पुणे : रोटरी इंटरनॅशनल झोन-४ अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पुणे डायमंड व रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज यांच्या वतीने दिला जाणारा ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ उचित माध्यमचे प्रमुख जीवराज भागाबाई महादेव चोले यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक, जनसंपर्क व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल चोले यांना सन्मानित करण्यात आले.
सेनापती बापट रस्त्यावरील ‘एमसीसीएआय’च्या मुळगावकर सभागृहात झालेल्या या सोहळ्यात रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१चे निर्वाचित प्रांतपाल शीतल शाह यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी व्होकेशनल डायरेक्टर वसंतराव माळुंजकर, झोनल डायरेक्टर प्रकाशकुमार सुतार, शिरीष पुराणिक, रोटरी क्लब पुणे सनराईजचे अध्यक्ष विनीत अग्रवाल, सचिव संध्या तायल, असिस्टंट गव्हर्नर फिरोज मास्तर, राजेश जैन, महेश माखिजा, मनोजीत चौधरी, समीर भिडे आदी उपस्थित होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १२ व्यक्तिमत्त्वांना ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये अवयवदान चळवळीसाठी धीरज गोडसे, शिक्षणासाठी प्रा. रफिक सौदागर, डॉ. एम. डी. लॉरेन्स, सामाजिक कार्यासाठी राम भागवत, झैनाब चिनीकमवला, अनाथांसाठी कार्यरत केशव धेंडे, दिव्यांगांसाठी कार्यरत जाई खामकर, अपंग सैनिकांसाठी कार्यात कर्नल वसंत बल्लेवार, आरोग्य क्षेत्रात कार्यरत ब्रिगेडियर अमरजित सिंग, कर्नल एन. एस. न्यायपती, डॉ. शिवलाल जाधव यांचा समावेश होता.
हा सन्मान विद्यार्थी सहायक समिती, वंचित विकास या संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक कार्यात योगदान देण्यासाठी प्रोत्साहन देईल. उचित माध्यमच्या साहाय्याने समाजातील अनेकांचे उचित कार्य समाजासमोर आणण्याचा प्रयत्न यापुढेही करणार असून, सामाजिक कार्यात अधिक योगदान कसे देता येईल, यावर अधिक लक्ष्य केंद्रित करणार आहे.- जीवराज भागाबाई महादेव चोले, प्रमुख, उचित माध्यम पुणे.