Home Blog Page 1118

कॉंग्रेसने राजस्थानमधील ३ उमेदवार बदलले, आतापर्यंत 198 उमेदवार जाहीर

काँग्रेसने आतापर्यंत देशभरात 198 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

काँग्रेसमध्ये आतापर्यंत राजस्थानमधील तीन जागांवर उमेदवार बदलले आहेत. जयपूर, भिलवाडा आणि राजसमंद जागांवर उमेदवार बदलले आहेत. जयपूरमधून उमेदवार बनवलेले सुनील शर्मा यांनी आरएसएस समर्थक संघटनेच्या जयपूर डायलॉग्सशी संबंध असल्याच्या वादामुळे तिकीट परत केले, त्यानंतर प्रताप सिंह खाचरियावास यांना उमेदवारी देण्यात आली. आता भिलवाडामधून दामोदर गुर्जर यांच्या जागी सीपी जोशी यांना तिकीट देण्यात आले आहे. राजसमंदचे उमेदवार सुदर्शन रावत यांनी एक दिवस आधीच तिकीट सरेंडर केले होते. त्यांच्या जागी दामोदर गुर्जर यांना राजसमंदमधून तिकीट देण्यात आले आहे.

वास्तविक सीपी जोशी सुरुवातीला निवडणूक लढवण्यास तयार नव्हते. सुदर्शनसिंग रावत यांचे तिकीट परत करून आणि एकाही ब्राह्मण चेहऱ्याला तिकीट न दिल्याने चुकीचा संदेश जात असल्याचे पाहून काँग्रेसने आपली रणनीती बदलली. सर्वांनी सीपी जोशी यांचे नाव सुचवले, पण त्यांना निवडणूक लढवण्यासाठी त्यांचे मन वळवणेही गरजेचे होते. यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा आणि प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी त्यांना निवडणूक लढवण्यास तयार केले. त्यात दिल्लीतील काही ज्येष्ठ नेत्यांनीही सीपी जोशी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर सीपी जोशी यांना तिकीट देण्याचा प्रस्ताव हायकमांडकडे पाठवण्यात आला होता.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर:सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, नीलेश लंके यांना उमेदवारी, जयंत पाटील यांची घोषणा

मुंबई– शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर दिंडोरी मधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अपेक्षेप्रमाणे शिरुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कालच लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे नीलेश लंके यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार गटाने पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीच्या वतीने अद्याप या मतदारसंघातून उमेदवार जाहीर झालेला नाही. मात्र, तरी देखील अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. आता सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली असून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी देखील जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अहमदनगरमध्ये लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढत

अपेक्षेप्रमाणे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून नीलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नीलेश लंके यांनी कालच आमदारकीचा राजीनामा देत आपण लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ते शरद पवार गटाचे उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. आज त्यांना उमेदवारी जाहीर झाली असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यासमोर दिनेश लंके यांचे तगडे आव्हान असणार आहे.

आढळराव पाटील यांच्या विरोधात डॉ. अमोल कोल्हे

शिरूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा शरदचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आढळराव पाटील हे असणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी या आधी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे ही लढत देखील काट्याची टक्कर होणार असल्याची चर्चा सध्या दिसून येत आहे.

 बंडोबा झाले थंडोबा ,डरकाळ्या हवेतच विरल्या,फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर बदलले सूर

पुणे-माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अखेर बारामती मतदारसंघातून लढणारच लढणारच , अजित दादांना धडा शिकविणारच अशा डरकाळ्या मारता मारता अखेरीस फडणविसांच्या मध्यस्थीनंतर सूर बदलले असून आता त्यांनी माघार घेतली आहे. पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय शिवतारेंनी घेतला आहे. स्वतः शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. तसेच गुंजवणीचे पाणी पुरंदरला देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने निवडणूक लढवणार नसल्याचे शिवतारे म्हणाले. शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे बारामती लोकसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, शिवतारे यांनी बारामतीत महायुतीचा प्रचार करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. तसेच विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेतल्याने आता बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे.दोन-तीन दिवसांपूर्वीच बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विजय शिवतारेंची विशेष बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात मध्यस्थी केल्याची रंगली होती. तेव्हाच शिवतारे हे माघार घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र शिवतारेंनी निर्णय जाहीर केला नव्हता. अखेर आज शिवतारेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माघार घेत बारामतीमधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला.

तसेच एकनाथ शिंदे यांचे न ऐकल्याने ते माझ्यावर रागावले असेही विजय शिवतारे म्हणाले. बोलतांना ते म्हणाले, ”आज निवडणूक न लढवण्याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या तिखट प्रतिक्रियाही उमटल्या. पण मी लढल्यावर काय होईल, यावर ही कारणमीमांसा झाली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बैठक झाली. मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांचे ऐकत नव्हतो म्हणून ते रागावले. तसेच माझ्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत आहेत. त्यांना आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल”, असे मला सांगण्यात आले.

तसेच आता गुंजवणीचे पाणी पुरंदरला देण्याचे आश्वासन मला देण्यात आले. याशिवाय मोदींना पंतप्रधान करण्यासाठी माघार घेत आहे असे शिवतारे यांनी सांगितले. महायुतीला मोठा फटका बसणार होता असे मला सांगण्यात आले. मोदींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असे शिवतारे म्हणाले.

 निरंजन टकले यांची काँग्रेस भवनला भेट.

    पुणे-      आज दि. ३० मार्च २०२४ रोजी जेष्ठ पत्रकार आणि लढाऊ कार्यकर्ते लेखक निरंजन टकले यांनी काँग्रेस भवनला भेट दिली. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष  मोहन जोशी, शिवसेनेचे  गजानन थरकुडे, संजय मोरे,  संग्राम खोपडे उपस्थित होते.

     भारत जोडो अभियानचे समन्वयक प्रशांत कोठाडिया यांनी या बैठकीचे आयोजन केले व संदिप बर्वे, ॲड. संदिप ताम्हणकर आणि भारत जोडो अभियानचे इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

     यावेळी निरंजन टकले यांनी नाशिक शहरात केलेले वेगवेगळे उपक्रम, बुथ कार्यकर्ता प्रशिक्षण, कोपरा सभा कार्यकर्ता प्रशिक्षण, ६००० सोशल मिडिया वॉरीयर यांची टिम बांधणे याचे अनुभव सांगितले. तसेच भाजपा, संघ आणि मोदी सरकारचा खोटा प्रचार प्रत्येक ठिकाणी खोडून काढण्याची रणनिती विषद केली.

     यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘पुण्यात महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी निरंजन टकले यांचा एक तपशिलवार प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जाईल आणि पुण्यातही अशीच टिम उभी केली जाईल असे नियोजन आहे असे सांगितले.’’

     सर्व उपस्थितांचे आभार मानून निरंजन टकले यांचा शाल आणि तिरंगी पट्टी देऊन स्वागतपर सत्कार केला.

चांगली वाणी श्रवणाने मिळेल नशामुक्तीची प्रेरणा-आचार्य श्री महाश्रमणजी

आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीच्या वतीने आयोजित प्रवचनाचा दुसरा दिवस
पुणे : चांगल्या विचारांच्या श्रवणाने जीवनात आध्यात्मिक विकास शक्य आहे. कानामध्ये आभूषणे घातल्याने शोभा वाढणार नाही, तर ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्याने कानाची शोभा वाढेल. आधुनिक युगात डिजिटल डिटॉक्स आणि नशेच्या समुद्रात अडकलेल्या तरुणाईला बाहेर काढण्याकरिता साधू- संतांची व चांगल्या विचारांची वाणी ऐकविणे आवश्यक आहे. चांगली वाणी श्रवण केल्याने नशामुक्तीची प्रेरणा मिळेल, असे  जैन तेरापंथचे धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांनी सांगितले.

आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीतर्फे  गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात आचार्य श्री महाश्रमणजी यांची प्रवचनमाला सुरु आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. यावेळी वालचंद संचेती, पं. वसंतराव गाडगीळ यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
श्री महाश्रमणजी म्हणाले, मोबाईल सारख्या यंत्राचा अतिवापर होत नाही ना? हे आपण पाहायला हवे. त्याच्या वापरावर आपला संयम असणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थी देखील सध्या नशेच्या विळख्यात अडकत आहेत. त्यांना त्यातून बाहेर काढण्याकरिता शाळा व महाविद्यालयांमध्ये संतांची प्रवचने व्हायला हवी.

ते पुढे म्हणाले, आपण काय ऐकले? का ऐकले? आणि कसे ऐकले पाहिजे? या तीन प्रश्नांची उत्तरे मिळाली, तर चांगली माहिती मिळून संतुष्ट होत काम करू शकतो. आजच्या युगात सामग्री खूप प्रमाणात आहे. त्यातील संतांचे विचार, भक्तीमय भजन आणि जीवनात उपयोगी पडेल असेच ऐकायला हवे. चांगली प्रेरणा देणारी वाणी आपण ऐकायला हवी. मार्गदर्शक, हितकर आणि उपयुक्त गोष्टी ऐकल्यास आपला फायदा होणार आहे.

हित संपादनासाठी आपण समोरच्या व्यक्तीचे देखील ऐकायला हवे. त्यातून ऐकणाऱ्या आणि सांगणाऱ्या अशा दोन्ही व्यक्तींचे हित होईल. आर्ट ऑफ हिअरिंग ही देखील एक कला आहे. एखाद्या प्रवचन किंवा व्याख्यानात वक्त्यांनी सांगितलेले विचार मनापासून ऐकल्यास एखादा श्रोता देखील पुढे जाऊन  चांगला वक्ता होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

श्री महाश्रमणजी यांचे गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात दिनांक २ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ९.३० वाजता प्रवचन होणार असून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समिति एवं समस्त तेरापंथ समाज पुणे, श्री भिक्षु मेमोरियल फाउंडेशन, तेरापंथ युवक परिषद, तेरापंथ महिला मंडळ, तेरापंथ प्रोफेशनल फोरम, अणुव्रत समिती आयोजनात सहभागी झाले आहे.

श्री शिवाजी मराठा सोसायटी आर्किटेक्चर महाविद्यालयाचा पदवीप्रदान सोहळा संपन्न

विविध गुणदर्शन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य सादर 

पुणे: श्री शिवाजी मराठा सोसायटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आणि माजी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते.
सहकारनगरमधील समाजभूषण विठ्ठलराव सातव हॉल मध्ये कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे नगररचना विभागाचे उपसंचालक डी. एल वाघमोडे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन प्रमुख पाहुणे व संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला गुणांचे सादरीकरण केले. तसेच माजी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग लाभला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बजरंग सुतार यांनी आभार व्यक्त केले.

भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांच्या तावडीतून २३ पाकिस्तानीना वाचविले

भारतीय नौदलाने अपहरणाचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडत समुद्री चाच्यांच्या तावडीतून एक इराणी जहाजाला सुखरूप बाहेर काढले आहे.

मासेमारी करणाऱ्या या इराणी जहाजासह इंडियन नेव्हीने २३ पाकिस्तानी क्रू मेबर्सना देखील सुरक्षितपणे वाचवले आहे. तब्बल १२ तासांहून अधिक वेळ चाललेल्या या ऑफरेशनबद्दल नौदलाने माहिती दिली आहे.

आमची विशेष टीम त्या प्रदेशाचा तपासणी करेल, जेणेकरून तो भाग मासेमारी करणे तसेच इतर कामांसाठी सुरक्षित होईल. गुरूवारीच जहाज समुद्री चाच्यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर नौदलाने त्यांच्या सुटकेसाठी मोहिम सुरू केली होती, अशी माहिती भारतीय नौदलाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.

भारतीय नौदलाने एडनच्या खाडीजवळ समुद्री चाच्यांच्याहल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि कित्येक तासांच्या कारवाईनंतर २३ पाकिस्तानी नागरिक चालक दलाला भारतीय नौदलाने रेस्क्यू केले. तसेच इराणी मासेमारी जहाज अल कंबर ७८६ वरील समुद्री चाच्यांनी आत्मसमर्पण केले, नौदलाला २८ मार्च संध्याकाळी इराणी मासेमारी जहाज अल कंबर ७८६ वर समुद्री चाच्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळाली होती.

ही माहिती मिळताच नौदलाने समुद्री सुरक्षा ऑपरेशनसाठी अरबी सागरात तैनात दोन जहाजांना इराणी जहाजाच्या रेस्क्यूसाठी रवाना केले. नौदलाने आपल्या निवेदनात सांगितले की, या घटनेवेळी जहाज सोकोट्रापासून तब्बल ९० एनएम दक्षिण पश्चिमेत होते आणि समुद्री चाचे या जहाजावर होते. अपहरण झालेल्या एफव्हीला २९ मार्च रोजी थांबवण्यात आले.

सोकोट्रा बेटे एडन खाडीजवळ हिंदी महासागरात आहेत, येथे नुकतेच व्यापारी जहाजांवर हल्ले वाढल्याने भारतीय नौदलाने आपलं लक्ष वाढवलं आहे.

पाच जानेवारी रोजी भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांकडून अपहरण झाल्यानंतर लायबेरीयाचा ध्वज असलेले जहाज एमव्ही लीला नोरफोकला सोमालीच्या किनाऱ्यावरून रेस्क्यू केले होते. २३ मार्च रोजी नोदलाचे स्टाफ प्रमुख अॅडमिरल आर हरि कुमार यांनी सांगितलं की हिंदी महासाहर क्षेत्रातला अधिक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल.

काँस्टेबल मंजू’ मध्ये अभिनेत्री विद्या सावळे आणि तिच्या जुळ्या मुली नेहा आणि निकिता दिसणार एकत्र

आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून कलाकारांची मुलं अभिनयाकडे वळतात. लहानपणापासून आपल्या कलाकार आई-वडिलांमध्ये पाहिलेले अभिनय कौशल्य, सोबतीला त्यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन यामुळे मुलांना त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात एक आत्मविश्वास मिळतो. असाच एक प्रवास सुरू झाला आहे कलाकार मायलेकींचा. कलाकार आई आणि तिच्या दोन जुळ्या मुली अशी ही माय लेकींची जोडी लवकरच मराठी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणार आहे.

‘सन मराठी’वर ‘काँस्टेबल मंजू’ ही नवीन मालिका येत्या १८ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेत्री विद्या सावळे आणि त्यांच्या जुळ्या मुली नेहा आणि निकिता ‘मम्मीसाहेब’ आणि ‘सवी- कवी’ या भूमिका साकारणार आहेत. आई आणि तिच्या जुळ्या मुली यांना छोट्या पडद्यावर एकत्र पाहण्याचा योग सन मराठीने जुळवून आणला आहे.

अगोदरच ‘काँस्टेबल मंजू’ मालिकेची इंटरेस्टिंग झलक पाहून मालिकेच्या टीमने प्रेक्षकांची आतुरता वाढवली आहे आणि त्यात आता या मायलेकींची भर…

संदीप जाधव निर्मित ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेचे संवाद तेजपाल वाघ यांनी लिहिले असून स्वप्नील गांगुर्डे यांनी कथा, पटकथा लिहिली आहे. भिन्न स्वभावाची अनोखी प्रेम कहाणी गेल्या १८ मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त सन मराठी वाहिनीवर प्रदर्शित होते आहे.

सातारा येथे शिवदुर्गा संवाद दौऱ्याचे आयोजन

;शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांसोबत उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी साधला संवाद

सातारा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांसोबत सातारा येथे शिवदुर्गा मेळावा आयोजित करण्यात आला. याद्वारे महिलांचे मतदानामध्ये अधिक सहभाग वाढावा, महायुतीच्या उमेदवारांना अधिकाधिक मतदान मिळावं यासाठी महिला शिवसैनिकांनी कशा प्रकारे प्रचार केला पाहिजे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, तसेच शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विविध योजना राबवत असताना ज्या अडचणी येत असतात त्यातून सरकार त्यांच्या पाठीशी आहे याचा संदेश जावा म्हणून ‘शिवदुर्गा संवाद दौरा’ आयोजित करण्यात आला असल्याचे उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

आज सातारा येथे शिवसेना महिला आघाडी सोबत डॉ. गोऱ्हे यांनी संवाद साधला. याप्रसंगी, संपर्क प्रमुख शारदाताई जाधव, शीतल कचरे, सुलोचना पवार, संगीता पवार, विद्या शिंदे, विमल सुपाणेकर, शोभा जैन, वनिता जाधव, मेघा चोरगे, सुजाता सपकाळ, नीता लोंढे, श्वेता वाघमारे, कल्पना पवार, सुजाता गायकवाड यांसह सातारा जिल्हा व तालुका माण-खटाव फलटण, कराड, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, पांचगणी, पाटण येथील शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास, आनंदाचा शिधा, लेक लाडकी योजना, महिला धोरण यांसारखे निर्णय घेऊन महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण करण्यावर भर दिला असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातले शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई अतिशय समर्थपणाने काम करत आहेत. तसेच महिलांच्यासाठी शेतकरी कर्जमुक्ती, उद्योजकता, स्त्रियांची सुरक्षा, महिला विषयक कायदे यावरती जून- जुलै महिन्यामध्ये सातत्याने शिबिरांची मोहीम घेत असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच शेतकरी व शेतमजूर महिलांच्या प्रश्नांवर शिवसेना महिला आघाडीने संवाद करावा असेही त्यांनी आवाहन केले. महिला मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी गाव-गाव बैठका घेऊन त्यांच्यापर्यंत महायुतीचे काम पोहोचवण्याचा निर्धारही स्त्रियांनी केला.

निवडणूकीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे :- लोकसभा निवडणूक कामासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्य़वेक्षक आणि समन्वयक अधिकारी यांचे प्रशिक्षण हडपसर येथील साधना महाविद्यालयात आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षणात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी अधिकाऱ्यांना मतदार यादीचे अद्ययावतीकरण, हडपसर विधानसभा मतदारसंघांतर्गत येणारी मतदान केंद्रे तसेच मतदार सहायता केंद्र , मतदाता ओळख चिठ्ठी वितरण, मतदार ओळख पत्र तसेच टपाली मतदान याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी सर्व समन्वयक अधिकारी आणि सहायक यांच्या निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेण्यात आला आणि त्यांना आलेल्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणासाठी अतिरिक्त मतदार नोंदणी अधिकारी नागनाथ भोसले व सर्व संबंधीत प्रशिक्षणार्थी सहभागी झाले.

रिक्षा चालकांना मतदान जागृती करण्याचे आवाहन

लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हडपसर येथे स्वीप व्यवस्थापन समितीच्यावतीने हडपसर परिसरातील श्री दत्त रिक्षा स्टॅन्ड येथे मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी रिक्षा चालकांना मतदान करण्याविषयी आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर रिक्षातील प्रवाशांनादेखील मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

स्वीपचे समन्वयक अमरदीप मगदूम, मीडिया समन्वयक शैलेश शिंदे, सहायक संतोष गायकवाड यावेळी उपस्थित होते.
०००

गिरीश बापट यांच्या पुण्यतिथीनिमित्त निवारा वृद्धाश्रमात शिधावाटप

कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम

पुणे : सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम अग्रेसर राहिलेले आणि पुणे शहराच्या विकासाला गती देणारे लोकनेते दिवंगत खासदार गिरीश भाऊ बापट यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त आज कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपाकडून निवारा वृद्धाश्रमात शिधावाटप करण्यात आले. मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. गिरीश भाऊ बापट यांनी समाजातील प्रत्येक घटकाला मदतीची भूमिका आपल्या आयुष्यामध्ये कायम निभावली, त्यांच्या पुण्यतिथीदिनी वृध्दाश्रमात शिधा वाटप करत खऱ्या अर्थाने एक आगळवेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी बोलताना श्री. हेमंत रासने म्हणाले की “गेली तीन दशके लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना भाजपा परिवाराचे प्रमुख म्हणून स्वर्गीय गिरीश भाऊंनी भूमिका पार पाडली. सामान्यांना मदत करण्याचे संस्कार त्यांनी आम्हाला दिले असून त्यांची शिकवण आणि दाखवलेल्या वाटेवरून लोककल्याणाचे काम संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून केले जाते. पुण्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे शहराला प्रगतीपथावर घेऊन जाणारे आहे. गरजवंताला मदतीचा हात पुढे करण्याचे त्यांनी केलेले संस्कार खऱ्या अर्थाने राबवण्यासाठी आज निवारा वृद्धाश्रमात छोटीशी भेट म्हणून शिधा वाटप करण्यात आले”.

यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष श्री. राजेंद्र काकडे, मतदारसंघाचे पालक संजय मामा देशमुख, मा. नगरसेवक अजय खेडेकर, गायत्री खडके, सरचिटणीस प्रणव गंजीवाले, राणीताई कांबळे, वैशालीताई नाईक, उमेश अण्णा चव्हाण, अमित कंक, चंद्रकांत पोटे, प्रशांत सुर्वे, वरिष्ठ उपाध्यक्ष निलेश कदम, महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पवार, युवा मोर्चा अध्यक्ष निर्मल हरिहर, अनिल बेलकर, तुषार रायकर यांच्यासह मतदार संघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रियेसाठी सविस्तर दळणवळण आराखडा तयार करा-डॉ.सुहास दिवसे

पुणे: जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी निवडणूक समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. निवडणूक प्रक्रियेसाठी दळणवळण आराखडा सूक्ष्मरितीने तयार करून त्यात विविध जबाबदाऱ्या पारपाडतांना प्रभावी संवादासाठी आवश्यक प्रक्रीया निश्चित करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, मावळ निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला (दूरदृष्यप्रणालीद्वारे) निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, निवडणूक समन्वयक अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते.

डॉ.दिवसे म्हणाले,मतदान, सुरक्षा व्यवस्था आणि आपत्तीच्यादृष्टीने विविध पैलूंचा समावेश दळणवळण आराखड्यात करावा, जेणेकरून प्रत्येक काम वेगाने पूर्ण होईल. ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांच्या मतदानासाठीच्या व्यवस्थेचाही या आराखड्यात विचार करावा.

प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी पुरेसे मनुष्यबळ देण्यात आले आहेत. त्यांचे प्रशिक्षण योग्यरितीने करण्यात यावे. मतदार यादीशी संबंधित कामे वेळेवर करण्यात यावी. नियंत्रण कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

मतमोजणी केंद्राचा आराखडा, सुरक्षा व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांचे मतदान, मतदान साहित्य वितरण, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदान केंद्रातील सुविधा, टपाली मतदान, सी-व्हिजील ॲपवरील तक्रारी, निवडणूक प्रचारासाठी विविध परवानग्या, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी आदी विविध विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

शासकीय तंत्रनिकेतनचा २४ वा पदविका प्रदान समारंभ ३ एप्रिल रोजी

पुणे, दि. २९: शासकीय तंत्रनिकेतन पुणे संस्थेचा पदविका प्रदान समारंभ बुधवार ३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.

या पदविका प्रदान समारंभास पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव उपस्थित राहणार आहेत.

या समारंभामध्ये स्थापत्य, विद्युत, अणुविद्युत व दूरसंचार, यंत्र, धातुशास्त्र, संगणक, माहिती तंत्रज्ञान, ड्रेस डिझायनिंग अॅड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग या अभियांत्रिकी विद्या शाखेतील सर्व स्नातकांना पदविका प्रदान करण्यात येणार आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांपैकी शाखानिहाय गुणानुक्रमे प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मानचिन्हे, पारितोषिकाचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त ‘जाऊ देवाचिया गावा’ भव्य महानाट्य 

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ वा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा नुकताच लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र देहू येथे पार पडला. यानिमित्ताने जगद्गुरु संत तुकाराम महाराज देवस्थान संस्था व इस्कॉन, देहू आयोजित श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा जीवनपट उलगडणा-या ‘जाऊ देवाचिया गावा’ या महानाट्याचे तीन प्रयोग देहू मध्ये यशस्वीरीत्या पार पडले. 
महानाट्याचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय, खासदार श्रीरंग बारणे आणि देहू संस्थानच्या विश्वस्तांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुमारे दीडशेहून अधिक कलाकारांनी सादर केलेल्या ‘जाऊ देवाचिया गावा’ हे महानाट्य या सोहळ्याचे मुख्य आकर्षण राहिले. महानाट्याचे लेखन दिग्दर्शन संजय भोसले यांनी केले आहे. निर्मिती डॉ. जनार्दन चितोडे यांनी केली आहे. अशोक पत्कींनी दिलेल्या सुमधुर संगीतांवर मयूर वैद्य यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. 
या महानाट्यामुळे तुकोबारायांचा जीवनपट अगदी सर्वसाधारण लोकांना या नावीन्यपूर्ण कलाकृतीच्या माध्यमातून समजला, असे देहू संस्थांचे अध्यक्ष व विश्वस्त माणिक महाराज मोरे, पुरुषोत्तम मोरे, भानुदास मोरे महाराज यांनी सांगितले. या कार्यक्रमाची व्यवस्था देहू देवस्थान आणि देहूच्या इस्कॉन मंदिराच्या भक्तवृंदा तर्फे करण्यात आली. अभिजीत कंद यांनी सूत्रसंचालन केले. 

 शहरांमधील मोकळ्या  जागांच्या  संरक्षणावर संशोधन – आर्किटेक्ट आशीष केळकर यांचे संशोधन  आंतरराष्ट्रीय  जर्नलमध्ये 

पुणे :शहरांमधील मोकळ्या  जागांच्या  संरक्षणाबद्दल आर्किटेक्ट आशिष केळकर यांचे  संशोधन ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्रिएटीव्ह रिसर्च थॉट्स’ या आंतरराष्ट्रीय  जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.व्यवसायाने आर्किटेक्ट,अर्बन प्लॅनर असणाऱ्या  आशीष  केळकर यांनी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट लंडन मधून कंट्री अँड टाऊन प्लानिंग  विषयात मास्टर्स डिग्री घेतली असून त्यांचे अनेक शोध निबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाले आहेत.या क्षेत्रात कामाचा त्यांना २२ हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. ‘शहरातील अनियंत्रित वाढीमुळे शहरांमधील मोकळ्या जागा,पर्यावरण पाण्याची गुणवत्ता,हवा आणि सांडपाणी व्यवस्थापन धोक्यात आले असून तेथील मोकळ्या  जागांच्या  संरक्षणासाठी धोरणात्मक बदल केल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही’,असे ‘ इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्रिएटीव्ह रिसर्च थॉट्स’ मध्ये प्रकाशित संशोधनात  आशीष केळकर यांनी म्हटले आहे.
‘दर्जेदार मोकळ्या जागा ही शहरात चंगळ न राहता निकड  बनली आहे.मेट्रो शहरांमधील विशेषत: मुंबईतील मोकळ्या जागांचे संरक्षण करण्यासाठी सध्याच्या धोरणात्मक साधनांना सक्षमीकरणाची नितांत गरज आहे.शहरातील नागरिक विशेषत: गरिबांच्या जीवनमानावर त्याचा परिणाम  होत आहे’,असे या शोधनिबंधात त्यांनी नमूद केले  आहे.  

‘मोकळ्या जागेतील लोकांच्या सामाजिक संवादामुळे व्यवसाय वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे शहरे वाढतात.तथापि,भारतीय शहरांमध्ये मनोरंजन आणि विश्रांतीच्या सध्याच्या कल्पनेत बदल झाला आहे.ही कल्पना इनडोअर स्पेसभोवती फिरते आणि त्यासाठी पैसे दिले जातात. दर्जेदार मोकळ्या जागा ही चंगळ (लक्झरी) बनली आहे.नितांत गरज आहे आणि विशेषत: गरिबांना त्रास देत आहे.मुंबईतील निम्म्याहून अधिक शहरी लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत असल्याने,तेथे राहणाऱ्यांच्या  जीवनमानावर  मोकळ्या जागांच्या कमतरतेमुळे परिणाम होत आहे.
 जमिनीच्या वापर(लँड युज) बदलल्याने आणि अनियंत्रित नागरी विस्तारामुळे पर्यावरण,घरांची उपलब्धता,पाणी गुणवत्ता,हवेचा दर्जा,कचरा व्यवस्थापन या परिणाम झाला आहे.संशोधनानुसार,मुंबईतील हरित आच्छादन १९७३ मध्ये ५३.६३ टक्क्यांवर घसरले,२००९ मध्ये ३३.७६ टक्क्यांपर्यंत घसरले  आहे.याचा अर्थ ६२ टक्के हरित आच्छादन आपण गमावले आहे.याच कालावधीत बिल्ट-अप एरिया १५५ टक्क्यांनी वाढला आहे.

‘दरडोई शहरी मोकळी जागा सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे सक्षम  धोरण महत्त्वाचे आहे.मुंबईतील मोकळ्या जागांचे संरक्षण करताना साधनांना सक्षमीकरणाची गरज आहे. स्मार्ट शहरांबरोबर बरोबरच स्मार्ट व्हिलेजच्या विकासात व्यापक आणि अधिक मूलगामी धोरणांची गरज आहे.शहर पातळीवरील छोट्या सुधारणा धोरणांव्यतिरिक्त स्मार्ट व्हिलेजेस निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे.शहरांमधील पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे.ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी आणि स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी ग्रामीण स्तरावर रोजगार निर्माण केला पाहिजे.स्वावलंबी  खेड्यांची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी कल्पना केली होती,त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे’,असे निष्कर्ष देखील आशीष  केळकर यांनी मांडले आहेत.