पुणे- भाजपचे राष्ट्रीय नेते विकास करायला नाही शरद पवारांना हरविण्यासाठी बारामतीत येतात , त्यांना हरविण्याच्या वल्गनाही करतात ,पण त्यांच्या भाजपमध्ये उमेदवार नव्हताच म्हणून त्यांनी पवारांचेच घर फोडले, मोठी वाहिनी आई समान असते ,त्यांनाच त्यांनी रणांगणात आणले यातून त्यांची नीती समजते असे खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे म्हटले आहे.केजरीवाल प्रकरणी बोलताना त्या म्हणाल्या , स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कितीतरी लोकांनी बलिदान दिलेले आहे. स्वातंत्र्याने मिळालेली लोकशाही हटवून आता दडप शाही लादण्याचा प्रयत्न होणार असेल तर कितीही किंमत द्यावी लागली तरी तो आम्ही हाणून पाडू. त्या म्हणाल्या,’माझी लढाई भाजपाच्या विचारा विरोधी , सुनेत्रा वाहिनी किंवा व्यक्ती विरोधात नाही , महागाई, बेरोजगारी ,पाण्याचे प्रश्न पर्येक कुत्म्बाच्या ,शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणे आणि प्रत्येकाची प्रगती व्हावी यासाठी विकासाच्या दृष्टीने वाटचाल राहावी म्हणून माझी लढाई आहे , माझ्यावर आज पर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही , मेरिटवर लोकांनी माझा विचार करावा
तळजाई पठार येथे रस्त्यावर पिस्तूल घेऊन थांबलेल्या १९ वर्षीय गुन्हेगाराला पोलिसांनी पकडले
पुणे- तळजाई पठार धनकवडी येथे विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक पिस्टल, एक जिवंत काडतुस असा 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.29) तळजाई पठार धनकवडी येथे करण्यात आली. वैभव उर्फ संयम प्रकाश कटरिया (वय-19 रा. साईली ईन एरीया, चैतन्य नगर, एमआयडीसी बारामती ता. बारामती ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत.
संत विचारांच्या प्रसारासाठी संगीत प्रभावी माध्यम – डॉ. चैतन्य कुंटे
संत तुकाराम महाराज बीज निमित्त आयोजन
पुणे-भारतात अनेक संप्रदाय असून प्रत्येकाचे स्वतंत्र संगीत आहे, संगीत हे विचार मांडण्याचे साधन म्हणून संतांनी वापरले. संगीत परंपरांमध्ये होत असलेल्या भेसळींमुळे मुळ संदेशाला तडा जात आहे, अशी खंत डॉ. चैतन्य कुंटे यांनी व्यक्त केली.
संत तुकाराम महाराज बीज निमित्त, ‘संत तुकाराम महाराज विचार व्यासपीठ’ यांच्या वतीने आयोजित तीन दिवसीय’ तुका झालासे कळस’ या जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे वेगळेपण दर्शवणा-या कार्यक्रमाचे उद्घाटन पंडीत यादवराज फड, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, जीवनज्योत फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप चोरघे, तानाजी निम्हण, प्रा. वि. दा. पिंगळे, डॉ. चैतन्य कुंटे, पालवे शास्री यांच्या हस्ते झाले.
पालवे शास्री म्हणाले की, तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचा कळस शोभतात.त्यांची गाथा म्हणजे पाचवा वेद मानावा लागेल. भागवत धर्माची पताका तेवत ठेवण्यासाठी तुकाराम महाराजांचे विचार समजून घ्यावे व आत्मसात करावेत.
या विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन कोथरुड मधील गांधीभवन येथे शुक्रवार दि. २९ ते रविवार दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत संध्याकाळी ६ ते ९ या वेळात, आयोजन केले आहे.
उद्घाटनसत्रानंतर ‘ सांप्रदायिक तुकाराम ‘या विषयावर डॉ. चैतन्य कुंटे, पालवे शास्री यांनी विचार मांडले. ईशानी हिंगे हीच्या बोलावा विठ्ठल या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
जितेंद्र मैड यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन प्रा. सागर शेडगे यांनी केले. अँड. शिवाजी भोईटे यांनी आभार मानले.
कांचन कुंबरे, सुरेखा होले, मारोती माने, वामन वाघेरे, बाबाजी वाघ, संदीप कुंबरे, कुणाल वेडेपाटील, शशांक अमराळे, धनंजय झुरंगे आदी उपस्थित होते.
लोणावळ्यातील एका बंगल्यात पॉर्न व्हिडिओ करणारी टोळी जेरबंद
लोणावळा : भारत देशामध्ये अश्लील व नग्न चित्रीकरणास तसेच प्रसारणास बंदी असल्याचे माहिती असताना देखील स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने अश्लील चित्रफित बनविणाऱ्या 15 जणांसह त्यांना बंगला भाड्याने देणाऱ्या तीन जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवि कलम 292, 293, 34 माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 कायदा कलम 67, 67 (A), स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपन अधिनियम 1986 कायदा कलम 3, 4, 6, 7 प्रमाणे शुक्रवारी (29 मार्च) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस उप निरीक्षक भारत भोसले यांनी सरकारी फिर्याद दिली आहे. यानुसार विश्णु मुन्नासाहब साओ (वय-30, रा.16 परगना, कोलकत्ता), जावेद हबीबुल्ला खान (वय-35, रा. आहरा उमरी, जि. बस्ती, उत्तरप्रदेश), अलका राज के राजन (वय 23, रा. आरपी, साउथ वेस्ट दिल्ली), नेहा सोमपाल वर्मा (वय 38, रा. गणेशपुरी, मुजफानगर, उत्तरप्रदेश), रिया वासु गुप्ता (वय 21, रा. लक्ष्मीनगर, शखरपुर, दिल्ली), बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास (वय-29, रा. महाकाली कॉलनी, चंद्रपुर), समीर मेहताब आलम (वय 26, रा. अमरोहा, राईड मॉक्सी, उत्तरप्रदेश), अनुप मिथीलेष चौबे (वय 29, रा. काशीबाई चाळ कांदिवली ईस्ट, मुंबई), रामकुमार श्रीभगवान यादव (वय 21, रा. रोनक सिटी, शाम कॉलनी, हरियाणा), विना भारत पोवळे (वय 32, रा. केंगार चाळ, खोपट, ठाणे), मैनाज जाहीद हुसेन खान (वय 28, रा. सनसिटी, नालासोपारा वेस्ट, जि. पालघर), राहुल सुरेश नेवरेकर (वय 38, रा. मोहनचाळ, वागळे इस्टेट, ठाणे), अनिकेत पवन शर्मा (वय 19, व्यवसाय मेकअप आर्टीस्ट, रा. रूद्राक्ष रेसिडेन्सी, पलसाना, सुरत, राज्य गुजरात), वंशज सचीन वर्मा (वय 21, रा. डेहराखास, डेहराडुन), मनीश हिरामण चौधरी (वय 20, रा. शास्त्रीनगर, हरीयाणा) यांच्यासह बंगला चालक सुखदेव चांगदेव जाधव (वय 52, रा. मळवली, ता. मावळ), आकेष गौतम शिंदे (वय 32, रा. मळवली, ता. मावळ) व सनी विलास शेंडगे (वय 35, रा. मळवली, ता. मावळ, जि.पुणे) यांच्या विरोधात सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
29 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या पूर्वी पाटण गावाच्या हद्दीत असलेल्या आर्णव व्हील या बंगल्यात सदरचे अश्लील चित्रीकरण करण्यात आले असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ अधिकचा तपास करत आहेत.
आरएसएसचा मनुवादी अजेंडा हाणून पाडण्यासाठी भीमशक्तीचा काँग्रेस आघाडीला पाठिंबा: खासदार चंद्रकांत हंडोरे
भाजपाचा ४०० पार चा नारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्यासाठी.
भिमशक्तीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक चेंबूरच्या नालंदा हॉलमध्ये संपन्न.
मुंबई, दि. ३० मार्च-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून भारताला हिंदू राष्ट्र बनवणे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना बदलणे हा त्यांचा अजेंडा आहे. भाजपाचा ४०० पारचा नारा हा दोन तृतियांश बहुमतासाठी असून एवढे बहुमत मिळाले की भाजपा राज्यघटना बदलणार हे भाजपाचे नेतेच जाहीरपणे सांगत आहेत. आरएसएस व भाजपाचा हा अजेंडा हाणून पाडण्यासाठी भिमशक्ती काँग्रेस आघाडीला पाठिंबा देत असल्याचे भिमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष, खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी जाहीर केले आहे.
चेंबूरच्या नालंदा हॉल येथे भीमशक्तीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ऑनलाईन संबोधित केले. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रकांत हंडोरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यास २७२ खासदार लागतात परंतु भाजपाने अब की बार ४०० पार चा नारा दिला आहे. ४०० जागांवर विजय मिळवण्यामागचा भाजपाचा हेतू दोन तृतियांश बहुमत मिळवणे व त्यानंतर डॉ. बाबासाहेबांच्या राज्यघटनेला हात घालून ते बदलणे हा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना बदलल्यानंतर आरएसएसचा मनुवादी अजेंडा लागू होईल. भाजपाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी भिमशक्तीने महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचा ठराव पास केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना वाचवणे हे आंबेडकरी जनतेची जबाबदारी आहे. काँग्रेस पक्ष राज्यघटना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. खासदार राहुल गांधी यांनी राज्यघटना व लोकशाही वाचवण्यासाठी देशभर पदयात्रा काढून जनजागृती केली आहे. भाजपाचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी भिमशक्तीचे कार्यकर्ते दलित समाजात जनजागृती करतील, घरोघरी जातील, तालुका, जिल्हा, गावा-गावात जातील.
ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आदरच आहे परंतु राज्यघटना वाचवण्यासाठी आंबेडकरी जनतेने एकत्र आले पाहिजे. वंचित बहुजन आघाडीला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जेवढी मते मिळाली होती तेवढी मते विधानसभा निवडणुकीत मिळाली नाहीत. या दोन निवडणुकीत त्यांच्या मतांमध्ये मोठी घसरण झाली आहे. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस आघाडीला फटका बसेल असे वाटत नाही असेही चंद्रकांत हंडोरे म्हणाले.
भिमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत भिमशक्तीचे कार्याध्यक्ष व नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे, भिमशक्ती मध्य प्रदेशचे अध्यक्ष सुनिल बोरसे, गोवा प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर वारखेडकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष दिनकर ओकार, उपाध्यक्ष नामदेव पिंपळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष शशिकांत बनसोडे, सरचिटणीस गोपाळराव नेत्रपाळे, सरचिटणीस रवी सोनकांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
परिवारवादी मानसिकता जपणाऱ्यांना पराभूत करा- मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार
मुंबई दिनांक ३० मार्च २०२४
‘मी आणि माझे कुटुंब’ अशा परिवारवादी मानसिकता जपणाऱ्यांना पराभूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज दादर वसंत स्मृती येथे केले. लोकतंत्र सेनानी संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, आणीबाणीच्या काळात असंख्य लोकांना यातना सहन कराव्या लागल्या. ज्यांनी आणीबाणी लावली ते लोक आजही त्याला चूक/ पाप मानायला तयार नाहीत. त्या मानसिकतेचे समर्थन आजही केले जाते. एक व्यक्ती, एक पद आणि एक नेता अशी कार्यप्रणाली आजही काँग्रेसमध्ये आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधींवरील एका सुनावणी दरम्यान न्यायाधीशापेक्षा पंतप्रधानांची खुर्ची मोठी होती यातून त्यांची मानसिकता दिसून येते. देशाच्या लोकशाहीचे रक्षण करण्याचे काम लोकतांत्रिक सेनानी यांनी केले आहे. त्या विचारधारेच्या विरोधात लढाई आजही चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला प्रधान सेवक म्हणून ‘सबका साथ सबका विकास’ नारा देतात आणि काँग्रेसचा नारा ‘आय एम इंदिरा, आय एम इंडिया’ असा होता अशीही टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर जाऊन आणीबाणीत तुरुंगात गेलेल्या नागरिकांची पेन्शन बंद केली. हिंदुत्वाचे विचार सोडले. त्यामुळे आजच्या घडीला लोकशाही वाचवण्यासाठी या मानसिकतेचा पराभव करणे गरजेचे आहे असेही आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले. यावेळी लोकतंत्र सेनानी संघाचे राष्ट्रीय सचिव कोमल छेडा, मुंबई भाजपा उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा, मधू कोटियन, उदय धर्माधिकारी, विवेक मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडणुकीत कोणालाही पाठिंबा नाही, अपक्ष उमेदवारही देणार नाही; जरांगे पाटलांची घोषणा
जालना–
लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक जिल्ह्यात अपक्ष उमदेवार उभे करणार होते, त्यासाठी त्यांनी विविध जिल्ह्यामधून मराठा समाजबांधवांकडून अहवाल देखील मागविला होता. या अहवालानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये मी कोणालाही पाठिंबा देणार नाही. कोणताही अपक्ष उमेदवार देखील उभा करणार नाही, ज्यांना ज्या उमेदवाराला पाडायचं त्यांनी त्या उमेदवाराला पाडावं, पराभूत करावं. पण समाजाच्या मागण्यांसाठी मी निवडणुकीच्या आडून राजकारण करू इच्छित नाही, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ते आंतरवाली सराटीमध्ये आयोजित मराठा समाजबांधवांच्या बैठकीत बोलत होते.मराठा आरक्षणासाठी राज्यभर रानं पेटवणारे मनोज जरांगे पाटील हे या लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागून होते. यासंदर्भात 24 मार्च रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी बैठक देखील झाली. त्यानंतर गावागावाच जाऊन उमेदवार उभा करायचा का, एकच अपक्ष उमेदवार उभा करायचा याची विचारपूस करावी, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. त्यानंतर आज शनिवारी पुन्हा मराठा समाजाबांधवांची एकत्र बैठक पार पडली. या ठिकाणी लोकांनी आणलेल्या अहवालानंतर चर्चा झाली. अखेर मराठा समाजबांधवांनी आणलेल्या अहवालानंतर जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
जरांगे म्हणाले की, लोकसभा असो किंवा अन्य कोणतीही निवडणूक हा आपला प्रांत नाही. निवडणुकीच्या आडून मी मायबाप समाजाचे नुकसान होऊ देणार नाही. ज्यांना ज्यांना ज्या उमेदवाराला पाडायचं, सपोर्ट करायचा हा ज्याचा त्याचा व समाजाबांधवांचा प्रश्न आहे. यात कोणाचाही पाठिंबा मी देणार नाही कोणालाही मदत करणार नाही. अशी भूमिका त्यांनी घेतली. तसेच आपण अपक्ष उमेदवार देखील देणार नाही, अशी घोषणा जरांगे पाटील यांनी घेतली.
जरांगे पाटील व प्रकाश आंबेडकर यांची भेट
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी रात्री भेट घेतली. आंतरवाली सराटीमध्ये मध्यरात्री बाराच्या सुमारास प्रकाश आंबेडकर हे आंतरवाली सराटी मध्ये दाखल झाले. यावेळी मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. तर या भेटीसंदर्भात दोन्ही नेत्यांनी बोलणे टाळले. ही केवळ सदीच्छा भेट होती, असे आंबेडकर म्हणाले. तर प्रकाश आंबेडकर साहेब यांनी अचानक घरी भेट दिली. ते ज्येष्ठ नेते आहेत, ते भेटायला आले त्यांचे मनापासून स्वागत केले, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले होते.
तमाशा बदलला असला, तरी त्याचे मूळ स्वरूप बदललेले नाही…!
लोककला अभ्यासकांचे निरीक्षण

मुंबई -(प्रतिनिधी ) लोकपरंपरेत अनेक स्थित्यंतरे आली आणि गेली आहेत. अनेक मर्यादा ओलांडून त्यांनी आपली कुस बदलली).कारण ह्या वैश्विक कला आहेत.कालानुरूप असे बदल होत राहतील.अशा स्पष्ट शब्दात लोककला अभ्यासकांनी एका परिसंवादात आपले निरीक्षण नोंदविलेले असतानाच,आजमितीला तमाशा जरी बदललेला दिसला,तरी त्याने आपला मूळ स्वभाव सोडला नाही. त्याचे स्वरूप ही बदलले नाही.असा ठाम विश्वास ही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या सहयोगाने कलिना येथील मुंबई विद्यापीठात येथे बुधवारी (दि.27मार्च) रोजी “आधुनिक तमाशाची जडण – घडण”या विषयावर लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चा सत्रात लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, अकॅडमी ऑफ थिएटर आर्टसचे प्रा. डॉ. मंगेश बनसोड, जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड सहभागी झाले होते. तर डॉ मोनिका ठक्कर यांनी या चर्चा सत्राचे सूत्रसंचालन केले.
जडण घडण म्हणजे काही तरी घडलेले असते. तमाशात एकाच वेळी गण गौळण बतावाणी, वगनाट्य दाखविली जातात. तमाशात सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, रजवाडी वगनाट्य दाखविली जातात.त्यामध्ये विविधता असते.या कलेत सतत बदल होत असतात. तरी तमाशाने कधी ही आपले मुळ स्वरूप बदलेले नाही. मात्र कालांतराने या लोककलेला अनेक मर्यादा ओलांडाव्या लागल्या. कारण ह्या वैश्विक कला आहेत. या कलेमध्ये आव्हानं स्वीकारण्याचे सामर्थ्य आहे.असे स्पष्ट मत लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी व्यक्त केले.
तर आधुनिक तमाशाची जडण घडण याविषयावर बोलताना प्रा. डॉ गणेश चंदनशिवे यांनी विविध विषयाला हात घालून तमाशाची सुरुवातीपासूनची परंपरेची माहिती दिली.जेव्हा – जेव्हा स्थित्यंतरे आले, तेव्हा – तेव्हा तमाशाने आपली कूस बदललेली आहे.प्रत्येक चळवळीत तमाशाने समजाला साथ दिली. मग ते लोकनाट्य माध्यमातून असो. की वगनाट्यातून. सुरुवातीला तमाशाचे स्वरूप ओबड धोबड होते. विधिनाट्यातून तमाशाचा जन्म झाला.आख्यानातून तमाशा सादर केले जायचा.तमाशाचा उल्लेख अनेक संतांच्या लेखणीतून आला. पारशी, अरबी, उर्दू भाषेमध्ये ही तमाशाचा उल्लेख आहे.तमाशाने वगातून समाजप्रबोधन केले.येवढी लेखणीत ताकद असायची. मात्र अलीकडे लिहिणार माणूस सापडत नाही. त्यामुळे तमाशाचे बलस्थान हरवत चालले की काय?याची चिंता वाटू लागली असल्याचे यावेळी डॉ. चंदनशिवे यांनी स्पष्ट केले.
तमाशाला अडीचशे ते तीनशे वर्षाची परंपरा आहे.अनेक टप्प्यात तमाशात बदल होत गेलेत . मात्र सध्याच्या तमाशावर चित्रपटाचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे तमाशाचे मूळ अस्सल बीज कोमजले आहे. काळानुरूप बदल होत राहतील. पण गण गौळण वगनाट्य सारखी परंपरा जपली पाहिजे. अशी अपेक्षा यावेळी अकॅडमी ऑफ थिएटरचे प्रा डॉ. मंगेश बनसोड यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी युरोपमध्ये एका लोककलेच्या सेमिनारमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना काही मजेशीर आठवणी ही सांगितल्या.आम्ही युरोपमध्ये 36 देशातील विदयार्थ्यांसमोर इंग्रजीतून गण साजरा केला. बतावणी इंग्रजीतून केली. तीन दिवसात गण गौळण बतावणी इंग्रजीतून सादर करणे सोपे काम नव्हते. पण ते आव्हान आम्ही स्वीकारले होते. कलेची वर्तमानाची नाळ जोडताना, कलावंतांनी पारंपारिकता जपली पाहिजे.असा मोलाचा सल्ला ही यावेळी त्यांनी दिला.
पाश्चात संस्कृतीमुळे तमाशाचे विद्रुपीकरण होवू नये. सध्या तमाशात चित्रपटाची गाणी सादर केली जातात.जवळ जवळ आता वगनाट्य सादर केली जात नाहीत.मात्र किती ही सामाजिक संकट आली, तरी तमाशा कलावंतांनी आपले मूळ स्वरूप हरवू देवू नये. असे यावेळी आपले स्पष्ट मत जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड यांनी व्यक्त केले.
लोककला अकादमीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवाजी वाघमारे यांनी शिलकार गाऊन वातावरण तमाशामय केले. परिसंवादाच्या शेवटी अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असा गण गाऊन कलारसिकांच्या टाळ्या मिळविल्या.
डॉ. अर्चना पाटील यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यात भाजपा ला आणखी बळ मिळेलउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
मुंबई- माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेस चे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकुरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, लातूरचे महायुतीचे उमेदवार भाजपा खा. सुधाकर श्रुंगारे, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. राणा जगजीतसिंह पाटील, माजी आमदार सुधाकर भालेराव, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, विक्रांत पाटील, माधवी नाईक, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, बसवराज पाटील आदी उपस्थित होते. डॉ. अर्चना पाटील यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला मराठवाड्यात आणखी बळ मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. याच कार्यक्रमात उदगीरचे नगराध्यक्षपद अनेक वर्षे भूषविणारे राजेश्वर निटुरे यांनीही यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. अर्चना पाटील आणि राजेश्वर निटुरे यांचे स्वागत केले.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेली 10 वर्षे पंतप्रधान मोदी ज्या प्रकारे देशाच्या विकासाला दिशा, गती देत आहेत त्याने प्रभावित होऊन डॉ. अर्चना यांनी सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात येण्याचा व भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामाणिक व मूल्याधिष्ठीत राजकारण करणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज चाकुरकर यांचा समृद्ध वारसा डॉ. अर्चना भाजपामध्ये काम करून पुढे नेतील, असा विश्वास आहे. अर्चना पाटील यांच्या प्रवेशामुळे लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार सुधाकर श्रुंगारे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असेही त्यांनी नमूद केले. सर्वसामान्यांसाठी कार्य करणारे, उदगीरचे 8 वेळा नगरसेवक व 7 वेळा नगराध्यक्ष राहीलेले श्री. निटुरे यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला अनुभवी, परिपक्व नेतृत्व लाभले आहे या शब्दांत श्री. फडणवीस यांनी श्री. निटुरे यांचे स्वागत केले.
डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देशाचा विकसनशील ते विकसीत देश असा वेगवान व विलक्षण प्रवास सुरू आहे. नारी शक्ती वंदन विधेयक पारित करून मोदीजींनी महिलांचा सन्मान राखला. महिला आरक्षणाचा कायदा संमत झाल्यानंतर आपण भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला. जात, धर्म-पंथ या पलिकडे जात समाजातील शेवटच्या माणसाचा विकास हा मोदीजींचा ध्यास असून त्यांना साथ देण्याची आपली इच्छा आहे. भाजपा नेतृत्व जी जबाबदारी देईल ती सचोटीने पार पाडू असेही त्यांनी सांगितले.
निवडणूक आचारसंहितेच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांचा पुढाकार
भाजपा शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी/ जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची भेट
मुंबई दिनांक ३० मार्च २०२४
मुंबईतील लोकसभा निवडणुकीची सूचना अद्याप काढली नसताना काही शासकीय अधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आचारसंहितेच्या नावाखाली भाजपा कार्यालयावर निर्बंध लादत आहेत या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहितेच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी/ जिल्हा निवडणूक अधिकारी यांची भेट घेतली. यावर आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी मुंबई भाजपा शिष्टमंडळाला दिली.
निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी दि. १६ मार्च २०२४ रोजी देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा केली केली असून त्या दिवसापासून आचारसंहिता लागु करण्यात आली आहे. मुंबईची निवडणूक २० मे रोजी होणार आहे त्याची अधिसूचना २६ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. परंतु काही शासकीय अधिकारी व मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांनी पक्षाच्या कार्यालयातील बोर्डवरील नावे कपड्याने झाकायला सांगत आहेत तसेच कार्यालय परिसरातील झेंडेही काढण्यास सांगत आहेत. अशाप्रकारे आचारसंहितेच्या नावाखाली आतापासूनच विविध निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज भाजपा
शिष्टमंडळाने उपनगर जिल्हाधिकारी क्षीरसागर यांची भेट घेतली. यावेळी माजी स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट, ॲड.अमित मेहता, ॲड. राहुल तिवारी, अलका कानबार – नरसाळे, युनूस खान, अमित सिंग, संतोष मेढेकर, ॲड. संदीप दुबे, श्रीकृष्ण आंबेकर, राजेश दाभोळकर, बोनेरा बटूल आदी उपस्थित होते.
मतदार यादीत कोणताही दोष नाही; तांत्रिक त्रुटींची तात्काळ दुरुस्ती-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे स्पष्टीकरण
पुणे, दि. ३०: मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा निवडणूक प्रशासनाने मतदार यादी शुद्धीकरणासाठी विशेष प्रयत्न केले असल्याने मतदार यादीत कोणतेही दोष नसून काही ठिकाणी आढळलेल्या तांत्रिक त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहे. नागरिकांनी मतदार यादीबाबत काही शंका असल्यास नागरिकात संभ्रम होईल अशी माहिती इतरत्र न देता प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
भोर विधानसभा मतदारसंघातील काही नावे गुजरातीत असल्याबाबत आलेल्या तक्रारीनंतर काही माध्यमांनी ‘मतदार यादीत घोळ’, ‘मतदार यादीत अनेक नावे बोगस लावली’ अशा आशयाचे वृत्त दिले आहे. म्हाळुंगे येथील संतोष मोहोळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हे वृत्त देण्यात आले आहे. श्री.मोहोळ यांनी आपल्या तक्रारीत म्हाळुंगे येथील मतदार यादी क्रमांक १०४ ते १०९ मधील अनेक मतदारांची नावे गुजराती भाषेत आहेत. तसेच एका मतदाराचे नाव म्हणुन मंदिराचे नाव यादीत आहे. याबाबत बोगस मतदार असण्याची शक्यता व्यक्त करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. प्रशासनाने त्याच दिवशी अर्थात २७ मार्च रोजी पत्राची तात्काळ दखल घेवून श्री.मोहोळ यांना प्रशासनाने यापूर्वीच केलेल्या कार्यवाहीविषयी पत्राद्वारे माहिती दिली होती.
निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये एका ठिकाणी मतदार यादीत असलेल्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी नमुना अर्ज क्र. ८ (स्थलांतर/पत्त्यात बदल) भरता येतो. राज्यातील विविध भागातून तसेच वेगवेगळ्या राज्यातून मुळशी तालुक्यातील हिंजवडी, सूस, म्हाळुंगे, बावधन बु., माण, मारूंजी या भागात रोजगार, नोकरी व्यवसाय निमित्त स्थलांतर होत असल्याने तेथील नागरीक या भागात रहिवासास आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने नमुना अर्ज क्र. ८ (स्थलांतर/पत्त्यात बदल) भरत असतात.
प्रस्तुत प्रकरणात ३ मतदार हे सद्यस्थितीत सदर यादी भागाचे सर्वसाधारण रहिवाशी असून ते या यादी भागात रहिवासास येण्यापुर्वी गुजरात राज्यात रहिवासासाठी होते. त्यांनी मतदार यादीच्या संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने नमुना अर्ज क्र. ८ सादर केल्यांनतर त्यासोबत जोडलेले रहिवासाचे कागदपत्रे तपासून सदर अर्ज स्विकृत करण्यात आला. त्यानंतर मतदाराचा पूर्वीच्या मतदार यादीतील ठिकाणचा इंग्रजी भाषेतील तसेच तेथील स्थानिक भाषेतील नावाचा तपशील इकडील कार्यलयास प्राप्त होतो. त्यामुळे सदर मतदार हे या यादी भागात समाविष्ठ झाल्यानंतर संगणकीय प्रणालीवरील सुविधेच्या आधारे त्यांची नावे स्थानिक भाषेत रूपांतरीत करण्यात येत असतात. आतापर्यंत बाहेरच्या राज्यातून अशा प्रकारे स्थलांतरित झालेल्या मतदारांच्या नावाचे स्थानिक भाषेत रूपांतरण करण्यात आले आहे. ही प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची आहे.
वृत्तात यादी भागात एका महिला मतदाराच्या नावाबाबत उल्लेख करण्यात आला आहे. हे नाव यादी भागात पुर्वीपासून होते. सदर महिला मतदाराच्या नावाच्या तपशीलामध्ये नावाऐवजी सर्वसाधारण रहिवास पत्त्याच्या जवळचा परिसर म्हणून तेथील स्थानिक मंदिराचे नाव अर्जदार यांचेकडून अर्जात भरले गेल्याने ते नाव मुद्रीत झाले होते. त्यानंतर मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून मतदारांच्या स्थानिक रहिवासाची पडताळणी सुरू असताना सदर मतदार स्थलांतरीत झाले असल्याबाबत निदर्शनास आले आहेत. त्यांचे नाव कमी करणेसाठी अर्ज क्र. ७ भरून घेण्यात आला आहे. या यादी भागातील जे मतदार त्यांच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणी येत नसतील त्यांची निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वतंत्र एसडी (अनुपस्थित/स्थलांतरीत/मृत) अशी यादी तयार करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.
निवडणुका नि:ष्पक्ष आणि पारदर्शक वातारणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटीबद्ध असून मतदार यादी पूर्णत: शुद्ध आणि त्रुटी विरहीत राहील यासाठी प्रशासनातर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनीदेखील अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.
विरोधकांच्या राज्य घटना बदलाच्या अपप्रचाराला खोडून काढा-
मुरलीधर मोहोळ यांचेसाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मॅरेथॉन बैठका
दोन दिवस भाजपा पुणे शहरच्या सर्व आघाड्यांच्या सविस्तर बैठका घेऊन आढावा
मोदीजींचे काम मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करण्याची सूचना
पुणे- लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली आहेत. दोन दिवस पक्षाच्या सर्व आघाड्यांच्या बैठका घेऊन मताधिक्य वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.विरोधकांकडे मुद्दे नसल्याने, ते राज्यघटना बदलाचा अपप्रचार करत आहेत. उलट कॉंग्रेसने स्वतः च्या स्वार्थासाठी ४० वेळा घटना बदल केला. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करुन हुकूमशाही आणली. त्यामुळे हे सर्व जनतेसमोर मांडून विरोधकांचे मुद्दे वेळीच खोडून काढा, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग मिळाला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. शुक्रवारी महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, व्यापारी आघाडी, मंडल अध्यक्ष, विस्तारक सोशल मीडिया आणि आयटी सेल यांची बैठक घेतली. शनिवारी अनुसूचित जाती मोर्चा, झोपडपट्टी आघाडी, वैद्यकीय आघाडी, पर्यावरण आघाडी, उत्तर व दक्षिण भारतीय आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, सहकार, पायाभूत सुविधा, शिक्षक भटके विमुक्त आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला. तसेच, पदाधिकाऱ्यांच्या सूचना देखील जाणून घेतल्या.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या आहेत. तसेच, वर्षानुवर्षे प्रलंबित अनेक विषय मार्गी लावले आहेत. आपल्या मानबिंदूंची पुनर्स्थापना केली आहे. त्यामुळे त्यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे. राज्य सरकारने ही अनेक जटिल विषय मार्गी लावले आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण घेणे सोपे व्हावे यासाठी; आठ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना शिक्षण मोफत केले. आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून दिला. नुकतेच त्याचे भूमिपूजन देखील झाले.
ते पुढे म्हणाले की, कोविड काळात मुरलीधर मोहोळ यांनी महापौर नात्याने पुणे शहराला केले काम फारच परिणामकारक होते. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे पुणे शहराने कोविडवर यशस्वी मात केली. पुणेकरांना याची जाणीव आहे. त्यामुळे मोदीजींना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी आणि मुरलीधर मोहोळ यांना खासदार बनविण्यासाठी पुणेकर मतदान करणारच आहेत. पण तरीही कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना दिल्या.
शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, देशातील सर्वसामान्यांचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास आहे. मोदीजींनी सर्वसामान्यांचा नेहमीच विचार केला. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांच्या काळात देशात केलेले काम, विकास कामे सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यात यावे, असे आवाहन केले.
या बैठकीला शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, पुणे लोकसभा निवडणूक प्रभारी श्रीनाथ भिमाले, सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र बापू मानकर, रवी साळेगावकर यांच्या सह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी सर्वच आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुरलीधर मोहोळ विक्रमी मतांनी विजयी होतील, असा संकल्प व्यक्त केला.
सीएए निर्वासितांना नागरिकत्व देणारा कायदा- ना. पाटील
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेला नागरिकता सुधारणा कायदा हा पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आदी देशातील त्रासाला कंटाळून भारतात आलेल्या निर्वासित सहा धर्मियांना नागरिकत्व देणारा कायदा आहे. कोणाचंही नागरिकांचं नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही. त्यामुळे सीएएबद्दल जनजागृती करावी, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
कर्कश आवाज करुन दुचाकी पळविण्या-या शायनिंगखोर वाहनचालक आता पुणे पोलिसांच्या रडारवर ..
पुणे-बुलेट गाडीचे सायलेन्सर मध्ये फेरबदल करुन कर्कश आवाज करुन जोर जोरात दुचाकी पळविण्या-या शायनिंग खोर वाहन चालकांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.
दि.२७/०३/२०२४ रोजी रात्रौ २०/०० वा ते दि २८/०३/२०२४ रोजी ०६/०० वा पर्यत सिहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत बुडगाव पुलाखाली पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३. पुणे शहर यांचे आदेशान्वये नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान एकुण ११७ दुचाकी वाहने ताब्यात घेतली त्यांचेवर फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपलसिट वाहन चालविणे, विनापरवाना वाहन चालविणे, बुलेट वाहनाचे सायलेन्सरमध्ये Modification केलेबाबत कारवाई करण्यात आली.
एकुण ३३ बुलेट चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये विविध तरतुदीचा भंग केलेबाबत कारवाई केली त्यापैकी ११ वाहने मोटार वाहन कायदा कलम २०७ प्रमाणे त्याबाबत घेतली होती. त्यांचेवर Modified सायलेन्सर बसविलेबाबत कारवाई केली. संबधित बुलेट मालकाकंडुन त्यांचे बुलेटचे Modified केलेले सायलेन्सर काढुन घेतले त्याचप्रमाणे वाहन मालकांकडुन वाहनांना Original सायलेन्सर लावुन घेतले तसेच मोटार वाहन कायद्यामधील इतर तुरतुदीनुसार फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपलसिट, Modified सायलेन्सर बसविलेबाबत एकुण ५३,०००/- रु.दंड आकारण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३. पुणे संभाजी कदम सहा पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग अतिरिक्त पदभार सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, . भिमराव टिळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रविण जाधव, सहा. पोलीस निरीक्षक निकेतन निंबाळकर, पोलीस उप निरीक्षक आत्माराम आहिरे सिहंगड रोड वाहतुक विभाग पोलीस अंमलदार धनंजय गिरीगोसावी, दयानंद काबळे, मल्हारी सोनकांबळे व आरसीपी ३ प्लाटुन यांचे पथकाने केली.
गीता धनावडे या विद्यार्थिनीची इस्रो प्रशिक्षणासाठी निवड
पुणे-डीईएसच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी गीता धनावडे हिची इस्रो प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. इस्रोच्या ‘युविका 2024’ या कार्यक्रमाअंतर्गत ही निवड करण्यात आली. त्यासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत गीताने संपूर्ण देशात सहावा क्रमांक पटकाविला.
अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन सेंटर (एसएसी) येथे 12 ते 24 मे या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. मुख्याध्यापिका वासंती बनकर यांनी गीताच्या यशाबद्दल तिचे आणि पालकांचे अभिनंदन केले आहे. गीताने राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात विजेतेपद मिळविले असून, राज्यस्तरीय ऑलिंम्पियाड स्पर्धेत ही विजेतेपद प्राप्त केले. गीताने जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत विजेती आहे.
शिवरायांचा इतिहास सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावा -पतित पावन संघटनेची मागणी
पुणे : अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सीबीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये देखील शिकविला जाणे गरजेचे आहे. सीबीएससी बोर्डाच्या २७ हजारहून अधिक मान्यता प्राप्त शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु सीबीएसई बोर्डाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा विसर पडला आहे, याकरिता पतित पावन संघटनेतर्फे सीबीएसई बोर्डाचे रिजनल ऑफिसर राम वीर यांना निवेदन देण्यात आले.
सीबीएसई बोर्ड पुणे विभागीय कार्यालय येथे निवेदन देण्याच्या प्रसंगी संघटनेचे पुणे शहराचे अध्यक्ष स्वप्नील नाईक, शैक्षणिक विभाग समन्वयक ध्रुव जगताप, पुणे शहराचे उपाध्यक्ष प्रसाद वाईकर आदी उपस्थित होते. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीतून आज परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याकरिता संघटनेने हे निवेदन दिले आहे.
स्वप्नील नाईक म्हणाले, शिवरायांच्या ऐतिहासिक वारसा देशातल्या नवीन पिढीला अभ्यासता यावा, राष्ट्रीय स्वाभिमान व अस्मिता जागरूक व्हावी, याकरिता हे निवेदन देण्यात आले. ज्या वयात विद्यार्थ्यांची शैक्षणिक जडणघडण होते, त्या काळात विद्यार्थ्यांना जगाच्या पटलावर अधिराज्य केलेले अभ्यासू, धुरंदर, युगपुरुष, लढवय्ये, हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कळावा अशा प्रेरणादायी युगपुरुष राजाचा इतिहास हा सीबीएसई च्या अभ्यासक्रमामध्ये असणे गरजेचे आहे. ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाने माणसाची जडणघडण होते त्याच राजाचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न संघटनेतर्फे करण्यात येत आहे.
