राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ वा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा नुकताच लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र देहू येथे पार पडला. यानिमित्ताने जगद्गुरु संत तुकाराम महाराज देवस्थान संस्था व इस्कॉन, देहू आयोजित श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा जीवनपट उलगडणा-या ‘जाऊ देवाचिया गावा’ या महानाट्याचे तीन प्रयोग देहू मध्ये यशस्वीरीत्या पार पडले.
महानाट्याचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय, खासदार श्रीरंग बारणे आणि देहू संस्थानच्या विश्वस्तांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुमारे दीडशेहून अधिक कलाकारांनी सादर केलेल्या ‘जाऊ देवाचिया गावा’ हे महानाट्य या सोहळ्याचे मुख्य आकर्षण राहिले. महानाट्याचे लेखन दिग्दर्शन संजय भोसले यांनी केले आहे. निर्मिती डॉ. जनार्दन चितोडे यांनी केली आहे. अशोक पत्कींनी दिलेल्या सुमधुर संगीतांवर मयूर वैद्य यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे.
या महानाट्यामुळे तुकोबारायांचा जीवनपट अगदी सर्वसाधारण लोकांना या नावीन्यपूर्ण कलाकृतीच्या माध्यमातून समजला, असे देहू संस्थांचे अध्यक्ष व विश्वस्त माणिक महाराज मोरे, पुरुषोत्तम मोरे, भानुदास मोरे महाराज यांनी सांगितले. या कार्यक्रमाची व्यवस्था देहू देवस्थान आणि देहूच्या इस्कॉन मंदिराच्या भक्तवृंदा तर्फे करण्यात आली. अभिजीत कंद यांनी सूत्रसंचालन केले.