण करण्याचे वाणी हे साधन आहे. वाणी रुपी रथावर आरूढ होऊन विचार व भाव बाहेर जातात. त्यामुळे आपण कोणावरही खोटा आरोप करता कामा नये, याला पाप समजले जाते. माणसाला राग आलेला असताना वाणी वर नियंत्रण ठेवले, तर रागावर नियंत्रण ठेवता येते. मौन ठेवले, तर हे सहज शक्य आहे. चांगल्या किंवा वाईट अशी कोणतीही परिस्थिती आली, तरी देखील शांती व धैर्य ठेवले पाहिजे. दोन्ही स्थितीमध्ये समत्व भाव ठेवणे आवश्यक आहे, असे जैन तेरापंथचे धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांनी सांगितले.
आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीतर्फे गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात आचार्य श्री महाश्रमणजी यांची प्रवचनमाला सुरु आहे. त्याच्या तिसऱ्या दिवशी ते बोलत होते.
श्री महाश्रमणजी म्हणाले, भाषा प्राणीमात्रांकडे देखील असते, परंतु माणसाकडे जी भाषा आहे. ती भाषा व्यापक व विकसित आहे. जगात अनेक भाषांचा वापर केला जातो. आज अनेक भाषा शिकाव्या लागतात. भाषा मूळ गोष्ट नाही. भाषा हे साधन आहे, साध्य हा विषय आहे, तो आपण समजून घ्यायला हवा. जगात एकच भाषा असती, शास्त्र असते, तर जेवढा वेळ सगळ्या भाषा शिकण्यास लागतो, तो प्रत्येकाचा वाचला असता. त्या वेळेचा उपयोग इतर चांगल्या गोष्टींकरिता आपण वापरू शकलो असतो. जी भाषा आपल्या दैनंदिन आयुष्यात सहजोपयोगी ठरेल, ती भाषा उपयुक्त असते.
ते पुढे म्हणाले, शारीरिक व्यंगामुळे अनेकांना बोलता किंवा ऐकायला येत नाही, तर स्वभावामुळे काहीजण बोलू शकत नाही. भाषेची शक्ती होणे देखील महत्वाचे आहे. ज्यांच्याकडे भाषेची शक्ती आहे, ते भाषेचा प्रयोग कधी व कोणत्या स्वरूपात करतील, हे महत्वाचे आहे. आवश्यकते शिवाय बोलणे हे उपयुक्त नाही. बोलणे किंवा न बोलण्यात विवेक ठेवणे आवश्यक आहे. कुठे बोलणे आणि कुठे न बोलणे तसेच काय, कसे बोलावे हे आपल्याला समजणे गरजेचे आहे.
खूप वेळ गरज नसताना जास्त वेळ बोलणे आणि सार व अर्थहीन गोष्टी बोलणे, हे वाणीमध्ये असलेले दोन प्रकारचे विष आहेत. कमी वेळेत कामाविषयी बोलणे हे वाणीचे अमृत असून याचा उपयोग केल्यास चांगला वक्ता तयार होऊ शकतो. जे बोलायचे ते खरे बोलायला हवे. खोटे न बोलणे हा नियम अंगिकारायला हवा. चांगले व गोड बोलण्याने सुखप्राप्ती करता येईल.
श्री महाश्रमणजी यांचे गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात दिनांक २ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ९.३० वाजता प्रवचन होणार असून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समिति एवं समस्त तेरापंथ समाज पुणे, श्री भिक्षु मेमोरियल फाउंडेशन, तेरापंथ युवक परिषद, तेरापंथ महिला मंडळ, तेरापंथ प्रोफेशनल फोरम, अणुव्रत समिती आयोजनात सहभागी झाले आहे.
राहुल गांधी म्हणाले- मोदी मॅच फिक्स करून ४०० पार करू पाहत आहेत,भाजप जिंकला तर देश टिकणार नाही, हे लक्षात घ्या …
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीपूर्वी I.N.D.I.A. ब्लॉकमधील 27 पक्ष रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर लोकशाही वाचवा रॅली काढली आहे. राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याशिवाय शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि समाजवादी प्रमुख अखिलेश यादव या रॅली त मंचावर उपस्थित आहे.त्यांच्यासोबत शिवसेना (UBT) संजय राऊत, CPI(M) सरचिटणीस सीताराम येचुरी, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी-SCP अध्यक्ष शरद पवार, आप नेते आतिशी, गोपाल राय, पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लाही उपस्थित आहेत.या रॅलीत सहभागी होण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेनही पोहोचल्या आहेत.
राहुल म्हणाले- इथे मॅच फिक्सिंग होत आहे हे लक्षात ठेवा. या निवडणुकीत काहीतरी गडबड आहे, असे हे भाजपवाले सांगत आहेत. असे भाजपच्या एका नेत्याने म्हटले आहे. त्यांच्याच दोन लोकांना निवडणूक आयोगात आणले. आमच्या दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. हे करायचे असते तर ते सहा महिन्यांपूर्वी, वर्षभरापूर्वी करता आले असते. तुम्हाला आमची खाती गोठवायची असल्यास, तुम्ही ते सहा महिन्यांपूर्वी करायला हवे होते. पण तुम्हाला ते आता करायचं होतं, जेणेकरून मॅच फिक्सिंग होऊ शकतं. माझे लक्षपूर्वक ऐका. जर भाजप जिंकला आणि त्यांनी संविधान बदलले तर संपूर्ण देश पेटणार आहे, हा देश टिकणार नाही. ही निवडणूक मतांसाठीची निवडणूक नाही, ही निवडणूक भारताला वाचवण्याची निवडणूक आहे.राहुल म्हणाले- त्यांना राज्यघटना का मिटवायची आहे, कारण त्यांना तुमचा पैसा हिसकावून घ्यायचा आहे. मी जनगणना आणि रोजगार याविषयी बोललो, कारण या देशासमोरील सर्वात मोठ्या समस्या आहेत. त्यामुळे तुम्ही लोकांनी सर्व शक्तीनिशी मतदान केले नाही तर त्यांचे मॅच फिक्सिंग यशस्वी होईल आणि देशाचे संविधान नष्ट होईल.
राहुल म्हणाले – हे संविधान आहे, पोलिस आणि धमक्या देऊन चालणार नाही. त्यांना वाटते की संविधानाशिवाय देश धमक्या देऊन, सीबीआय, ईडीने चालवता येईल. तुम्ही मीडिया विकत घेऊ शकता, मीडिया रिपोर्ट्स बंद करू शकता पण लोकांचा आवाज दाबू शकत नाही. कोणतीही शक्ती हा आवाज दाबू शकत नाही. सामना फिक्स करून 400 जागा जिंकताच आम्ही संविधान बदलू, असे भाजप खासदार म्हणाले.हा लढा संविधान वाचवण्याचा लढा आहे. संविधान गेले तर गरिबांचे हक्क जातील, गरिबांची संपत्ती पाच-सहा लोकांच्या हातात येईल. मला सांगा नोटबंदी आणि जीएसटीचा फायदा कोणत्या गरीबांना झाला? कोणत्या व्यावसायिकाला फायदा झाला?राहुल गांधी म्हणाले- येथे आलेल्या INDIA आघाडीच्या सर्व नेत्यांसोबत मला केजरीवालजी आणि सोरेनजी यांचीही नावे घ्यायची आहेत, जे येथे नाहीत, पण मनापासून आमच्याशी जोडलेले आहेत. सध्या आयपीएलचे सामने आहेत. जेव्हा अप्रामाणिकपणे साम्राज्यावर दबाव टाकून खेळाडू विकत घेतले जातात, त्याला मॅच फिक्सिंग म्हणतात. लोकसभा निवडणुका आपल्या समोर आहेत. सामने कोणी फिक्स केले- नरेंद्र मोदी यांनी. सामना सुरू होण्यापूर्वी आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करून आत टाकण्यात आले. त्यामुळे नरेंद्र मोदीजी या निवडणुकीपूर्वी मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा 400 चा नारा मॅच फिक्सिंगशिवाय आणि सोशल मीडिया आणि मीडियावर दबाव आणल्याशिवाय 180 च्या पुढे जाऊ शकत नाही.
प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या- मला वाटते की त्यांनी दिखावा केला आहे. मला आठवण करून द्यायची आहे की हजारो वर्षांपूर्वी त्या कोणत्या गोष्टी होत्या? प्रभू राम जेव्हा सत्यासाठी लढले तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही साधन नव्हते. त्याच्याकडे रथही नव्हता. रावणाकडे रथ, साधनसामग्री आणि सैन्य होते. संपत्ती होती, सोन्याच्या लंकेत राहायचा. रामाकडे फक्त सत्य, विश्वास, विश्वास, संयम, आशा आणि धैर्य होते.
देशाची लोकशाही धोक्यात असल्याचे मान म्हणाले. त्यांना (मोदी सरकारला) वाटते की ते लाठीने चालवतील. हा देश कुणाच्या बापाची संपत्ती नाही, हा देश 140 कोटी जनतेचा आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला शहीद आझम भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंग्रा, कर्तारसिंग सराभा, चंद्रशेखर आझाद अशा हजारो नेत्यांनी दिले आहे. हे आणि तेदेखील समाविष्ट करून त्यांना काय म्हणायचे आहे? कुणाची खाती गोठवता, कुणा पक्षाच्या नेत्याला तुरुंगात टाकता. आम्ही फांदीची पाने नाही जी फांद्या फुटून गळून पडतील. वादळांना त्यांच्या मर्यादेत राहण्यास सांगा. अरविंद केजरीवाल यांना आत टाकले, हेमंत सोरेन यांना आत टाकले. त्यांच्या घरी ईडी पाठवली, त्यांचे घर पाडले. हे गैरसमज आहेत. आज सुनीता केजरीवाल आणि कल्पना सोरेनही इथे हजर आहेत. त्यांनी जे कष्ट सोसले त्याबद्दल मी त्यांना सलाम करतो. नुसती दाद कुणालाच मिळत नाही, त्यांना रोजंदारी देऊन मोदी-मोदी करायला लावणे खूप सोपे आहे. मनापासून जे बोलले जाते त्याचा परिणाम होतो. त्यांना देशाचे तुकडे करायचे आहेत. ते देशाला द्वेषाच्या वादळात ढकलत आहेत. त्यांनी CAA आणला. मी संसदेत होतो. मी म्हणालो- मला 30 सेकंद बोलू दे. मला सांगण्यात आले – नाही. मग मी म्हणालो की त्यांना 20 सेकंद बोलू द्या. ते म्हणाले, यावेळी काय बोलणार? मी म्हणालो- लांबच्या प्रवासाला मैलांमध्ये विभागू नका… समाजाला जमातींमध्ये विभागू नका… माझा देश भारत ही एक वाहणारी नदी आहे… ती नदी आणि तलावांमध्ये विभागू नका…
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले- तुम्ही अरविंद केजरीवाल यांना अटक कराल, पण त्यांच्या विचारसरणीला अटक कशी करणार? जन्माला आलेल्या लाखो केजरीवालांना तुम्ही कसे थांबवाल? अरविंद केजरीवाल हे एक विचारसरणीचे नाव आहे. भारत आघाडी पूर्णपणे एकत्र आली आहे. सगळे एकत्र कसे बसले या विचाराने अनेकांचे कॅमेरेही थरथरू लागले असतील. आपण एकत्र यावे असे त्यांना वाटत नाही. म्हणूनच मी सर्वांना सांगू इच्छितो की एकत्र या. या भ्रष्ट लोकांनी कितीही पैसा, सोने, चांदी, दागिने गोळा केले तरी कफनाला खिसा नसतो हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. एकही पैसा आमच्यासोबत जाणार नाही, देशाला जेवढे लुटायचे आहे तेवढे लुटायचे. त्यामुळे गरिबांना शिव्याशाप देऊ नका.
नौटंकीबाजांना घरचा रस्ता दाखवा: आ. यशोमती ठाकूर
केंद्र सरकारकडून ED, CBI या स्वायत्त संस्थांचा गैरवापर
मातीशी नाळ असणारा माणूस निवडून आणा: सुषमा अंधारे.
महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
मोटरसायकल रॅली व सभेच्या अफाट गर्दीमुळे विरोधकांचे धाबे दणाणले.
अमरावती-
नौटंकीबाज लोकांना आता घरी बसविण्याची वेळ आली आहे. सच्चा आणि प्रामाणिक मातीशी जुळलेला उमेदवार मिळाल्याने अमरावती जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह असून हा उत्साह मतदानरुपी आशीर्वादात बदलवून बळवंत वानखडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत यशोमती ठाकूर बोलत होत्या. बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी व घटक पक्षाचे हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी व अफाट जनसमुदाय नेहरू मैदानावर उपस्थित झाला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी मोदी सरकारसह विरोधकांवर तोफ डागत भाजपा सरकार ईडी आणि सीबीआय या स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग करत असल्याचा पुनरुचार केला.
यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपा सरकारने अच्छे दिनच्या नादात दहा वर्षात देशातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, वंचित आणि शोषितांची घोर फसवणूक केली. आज अमरावती जिल्हा राणा दाम्पत्याने दहा वर्षे मागे आणून टाकलाय त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना, बेरोजगारांना आता न्याय देण्यासाठी शेतीमातीशी जुळलेला आपला हक्काचा माणूस महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना निवडून आणण्याचे आवाहन सभेत केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी खा. अनंत गुढे, बबलू देशमुख, प्रदीप राऊत उपस्थित होते. सकाळी शहरातील महापुरुषांना अभिवादन करून संपूर्ण शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. बळवंत वानखडे यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅली मुळे अमरावती शहरात उत्साह संचारला होता. त्यानंतर झालेल्या सभेला उपस्थित असलेल्या अफाट गर्दीने विरोधकांचे धाबे दणाणले.यावेळी विविध पक्षाच्या वरिष्ठ तसेच स्थानिक नेत्यांनी मनोगत व्यक्त करून विरोधकांना धारेवर धरले. सभेचे संचालन हरिभाऊ मोहोड व प्रवीण मनोहर यांनी केले.
सभेला काँग्रेसच्या नेत्या आ.यशोमती ठाकूर, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख, माजी मंत्री सुनील देशमुख, काँग्रेसचे प्रवक्ते ऍड. दिलीप एडतकर, आ. धीरज लिंगाडे, माजी महापौर डॉ. मिलिंद चिमोटे, भैय्या पवार, हरिभाऊ मोहोड, प्रवीण मनोहर, किशोर बोरकर, विलास इंगोले, बबलू शेखावत, कम्युनिस्ट पार्टचे तुकाराम भस्मे, नितीन कदम, रामेश्वर अभ्यंकर, वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख, अनिसचे ऍड गणेश हलकारे,शिवसेना जिल्हाध्यक्ष सुनील खराटे, प्रीती बंड, धाने पाटील, नाना नागमोते, महानगर प्रमुख पराग गुडधे, श्याम देशमुख,सुधीर सूर्यवंशी, बाळासाहेब भागवत, महेंद्र दिपटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत, शहराध्यक्ष प्रा. हेमंत देशमुख, महिला शहर अध्यक्ष वर्षा भटकर, संगीता ठाकरे,विनेश आडतीया,रमेश बंग, गणेश रॉय, आसिफ तवक्कल, मुक्कद्दर खा पठाण, नसीमभाई, प्रा. सुजाता झाडे, कांचनमाला गावंडे, जयश्री वानखडे, संजय वाघ, मनोज भेले, हरिश मोरे, सुधाकरराव भरसाकले, जयंत देशमुख आदी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
धनशक्ती विरुद्ध माझी उमेदवारी-बळवंत वानखडे
माझी उमेदवारी ही सर्वसामान्यांची उमेदवारी असून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढत असणार आहे. मला जनतेचा आशीर्वाद हवा आहे, तुमची निवडणूक समजून यावेळी मला मतदानरुपी आशीर्वाद द्या तुमचा स्वाभिमान आणि अभिमान मी संसदेत जागृत ठेवल्याशिवाय राहणार नाही असे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
राज्यात ३३ कोटी रोख तर ३१० कोटीच्या वस्तू पकडल्या – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी
मुंबई : राज्यामध्ये दि. 1 ते 28 मार्च या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींच्या जप्तीचा तपशील येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिला असून यात ३३ कोटी रुपये रोकड तर २० लाखाची दारू ,१८६ कोटीचे ड्रग्ज ,४० कोटीचे मौल्यावन धातू व अन्य बाबींचा समावेश असून या सगळ्यांची किंमत ३४३ कोटीच्या घरत आहे , दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून याअंतर्गत अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip)उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी येथे दिली.
मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीबाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर,अवर सचिव तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.
यावेळी श्री. चोक्कलिंगम यांनी सांगितले की, राज्यातील एकुण मतदारांच्या संख्येमध्ये सद्यस्थितीत अंदाजे 1,16,518 अंध मतदार आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip)उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने 40% दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व 85 वयावरील जेष्ठ नागरिकांमधील इच्छुक मतदारांना 12-डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार राज्यभरातून दि. 28 मार्चपर्यंत 85 वयावरील जेष्ठनागरिक यामध्ये 17 हजार 850 मतदारांचे तसेच 40% दिव्यांगत्व असलेले 5 हजार 453 दिव्यांग मतदारांचे 12 डी चे अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा यामधील 53 मतदारांचे 28 मार्च पर्यंत 12 डी चे अर्ज प्राप्त झाले आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांसाठी या निवडणूकीत 190अंतिम मुक्त चिन्हे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत तसेच भारत निवडणूक आयोगाने राज्यामध्ये सहा राष्ट्रीय मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि चार राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्ष यांना मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे राज्यभरामध्ये विविध राजकीय पक्षांच्या 241 एवढ्या प्रमुख प्रचारकांना परवानगी देण्यात आली आहे.
राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिद्धीकरिता माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे / पोस्टर/ ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पुर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम देखरेख व संनियत्रण समिती व अपिलिय समिती गठीत करण्यात आली आहे.सदर समितीकडे पूर्व प्रमाणिकरणासाठी (PRE CERTIFICATION) साठी दोन राजकीय पक्षांचे दोन अर्ज प्राप्त झाले असून कार्यवाही पूर्ण झाली असल्याची माहिती श्री.चोक्कलिंगम् यांनी यावेळी दिली. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राज्यभरातील 48 लोकसभा मतदार संघामध्ये अवैध रोख रक्कम, दारु, ड्रग्ज इ. जप्त करण्यासाठी 1 हजार 656Flying Squad Team (FST) व 2096Static Surveillance Team (SST) स्थापन करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्यासाठी विशेष निरिक्षक (Special General Observer) म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी श्री.धर्मेंद्र एस गंगवार व विशेष पोलिस निरिक्षक (Special PoliceObserver) म्हणून निवृत्त आयपीएसअधिकारी श्री.एन. के. मिश्रा यांची नियुक्ती केली आहे. राज्यामध्ये या निवडणूकीसाठी 98 हजार 114 इतक्या मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्थायंत्रणेमार्फत दि. 28 मार्च पर्यंत 27,745 शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत तसेच 190 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. परवाना नसलेली 557 शस्रेजप्त करण्यात आलेली आहेत. तसेच राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून CRPC कायद्यांतर्गत 27,685 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्तीची माहिती
राज्यामध्ये दि. 1 ते 28 मार्च या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींच्या जप्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक-2024 च्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील 05 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक19 एप्रिलरोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणूकीसाठी रामटेकमध्ये एकुण 35 उमेदवार पात्र ठरले त्यापैकी 7 जणांनी माघार घेतल्याने अंतिम उमेदवारांची संख्या 28 आहे, नागपूर मध्ये अंतिम उमेदवार 26 आहेत, भंडारा-गोंदीया मध्ये 22 उमेदवारांपैकी 4 जणांनी माघार घेतली असून अंतिम उमेदवारांची संख्या 18 आहे, गडचिरोली-चिमूर मध्ये 12 उमेदवारांपैकी 2 जणांनी माघार घेतली असून अंतिम उमदेवारांची संख्या 10 तर चंद्रपूर मध्ये अंतिम उमेदवार 15 आहेत.
पहिल्या टप्प्यात 05लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा तपशिल
निवडणूकीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकास मतदार नोंदणीची प्रक्रीया थांबविण्यात येते व मतदार यादी अंतिम करण्यात येते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी दि. 27.03.2024 रोजी थांबविण्यात आली आहे व या निवडणूकीसाठी मतदारांचा तपशिल खालीलप्रमाणे अंतिम करण्यात आलेला आहे.

मतदारांचा तुलनात्मक तपशील या पाच लोकसभा मतदार संघातील सन 2014 व सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदार संघासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण पाच सर्वसाधारण निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच एकुण तीन पोलिस निरिक्षकांची आणि सहा खर्च निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यातील पोस्टल बॅलेट (Electronically Transmitted Postal Ballet System (ETPBS) द्वारेमतदान करणाऱ्या मतदारांची एकुण संख्या 9 हजार 416 इतकी आहे यामध्ये रामटेक 1 हजार 867, नागपूर 1 हजार 001, भंडारा-गोंदिया 3 हजार 211, गडचिरोली-चिमूर 1 हजार 483 व चंद्रपूर 1 हजार 854 इतके मतदार पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहे.
लोकसभा निवडणूकीचा दुसरा टप्प्याबाबतची माहिती
दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील 05आणि मराठवाडा विभागातील 03 अशा एकूण 08 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक26 एप्रिलरोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया 28 मार्च रोजी सुरु झाली असून 4 एप्रिल नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. 5 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र छाननी करण्यात येईल तर दि. 8 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.
दुसऱ्या टप्प्यातील 08 लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे

मतदानासाठीपुढील 12 पैकीकोणताही एक ओळखीचा पुरावा आवश्यक
आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड,बँक / पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र / राज्य सरकार / PSU / Public Limited कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्र, खासदार / आमदार / MLC यांना जारी केलेली अधिकृत ओळखपत्र, अद्वितीय अपंगत्व आयडी (UDID)कार्ड, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, भारत सरकार.
सदर माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आलेली आहे.
सुनील महाजन म्हणजे सांस्कृतिक विद्यापीठ ः पी.डी.पाटील
पुणे ः ’संवाद पुणे’चे संस्थापक-अध्यक्ष सुनील महाजन यांचे समाजासाठी कार्य खूप मोठे आहे. जे पेराल ते उगवे असे सुनील महाजनांचे कार्य असून त्यांनी सर्वांना प्रेम दिले. महाजन हे सांस्कृतिक विद्यापीठ आहेत, त्यांची सर्व क्षेत्रातील बड्या लोकांशी ओळख असून त्यांच्याकडून आणखी सामाजिक कार्य होत राहो, अशा शुभेच्छा देत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी आपली भावन व्यक्त केली.
पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये गायन, वादन, नृत्यसंगीत, नाटके, बालमहोत्सव आदींचे गेली 40 वर्षे आयोजन करणार्या ‘संवाद पुणे’चे संस्थापक अध्यक्ष सुनील महाजन यांचा वयाच्या एकसष्ठीनिमित्त रसिक पुणेकर व सुनील महाजन गौरव समितीच्या वतीने भव्य नागरी सत्कार शनिवारी बालगंधर्व रंगमंदिरात पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी डॉ. मोहन आगाशे, उल्हास पवार,. मोहन जोशी,शेखर गायकवाड, मा. ल. म. कडू, श्रीमती लीला गांधी, पं. सुरेश तळवलकर, रामदास फुटाणे, मा. राजेश पांडे, डॉ. अभिजित वैद्य, मा. आनंद माडगूळकर, डॉ. संजय चोरडिया, वसंतराव मस्के, आशा काळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, जे पेराल ते उगवे असे सुनील महाजनांचे कार्य असून त्यांनी सर्वांना प्रेम दिले. 1985 मध्ये ते पुण्यात आले, आणि त्यांनी ठरवले व्यवस्थापन करण्याचे ठरविले. सुनील महाजन म्हणजे प्रेमाचा सागर सांस्कृतिक विद्यापीठ आहेत. त्यांनी नेहमीच समाजासाठी काम केले. ते शतायुशी होवो हीच इच्छा अशा भावना पी.डी. पाटील यांनी व्यक्त केल्या.
चंदू बोर्डे म्हणाले, सुनील महाजन त्यांच्यासारखे विविध कार्यक्रमांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन कोणाला करणे जमत नाही. त्यांनी माझ्या वाढदिवसाने इतके पद्धशीर व्यवस्थापन केले. सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर यांच्या सारख्या दिग्गज खेळाडूंशी त्यांनी संपर्क करुन त्यांना माझ्या वाढदिवसाला आमंत्रित केले. ते माझ्या साठी खूप मोठे होते. ही त्यांची सुरुवात आहे, ते शतक नक्की करणार याची मला खात्री आहे. तुमची ही कला समाजाला भरभरुन देत राहो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो यु मस्ट हॅव विन असे त्यांनी नमूद केले.
आशा काळे म्हणाल्या, देवाने मला सुनील महाजन यांच्या रूपाने मोठा पुरस्कार दिला आहे. त्यामुळे आता माला कोणत्याही पुरस्काराची गरज नाही.
सत्काराला उत्तर देताना सुनील महाजन म्हणाले, आपण जर इतरांवर प्रेम केले, तर माणसे आपल्यावरही प्रेम करतात. आपली कदर करणारी माणसे या खूप आहेत. आपण चांगले काम केले तरच ती नक्कीच आपल्याला भेटतात. आयुष्यात संकटे येत राहतात, पण कधी थांबायचे नाही. कारण कधी ना कधी अचूक वेळ देखील येतेच. मी एक कार्यकर्ता म्हणून जगलो आणि यापुढेही जगत राहणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.
’संवाद पुणे’चे संस्थापक-अध्यक्ष सुनील महाजन यांच्या कार्याची यावेळी चित्रफीत दाखविण्यात आली. तसे गौरव विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यावरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर ‘रंग-तरंग’ गीत, संगीत, नृत्य सांस्कृतिक सोहळा संपन्न झाला. यामध्ये नृत्य सहभाग अभिनेत्री शर्वरी जमेनीस, वैशाली जाधव, ऋतुजा जुन्नरकर, वैष्णवी पाटील यांचा असून, गायक जितेंद्र भुरुक, त्यागराज खाडिलकर, योगिता गोडबोले, सुजित सोमण, अश्विनी कुरपे हे आहेत. मिलिंद कुलकर्णी, स्नेहल दामले, योगेश सुपेकर हे निवेदक सहभाग होता.
विधानभवनाच्या वि स पागे केंद्राद्वारे पागे यांचे साहित्य जतन करणार
पुणे : विधानपरिषदेचे सभापती म्हणून वि स पागे यांनी दिलेले निर्देश दिपस्तंभाप्रमाणे नेहमीच मार्गदर्शक ठरत आले आहेत. पागे यांचे साहित्य विधानभवनाच्या वि स पागे केंद्राच्यामाध्यमातून प्रकाशित आणि जतन करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
कै. वि. स. पागे यांच्या ३४व्या स्मृतिदिनानिमित्ताने, आध्यत्मिक विषयावर वि स पागे यांनी केलेल्या प्रवचनांच्या संकलनाचे ‘किंबहुना श्रीनारायणे विश्व कोंदले’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते व माजी आमदार उल्हासदादा पवार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अयोजन ऍड. शशिकांत पागे व दिलीप पागे यांनी केले.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, महाराष्ट्राचे देशामधील योगदान नमूद करताना वि स पागे यांच कार्य विचारात घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. राज्यातील रोजगार हमी योजना ही पागे यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली योजना आहे जी पुढे सर्व देशभर सुरू करण्यात आली आहे. अनेक मजुरांना त्यातून जीवन जगण्याचा मार्ग मिळाला आहे. कोविड काळात या योजनेमुळे अनेक कामगारांना रोजगार मिळण्यास मदत झाली असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
विधानपरिषदेच्या शतकोत्तर महोत्सवानिमित्त तयार करण्यात येणाऱ्या पुस्तकात वि स पागे यांचा सभागृतील भाषणांचा समावेश करण्यात आला आहे. वि स पागे यांचे प्रत्येक गोष्टीतील सार काढणे आणि ते पुस्तकांतून लोकांसमोर सादर करणे हे आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर म्हणाले, वि स पागे यांची आध्यत्मिक, तात्विक आणि धार्मिक या विषयावर दिलेल्या प्रवचनांवरील पुस्तके ही कायमच तरुण पिढीला मार्गदर्शक ठरणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार उल्हासदादा पवार म्हणाले, वि स पागे यांच्याकडे लेखनाचे सामर्थ्य होते. त्यांनी विविध क्षेत्रातील विषयांवर लेखन केलेले आहे जे सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. राज्यात रोजगार हमी योजना यशस्वीपणे राबविण्याच काम त्यांनी केल जी पुढे देशामध्ये लागू करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता पागे यांनी केले तर वि स पागे यांच्या कन्या उज्वला वरदे यांनी आभार मानले.
