मुंबई– शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर दिंडोरी मधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अपेक्षेप्रमाणे शिरुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कालच लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे नीलेश लंके यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार गटाने पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीच्या वतीने अद्याप या मतदारसंघातून उमेदवार जाहीर झालेला नाही. मात्र, तरी देखील अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. आता सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली असून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी देखील जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अहमदनगरमध्ये लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढत
अपेक्षेप्रमाणे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून नीलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नीलेश लंके यांनी कालच आमदारकीचा राजीनामा देत आपण लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ते शरद पवार गटाचे उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. आज त्यांना उमेदवारी जाहीर झाली असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यासमोर दिनेश लंके यांचे तगडे आव्हान असणार आहे.
आढळराव पाटील यांच्या विरोधात डॉ. अमोल कोल्हे
शिरूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा शरदचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आढळराव पाटील हे असणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी या आधी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे ही लढत देखील काट्याची टक्कर होणार असल्याची चर्चा सध्या दिसून येत आहे.