पुणे-माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अखेर बारामती मतदारसंघातून लढणारच लढणारच , अजित दादांना धडा शिकविणारच अशा डरकाळ्या मारता मारता अखेरीस फडणविसांच्या मध्यस्थीनंतर सूर बदलले असून आता त्यांनी माघार घेतली आहे. पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय शिवतारेंनी घेतला आहे. स्वतः शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. तसेच गुंजवणीचे पाणी पुरंदरला देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने निवडणूक लढवणार नसल्याचे शिवतारे म्हणाले. शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे बारामती लोकसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, शिवतारे यांनी बारामतीत महायुतीचा प्रचार करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. तसेच विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेतल्याने आता बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे.दोन-तीन दिवसांपूर्वीच बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विजय शिवतारेंची विशेष बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात मध्यस्थी केल्याची रंगली होती. तेव्हाच शिवतारे हे माघार घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र शिवतारेंनी निर्णय जाहीर केला नव्हता. अखेर आज शिवतारेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माघार घेत बारामतीमधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला.
तसेच एकनाथ शिंदे यांचे न ऐकल्याने ते माझ्यावर रागावले असेही विजय शिवतारे म्हणाले. बोलतांना ते म्हणाले, ”आज निवडणूक न लढवण्याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या तिखट प्रतिक्रियाही उमटल्या. पण मी लढल्यावर काय होईल, यावर ही कारणमीमांसा झाली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बैठक झाली. मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांचे ऐकत नव्हतो म्हणून ते रागावले. तसेच माझ्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत आहेत. त्यांना आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल”, असे मला सांगण्यात आले.
तसेच आता गुंजवणीचे पाणी पुरंदरला देण्याचे आश्वासन मला देण्यात आले. याशिवाय मोदींना पंतप्रधान करण्यासाठी माघार घेत आहे असे शिवतारे यांनी सांगितले. महायुतीला मोठा फटका बसणार होता असे मला सांगण्यात आले. मोदींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असे शिवतारे म्हणाले.