मुंबई दिनांक ३० मार्च २०२४
‘मी आणि माझे कुटुंब’ अशा परिवारवादी मानसिकता जपणाऱ्यांना पराभूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज दादर वसंत स्मृती येथे केले. लोकतंत्र सेनानी संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, आणीबाणीच्या काळात असंख्य लोकांना यातना सहन कराव्या लागल्या. ज्यांनी आणीबाणी लावली ते लोक आजही त्याला चूक/ पाप मानायला तयार नाहीत. त्या मानसिकतेचे समर्थन आजही केले जाते. एक व्यक्ती, एक पद आणि एक नेता अशी कार्यप्रणाली आजही काँग्रेसमध्ये आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधींवरील एका सुनावणी दरम्यान न्यायाधीशापेक्षा पंतप्रधानांची खुर्ची मोठी होती यातून त्यांची मानसिकता दिसून येते. देशाच्या लोकशाहीचे रक्षण करण्याचे काम लोकतांत्रिक सेनानी यांनी केले आहे. त्या विचारधारेच्या विरोधात लढाई आजही चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला प्रधान सेवक म्हणून ‘सबका साथ सबका विकास’ नारा देतात आणि काँग्रेसचा नारा ‘आय एम इंदिरा, आय एम इंडिया’ असा होता अशीही टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर जाऊन आणीबाणीत तुरुंगात गेलेल्या नागरिकांची पेन्शन बंद केली. हिंदुत्वाचे विचार सोडले. त्यामुळे आजच्या घडीला लोकशाही वाचवण्यासाठी या मानसिकतेचा पराभव करणे गरजेचे आहे असेही आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले. यावेळी लोकतंत्र सेनानी संघाचे राष्ट्रीय सचिव कोमल छेडा, मुंबई भाजपा उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा, मधू कोटियन, उदय धर्माधिकारी, विवेक मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.